Wednesday 30 November 2016

तोंडल्याचे लोणचे



तोंडल्याचे लोणचे

साहित्य :  एक वाटी कोवळी तोंडली, एक टेबलस्पून मोहरी, अर्धा टी स्पून हळद, पाव टी स्पून हिंग, चवीनुसार मीठ, एका लिंबाचा रस.
कृती :  एका तोंडल्याच्या चार फोडी कराव्यात. मोहरी बारीक वाटावी. उंच काठाच्या ताटात वाटलेली मोहरी, मीठ, हळद, हिंग, लिंबाचा रस घालावा आणि चांगले फेसा. त्यात तोंडल्याच्या फोडी घालाव्यात. हे लोणचे २ ते ४ दिवस फ्रिजमध्ये ठेवल्यास टिकेल. शक्‍यतो ताजेच खावे.

साहित्य : पाव किलो कोवळी ताजी तोंडली, १ टीस्पुन मीठ, २ टेस्पुन तेल, २ टेस्पुन व्हिनेगर, २ टीस्पुन लाल तिखट, २ टीस्पुन राईपुड / मोहरीपुड, १ टीस्पुन हळद.

कृती : तोंडली धुवुन त्याच्या प्रत्येकी ४ फोडी करा. त्यांना मीठ लावुन त्या फोडी व्यवस्थीत बुडतील एवढ्या गार पाण्यात बुडवुन रात्रभर फ्रिझमध्ये ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी करायच्या वेळी त्या फोडी पाण्यातुन उपसुन चाळणीवर निथळत ठेवा.

पातेल्यात तेल कडकडीत तापवा मग आंचेवरुन उतरवुन थंड होवु द्या. साधारण थंड झाले की मग त्यात हा वर दिलेला मसाला एकत्र करुन कालवा. पुर्ण थंड झाले की मसाला, तोंडली अन व्हिनेगर एकत्र करुन बरणीत भरा. ही तोंडली मुरल्यावर मस्त लागतात.

Monday 28 November 2016

पुदिना रोल्स्स


पुदिना रोल्स्स 



साहित्य : सहा वाट्या (३+३) ,सहा टेबलस्पून तेल (३+३),अर्धा चमचा ओवा,अर्धा चमचा काळी मिरी पूड,चवीनुसार मीठ त तिखट पावडर ,दोन टेबलस्पून पुदिण्याची घट्ट पेस्ट,तळणीसाठी गरेनुसार तेल.
कृती : एका बाउलमध्ये तीन वाट्या मैदा,तीन टेबलस्पून तेल, अर्धा चमचा ओवा,अर्धा चमचा काळी मिरी पूड व चवीनुसार मीठ एकत्र कोरडेच मिक्स करून घ्या व नंतर त्यात जरुरीनुसार पाणी घालून नेहमी आपण पुर्‍यांसाठी भिजवतो तसे घट्ट इथ भिजवून व मळून घेऊन मुरण्यासाठी एका ओल्या तलम सूती कपड्याने १५-२० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
आता दुसरे बाऊल घेऊन त्यात तीन वाट्या मैदा,तीन टेबलस्पून तेल, दोन टेबलस्पून पुदिण्याची घट्ट पेस्ट व चवीनुसार तिखट व मीठ घालून गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून नेहमी आपण पुर्‍यांसाठी भिजवतो तसे घट्ट इथ भिजवून व मळून घेऊन मुरण्यासाठी बाऊल एका ओल्या तलम सूती कपड्याने १५-२० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
आता पुदिण्याच्या पिठाचे लिंबाएव्हधे गोळे बनवून घेऊन पोळपाटावर त्यांच्या गोल पुर्‍या लाटून घ्या व एका ताटात काढून ठेवा.
मग त्याचप्रमाणे ओवा व मैद्याच्या पिठाच्या पुर्‍या लाटून घ्या,आणि त्याही दुसर्‍या ताटात काढून ठेवा.
आता पुदिण्याची एक गोल पुरी पोळपाटावर ठेवा,त्यावर ओवा-मैद्याची गोल पुरी ठेवा (पुरीवर पुरी) व हाताच्या तळव्याने वरून थोडा दाब द्या, आणि दोन्ही पुर्‍या एकत्र ठेवून त्यांची गुंडाळी (वळकटी) वळा.
सुरीने पाऊण इंच रुंदीच्या बाकरवडीसारख्या वड्या (रोल्स) कापुन ठेवा.
आता गॅसवर एका कढईत तळणीसाठी तेल तापत ठेवा. तेल चांगले कडकडीत तापून त्यातून धूर येऊ लागला की त्या तापलेल्या तेलात ७-८ रोल्स सोडून हलक्या गोल्डन रंगावर तळून पेपर नॅपकीनवर काढा,म्हणजे रोल्समधील जास्तीचे तेल शोषले जाईल.
थंड झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा एखाद्या आवडत्या चटणीसोबत दुपारच्या चहाचे वेळी सर्व्ह करा.

