Thursday 17 December 2020

दुधीचे वडे

 दुधीचे वडे


 

खास विदर्भीय पध्दतीचे लौकीचे वडे बनवण्या करता प्रथम एक दुधी किसणीने किसून व घट्ट पिळून त्यातील पाणी काढून टाका व मग त्यात हिरवी मिरची ,जिरे,दोन चमचे पांढरे तीळ,एक चमचा ओवा यांचे वाटण करून घाला ,नंतर त्यात थोडीची हळद,बारीक चिरलेला कढीपत्ता , कोथिंबीर आणि मेथीची पाने व अर्धा चमचा साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या . आता त्यात मावेल तेव्हढेच तांदुळाचे पीठ घालून वडे बनवता येतील असे घट्ट पीठ बनवा.
प्लास्टिकचा पेपर किंवा कॉटनच्या ओल्या कापडावर वडे थापून गरम तेलात खमंग टाळून काढा.
गरमागरम खुसखुशित दुधीचे वडे तयार.

Tuesday 8 December 2020

आवळ्यासे लोणचे

#आवळ्याचे_लोणचे 




साहित्य : अर्धा किलो मोठे टपोरे असे डोंगरी आवळे ,पाव किलो तेल,१०० ग्रॅम लाल मोहरी,५० ग्रॅम लाल मिरचीचे तिखट, १०० ग्रॅम मीठ,२५ ग्रॅम हळद पावडर,चमचाभर मेथीचे दाणे, छोटा चमचा हिंग. 
कृती : प्रथम आवळे स्वच्छ धुवून व सूती कपड्याने कोरडे करून घ्या. मिक्सरच्या छोट्या भांड्यात लाल मोहरी व अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरवर वाटून मोहरी चांगली फेटून ठेवा. एका काढल्यात चमचाभर तेल गरम करून त्यात मेथीचे दाणे तळून काढून बाजूला ठेवा. आता गॅसवर एका पातेल्यात आवळे घ्या व त्यावर दोन टेबलस्पून तेल घालून मंद आंचेवर थोडेसे शिजवून घ्या. थोडेसे शिजल्यावर गॅसवरून उतरवून थंड झाल्यावर आवळा फोडून आवळ्याच्या फोडी व गर बाजूला काढा. गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात फेटून ठेवलेली लाल मोहरी,लाल मिरचीचे तिखट,तळून ठेवलेले मेथीचे दाणे,हळदीची पावडर व हिंग घालून फोडणी करून घ्या व ही फोडणी थंड होऊ द्या. आवळ्यांच्या फोडीवर व गरावर ही थंड झालेली फोडणी घाला व मीठ घालून चमच्याने हलवून लोणचे एकजीव करा. एका घट्ट झाकणाच्या कोरड्या काचेच्या बरणीत हे मसाला लावलेले आवळ्याचे लोणचे भरून ठेवा. दोन दिवस मुरल्यावर जेवणात तोंडीलावणे म्हणून सर्व्ह करा.

Tuesday 1 December 2020

येसुरची आमटी

झटपट होणारी आणि पौष्टिकतेने भरपूर अशी येसूरची आमटी हल्ली खुप कमी बघायला मिळते. या येसूरच्या आमटीत प्रोटीन कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात असते. ही बनवायला अतिशय सोप्पी. थंडीच्या दिवसात किंवा सर्दी झालेली असेल किंवा तापाची किणकिण असली तरी गरमागरम येसूरची आमटी प्यायल्याने लगेच तरतरी येते अंगात. कमीतकमी तेल आणि मसाले वापरून अत्यंत पौष्टिक, पचायला हलकी अशी आमटी तयार होते. येसूरचे पीठ बनवीण्यासाठी प्रत्येकी एक छोटी वाटी हरभरा डाळ, गहू,बाजरी आणि ज्वारी मंद आंचेवर खमंग भाजून घ्यावी आणि मिक्सरवर बारीक पीठ दळून घ्यावे. हे पीठ डब्यात भरून ठेवावे. चारसहा महीने आरामात टिकते . येसूरच्या आमटीसाठी येसूरचे पीठ तीन चमचे.धनेजीरे पुड , लाल तिखट , गरम मसाला, मीठ, मोहरी, कोथींबीर, आणि थोड़ आले-लसूण ठेचून घ्या. तापलेल्या कढ़ईत दोन चमचे तेल घालून मोहरी आणि ठेचलेलं आले-लसूण परतून घ्या. माह त्यातच सुके मसाले टाकुन परता आणि नंतर एक ग्लास गरम पाणी टाकून छान उकळी येऊ द्या.मीठ आणि चिरलेली कोथंबीर घाला. उकळी आली की येसूरचे पीठ लावा आणि पिठल्याप्रमाणे.चार पाच मिनिटे उकळी येऊ द्या. गरमागरम आमटी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर व भाताबरोबर छान लागते.

शिळ्या भाताचा चिवडा

शिळ्या भाताचा चिवडा रात्रीचा उरलेला भात हाताने मोकळा करून घेऊन वरून तिखट, मीठ, थोडीशी पिठीसाखर चोळून घ्यायची उन्हात पूर्ण वाळवून घ्यायचा आणि असा वाळवलेला भात नंतर त्यात उभा चिरलेला कांदा,बारीक चिरलेला लसूण , पंढरपूरी डाळं , शेंगदाणे,काजू ,बेदाणे व कढीपत्त्याची पाने यांचासह तळून घ्यायचा इतका अप्रतिम लागतो ना हा चिवडा,एकदम यम्मी ! एकदा तरी करून बघाच.