Friday 31 December 2021

मुळा व चणा डाळीचा चटकदार चटका

मुळा व चणा डाळीचा चटकदार चटका





साहित्य : अर्धी वाटी भिजवलैली हरभर्‍याची डाळ, अर्धा मुळा, अर्धे लिंबू किंवा दोन मोठे चमचे दही , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ, जिरे, कोथींबीर,चवीपुती साखर.

मुळ्याच्या चकत्या करा. हरभर्‍याची डाळ, मुळ्याच्या चकत्या,लिंबाचा रस, ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ, जिरे, कोथींबीर,चवीपुती साखर हे सर्व एकत्र करा. आणि मिक्सरला भरडच वाटायचे. म्हणजे टेस्ट छान येते. या भरड वाटणावर खमंग फोडणी द्या , फोडणीत हिंग पावडर जरा जास्तच टाका. असा चटकदार स्वाद येतो ना चटक्याला!

या चटकदार चटक्या बरोबर एखादी पोळी जास्तच जाते बर का .

Wednesday 29 December 2021

मुळ्याचे मिनी डोसे

मुळ्याचे  मिनी डोसे


 

आज सकाळी नाश्त्याला आम्ही केले होते ‘मुळ्याचे मिनी डोसे ’ त्याचीच ही सचित्र रेसिपी

साहित्य : एक मुळा,चवीनुसार लाल मिरचीचे किंवा हिरव्या मिरचीचे तिखट व मीठ,दोन मोठे चमचे बेसन पीठ , तेल

कृती : प्रथम मुळा स्वच्छ धुवून व सालं काढून ,किसणीवर किसून घ्या,एका परातीत मुळ्याचा कीस,दोन मोठे चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार लाल मिरचीचे /हिरव्या मिर्च्यांचे तिखट व मीठ एकत्र मिक्स करून   मिक्सरवर वाटून घ्या . मग त्यात पाणी घालून डोश्याच्या पिठासारखे पीठ  करून ठेवा.

गॅसवर मिनी डोश्यचा  तवा तापत ठेवा,  तवा तापल्यावर  तव्याच्या प्रत्येक भागात डावाने पीठ घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.भाजतेवेळी सर्व  बाजूंनी चमच्याने थोडे तेल सोडा.

गरम मिनी डोसे टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.  

Saturday 25 December 2021

डेक्कन पराठा

 डेक्कन पराठा



साहित्य : चार बटाटे, एक चमचा बडीशेप, एक चमचा हळद, एक चमचा लाल मिरचीचे तिखट,दीड चमचा तयार लोणच्याचा मसाला, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, व अर्ध्या लिंबाचा रस, नेहमीप्रमाणे मळलेली कणिक
कृती : आगोदर बटाटे सालं काढून किंवा सालासकट किसून घ्या. गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक डाव तेल घालून त्या गरम तेलावर जिरे , हिंग व बडीशेप घालून फोडणी करुन घेऊन मग त्यात लोणच्याचा मसाला व लिंबाचा रस घालून बटाट्यांचा कीस टाका व चवीनुसार मीठ घालून, नीट परतून घेऊन , झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
कणकेच्या पारीत वरील सारण घालून नेहमीप्रमाणे इतर पराठ्यांसारखे पराठे करावेत. दोन्ही बाजूंनी तूप सोडून खमंग भाजावेत.

Monday 29 November 2021

मेतकूट मसाला पराठे

 आजच्या नाशत्यासाठी केला होता हा जरा हटके असा मेतकूट मसाला पराठा.

त्याचीच ही सचित्र रेसिपी ..

