Wednesday 29 August 2018

#शेवगाच्या #पानांचे #ठेपले



साहित्य : एक वाटी शेवग्याची कोवळी पाने, दीड वाटी कणीक, चार टेबलस्पून बेसन पीठ,दोन टेबलस्पून  आंब्याच्या किंवा मिरचीच्या लोणच्याचा खार, चवीनुसार मीठ, एक चमचा हळद, आले लसुण व मिरचीचा खर्डा दोन टेबलस्पून तेल ठेपले भाजण्या साठी व थोडे पीठ मळण्या साठी

साहित्य : प्रथम शेवगाची पाने बारीक चिरुन घ्या, व त्या मध्ये सर्व साहित्य घालून हाताने मिक्स करावे व जरा घट्ट असे पीठ भीजवावे, व अर्ध्या तासाने ठेपले लाटावे व तेल लावुन तव्यावर भाजावे , कोणत्याही साँस किवा चटणी नाही तर दह्या बरोबर सर्व्ह करावे

Monday 27 August 2018

#कारल्याची #पीठ पेरुन भाजी

#कारल्याची  #पीठ पेरुन भाजी


साहित्य  : २-३ कारली , चवीनुसार तिखट, मीठ, साखर,अर्धा डाव तेल,तीन टेबलस्पून हरबरा डाळीचे पीठ
कृती :  कारली स्वच्छ धुवून घ्यावीत आणि त्याचे पातळ काप चिरुन घेऊन त्यांना मीठ चोळून १५-२० मिनिटे मुरत ठेवा. गॅसवर एका कढईत फोडणीला तेल नेहमीपेक्षा थोडे जास्ती घालणे. फोडणीमधे कारल्यांच्या चकत्या घालून परताव्या. मंद आचेवर २-३ वेळा वाफ देवून शिजवून घ्या. नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून थोडीशी साखर घालणे. परत परतून त्यात वरुन थोडे डाळीचे पीठ घालुन परतणे व एक वाफ देवून परत परतणे. झाली भाजी तयार. भाजी मिळून येण्याइतकेच पीठ पेरावे. पीठ पेरल्याने कारल्यांचा कडूपणा पुर्णपणे जातो व भाजी  चवीला चांगली लागते. पीठ जास्त नको, थोडेसेच पेरायचे. नुसती खायला पण चांगली लागते.

Friday 10 August 2018

ब्रेडचा रायता



साहित्य : ८ नग ब्रेडचे  स्लाइस,चार वाट्या दही,एक चमचा साखर,एक चमचा जिरे,एक चमचा मोहरी,चिमूटभर हिंग,अर्धा चमचा सैंधव मीठ,अर्धा चमचा काळी मिरीपूड,एक चमचा चाट मसाला,दोन टेबलस्पून तूप,५-६ कढीपत्त्याची पाने,सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव.
कृती : ब्रेड स्लाइसच्या कडा कापून काढून टाका,व उरलेल्या मधल्या भागाचे सारख्या आकारात तुकडे कापून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये तूप गरम करून घेऊन त्यात हे ब्रेडचे कापलेले तुकडे टाळून काढा व एका ताटात ठेवा.
आता एका बाउलमध्ये दही घेऊन ते चांगले फेटा. मग त्यात चवीनुसार साखर,सैंधव मीठ,जिरे पूड, व काळी मिरीपुड घालून चमच्याने चांगले मिक्स करा.दही जास्त घट्ट वाटले तरच थोडेसे पाणी घाला.
गॅसवर पॅन मध्ये तूप गरम करून घेऊन त्यात मोहरी व जिरे घालून ते चांगले तडतडल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने घाला परतून घ्या. ही खमंग फोडणी दह्यात घालून बरोबर तळून ताटात ठेवलेले ब्रेडचे तुकडे घाल व एकदा चमच्याने हलकेच मिक्स करा.

आता हा ब्रेड रायता सर्व्हिंग बाउल्समध्ये काढून घ्या व त्यावर लाल तिखट,काळी मिरीपुड,जिरे पूड व चाट मसाला भुरभुरून वर बारीक शेव घालून त्यावर चिरलेल्या कोथिंबीरीने सजावट करून सर्व्ह करा. 

