Monday 14 October 2013

अननसाचा शिरा (पाईनॅपल)

अननसाचा शिरा (पाईनॅपल) "

साहित्य  :  दोन वाट्या अननसाचे काप किंवा फोडी , दोन वाट्या जाड रवा , एक वाटी साखर  (अननस जास्त आंबट असेल तर साखरही जास्त घ्यावी) , अर्धी वाटी साजूक तूप , १०- १२ काजू पाकळ्या, १०- १२ बेदाणे , ६ वाट्या गाईचे दूध , ५-६ केशराच्या काड्या , एक छोटा छानचा वेलची पूड.

कृती :  एका वाटीत थोडे (४ चमचे) गरम दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत घालून बाजूला ठेवा, एका स्टीलच्या पातेल्यात २ वाट्या पाणी घेऊन त्यात अननसाचे काप किंवा फोडी घालून गॅसवर मध्यम आचेवर  पूर्णपणे शिजवून घ्या. एकीकडे अननस शिजत असतांना एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात काजुच्या पाकळ्या व बेदाणे टाळून घेऊन बाजूला टिश्यू  पेपरवर काढून ठेवावेत. त्याच तुपात जाड रवा घालून सारखा परतत राहून सोनेरी गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. अननस शिजला की फक्त अननसाच्या फोडी किंवा काप रव्यात घालुन पुन्हा परतून घ्या. अननस शिजवून उरलेल्या पाण्यात गाईचे दूध व साखर घालुन उकळवून घ्या,मग त्यात रवा आणि अननसाचे मिश्रण घालुन सारखे ढवळत राहून शिजवून घ्या. शिरा सुकायला लागला की त्यात साखर, केशर दुध, बेदाणे , काजू पाकळ्या आणि  वेलची पूड घालणे व पूर्णपणे शिजवून घ्या.


Sunday 13 October 2013

दही बुत्ती भात

         " दही बुत्ती भात " 

साहित्य  :   एक वाटी दिल्ली राईस किंवा बासमती तांदळाचा नेहमीप्रमाणे शिजवलेला साधा भात ,  दोन वाटया गोड घट्ट दही , एक वाटी दुध  , चवीनुसार  मीठ व साखर ,  एक मोठा चमचा साजूक तूप  ,  एक चमचा जिरे ,पाच –सहा सांडगी तळणीच्या मिरच्या ,दोन तीन काश्मिरी सुक्या लाल मिरच्या ,  आठ – दहा कढीपत्त्याची पाने , थोडी  बारीक चिरलेली कोथिंबीर .
कृती  :  शिजलेल्या मोकळा  भातात गोड घट्ट दही , दुध , चवीनुसार  साखर  मीठ घालून भात मऊसर कालवावा . 
गॅसवर एका कढईत एका मोठ्ठ्या चमचाभर साजूक  तुपात जिरे , कढीपत्ता आणि सांगडी मिरच्या व दोन तीन काश्मिरी सुक्या लाल मिरच्या घालून परतून घ्याव्या , व  मिरच्या जरा कुस्कराव्या आणि ती फोडणी भातात मिसळावी .  
सर्व्ह करतेवेळी बारीक चिरलेली  कोथिंबीर घालून भात वाढवा . 
टीप : हा भात प्रवासात न्यायला सोयीचा पडतो . मात्र असा प्रवासात घ्यायच्या भातात दुध जास्त घालून दह्याचे  प्रमाण थोडे कमी करावे जेणेकरून भात फार आंबट किंवा कोरडा होणार  नाही . 


 

Saturday 12 October 2013

ताकातील कढी

"ताकातील कढी " 