Sunday 27 November 2016

पुदिन्याच्या पुर्‍या

पुदिन्याच्या पुर्‍या

सकाळच्या नाश्त्यासाठी पुदिन्याच्या पुर्‍या बनवता येतील.तसेच लहान मुलांना शाळेच्या मधल्या सुट्टीत खायला द्यायच्या डब्यात द्यायलाही ह्या पुर्‍या छान आहेत. या बनवतांना पुदिना व कोथंबीर यांचा वापर आहे. पुदिना व कोथंबीर हे दोन्हीही खूपच पौष्टिक आहेत. ह्या पुर्‍या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणार्‍या आहेत.
साहित्य : दोन वाट्या कणीक,एक टेबलस्पून चणा डाळीचे पीठ (बेसन),मूठभर कोथंबीर,मूठभर पुदिन्याची पाने,एक चमचा भाजलेले पांढरे तीळ, एक चमचा लाल मिरचीच्या तिखटाची पावडर,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे,५-६ लसणाच्या पाकळ्या,पेरभर आल्याचा तुकडा,मोहन म्हणून एक टेबलस्पून कडकडीत तेल,चवीनुसार मीठ,आवश्यकतेनुसार पुर्‍या तळण्यासाठी तेल.
कृती : एका परातीत कणीक,बेसन पीठ, भाजलेले पांढरे तीळ, लाल मिरचीच्या तिखटाची पावडर, मीठ घेऊन कोरडेच मिक्स करून घ्या व त्यात कदकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करून घ्या.मिक्सरवर कोथंबीर, पुदिना पाने, आले, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट वाटुन घेऊन पीठामध्ये मिक्स करून पीठ घट्ट भिजवून व चांगले मळून घ्या. मळलेले पीठ मुरण्यासाठी १० मिनिटे ओल्या तलम सूती कपड्याने झाकून एका बाजूला ठेऊन द्या. १० मिनिटांनी पुन्हा एकदा पीठ मळून घेऊन त्याचे लिंबाएव्हढ्या आकाराचे एक सारखे गोळे बनवून ठेवा.
त्यातील एकेक गोळाघ्या व पोळपाटावर लाटून पुर्‍या बनवून ठेवा.
दुसरीकडे गॅसवर एका कढईत मोठ्या आंचेवर तेल कडकडीत गरम करून घ्या व त्या गरम तेलात मध्यम आंचेवर ब्राऊन रंगावर पुर्‍या छान तळून घ्या व पेपर नॅपकीनवर काढा म्ह

णजे पुर्‍यातील जास्तीचे तेल शोषून घेतले जाईल.
या गरमा- गरम पुदिनयाच्या पुर्‍या आपल्या आवडत्या चटणी सोबत अगर टोमाटो सॉस सोबतसर्व्ह करा.