मेतकूट मसाला पराठे


साहित्य : पराठ्यांसाठी चार वाट्या कणीक, चमचाभर तेल,अर्धा चमचा मीठ,भांडभर पाणी, मसाल्यासाठी अर्धी वाटी मेतकूट, चार चमचे पातळ केलेले साजूक तूप, चार चमचे पातळ केलेले अमुलचे बटर,किसलेले अमुलचे चीज,पाव वाटी बारीक चिरून वाफवलेली मेथी,चवीनुसार आले,लसूण, हिरव्या मिरच्या व मीठ घालून बनवलेला खर्डा,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीरआणि एक कांदा बारीक चिरून ठेवा.पराठया सोबत तोंडीलावणे म्हणून देण्यासाठी हळदीचे लोणचे.
कृती : एका परातीमध्ये पराठ्यासाठी कणीक घ्या आणि त्यात तेल,मीठ व जरुरीप्रमाणे पाणी घालून पराठ्याचे पीठ भिजवून व मळून घेऊन ओल्या सूती कपड्याने झाकून ठेवा.
दुसरीकडे एका बाउलमध्ये मसाल्यासाठी अर्धी वाटी मेतकूटघ्या. त्यात चार चमचे पातळ केलेले साजूक तूप आणि चार चमचे पातळ केलेले अमुलचे बटर घाला. पाव वाटी बारीक चिरून वाफवलेली मेथी,चवीनुसार आले,लसूण,हिरव्या मिरच्या व मीठ घालून बनवलेला खर्डा घालून मिक्स करा.
आता भिजवून मुरत ठेवलेल्या कणकीतून एक लाडवा एव्हढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटा त्या पोळीवर हाताने मेतकूट मसालापेस्ट चोळून लावा . आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले चीज सगळीकडे भुरभुरा . आता त्या पोळीची एक आडवी व एक उभी घडी घाला किंवा गुंडाळी करून पुन्हा एकडा गोल आकाराचा पराठा लाटा.
गॅसवर एक निर्लेप तवा तापवून घेऊन त्यावर अमूल बटर वर दोन्ही बाजूंनी पराठा चांगला खरपूस भाजून घ्या.
एका सर्व्हिंग डिशमध्ये खरपूस भाजलेला गरम पराठा काढून घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर पसरून हळदीच्या लोणच्यासह सर्व्ह करा.

Friday 26 November 2021

खर्डा



पर्वाच्या दिवशी व्यायामासाठी मॉर्निंग वॉकला गेलो असतांना शनिपाराशेजारी एका भाजीवाल्याकडे जाड सालीच्या कमी तिखट मिरच्या पाहून खर्डा करावा अशी इच्छा झाली.लगेच पाव किलो मिरच्या घेतल्या.
घरी आल्यावर त्या मिरच्यांचा खर्डा केला .
मिरच्या स्वच्छ धुवून व कोरड्या पणचाआने पुसून घेतल्या ,एक लसणाचा कांदा सोलून घेतला. चार चमचे लाल मोहरी मिक्सरच्या भांड्यातून थोडेसे (चमचाभर) पाणी घालून फेटून घेतली.
मग मिक्सरच्या भांड्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घातले , लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे घातले. एल चमचा मीठ व एक चमचा तेल घालून मिक्सरवर वाटून घेतले.
दुसरीकडे गॅसवर एका काढल्यात फोडणीसाठी तेल तापवून त्यात मोहरी,हळद व हिंग घालून फोडणी केली आणि त्यात मिक्सरवर वाटून ठेवलेले मिरची-लसणाचे वाटण घालून परतून घेतले.
झाला खर्डा तयार.
पिठले,भाकरी,कांदा आणि हा खर्डा घेऊन खाल्ले. मस्त यssम्मी बेत झाला.

Wednesday 17 November 2021

चकलीची भाजी

चकलीची भाजी 

 


दिवाळीच्या चकल्या उरल्या होत्या. त्यांना जास्त दिवस झाल्यामुळे वास येण्याची शक्यता असल्याने लवकर संपवणे आवश्यक होते. मग मला एक आयडिया सुचली की अशी आपण ‘शेव’ वापरुन जशी शेव  भाजी करतो, त्याचप्रमाणे या शिल्लक चकल्यांचा वापर करून ‘चकली’ भाजी करावी.

 

या ‘चकली’ भाजीसाठी गॅसवर एका पॅनमध्ये तेलात हिंग, कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं . मग त्यात कांदा खोबरे वाटण घालून परतायचे ... थोडं  परतलं की त्यात मीठ आणि पाणी घालायचे. उकळी आली की त्यात शिल्लक उरलेआय चकल्या सोडायच्या. एक उकळी आली की कोथिंबीर बारीक चिरून घालायची.


Monday 8 November 2021

पूर्णालू

 

पूर्णालू



खूप छान पदार्थ आहे. तेलुगू लोकांच्यात  सणा-सुदीला हा पारंपारिक पदार्थ मिष्टान्न म्हणून आवर्जून केला जातो.