साहित्य : एक मोठी वाटी गोडसर दही किंवा पाच वाट्या ताजे रवीखालचे ताक(ताक जास्त आंबट असल्यास एक वाटी दूध घालावे) , दोन टिस्पून बेसन पीठ,८-१० कढीपत्त्याची पाने,७-८ लसणाच्या पाकळ्या,एक मोठा आल्याचा तुकडा,चवीपुरत्या हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा ठेचा ,चवीप्रमाणे साखर व मीठ,कढीत घालण्यासाठी काकडीचे तुकडे,फोडणीसाठी दोन टिस्पून तेल मोहोरी,जिरे,हळद ,मेथीदाणे व हिंग , व बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :   प्रथम मिक्सरच्या भांड्यात थोडे दही किंवा ताक घेऊन त्यात चवीनुसार साखर,मीठ व हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा ठेचा,बारीक किसलेले आले,लसणाच्या पाकळ्या,बेसन पीठ ,२-३कढीपत्त्याची पाने  घालून चांगले फिरवून पेस्ट करून घ्या,एका स्टीलच्या मोठ्या उभ्या गंजात कढीसाठी ताक घेऊन त्यात ही पेस्ट मिसळा व एकजीव होईपर्यंत रवीने घुसळून घ्या,गॅसवर एका कढल्यात तेल तापत ठेऊन ,तेल चांगले तापल्यावर मगच त्यात प्रथम मोहोरी व जिरे घाला, दोन्ही चांगले तडतडल्यावरच मग त्यात हळद,हिंग,कढीपत्त्याची चुरडलेली पाने ,मेथीचे दाणे किंवा कसूरी मेथी घालून ती फोडणी कढीवर घालून डावाने हलवा ,आता कढीत बारीक चिरलेले काकडीचे तुकडे घालून एक उकळी येऊ द्या, उकळी आल्यावर कढीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवा व गॅस बंद करा.
जेवणात खिचडी बरोबर ही टाकातील कढी फारच सुरेख लागते.
पोळीबरोबरसुद्धा कढी व तव्यावरचे कोरडे पिठले असा मेन्यू फारच लज्जतदार आहे.
ह्याच कढीत शेवग्याच्या शेंगा,हदग्याची फुले किंवा पडवळाचे तुकडे घातल्याही  छान लागतात.
गुजराथी पद्धतीने केलेल्या कढीत फोडणीत हळद घालत नाहीत व त्यात लवंगा आणी दालचिनीचे तुकडे घालून ती कढी केली जाते. 

Friday 11 October 2013

“ मोड आलेल्या मुगाची उसळ “

मोड आलेल्या मुगाची उसळ “



साहित्य: 
३/४ कप मुग 
फोडणीसाठी: २ टीस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/८ टीस्पून हिंग, १/४ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, ४-५ कढीपत्ता पाने 
२- ३ मोठ्या लसणीच्या पाकळ्या, जराशा ठेचून 
१/४ कप बारीक चिरलेला कांदा 
१/४ कप ताजा खोवलेला नारळ 
२ ते ३ आमसूलं 
१/२ टीस्पून गोड मसाला (ऐच्छिक) 
चवीपुरते मीठ 
१/२ टीस्पून साखर किंवा चवीनुसार 

कृती: 
१) मूग रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. नंतर सकाळी पाणी काढून टाकावे. मूग निवडून घ्यावे, जर खडा किंवा न भिजलेला कडक मूग असेल तर काढून टाकावा. सुती कापडात भिजलेले मूग घट्ट बांधून ठेवावे. मोड यायला साधारण १० तास तरी लागतील. आणि जर थंडीचा सिझन असेल तर अजून काही तास लागतील. मुगाला मोड आले कि उसळ बनवायच्या आधी पाण्यात घालून लगेच उपसावेत. यामुळे मूग थोडे ओलसर होतात आणि फोडणीला टाकल्यावर कोरडे राहत नाहीत. आणि करपण्याचा संभव टळतो. 
२) कढईत तेल गरम करून. मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. लसूण आणि कांदा नीट परतून घ्यावा. 
३) कांदा छान परतला कि मूग घालून परतावे. आमसूल, मीठ घालावे आणि नीट मिक्स करावे. झाकण ठेवून मध्यम आचेवर झाकण ठेवून वाफ काढावी. मूग कोरडे पडू देवू नये. यासाठी मध्येमध्ये पाण्याचा हबका मारावा. एकाचवेळी खूप जास्त पाणी घालू नये. त्यामुळे चव बिघडते. मूग शिजायला १५ ते २० मिनिटे लागतील. 
४) मूग साधारण ९०% शिजले कि त्यात नारळ, लागल्यास मीठ आणि गोड मसाला घालावा. उसळीला थोडा रस ठेवायचा असल्यास गरजेपुरते पाणी घालावे. साखर घालून उकळी काढावी. 
गरम उसळ पोळीबरोबर सर्व्ह करावी. 