सुरणाची सुक्की भाजी

सुरणाची सुक्की भाजी


बटायाच्या सुक्या भाजीप्रमाणेच सुरणाची ही सुकी भाजीसुद्धा चवीला खूप स्वादिस्ट व रुचकर लागते. ही भाजी बनवायला पण अगदी सोपी आहे व पौस्टिक पण आहे. सुरणामध्ये प्रोटीन, लोह, व जीवनसत्व “अ” असते. सुरण नेहमी पांढरे वापरावे. लाल सुरण हे खाजरे असते. म्हणून नेहमी पांढरे सुरण वापरावे.
साहित्य : अर्धा किलो सुरण (पांढरे),३-४ आमसुले,चवीनुसार मीठ,फडणी साठी एक टेबलस्पून तेल,एक चमचा मोहरी, ४-५ लाल सुक्या मिरच्या,एक टेबलस्पून उडदाची डाळ,वाटणासाठी अर्धा खोवलेला नारळ व एक चमचा जिरे आणि सजावटीसाठी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : आगोदर सुरण धुवून साफ करून त्याचे बटाट्याचे भाजीसाठी करतो तसे बारीक चौकोनी तुकडे करावेत. ओल्या नारळाचा खाऊन घेतलेला चव व जिरे याचे मिक्सरवर जाडसर वाटण करून घ्यावे.
आता गॅसवर एका पॅनमध्ये पाणी उकळून त्यामध्ये आमसूल व मीठ घालून सुरणाच्या फोडी घालून ५-७ मिनिट मंद आंचेवर शिजवून घ्याव्यात. (सुरण,आमसुल व मिठाच्या पाण्यात उकडल्यामुळे सुरणाचा खाजरे पणा जातो)
नंतर गॅसवर एका कढई मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, सुक्या लाल मिरच्या, उडदाची डाळ व मीठ घालून सुरणाच्या शिजववून घेतलेला फोडी घालून भाजी परतून घ्यावी मग त्यामध्ये जिरे- खोबर्याचे वाटण घालून परत भाजी थोडी परतून घ्यावी.
बारीक चिरलेल्या कोथंबीरीने भाजी सजवून पोळी बरोबर सर्व्ह करावी.


Friday 25 November 2016

मिक्स्ड व्हेजिटेबल चॉप्स

मिक्स्ड व्हेजिटेबल चॉप्स



साहित्य : तीन वाट्या मिक्स्ड व्हेजिटेबल्स (बीट,गाजर,घेवाड्याचा शेंगा,मटार,मका दाणे) दोन मोठे कांदे,चार हिरव्या मिरच्या,एक चमचा आल्याचा कीस,एक चमचा भाजलेले जिरे,दोन चमचे लाल लाल मिरचीचे तिखट,चवीनुसार मीठ,
तळणीसाठी आणि कांदा परतण्यासाठी गरजेनुसार तेल,दोन टेबलस्पून कॉर्नफ्लोअर,एक टेबलस्पून पाणी,एअर्धी वाटी ब्रेडचा चुरा.
कृती : प्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्या. साले काढून घेऊन बारीक चिरून ठेवा.
मग या सगळ्या चिरलेल्या भाज्या प्रेशरकुकरच्या भांड्यात घेऊन त्यात जिरे पूड आणि मीठ घालून प्रेशरकुकरमधून तीन शिट्यांदेऊन शिजवून ठेवा.
थंड झाल्यावर प्रेशरकुकरमधून शिजलेल्या भाज्या चाळणीवर काढून गाळून घेऊन त्यातील पाणी काढून टाका व पाणी पूर्ण निथळण्यासाठी एक बाजूला ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊन त्यात किसलेले आले,हिरव्या मिरचयांचे तुकडे व चिरून ठेवलेला कांदा घालून कांदा पारदर्शक होण त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतत रहा. परतून कांद्यचा रंग हवा तसा आला की त्यात प्रेशरकुकरमध्ये शिजवलेल्या भाज्या मॅश करून घेऊन घाला, तसेच चवीनुसार मीठ आणि मसाले घाला आणि उलथण्याने हलवून चांगले मिक्स करून घ्या. गॅस बंद करून मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या व बाजूला ठेवा.
मग त्यात कॉर्नफ्लोअर व पाणीघालून मिश्रण हाताने चांगले कालवून मिक्स करा.
आता या मिश्रणाचा लिंबाएव्हढा गोळा हार=तावर घेऊन त्याला लांबट गोल आकार द्या आणि मग तो प्रथम कॉर्नफ्लोअरमध्ये आणि नातर पावाच्या चुर्‍यात घोळवून घ्या व एका ताटात ठेवा. या प्रमाणे इतर चॉप्सही बनवून ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तळणीसाठी तेल गरम करत ठेवा. तेल चांगले तापुन त्याला उकळी आल्यावर गसची आंच मध्यम ठेऊन त्यात ताटात बनवून ठेवालेले चॉप्स सोडा आणि तळून त्यांचा गोल्डन ब्राऊन झाला की ते तयार झालेले चॉप्स पेपर नॅपकीनवर काढा. (म्हणजे त्यातील अतिरिक्त तेल पेपर शोषून घेईल)
हे गरमागरन मिक्स व्हेजिटेबल चॉप्स दुपारच्या चहा बरबर एखाद्या आवडत्या चटणी सह सर्व्ह करा.

