Search This Blog

Wednesday, 20 October 2021

पेंडपाला ( एक खास सोलापुरी पदार्थ )

 

पेंडपाला ( एक खास सोलापुरी पदार्थ ) 

 


साहित्य : एक वाटी हरभर्‍याची डाळ ,अर्धी वाटी तुरीची डाळ , अर्धी वाटी गावारीच्या शेंगा (तोडून)दोन चमचे मेथीचे दाणे चवीनुसार दीड ते दोन चमचे लाल मिरचीचे तिखट,छोटा चमचा हळद,दोन चमचे कारळे तीळ , ४-५ लसणाच्या पाकळ्या (ठेचून) , फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,मोहरी , चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ.

भाजीवर वरुन घ्यायच्या फोडणीसाठी दोन डाव तेल,१५-१६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून) , ५-६ लाल सुकक्या मिरच्या,चिमूटभर हळद  व हिंग

कृती : सुरवातीला दोन्ही डाळी व मेथीचे दाणे एकत्र स्वच्छ धुवून घ्या. कुकरच्या भांड्यात घालून त्यात बेताचं पाणी घाला. साधारणपणे २ ते अडीच वाट्या पाणी पुरे होईल. त्यात गवारीचे मोडलेले तुकडे घाला. कुकरला शिजवून घ्या. तीन शिट्या पुरे होतील. चणा डाळ पूर्ण राहिली पाहिजे, मोडता कामा नये.आता शिजवलेली डाळ हलक्या हातानं एकत्र करा. डाळीचे दाणे दिसायला हवेत.

दुसरीकडे कढईत तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग घाला. त्यातच पाठोपाठ हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच शिजलेली डाळ घाला. नीट हलवून घ्या.नंतर त्यात मीठ, काळा मसाला आणि कारळाची पूड घाला. परत हलवून घ्या. मध्यम आचेवर उकळी येऊ द्या. उकळी आली की गॅस बंद करा. पेंडभाजी तयार आहे. पेंडभाजीवर वरून लसणाची खमंग फोडणी घालून खातात.

वरून घालण्यासाठी  लसणाची फोडणी : गॅसवर एका काढल्यात फोडणीसाठी तेल कडकडीत गरम करुण घेऊन त्यात मोहरी घालून तडतडू द्या.

मोहरी छान तडतडली की त्यात लसणाचे बारीक चिरलेले तुकडे घाला. ते चांगले लाल, कुरकुरीत होऊ द्या.मग त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्या परतल्या की चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घाला आणि गॅस बंद करा.

पेंडपाल्याची भाजी सर्व्ह करतेवेळी ताटात पेंडपाला भाजी वाढा आणि त्यावर तयार केलेली लसणाची खमंग फोडणी घाला. बरोबर गरमा-गरम ज्वारीची भाकरी त्यावर लोण्याचा गोळा,लसणाची चटणी  आणि ताजं ताक द्या.

No comments:

Post a Comment