टीप: 
१) मुगाची उसळ कांदा आणि लसणीशिवाय सुद्धा करता येईल. पण, मुग आणि कांदा-लसूण यांचे कॉम्बिनेशन खूप छान लागते. 
२) मी शक्यतो कोणताही मसाला (गोड/गरम) मुगाच्या उसळीला वापरत नाही. वापरल्यास अगदी थोडासा वापरते. पण आपल्या आवडीनुसार मसाल्याचा वापर करावा.

Monday 7 October 2013

वांग्याचे परतून केलेले भरीत

"वांग्याचे परतून केलेले भरीत"





साहित्य :  एक मोठ्ठे भारताचे वांगे ,दोन मध्यम आकाराचे कांदे,एक मोठा लाल टोमॅटो,पाव वाटी शेंगदाणे , चवीनुसार हिरव्या मिरच्यांचा ठेचा ,मीठ व साखर,आले-लसूण पेस्ट,धने व जिरे पूड , फोडणीसाठी दोन डाव तेल,मोहोरी, जिरे, हळद,हिंग,१०-१२ कढीपत्त्याची पाने व अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर व सजावटीसाठी बारीक चिरलेली कांद्याची पात.

कृती :  तेलात बुडवून काढलेल्या सुरीने वांग्याला सर्व बाजूंनी छेद घ्यावेत व गॅसवर सर्व बाजूंनी ते वांगे चांगले भाजून घ्यावे , व कच्चे राहणार नाही ह्याचे काळजी घ्यावी. भाजलेल्या वांग्याच्या काळ्या साली व देठ  काढून टाकून वांग्याचा गर (बलक) एका बाऊलमध्ये काढून घ्यावा व चांगला मॅश करून घ्यावा,गुठळ्या रहाणार नाहीत असे पहावे. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. एका कढईत तेल गरम करत ठेवावे व तेल चांगले गरम झाल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने चुरुन घालावीत,जिरे व मोहोरी घालून दोन्ही तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा,आले लसणाची पेस्ट व हिरव्या मिरच्यांचा ठेचा घालून एकदा परतून घ्या, मग त्यात शेंगदाणे घालून परता,शेवटी बारीक चिरलेले टोमॅटो घालून परता व नंतर धने-जिरे पूड,हळद,हिंग घालून परतावे व हलवून चांगले एकजीव करून घ्यावे व ह्या मिश्रणात मॅश केलेला वांग्याचा गर (बालक) व चवीनुसार साखर व मीठ घालून आठ-दहा मिनिटे परतून घ्या व वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेऊन गॅस बंद करा.
सर्व्ह करतेवेळी  पुन्हा वर कोथिंबीर व बारीक चिरलेली काड्याची पात घाला व पुर्‍या किंवा कळण्याच्या भाकरीसोबत खायला द्या.  

Sunday 6 October 2013

तव्यावरचे कोरडे पिठले

तव्यावरचे कोरडे पिठले " 

आयत्यावेळी कामीतकमी वेळात तयार होणारे तोंडीलावणे म्हणजे हे तव्यावरचे कोरडे पिठले होय.

साहित्य :  दीड वाटी बेसन (चणा डाळीचे) पीठ ,चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ , ८-१० लसूण पाकळ्या बारीक चिरून,  फोडणीसाठी दोन टे.स्पून तेल मोहोरी,जिरे,हळद ,हिंग , ८-१० कढीपत्त्याची पाने,बचकभर  बारीक चिरलेली कोथिंबीर,  स्वादासाठी थोडी कसूरी मेथी

कृती :  एका बाउलमध्ये बेसनाचे पीठ घेऊन त्यात चवीप्रमाणे लाल तिखट व मीठ , ८-१० बारीक चिरलेली व ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या व जरूरी प्रमाणे पाणी घालून भज्याप्रमाणे सरबरीत असे पीठ भिजवा. गॅसवर तवा तेल घालून तापत ठेवा,तेल चांगले तापल्यावर प्रथम त्यात मोहोरी व जिरे घाला,दोन्ही चांगले तडतडल्यावरच मग त्यात हळद , हिंग ,कढीपत्त्याची चुरडलेली पाने व कसूरी मेथी घालून परता,आता त्यावर बाउलमध्ये भिजवलेले बेसनाचे पीठ घालून परतत रहा,चांगला खरपूस लाल रंग  येईपर्यंत परतत रहा,मग सर्व बाजूंनी चमच्याने तेल सोडून पुन्हा परता. चित्रात दाखवल्याप्रमाणे कोरडे पिठले झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झ थोडावेळ झाकून ठेवा व मग पोळीबरोबर  सर्व्ह करा.

