Monday 29 November 2021

मेतकूट मसाला पराठे

 आजच्या नाशत्यासाठी केला होता हा जरा हटके असा मेतकूट मसाला पराठा.

त्याचीच ही सचित्र रेसिपी ..

मेतकूट मसाला पराठे


साहित्य : पराठ्यांसाठी चार वाट्या कणीक, चमचाभर तेल,अर्धा चमचा मीठ,भांडभर पाणी, मसाल्यासाठी अर्धी वाटी मेतकूट, चार चमचे पातळ केलेले साजूक तूप, चार चमचे पातळ केलेले अमुलचे बटर,किसलेले अमुलचे चीज,पाव वाटी बारीक चिरून वाफवलेली मेथी,चवीनुसार आले,लसूण, हिरव्या मिरच्या व मीठ घालून बनवलेला खर्डा,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीरआणि एक कांदा बारीक चिरून ठेवा.पराठया सोबत तोंडीलावणे म्हणून देण्यासाठी हळदीचे लोणचे.
कृती : एका परातीमध्ये पराठ्यासाठी कणीक घ्या आणि त्यात तेल,मीठ व जरुरीप्रमाणे पाणी घालून पराठ्याचे पीठ भिजवून व मळून घेऊन ओल्या सूती कपड्याने झाकून ठेवा.
दुसरीकडे एका बाउलमध्ये मसाल्यासाठी अर्धी वाटी मेतकूटघ्या. त्यात चार चमचे पातळ केलेले साजूक तूप आणि चार चमचे पातळ केलेले अमुलचे बटर घाला. पाव वाटी बारीक चिरून वाफवलेली मेथी,चवीनुसार आले,लसूण,हिरव्या मिरच्या व मीठ घालून बनवलेला खर्डा घालून मिक्स करा.
आता भिजवून मुरत ठेवलेल्या कणकीतून एक लाडवा एव्हढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटा त्या पोळीवर हाताने मेतकूट मसालापेस्ट चोळून लावा . आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले चीज सगळीकडे भुरभुरा . आता त्या पोळीची एक आडवी व एक उभी घडी घाला किंवा गुंडाळी करून पुन्हा एकडा गोल आकाराचा पराठा लाटा.
गॅसवर एक निर्लेप तवा तापवून घेऊन त्यावर अमूल बटर वर दोन्ही बाजूंनी पराठा चांगला खरपूस भाजून घ्या.
एका सर्व्हिंग डिशमध्ये खरपूस भाजलेला गरम पराठा काढून घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर पसरून हळदीच्या लोणच्यासह सर्व्ह करा.

Friday 26 November 2021

खर्डा



पर्वाच्या दिवशी व्यायामासाठी मॉर्निंग वॉकला गेलो असतांना शनिपाराशेजारी एका भाजीवाल्याकडे जाड सालीच्या कमी तिखट मिरच्या पाहून खर्डा करावा अशी इच्छा झाली.लगेच पाव किलो मिरच्या घेतल्या.
घरी आल्यावर त्या मिरच्यांचा खर्डा केला .
मिरच्या स्वच्छ धुवून व कोरड्या पणचाआने पुसून घेतल्या ,एक लसणाचा कांदा सोलून घेतला. चार चमचे लाल मोहरी मिक्सरच्या भांड्यातून थोडेसे (चमचाभर) पाणी घालून फेटून घेतली.
मग मिक्सरच्या भांड्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घातले , लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे घातले. एल चमचा मीठ व एक चमचा तेल घालून मिक्सरवर वाटून घेतले.
दुसरीकडे गॅसवर एका काढल्यात फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी,हळद व हिंग घालून फोडणी केली आणि त्यात मिक्सरवर वाटून ठेवलेले मिरची-लसणाचे वाटण घालून परतून घेतले.
झाला खर्डा तयार.
पिठले,भाकरी,कांदा आणि हा खर्डा घेऊन खाल्ले. मस्त यssम्मी बेत झाला.

Wednesday 17 November 2021

चकलीची भाजी

चकलीची भाजी 

 


दिवाळीच्या चकल्या उरल्या होत्या. त्यांना जास्त दिवस झाल्यामुळे वास येण्याची शक्यता असल्याने लवकर संपवणे आवश्यक होते. मग मला एक आयडिया सुचली की अशी आपण ‘शेव’ वापरुन जशी शेव  भाजी करतो, त्याचप्रमाणे या शिल्लक चकल्यांचा वापर करून ‘चकली’ भाजी करावी.

 

या ‘चकली’ भाजीसाठी गॅसवर एका पॅनमध्ये तेलात हिंग, कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं . मग त्यात कांदा खोबरे वाटण घालून परतायचे ... थोडं  परतलं की त्यात मीठ आणि पाणी घालायचे. उकळी आली की त्यात शिल्लक उरलेआय चकल्या सोडायच्या. एक उकळी आली की कोथिंबीर बारीक चिरून घालायची.


Monday 8 November 2021

पूर्णालू

 

पूर्णालू



खूप छान पदार्थ आहे. तेलुगू लोकांच्यात  सणा-सुदीला हा पारंपारिक पदार्थ मिष्टान्न म्हणून आवर्जून केला जातो.

नेहमीपेक्षा थोडंसं घट्टसर डोश्याचं पीठ भिजवायच आणि त्यात पुरणाचा गोळा त्यात बुडवून शुद्ध तूपात 'पूर्णालू' तळा.

मऊ शिजलेल्या  हरभरा डाळीमध्ये गूळ आणि वेलची पावडर घालून घट्ट पुरणाचा गोळा बनवून ठेवा.

आता दुसरीकडे चार तास आधीच  भिजवून ठेवलेल्या उडदाच्या डाळीच्या पिठात तांदूळाची पिठी व चवीपुरते मीठ घालून सैलसर  पीठ भिजवून घ्या. (तयार डोश्याचे पीठ वापरले तरी चालेल किवा उडीद डाळ तांदूळ भिजवून नेहमिसारखे पीठ बनवले तरी हरकत नाही)

आता गॅसवर एका पॅनमध्ये तूप तापवून त्यात घट्ट पुरणाचे लिंबाएव्हढे आकाराचे गोळे करून ते डोश्याच्या पिठात बुडवून घ्या आणि तापलेल्या तुपातून तळून काढा.