नेहमीपेक्षा थोडंसं घट्टसर डोश्याचं पीठ भिजवायच आणि त्यात पुरणाचा गोळा त्यात बुडवून शुद्ध तूपात 'पूर्णालू' तळा.

मऊ शिजलेल्या  हरभरा डाळीमध्ये गूळ आणि वेलची पावडर घालून घट्ट पुरणाचा गोळा बनवून ठेवा.

आता दुसरीकडे चार तास आधीच  भिजवून ठेवलेल्या उडदाच्या डाळीच्या पिठात तांदूळाची पिठी व चवीपुरते मीठ घालून सैलसर  पीठ भिजवून घ्या. (तयार डोश्याचे पीठ वापरले तरी चालेल किवा उडीद डाळ तांदूळ भिजवून नेहमिसारखे पीठ बनवले तरी हरकत नाही)

आता गॅसवर एका पॅनमध्ये तूप तापवून त्यात घट्ट पुरणाचे लिंबाएव्हढे आकाराचे गोळे करून ते डोश्याच्या पिठात बुडवून घ्या आणि तापलेल्या तुपातून तळून काढा. 

 

Tuesday 26 October 2021

भारतीय स्वयंपाकात पदार्थांची रुची व स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाणारे विविध मसाल्याचे पदार्थ

 

भारतीय स्वयंपाकात पदार्थांची रुची व स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाणारे विविध मसाल्याचे पदार्थ




१.      जिरे

२.      शहाजिरे

३.      मोहरी/ मोहरीची डाळ

४.      हिंग (खडा / पावडर)

५.      हळद /हळकुंड

६.      हिरवे वेलदोडे

७.      जायफळ

८.      मायफळ

९.      मसाला वेलदोडे 

१०. तमालपत्र

११. जायपत्री

१२. त्रिफळ / तिरफळ

१३.  दालचीनी

१४.  लवंग

१५. लाल मिरची   (संकेश्वरी / ब्याडगी / काश्मिरी)

१६.  लाल तिखट

१७.  बडीशेप

१८.  दगड फूल

१९.  बादल फूल / चक्री फूल

२०.  नागकेशर

२१.  खसखस

२२.  गोटा खोबरे

२३. ओल्या नारळाचे खोबरे

२४.  धने

२५.  पांढरे तिळ

२६.  कांदा

२७.  लसूण

२८.  आले

२९.  सुंठ

३०.  मेथ्या

३१.  बारीक मीठ /खडे मीठ

३२. पुदिना

३३. कोथिंबीर

३४. लिंबू

३५. आमसुल

३६. चिंच

३७.  गार्सिआ कंबोगिया (आंबट फळाची पावडर)

३८.  केशर

Saturday 23 October 2021

शिंगाडयाच्या शेवयांचा उपमा (उपासाचा)

 

शिंगाडयाच्या शेवयांचा उपमा (उपासाचा)



साहित्य :  एक वाटी शिंगाडयाच्या शेवया , चार चमचे साजूक तूप, चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे मोठाले तुकडे,अर्धा चमचा आल्याचा कीस, एक चमचाभर लिंबाचा रस, चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर,काजूचे तुकडे, शेंगदाण्याचे कूट , सजावटीसाठी ओलं खोबरं , चार वाट्या पाणी

 

कृती : आगोदर प्रथम गॅसवर एका पॅनमसध्ये साजूक तुपावर  शिंगाडयाच्या शेवया भाजून घ्या. आता गॅसवर एका पातेल्यात चिमुटभर मीठ घालून चार वाट्या पाणी उकळायला ठेवावं, पाणी खळखळून उकळलं की त्यात भाजून घेतलेल्या शिंगाडयाच्या शेवया टाकव्या. शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात.

 आता गॅसवर एका कढाईत फोडणीसाठी तूप गरम करून घेऊन त्यात जिरं,आल्याचा कीस, मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात शिजवून निथळत ठेवलेल्या शिंगाडयाच्या शेवया घालाव्यात व पुन्हा एकदा परतावे. मग मीठ , साखर , लिंबूरस,शेंगदाण्याचे कूट  व काजुचे  तुकडे घालून परतून घेऊन कढईवर झाकण ठेऊन व गॅस मंद करून एक वाफ काढून घ्यावी व  गॅस लगेच बंद करावा.