Monday 7 November 2016

घरातील ओल्या कचर्‍यातून बायो-गॅस ची निर्मिती



बायो गॅस निर्मिती सयंत्र

ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी गेल्या दशकात जगभर जोरात चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक असा आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा सर्व प्रकारचा ओला कचरा ( यात शिळे किंवा खराब झालेले  अन्न भाजीपल्याचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचराकुंडीत टाकता त्याचा पुर्नवापर करून  पर्यावरणास  हातभार लागावा म्हणून आम्ही  अतिशय हौसेने ०१ जुलै २००६ रोजी माझ्या जुन्या घराच्या १०‘ x१५गच्चीवर बायो-गॅसची निर्मिती संयंत्राची उभारणी केली असून त्यातून निर्माण होणार्‍या गॅसचा वापर सुरू केल्यापासून  पासून माझ्या L.P.G.(बरशेन) गॅस सिलिंडरच्या वापरात २१ दिवसापर्यंत बचत होऊ लागली आहे, त्याचप्रमाणे गॅस निर्मिती सुरू झाल्यावर त्यातून उत्सर्जीत होणारे अतिरिक्त सांडपाणीसुध्दा बायो-कल्चरसाठी खत म्हणूनच वापरले जाते. एकुण खर्च ७४५०/- या प्रकल्पासाठी माझ्या गच्चीवरील एका कोपर्‍यातील ५’ x जागा लागली. (या प्रकल्पामुळे माझा एल.पी.जी.सिलिंडर २१ दिवस जास्त जाऊ लागला म्हणजेच दरमहा सुमारे २५० रुपयांची बचत होऊ लागली होती. त्यामुळे माझा या प्रकल्पावर झालेला खर्च २.५ वर्षात म्हणजे ३१ जानेवारी २००९ मध्येच भरून निघाला व त्यानंतर मी या बचतीचा लाभ घेत आहे. आता तर सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडी बंद करायचे ठरवल्यामुळे खुल्या बाजारात गॅस सिलिंडरच्या किमती ८०० रुपयांपर्यंत  आहेत हे लक्षात घेतले तर दरमहाची बचत रुपये ६५० पर्यन्त होईल) याखेरीज नागरिकांना अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर  करवावयास प्रोत्साहित करण्याचे उद्देशाने पुणे म.न.पा.ने जे नागरिक आशा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करत असतील त्यांना त्यांच्या वार्षिक मिळकत करात ५ % सवलत देण्यास सुरुवात केली आहे . हा आणखी एक आर्थिक फायदा होतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे  आपण पर्यावरणासंबंधात काहीतरी करतो याचे लाख मोलाचे मानसिक समाधान मिळते ते वेगळेच.
बायो-गॅस सयंत्रात फोटोत दिसते त्याप्रमाणे सिंटेक्स च्या दोन टाक्या असतात . बाहेरची टाकी आकाराने मोठी असते (माझी १००० लिटर्सची आहे) व दुसरी टाकी ही उलटी करून आंत सोडायची असल्याने बाहेरच्या टाकी पेक्षा  आकाराने थोडीशी छोटी टाकी असते  (माझी ७५० लिटर्सची आहे)  दोन्ही टाक्यांचा वरचा भाग कापून काढून त्याचे उघडे हौद करून घेतात. बाहेरच्या टाकीला तळापासून दोन इंच ऊंचीवर वर एक   ४ “ चे भोक पाडून त्यात चार इंचांचा एक पी.व्ही.सी.