Monday 30 December 2019

ब्रेड रिंग्स


ब्रेड रिंग्स

साहित्य : ८-१० ब्रेडचे स्लाईस, अर्धी वाटी तांदूळाची पिठी,एक चमचा लाल मिरचीचे तिखट,अर्धा चमचा जिरे पूड,अर्धा चमचा सैंधव मीठ,एक वाटीभर बारीक चिरलेली पालक्चि पाने,चवीनुसार मीठ,एक चमचा लिंबाका रस,तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल.
कृती : प्रथम मिक्सरच्या भांड्यात ब्रेड स्लाईसचे छोटे छोटे तुकडे, तांदूळाची पिठी, लाल मिरचीचे तिखट, जिरे पूड, सैंधव मीठ, बारीक चिरलेली पालकची पाने,चवीनुसार मीठ,लिंबाचा रस व थोडेसे घालून फिरवून घ्या व एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यात जरुरीनुसार तांदूळाची पीठ व पाणी घालून तेलाच्या हाताने मऊ पीठ भिजवून व मळून ठेवा.
दहा मिनिटांनी हाताला थोडेसे तेल लावून मुरलेल्या पिठाचा लिंबाएव्हढा गोळा घ्या आणि गोल छापता आकार करून मध्ये एका बोटाने आरपार भोक पाडून ती गोल आकाराची टिक्की/रिंग प्लेट मध्ये ठेवा. अशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्या रिंग्स बनवून घ्या.
दुसरीकडे गॅसवर एका पॅनमध्ये/कढईत तळणीसाठी तेल गरम करायला ठेवा. तेल चागले गरम झाले की एकेका वेळी ४-५ रिंग्स पॅन/काढीत तापलेल्या तेलात सोडून दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून क्रिस्पि झाल्या की  पेपर नॅप्किनवर काढा. अशाच रीतीने उर्वरित रिंग्स सुद्धा तळून घ्या.
टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत या गरम क्रिस्पि व क्रंची ब्रेड रिंग्स सर्व्ह करा.

Friday 27 December 2019

दुधातला झुणका (पिठले)


साहित्य : एक कप दुध , एक वाटी चणाडाळीच पीठ (बेसन) ,एक चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा ,बारीक चिरलेली कोथिंबीर ,डावभर तेल , चवीनुसार लाल तिखट व मीठ, फोडणीसाठी हिंग , मोहरी , जिरं आणि हळद.
कृती : प्रथम गॅसवर एक कढई तापत ठेऊन त्या कढईत तेल टाकून हिंग – मोहरी , जिऱ्याची फोडणी करावी . त्यात लसूण- हिरवी मिरचीचा ठेचा टाकून थोडेसे परतून घ्यावे आणि नंतर त्यात दुध टाकावे. हळद-तिखट – मीठ टाकून लगेच त्यात डाळीच पीठ टाकावं. थोडेसे हलवून झाकण ठेवावं. मंद आचेवर पिठल्याला वाफ आणावी आणि वाढताना थोडीशी त्यावर चिरलेली कोथिंबीर टाकावी .

मसाला पापड चे पराठे

मसाला पापड चे  पराठे





नाश्त्यासाठी एक अफलातून नवीन डिश

साहित्य : दोन लिज्जतचे भाजलेले पापड ,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,दोन चमचे सोलापुरी काळा मसाला,दोन चमचे गोडा मसाला, एक चमचा  प्रत्येकी धने-जिरे पूड, दोन चमचे पांढरे भाजलेले तीळ , दोन चमचे साखर,एक चमचा मीठ,एक चमचा लाल तिखट,दोन चमचे दही,दोन चमचे लिंबाचा रस,एक  चमचा हळद,अर्धा चमचा हिंग,दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन ,पराठ्यांसाठी भिजवून मळून ठेवलेली कणीक,एक वाटी अमुलचे बटर.
कृती : एका पसरट आकाराच्या लंगडीत किंवा तसराळ्यांत दोन लिज्जत भाजलेल्या पापडांचा हातानेच अगदी बारीक चुरा करून घ्या. मग त्यात अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन चमचे सोलापुरी काळा मसाला,दोन चमचे गोडा मसाला, एक चमचा  प्रत्येकी धने-जिरे पूड, दोन चमचे पांढरे भाजलेले तीळ , दोन चमचे साखर,एक चमचा मीठ,एक चमचा लाल तिखट,दोन चमचे दही,दोन चमचे लिंबाचा रस,एक  चमचा हळद,अर्धा चमचा हिंग घालून हातानेच कालवून चांगले मिक्स करून घ्या. त्यामिश्रणावर दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करा व मिश्रण झाकून १५ मिनिटे मुरत ठेवा.
मिश्रण १५ मिनिटे चांगले मुरले  की भिजवून व मळून  ठेवालेल्या कणकीचे लिंबा एव्हढ्या आकाराचे गोळे बनवून ठेवा. एकेक गोळा पोळपाटावर लाटून त्यात चमच्याने दोन चमचे पापड चुर्‍याचे मसाला सारण भरून पराठे लाटा आणि अमुल बटरचा वापर करून तापलेल्या तव्यावर मध्यम आंचेवर दोन्ही बाजूंनी पराठे भाजून घ्या.
ताज्या दहयासोबत नाश्ता म्हणून हे मसाला पापड पराठे सर्व्ह करा. खूपच  हेल्दि व टेस्टी लागतात हे पराठे .


