Search This Blog

Saturday, 12 October 2013

ताकातील कढी

"ताकातील कढी " 


साहित्य : एक मोठी वाटी गोडसर दही किंवा पाच वाट्या ताजे रवीखालचे ताक(ताक जास्त आंबट असल्यास एक वाटी दूध घालावे) , दोन टिस्पून बेसन पीठ,८-१० कढीपत्त्याची पाने,७-८ लसणाच्या पाकळ्या,एक मोठा आल्याचा तुकडा,चवीपुरत्या हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा ठेचा ,चवीप्रमाणे साखर व मीठ,कढीत घालण्यासाठी काकडीचे तुकडे,फोडणीसाठी दोन टिस्पून तेल मोहोरी,जिरे,हळद ,मेथीदाणे व हिंग , व बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :   प्रथम मिक्सरच्या भांड्यात थोडे दही किंवा ताक घेऊन त्यात चवीनुसार साखर,मीठ व हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा ठेचा,बारीक किसलेले आले,लसणाच्या पाकळ्या,बेसन पीठ ,२-३कढीपत्त्याची पाने  घालून चांगले फिरवून पेस्ट करून घ्या,एका स्टीलच्या मोठ्या उभ्या गंजात कढीसाठी ताक घेऊन त्यात ही पेस्ट मिसळा व एकजीव होईपर्यंत रवीने घुसळून घ्या,गॅसवर एका कढल्यात तेल तापत ठेऊन ,तेल चांगले तापल्यावर मगच त्यात प्रथम मोहोरी व जिरे घाला, दोन्ही चांगले तडतडल्यावरच मग त्यात हळद,हिंग,कढीपत्त्याची चुरडलेली पाने ,मेथीचे दाणे किंवा कसूरी मेथी घालून ती फोडणी कढीवर घालून डावाने हलवा ,आता कढीत बारीक चिरलेले काकडीचे तुकडे घालून एक उकळी येऊ द्या, उकळी आल्यावर कढीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवा व गॅस बंद करा.
जेवणात खिचडी बरोबर ही टाकातील कढी फारच सुरेख लागते.
पोळीबरोबरसुद्धा कढी व तव्यावरचे कोरडे पिठले असा मेन्यू फारच लज्जतदार आहे.
ह्याच कढीत शेवग्याच्या शेंगा,हदग्याची फुले किंवा पडवळाचे तुकडे घातल्याही  छान लागतात.
गुजराथी पद्धतीने केलेल्या कढीत फोडणीत हळद घालत नाहीत व त्यात लवंगा आणी दालचिनीचे तुकडे घालून ती कढी केली जाते. 

No comments:

Post a Comment