पाइप इनलेट (ओला कचरा टाकण्यासाठी) व वॉशआऊट ( टाकीत फारच घट्ट गाळ तयार झाला तर तो धुण्यासाठी) ह्यासाठी बसवलेला असतो व वरच्या टोकापासून ३ “ खाली एक  ३ “ आकाराचे भोक पाडून त्यात ३” चा पी.व्ही.सी.पाइप ओव्हरफ्लो साठी(टाकीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा व्हावा यासाठी)  बसवलेला असतो. उपड्या करून बसवायच्या आतील टाकीत गॅस साठवला जातो व तो बाहेर शेगडीकडे घेऊन जाण्यासाठी एक १/२ “ चे भोक पाडून त्यात एक १/२ “ जीआय.आय.चा एलबो बसवून त्याचेपुढे एक नोझल व्हॉल्व बसवतात व त्याच्या नोझलला पुढे एक रबरी नळी ( बागेत झाडांना पाणी देण्यासाठी वापरतो ती)बसवून त्यातून गॅस शेगडीस पुरवला जातो. या गॅस साठी आपली एल.पी.जी.ची नेहमीची शेगडी चालत नाही तर मोठ्या जाळीचा बर्नर असलेली गोबर गॅसला असते ती शेगडीच  लागते.
आता हे सयंत्र तयार करतांना प्रथम वर सांगितल्याप्रमाणे बाहेरची टाकी भोके पाडून घेऊन त्यात इनलेट,वॉशआऊट, ओव्हरफ्लो साठीचे ४” / ३” चे पी.व्ही.सी.पाइप्स बसवून घेऊन तयार करून घेऊन त्यात ओव्हरफ्लो पर्यन्त पाणी भरावे.दुसर्‍या एका रिकाम्या टाकीत ४० किलो गायी-म्हशीच्या शेणाचा पाण्यात काला करून  घेऊन तो टाकला जातो,मग मोठ्या टाकीत छोटी टाकी उपडी करून बसवतात. साधारणपणे एक आठवड्याने  शेणामुळे बक्टेरिया निर्माण झाले की इनलेट पाइप मधून घरातील शिळे अन्न व इतर ओला कचरा टाकायला सुरुवात करावी. भाजीची देठे कापून त्याचे बारीक तुकडे करून घालावेत. फणस , कालिंगडासारख्या फळांच्या सालीही  बारीक तुकडे करूनच घालावीत. या टाकीत चहाचा चोथा, मटाराची साले (कापून बारीक तुकडे करून) ,वालाची (बिरड्या / डाळिंबी)  साले, केळी,आंबे यांच्या साली,बुरशी आलेले पाव,आंबलेला भात, अगदी मेलेली झुरळे,उंदीर,घुशी घातले तरी त्यापासूनही विघटन होऊन त्यापासून मिथेनगॅस मिळतो. ज्या कचर्‍याचे विघटन होऊ शकेल असा कुठलाही ओला कचरा यात टाकलेला चालतो. ( आपण जेवतांना जसे चाउन खातो तसे बक्टेरियाला विघटन करायला जास्त वेळ लागू नये म्हणून जितके बारीक करून घालू तेव्हढे उत्तम) जर पिठाच्या गिरणीत जमिनीवर सांडणारे खराब कोरडे पीठ , किंवा घरात पोरकिडे झालेले / जाळ्या झालेले खराब पीठ ,  मिळाले तर जास्त गॅसची निर्मिती होते. गॅस तयार झाला की उपडी बसवलेली टाकी गॅसचे दाबाने वर  वर जाऊ लागते व त्याला बसवलेला व्हॉल्व चालु केल्यावर रबरी नळीवाटे  निर्माण झालेला मिथेन गॅस शेगडीस पुरवला जात असल्याने तो पेटतो.
या टाकीचे अगदी जवळ जाऊन उभे राहून नाकाने हुंगले  तरी कचर्‍याची दुर्गंधी येत नाही,डांस,माशा,चिलटे यांचा कसलाही त्रास होत नाही. गॅस पेटला असतांना त्याला कसलाही वास येत नाही. ज्योत एकदम निळी असते त्यामुळे भांडी काळी होत नाहीत. गॅस वार्‍याने विझला तर मात्र थोडासा उग्र वास येतो व त्यामुळे गॅस विझल्याचे लगेच