Thursday 26 December 2019

मंगलोरी बन्स (केळ्याच्या स्वादिष्ट पुर्‍या)

#मंगलोरी #बन्स (केळ्याच्या स्वादिष्ट पुर्‍या)

ही मंगलोर ची खास स्पेशालिटी आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी आमचे परम स्नेही सोलापूरचे डॉक्टर बालिगा यांच्या कडे गेलो तेंव्हा त्यांच्या आईंनी एक दिवस नाष्ट्यासाठी केले होते तेंव्हा पहिल्यांदाच मी हे मंगलोरी बन्स खालयाचे आठवते आहे.
अति पिकलेली (खूप जास्त पिकलेली ) केळी, मोठे चार चमचे साखर , चिमूटभर मीठ,अर्धा चमचा जिरे पूड किंवा ओवा पूड ,चिमूटभर इनोज फ्रूट सॉल्ट,एक चमचा साजूक तूप आणि आंबट दही हे सगळे एकत्र करून कणकीत घालून पीठ मळतात आणि रात्रभर (किमान ८ तास) आंबवून घेतात. नंतर दुसे दिवशी त्याच्या पुऱ्या बनवतात. अतिशय स्वादिष्ट आणि लुसलुशीत बनतात ह्या पुऱ्या. एखाद्याला Delicious ह्या शब्दाचा अर्थ समजवायचा असेल तर हे बन्स खायला द्यावेत.
साहित्य : दोन वाट्या कणीक , २ मध्यम आकाराची जराशी जास्तच पिकलेली केळी, १-२ कोशिंबीरीचे मोठे चमचे भरून दही, मोठे चार चमचे साखर , छोटा चमचा इनोज फ्रूट सोल्ट,चिमूटभरमीठ, अर्धा चमचा जिरे पूड किंवा ओवा,एक चमचा साजूक तूप,आवशयकतेनुसार पुऱ्या तळायला तेल किंवा तूप.
कृती : मिक्सरच्या भांड्यांत जास्त पिकलेल्या केळ्याचे तुकडे, आंबट दही,साखर, ,भरड जिरे, मीठ, चिमूटभर इनोज फ्रूट सॉल्ट व एक चमचा साजूक तूप घ्याआणि मिक्सरवर ते मिश्रण फिरवून घ्या. मग त्यात मावेल तेव्हढी कणिक घालून सैलसर पीठ भिजवून घ्या. पीठ जास्त घट्ट असेल तर आणखी दही घाला पण पाणी अजिबात घालू नका.पीठ फार सैल आहे असे वाटत असेल तरच थोडी कणिक घाला.तेलाचा हात लावून पीठ जरा मळून घ्या आणि रात्रभर (किमान ८ तास) झाकून ठेवा.
दुसरे दिवशी सकाळी पीठ जरासे मळून लिंबाएवढे गोळे करा आणि थोड्या जाडसर पुऱ्या लाटून घ्या .
गॅसवर एका कढईत तेल / तुप गरम करून घेऊन मध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्या. पुऱ्या छान फुगतात.
हे मंगलोरी बन्स गरम / थंड कसेही खाऊ शकता. चटणी / तुपाबरोबर नाश्ता म्हणून सर्व्ह करा.

पोह्यांची उकड

#पोह्यांची #उकड

पोहे म्हणजे माझे जीव की प्राण! पोह्यांचा कोणताही प्रकार असो मला खुपच आवडतो.अशीच पोह्यांची उकडही अप्रतिम लागते.
साहित्य : दोन वाट्या जाडे पोहे (कांदा पोहयासाठी आपण जे वापरतो ते), दोन वाट्या आंबटसर ताक, चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या, कढिपत्त्याची ८-१० पाने, दोन चमचे तूप, एक चमचा जीरे, दहा बारा लसूण पाकळ्या, थोडं आलं किसून, मीठ, चिमुटभर हळद,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर व सजावटीसाठी बारीक शेव.
कृती : अर्धा तास आगोदर जाड पोहे पाण्याने धुवूनचाळणीत ठेवावे. अर्ध्या तासाने धुतलेले पोहे आणि यात जरूरीनुसार आंबट ताक घालून मिक्सरवर फिरवून घ्या.जास्त फिरवून अगदी लगदा/पेस्ट करू नका. दुसरीकडे कढईत तूप घालून तापत ठेवा.तूप चांगले तापल्यावर त्यात जीरे, मिरचीचे तुकडे, सोललेल्या लसूण पाकळ्या घाला. लसूण चांगली तांबूस होऊद्या. तोपर्यंत तयार मिश्रणात मीठ, हळद मिसळून घ्या.लसूण तळली की कढीपत्त्याची पाने घाला. आता तयार मिश्रण फोडणीत ओता. उरलेले ताक घाला. किसलेले आले घाला. गरजेनुसार पाणी घाला. ढवळून एक वाफ काढा. गरमागरम उकडीवर साजूक तूप व बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव घालून सर्व्ह करा.