#कारल्याची #पानगी

कारल्याची पानगी

साहित्य : एक मोठे कारले , तीन वाट्या तांदुळाची  पीठी , दोन मोठे कांदे , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,एक  टेबलस्पून तेल,दोन केळीची /हळदीची पाने
कृती : आगोदर कारले बारीक चिरुन त्याला मीठ लावून (Marinate) मुरत ठेवावे. १० मिनिटांनंतर कारल्याला सुटलेले पाणी काढून टाकावे (कारले घट्ट पिळून घ्यावे.) तांदुळाची पीठी,बारीक चिरलेला कांदा व हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे व पाणी काढून टाकलेले कारल्याचे बारीक चिरलेले तुकडे  हे सगळे एकत्र करुन,थोडे पाणी घालून मळून घ्यावे. (थालिपीठासारखे थापता येईल इतपत घट्ट/सैलसर करावे.)
केळीच्या/हळदीच्या  पानावर वरील मिश्रणाचा एकेक गोळा घेऊन हलक्या हाताने थापावा. त्यावर दुसरे केळीचे पान ठेवावे व तव्यावर किंचीत तेल घालून मंद आंचेवर भाजावे / चाळणीत ठेऊन वाफवावे .
गरमगरम पानगी तयार! वर ठेवलेल्या केळीच्या/हळदीच्या  पानामुळे पानगी आतपर्यंत नीट शिजते. केळीच्या/हळदीच्या  पानामुळे आणि कारल्याच्या स्वादामुळे एक वेगळीच छान चव येते. कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवतही नाही


Thursday 9 August 2018

#चवळीची #भजी

चवळीची भजी

साहित्य : १ वाटी चवळी , चवीनुसार हिरव्या मिरच्या,१ छोटा चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस,गरजेनुसार बेसनाचे पीठ तळणीसाठी तेल (आवश्यकतेनुसार)


कृती : प्रथम आदल्या रात्री १ वाटी चवळी भिजत घाला,दुसरे दिवशी सकाळी भिजत टाकलेली चवळी मिक्सरमधून वाटून घ्या (भरड ठेऊन) ,नंतर त्यात चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या,१ छोटा चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस,बेसनाचे पीठ(आवश्यकतेनुसार) घालून भज्या साठी लागते तसे सरबरीत भिजवून घा. कढईत भाजी टाळण्यासाठी तेल घालून चांगले तापल्यावर मंद आचेवर भाजी लालसर रंगावर तळून घ्या.

कांदा-पुदिना #रायता

#कांदा-पुदिना #रायता 


साहित्य : दोन वाट्या गोडसर मलईचे दही , २५-३० पुदिण्याची पाने,एका कांद्याचे गोल काप,चवीनुसार मिठ,अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड,एक छोटा चमचा जिरे पूड,पाव छोटा चमचा लाल मिरचीचे तिखट. 
कृती : एका मोठ्या बाउलमध्ये दही घेऊन ते चांगले फेटा व फार घट्ट वाटले तर थोडेसे पाणी घाला. पुदिण्याची पाने मिक्सरवर वाटून त्याची पेस्ट बनवून ती फेटलेल्या दहयांत घाला व चवीनुसार मिठ, काळी मिरी पूड, जिरे पूड , मिरचीचे तिखट व कांद्याचे गोल काप घालून छान मिक्स करून घ्या. 
हा रायता बिर्याणीसोबत सर्व्ह करा,फार चविष्ट लागतो.

#इडली #पोहा #भुर्जी

इडली पोहा भुर्जी 


साहित्य  : आदल्या दिवशीच्या उरलेल्या इडल्या-३ ते ४, एक वाटी जाड पोहे,एक मध्यम आकाराचा कांदा -बारीक चिरून, एक छोटा  टोमॅटो-बारीक चिरून, एक चमचा – आले-लसूण पेस्ट, फोडणीसाठी एक चमचा जिरे व मोहोरी, एक चमचा  लाल मिरचीचे तिखट , अर्धा चमचा धनेपूड , चवीनुसार मीठ , एक टेबलस्पून तेल , सजावटीसाठी कोथिंबीर
कृती :  प्रथम पोहे धुवून घ्या व चाळणीत भिजत घालून ठेवा,तसेच इडल्या हाताने नीट कुस्करून ठेवाव्यात.
मग गॅसवर एका काढईत फोडणीसाठी तेल गरम करत ठेवावे तेल गरम झाले कि त्यात जिरे-मोहोरी घालून दोन्ही चांगली तडतडल्यावर त्यात कांदा घालून चांगला पारदर्शक होऊन गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत  परतू द्यावा मग त्यात टोमॅटो घालून परतून घ्यावे तसेच आलं-लसूण पेस्ट घालावी व परतून घ्यावे ,शेवटी भिजत घातलेले पोहे घालून कलथ्याने चांगले खालीवर  हलवून मिक्स करावे. मग त्यात  हळद, धनेपूड, लाल मिरचीचे तिखट घालून पुन्हा चांगले परतून घ्यावे आता यांत कुस्करलेल्या इडल्या घालाव्यात व नीट एकजीव करून घ्यावे. इडलीत आधीचेच मीठ असते तेव्हा थोड बेतानेच मीठ घालावे व परतून घ्यावे साधारण ३ ते ४ मिनिटांत गॅस बंद करावा.
भुर्जीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.