ध्यानात येते. हा गॅस साठवून ठेवता येत नाही,त्यामुळे दररोज निर्माण होणारा गॅस रोजच्या रोज वापरुन संपवावाच लागतो.
या पद्धतीत देखभाल फारशी नसते. फक्त १-१.५ वर्षाने गॅस वाहून नेणारी रबरी नळी हवेने/ उन्हाने कडक होऊन त्यास चिरा पडल्याने बदलावी लागते. बाहेरच्या टाकीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास पाणीi भरावे लागते. ओव्हरफ्लो झालेले पाणी तुम्ही बागेतील फुलझाडांच्या कुंड्यांना घालू शकता , कारण त्यात खताचे गुण असतात. माझी टाकी सहा वर्षांनंतर आत खूपच घट्ट गाळ तयार झाल्याने मोकळी करून / धुवून घ्यावी लागली व दोन वेळा रबरी नळी बदलावी लागली.
आधुन मधून कार्बन गॅसचा त्रास उद्भवला त्यावेळी टाकीत तयार झालेला संपूर्ण गॅस नळीवाटे बाहेर जाऊ दिला व नंतर नव्याने मिथेन  वायु तयार झाल्यावर पुन्हा शेगडी पेटू लागली.
मात्र या बायो गॅस प्रकल्पाच्याही  खालील प्रमाणे काही मर्यादा आहेत :
या बायो-गॅस निर्मिती सयंत्रात आपण घरातील कोणत्याही प्रकारचा ओला कचरा टाकतो व बक्टेरिया तो खातात आणि  खातांना त्याचे विघटन करून त्यातील मिथेन गॅस बाजूला करतात. हा मिथेन वजनाने हलका असल्याने वर जातो व तोच गॅस (वायु) नळीवाटे आपल्या स्वयंपाकघरातील शेगडीला जोडला जातो. पण हा मिथेन वायु साठवण टाकीतून ग्रॅव्हिटीने (वरुन  खाली)येत असल्याने आपली गॅस साठवण टाकी शेगडीच्या वर असावी लागते ,म्हणजेच ती टाकी आपण रहात असलेल्या घराच्या गच्चीवरच बसवावी लागते,तळमजल्यावर बसवून चालत नाही.
दुसरे असे की हा मिथेन वायु ग्रॅव्हिटीने येत असल्याने त्यास “ प्रेशर”  नसते.त्यामुळेच याची आंच (उष्णता) कमी असते. त्यामुळे चहासाठी पाणी उकळायला फार वेळ लागतो,भाजी शिजायलासुद्धा वेळ लागतो.तसेच पोळ्या व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मात्र ज्यासाठी मंद आंच लागते अश्या कामांसाठी उदा. शेंगदाणे किंवा रवा भाजणे किंवा लोणी काढवण्यासाठी हा गॅस एकदम उत्तम !
कधी कधी यात मिथेन बरोबर कार्बन वायु तयार होतो व त्यामुळे तो पेटत नाही. अशावेळी साठवण टाकीतील सर्व गॅस काढून टाकायला लागतो.
ही गॅस बनण्याची प्रक्रिया जलद होण्यासाठी हवेतील टेंपरेचर ३० अंश सेल्सियासपेक्षा जास्त असावे लागते. म्हणून पावसाळ्यात व थंडीत गॅस बनण्याची क्रिया सावकाश व मंद असते.
या सयंत्रासाठी तांत्रिक सल्लागार : Appropriate Rural Techno. Institute. ( आरती) 020 - 2439 22884
या प्रकल्पाविषयी काही शंका असल्यास मला पुढील पत्यावर येऊन प्रत्यक्ष भेटावे किंवा संपर्क साधावा.
प्रमोद तांबे ,१४१५,सदाशिव पेठ,रेणुका स्वरूप मुलींच्या शाळेजवळ पुणे ४११०३० दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ Email I.D. : pltambe@yahoo.co.in

बायो-गॅसचे आणखी काही फोटो