सर्व्ह करतेवेळी वरून खोबर्याचा चव भुरभुरून हा शिंगाड्याच्या शेवयांचा उपमा सर्व्ह करा.

Wednesday 20 October 2021

पेंडपाला ( एक खास सोलापुरी पदार्थ )

 

पेंडपाला ( एक खास सोलापुरी पदार्थ ) 

 


साहित्य : एक वाटी हरभर्‍याची डाळ ,अर्धी वाटी तुरीची डाळ , अर्धी वाटी गावारीच्या शेंगा (तोडून)दोन चमचे मेथीचे दाणे चवीनुसार दीड ते दोन चमचे लाल मिरचीचे तिखट,छोटा चमचा हळद,दोन चमचे कारळे तीळ , ४-५ लसणाच्या पाकळ्या (ठेचून) , फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,मोहरी , चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ.

भाजीवर वरुन घ्यायच्या फोडणीसाठी दोन डाव तेल,१५-१६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून) , ५-६ लाल सुकक्या मिरच्या,चिमूटभर हळद  व हिंग

कृती : सुरवातीला दोन्ही डाळी व मेथीचे दाणे एकत्र स्वच्छ धुवून घ्या. कुकरच्या भांड्यात घालून त्यात बेताचं पाणी घाला. साधारणपणे २ ते अडीच वाट्या पाणी पुरे होईल. त्यात गवारीचे मोडलेले तुकडे घाला. कुकरला शिजवून घ्या. तीन शिट्या पुरे होतील. चणा डाळ पूर्ण राहिली पाहिजे, मोडता कामा नये.आता शिजवलेली डाळ हलक्या हातानं एकत्र करा. डाळीचे दाणे दिसायला हवेत.

दुसरीकडे कढईत तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग घाला. त्यातच पाठोपाठ हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच शिजलेली डाळ घाला. नीट हलवून घ्या.नंतर त्यात मीठ, काळा मसाला आणि कारळाची पूड घाला. परत हलवून घ्या. मध्यम आचेवर उकळी येऊ द्या. उकळी आली की गॅस बंद करा. पेंडभाजी तयार आहे. पेंडभाजीवर वरून लसणाची खमंग फोडणी घालून खातात.

वरून घालण्यासाठी  लसणाची फोडणी : गॅसवर एका काढल्यात फोडणीसाठी तेल कडकडीत गरम करुण घेऊन त्यात मोहरी घालून तडतडू द्या.

मोहरी छान तडतडली की त्यात लसणाचे बारीक चिरलेले तुकडे घाला. ते चांगले लाल, कुरकुरीत होऊ द्या.मग त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्या परतल्या की चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घाला आणि गॅस बंद करा.

पेंडपाल्याची भाजी सर्व्ह करतेवेळी ताटात पेंडपाला भाजी वाढा आणि त्यावर तयार केलेली लसणाची खमंग फोडणी घाला. बरोबर गरमा-गरम ज्वारीची भाकरी त्यावर लोण्याचा गोळा,लसणाची चटणी  आणि ताजं ताक द्या.

Saturday 16 October 2021

पुदिना चटणी

 

पुदिना चटणी  



 

दोन वाट्या पुदिना घेतला तर एक वाटी कोथिंबीरीची पानं.. हिरव्या मिरच्या आणि मीठ चवीप्रमाणे.. अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला.. एक चमचा साखर आणि दोन चमचे लिंबाचा रस..  अर्रे ... कैरी असेल तर अहाहा.. कैरीचा कीस घ्या दोन चमचे (किंवा चवीप्रमाणे करा ऍडजस्ट)  .. एक छोटा/ मध्यम कांदा चिरून घ्या जीरं वगैरे हवं असेल तर घ्या पण मी नाही घेतलं..  खिक्क

हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि ही हिरवीगार चटणी, वडे, इडल्या, डोसे, अडे किंवा आणखी कशाहीबरोबर खा!! खूप रिफ्रेशिंग आहे...