Wednesday 8 August 2018

#शिळ्या #पोळीचे #डोसे


शिळ्या पोळीचे डोसे


साहित्य : दोन शिळ्या (काल रात्रीच्या) पोळ्या,दोन टेबल स्पून बारीक रवा,मूठभर जाड पोहे,अर्धी वाटी दही,४ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून,कांदा व लसूण पात दोन्ही बारीक चिरून,चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा,मीठ, कोथिंबीर,आवश्यकतेनुसार तेल 
कृती : मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पोळ्या ,रवा,दही,जाड पोहे,लसणाच्या पाकळ्याचे तुकडे,चिरलेली कांदा व लसूण पात, हिरव्या मिरचीचा ठेचा,मीठ व कोथिंबीर घालून मिक्सरवर थोडे थोडे पाणी घालून वाटून घ्या. मिश्रण डोश्यांच्या पिठाएव्हढे सैलसर सरबरीत बनवून ठेवा. गॅसवर डोश्यांचा तवा तापत ठेवा. तवा तापल्यावर तेल घालून डोसे टाका व दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या. 
गरम डोसे चटणी व सांबार सोबत सर्व्ह करा.

Tuesday 7 August 2018

#नाकारडे

#नाकारडे



साहित्य : दोन काकड्या,हिंग, चवीनुसार सैंधव मीठ,हिरवी मिरची,लवंगा, दालचिनीचा तुकडा,काळे मिरे,जिरे,सुंठ पावडर , मोहरी,५-६ पाकळ्या लसूण,अर्धी वाटी मलईचे घट्ट दही 
कृती : काकड्यांची साले काढून, काकड्या किसून घ्या.आता हा कीस राजापुरी पंचावर टाकून, पंचा गुंडाळून चक्क कपडा पिळल्या सारखा घट्ट पिळून घ्या.जमेल तेव्हढे पाणी काढून टाका.
वरील सर्व मसाले, मोहरी, सुंठपावडर , लवंग दालचिनी , जिरे मिरे, यांची मिक्सरवर छान पावडर करून घ्या.
एकदा बारीक झाले की मग त्यातच लसूण व मिरची घालून परत एकदा मिक्सर वर वाटून घ्या. हळद,हिंग, सैंधवमीठ मिसळा.
आता हे सर्व काकडीच्या किसात मिसळून छान एकत्र करा. त्यात घट्ट दही मिक्स करा. झाले तुमचे चविष्ट असे तोंडीलावण तय्यार !
मोहरीच्या उग्रपणामुळे हे 'नाकारडे' खाताना नाकातून अक्षरश: सुं सुं पाणी सुरु होत. सर्दी पडश्यावर एकदम नामी उपाय !! झटकन जाम झालेलं डोकं एकदम हलक होत.
घरात फ्रीज नसलेल्या काळातही हे 'नाकारडे’ सहज महिनाभर मडक्यात राहायचं अन् टिकायच सुद्धा.
आतातर मी चक्क बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवून दोन-तीन महिने मनसोक्त चाखत राहातो.
टीप : या नाकरड्याला वह्राडात कुरमुडे असे म्हणतात.

#ज्वारीचे #धपाटे

#ज्वारीचे #धपाटे

साहित्य : चार वाट्या ज्वारीचे पीठ , दोन मध्यम कांदे किसून , ८-१० लसणाच्या पाकळ्या, एक टेबलस्पून शेंगदानयाचे कूट , एक चमचा भाजले ले तीळ , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार लाल मीराचीचे
तिखट व मीठ व एक टेबलस्पून तेल

कृती : प्रथम एका परातीत ज्वारीचे पीठ चाळून घ्या व त्यात कांद्याचा कीस , शेंगदाण्याचे कूट , तीळ , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार लाल मिरचीचे तिखट व मीठ एकत्र मळावे.
गॅसवर तवा गरम करत ठेवावा , परातीत हे पीठ भाकरीप्रमाणे थापावे. तवा तापल्यावर हा धपाता तव्यावर थोडेसे तेल टाकून त्यावर लालसर होईपर्यंत भाजावा
दही किंवा चटणी सोबत हे ज्वारीचे धपाटे सर्व्ह करावेत.
हे ज्वारीचे धपाटे ७-८ दिवस छान टिकतात आणि त्यामुळे प्रवासात बरोबर नेण्यासाठी फार सोईस्कर व उपयुक्त आहेत.