आजचा संडे स्पेशल मेन्यू आहे " दही वडे "
साहित्य : दोन वाट्या उडदाची डाळ (ह्यात साधारणपणे
३० वडे होतील) (मुगाची आणि उडदाची डाळ निम्मी निम्मी घेतली तरी चालेल. मुगाच्या डाळीमुळे
वड्यांना छान रंगही येतो), एक लिटर दूध , वडे तळणीसाठी तेल, चवीनुसार मीठ व साखर
आणि दहीवड्यावर वरून घेण्यासाठी आवडीप्रमाणे मीरपूड, लाल
तिखट, चाट मसाला,जिरे पूड,चिरलेली कोथिंबीर इत्यादी.
कृती : सर्वात प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुवून साधारण सात ते आठ तास भरपूर पाण्यात
भिजत घालावी,
दूध तापवून कोमट झाल्यावर विरजण
लावून दोन तासांनी फ्रिजमध्ये ठेवावे.सात - आठ तासांनंतर उडदाची डाळ चांगली भिजली
की ती चाळणीत घालून पाणी उपसून टाकावे. मिक्सरमध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ
वाटताना पाणी आवश्यक तेवढेच ठेवावे. आवडत असल्यास वाटत असतांनाच डाळीमध्ये जिरे/
हिरवी मिरची घातले तरी चालेल. वाटलेले पीठ मेदूवड्यांपेक्षा किंचीतच सैल हवे. पीठ
चमच्यात घेऊन वरून सोडले असता एकसंध गोळा पडायला हवा. पीठाचा दाटपणा भज्यांप्रमाणे,
केकप्रमाणे, इडलीप्रमाणे असायला नको.
डोश्याप्रमाणे तर नकोच नको. दहीवडे/ मेदूवडे करण्यामधे पीठ वाटणे एवढे एकच
कौशल्याचे काम आहे , वाटलेल्या पीठात चवीप्रमाणे मीठ घालून
साधारण अर्ध्या-पाऊण तासासाठी ताटाने झाकून ठेवून द्या.
विरजणाच्या दह्यात चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ,
साखर आणि भाजलेल्या जिर्याची पूड घालून दही व्यवस्थित गुळगुळीत
होईपर्यंत घुसळून व फेटून घ्या. किंचीत आल्याचा रस घातल्याने दह्याला मस्त चव व
स्वादही येतो. विरजणाचे अंगचे पाणी आणि मीठ साखरेमुळे सुटलेल्या पाण्यामुळे दही जेव्हढे
सैल होईल तेवढेच पुरेसे होते. पण तयार झालेले दही फारच घट्ट वाटले तरच पाणी मिसळून
दही फ्रिजमधे थंडगार व्हायला ठेवून द्या.
अर्ध्या-पाऊण तासानंतर
उडदाच्या डाळीचे वाटलेले पीठ चमच्याने व्यवस्थित आणि भरपूर फेटून घ्या. तळणीसाठी
तेल तापवून आपल्याला आवडतील तेवढ्या आकाराचे वडे किंचीत सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या.
तळलेले सगळे वडे एका पसरट तसराळयात
घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात किंचीत मीठ आणि हिंग मिसळून घ्या. आणि
हे पाणी वड्यांवर घाला. साधारण दहा मिनिटे वड्यांमधे पाणी राहू द्या.
मग एकेक वडा हातात घेऊन हलक्या हलक्या हाताने पाणी पिळून घ्या. वडा
मोडता कामा नये. हे वडे घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात घालून फ्रिजमधे ठेवले तर
दोन दिवस चांगले राहतात.
दहीवडे देताना एका खोलगट डिशमधे वडे घेऊन त्यावर तयार केलेले थंडगार
दही घालून त्यावर आवडीप्रमाणे चाट मसाला,जिरेपूड, मिरपूड, लाल तिखट, कोथिंबीर
भुरभुरवून मग द्यावे.
No comments:
Post a Comment