Thursday 19 September 2013

वाटली डाळ

 "वाटली डाळ"


मित्रहो नमस्कार,आज आहे गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर,२०१३ काल होती "अनंत चतुर्दशी" म्हणजेच श्रींच्या विसर्जनाचा दिवस,बाप्पांना आवडते म्हणून विसर्जनाचे वेळी खिरापतीचा प्रसाद म्हणून हरभर्‍याच्या डाळीची 'वाटली डाळ' करायची आपल्याकडे पूर्वापार परंपरेने चालत आलेली एक प्रथा आहे.आम्हीही काल आमच्या घरच्या गणेशाचे विधिपूर्वक विसर्जन केले त्यावेळी नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू व खिरापतीसाठी ही "वाटली डाळ" केली होती.त्याच वाटल्या दलीची रेसिपी मी आज तुमच्यासाठी येथे देत आहे. उद्या बेसनाच्या लाडवाची रेसिपी देईन . 

साहित्य : चार वाट्या चणा डाळ (हरभरा डाळ) , फोडणीसाठी तेल,मोहोरी,जिरे,हिंग ,लाल तिखट,हळद,कढीपत्त्याची पाने,मीठ , साखर,सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खवलेला चव. 

कृती : चार तास आगोदर चणा डाळ भिजत घालावी. मग मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत फोडणीसाठी तेल घेऊन ते तापल्यावर त्यात मोहोरी,जिरे,हिंग,हळद,चवीनुसार लाल तिखट 
घालून परतावे,मग त्यात वाटलेली डाळ घालून उलथन्याने चांगले हलवून मिसळून घ्यावे त्याचवेळी चवीपुरते साखर व मीठ घालून पुन्हा हलवावे.मधूनच पाण्याचा हबका मारून हलवावे.शेवटी वर एका स्टीलच्या ताटात पाणी घेऊन झाकून  एक दरदरून वाफ येऊ द्यावी.मग तात काढून त्यातील गरम पाणी डाळीत घालून ती पुन्हा एकदा  हलवावी. व झाकून ठेवावी. 
पाच मिनिटांनी झाकण काढून दिशमधून सर्व्ह करतेवेळी वरुन सजावटीसाठी  बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा चव घालून द्यावी. 

No comments:

Post a Comment