Wednesday 13 October 2021

काकडीचं पिठलं

 

काकडीचं पिठलं

 


काकडीचं पिठलं :  एक खिरा  काकडी साल काढून किसून घ्या. आता एका बाऊलमध्ये पाव वाटी बेसन पाण्यात कालवून ठेवा. आता गॅसवे एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा .तेल चांगले तापले की त्यात  मोहरी घाला, मोहरी छान तडतडली की त्यात हिंग घाला. एका हिरव्या  मिरचीचे  तुकडे करून घाला . त्यावर हळद घालून परतून घेतल्यावर काकडीचा कीस घाला . तो कीस चांगला वाफवा . त्यात चवीनुसार तिखट आणि मीठ घालून छान मिसळून घेघ्या. आता त्यावर बाऊलमध्ये पाण्यात कालवउण ठेव लेलं बेसन घाला. जितकं पातळ हवं असेल तितकं पाणी घालून  मस्त वाफ येऊ द्या .

आता गॅसवर एका छोट्या कढल्यात फोडणी करा. त्यात भरपूर तिखट आणि थोडं मीठ घाला.

गरम पिठल्यावर ही फोडणी घालून सर्व्ह करा. खूपच  छान लागते हे पिठले.

 

Thursday 7 October 2021

मुगडाळ-शेवयांची खिचडी

 

मुगडाळ-शेवयांची खिचडी

 


 

या खिचडीत मुगाची डाळ भरपूर प्रमाणात घालतात. त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीनेही नाष्टा म्हणून किंवा रात्रीच्या वेळी पचायला हलकी असल्याने जेवणांत  ही खिचडी करावी.

साहित्य  : एक वाटी गणेश शेवया (इतर कुठल्याही शेवया वापरल्या तरी चालतील) , एक वाटी मूगाची डाळ ,एक बारीक चिरलेला कांदा,दोन टेबलस्पून साजूक तूप,चवीनुसार मीठ व २-३ हिरव्या मिरच्या,एक चमचा गोडा काळा  मसाला, फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,एक छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग, सजावटीसाठी मूठभर बारीक  चिरलेली कोथिंबीर व पाव वाटी खवलेला ओल्या नारळाचा चव,चार वाट्या गरम पाणी

कृती : खिचडीला सुरवात करण्यापूर्वी अर्धा तास आगोदर मूगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात भिजत घालून ठेवा.

आता गॅसवर एका  कढईत साजूक तूप गरम करून त्यात शेवया घाला व  मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खमंग भाजून एका परातीत काढून ठेवा.

नंतर त्याच कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन घ्या. तेल चांगले तापल्यावर त्यात मोहरी आणि जिरं घालून दोन्ही चांगले  तडतडल्यावर  हिंग व हळद क्रमाने टाकून एखादे मिनिट परतून घ्यावे व मग  हिरव्या मिरचांचे तुकडे टाकावे.

मिरची खमंग तळली गेल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून  किंचित रंग बदलून पारदर्शक होई पर्यंत परतून घ्यावा. लक्षांत ठेवा परतून कांदा जास्त ब्राऊन  होऊ देऊ नका.

आता त्यात मगाशी भाजून ठेवलेल्या शेवया टाकाव्या व भिजत घातलेली  मुगाची डाळ घाला. चवीप्रमाणे मीठ घाला,काळा गोडा मसाला घाला व झार्‍याने चांगले हलवून घ्या.

दरम्यान दुसरीकडे गॅसवर एका उभ्या गंजात पाणी ऊकळायला ठेवावे.

आता हे ऊकळते पाणी फोडणीला टाकून परतलेल्या  मूग डाळ+शेवयांमध्ये टाकावे.साधारणपणे सर्व शेवया बुडून दोन बोटं पाणी वर शिल्लक राहील एवढे पाणी टाकावे.

आता गॅस बारीक करून दोन मिनीटे खिचडीचे हे मिश्रण शिजू द्यावे व शिजून थोडेसे आळल्यावर कडेने तूप सोडून झाकण ठेवावे आणि मंद आचेवर दणदणीत वाफ येऊ द्यावी. या वाफेवरच मुगाची डाळ पूर्ण शिजायला हवी.

ही मुगडाळ-शेवयाची गरमागरम खिचडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव यांनी सजावट करून लगेच सर्व्ह करावी.

या खिचडीला स्वतःचाच एव्हढा खमंगपणा असतो की त्यासोबत इतर कुठल्याच तोंडीलावण्याची गरज भासत नाही.

टीप : या खिचडीत आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या उदा. सिमला मिरची, श्रावण घेवडा (फरसबी), तोंडली,वांगी,मश्रूम्स्, स्वीट कॉर्न , मटार,बटाटा,फ्लॉवर इ. घालू शकता.