कधी बरोबर हे कोरडे तव्यावरचे पिठले हा उत्तम असा मेन्यू आहे. 

Saturday 5 October 2013

“ देठी “ –आळूच्या देठांचे भरीत


“ देठी “ – अर्थातच आळूच्या देठांचे भरीत " 

साहित्य :  १०-१२ आळूच्या पानाच्या मागचे लांब व जाड देठ,एक मोठ्ठा कांदा, एक वाटी गोडसर दही, अर्धी वाटी शेंगदाण्याचे भरड कूट,फोडणीसाठी दोन टे.स्पून तेल , मोहोरी , जिरे , हळद व हिंग , चवीनुसार लाल तिखट , मीठ , साखर  व  लिंबाचा रस , अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :  प्रथम आळूच्या पानाच्या देठांवरचे साल (स्कीन) काढून देठांचे बारीक तुकडे चिरून घेऊन  ते शिजवून घ्या व स्मॅश करून घ्या , कांदा साले काढून बारीक चिरून घ्या.एका बाउलमध्ये स्मॅश केले आळूचे देठ , दही , शेंगदाण्याचे भरड कूट व चवीनुसार साखर,मीठ व लिंबाचा रस घालून चांगले हालवून एकजीव करून घ्या ,गॅसवर एका कढल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तेल तापल्यावर मोहोरी व जिरे घाला व ते चांगले तडतडल्यावर  त्यात हळद व हिंग घालून भरतावर आधी चवीनुसार लाल तिखट घाला व मग त्यावर ती गरम फोडणी घाला (लाल तिखट फोडणीतच  घातले तर ते  जळते म्हणून ते प्रथम भरतावर  घालून त्यावर गरम फोडणी घालावी) व पुन्हा एकवेळ चांगले हलवून सगळीकडे फोडणी व तिखट लागेल असे बघा. सर्व्ह करण्यापूर्वी भरतावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून द्या.
तोंडीलावणे म्हणून ही आळूच्या पानाच्या देठांची केलेली “देठी” (भरीत) पोळीबरोबर खाण्यास फारच चविष्ट लागते. 

 

Friday 4 October 2013

मिक्स व्हेजिटेबल कटलेटस्


मिक्स व्हेजिटेबल कटलेटस्"


साहित्य :  दोन मध्यम बटाटे,एक मध्यम बीट,पाव वाटी मक्याचे दाणे, अर्धा मध्यम कोबीचा गड्डा , दोन छोटी गाजरे, ८-१० फरसबीच्याशेंगा , पाव वाटी मटार, एक भोपळी मिरची, चवीपुरते लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्यांचा ठेचा चवीपुरते मीठ,एक चमचा लिंबाचा रस.तळणीसाठी तेल. 
कृती :  सर्वात प्रथम बटाटे व बीट उकडून व किसून घ्या ,मटार व मक्याचे दाणे वाफवून घेऊन नंतर मिक्सर मधून भरड फिरवून घ्या, कोबी, गाजर, फरसबी, भोपळी मिरची अशा भाज्या किसून  अगर बारीक चिरून घ्या, त्यामध्ये थोडी  आले-लसूण पेस्ट, चवीपुरता हिरव्या मिरच्यांचा ठेचा किंवा लाल तिखट व मीठ घाला,थोडासा लिंबाचा रसही घातला तरी चालेल.हे सगळे जिन्नस एकत्र करून चांगले कालवून घ्या व त्यांचे पॅटिसच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करा. आणि ते वाळवलेला पाव मिक्सरमध्ये फिरवून घेऊन रव्यासारख्या पावडरमध्ये  घोळवून घेऊन मंद आचेवर थोडय़ाशा तेलात परतवा अगर फ्राय पॅनमध्ये तेलात तळून घेऊन टिश्यू पेपरवर काढावेत.
सर्व्ह करतेवेळी ह्या गरम कटलेटस् बरोबर हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा टोमॅटो केचप द्या.


Thursday 3 October 2013

मुगाच्या डाळीची खिचडी,पापड,सांडगी मिरची व कडबोळी

मुगाच्या डाळीची खिचडी,पापड,सांडगी मिरची व कडबोळी "


साहित्य  :  एक वाटी मुगाची डाळ (मोड आलेले हिरवे किंवा पिवळे मूग सुद्धा चालतील) ,दोन वाट्या तांदूळ , चवीपुरते मीठ,गुळाचा बारीक खडा ,लाल तिखट, दोन चमचे गोडा मसाला ,बचकभर भाजून किसलेले सुके खोबरे ,भाजून घेतलेले एक चमचा जिरे  फोडणीसाठी एक डाव तेल.मोहोरी,जिरे,हळद ,मेथ्या दाणे (मोड आलेली मेथी असेल तर जास्त चांगले,किंवा कासुरी मेथी घातली तरी चालेल), हिंग ,असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर,कढीपत्त्याची १०-१२ पाने,ओल्या नारळाचा चव,खिचडीबरोबर तोंडीलावणे म्हणून  कडबोळी,लिज्जत पापड(भाजून किंवा तेलाचे बोट लावून मायक्रो ओव्हन मधून काढलेला) ,तळणीच्या सांडगी मिरच्या (दहयातले कांदा घालून केलेले डांगर सुद्धा खिचडी बरोबर तोंडीलावणे म्हणून उत्तम लागते)व साजूक तूप.

कृती :  प्रथम मुगाची डाळ व तांदूळ धुवून घेऊन अर्धा तास आधी भिजत ठेवा. सुके खोबरे व जिरे भाजून घेऊन मिक्सर मधून कच्चा मसाला वाटून घ्या,जाड बुडाच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात प्रथम मोहोरी व जिरे टाकून ते तडतडल्यावर फोडणीत मेथ्या दाणे,हळद व हिंग घालून परता,मग कढीपत्त्याची पाने व थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा परता,शेवटी भिजत ठेवलेली मुगाची डाळ व तांदूळ घालून चांगले परतून घ्या,आता त्यात कच्चा मसाला,गोडा मसाला ,चवीनुसार लाल तिखट,मीठ,गूळ घालून पुन्हा एकदा परतून घ्या व ते  मिश्रण प्रेशर कुकरमध्ये  काढून घेऊन त्यात सहा वाट्या पाणी घालून कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या देवून शिजवून घ्या.
सर्व्ह करतेवेळी डिश मध्ये खिचडी काढून त्यावर दोन चमचे साजूक तूप व बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा चव भुरभुरून  सोबत तोंडीलावणे म्हणून ३-४ कडबोळी ,दोन तळणीच्या सांडगी मिरच्या एखादा पापड द्यावा.


Tuesday 1 October 2013

वांग्याचे दहयातील भरीत

वांग्याचे दहयातील भरीत "




साहित्य : भाजलेल्या एका मध्यम वांग्याचा गर (बलक) , एक मोठा बारीक चिरलेला कांदा , फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा लाल तिखट , साखर , मीठ,  जरुरीप्रमाणे दही , तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड असे कूट.
कृती : तेलात बुडवून काढलेल्या सुरीने वांग्याला सर्व बाजूंनी छेद घ्यावेत व गॅसवर सर्व बाजूंनी ते वांगे चांगले भाजून घ्यावे , व कच्चे राहणार नाही ह्याचे काळजी घ्यावी. भाजलेल्या वांग्याच्या काळ्या साली व देठ  काढून टाकून वांग्याचा गर (बलक) एका बाऊलमध्ये काढून घ्यावा व चांगला मॅश करून घ्यावा,गुठळ्या रहाणार नाहीत असे पहावे. गॅसवर एका कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे व मोहोरी घालून दोन्ही तडतडेपर्यन्त थांबावे. मग फोडणीत हळद व हिंग आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. तयार फोडणी वांग्याच्या गरावर घालावी.नंतर त्यात कांदा,मीठ,साखर,दही,शेंगदाण्याचे भरड कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. जेवणात तोंडीलावणे म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत फारच छान लागते. विशेषतः मुगाच्या डाळीच्या गरागरम खिचडीबरोबर तर ते जास्तच लज्जतदार व चविष्ट लागते.