Search This Blog

Thursday, 3 October 2013

मुगाच्या डाळीची खिचडी,पापड,सांडगी मिरची व कडबोळी

मुगाच्या डाळीची खिचडी,पापड,सांडगी मिरची व कडबोळी "


साहित्य  :  एक वाटी मुगाची डाळ (मोड आलेले हिरवे किंवा पिवळे मूग सुद्धा चालतील) ,दोन वाट्या तांदूळ , चवीपुरते मीठ,गुळाचा बारीक खडा ,लाल तिखट, दोन चमचे गोडा मसाला ,बचकभर भाजून किसलेले सुके खोबरे ,भाजून घेतलेले एक चमचा जिरे  फोडणीसाठी एक डाव तेल.मोहोरी,जिरे,हळद ,मेथ्या दाणे (मोड आलेली मेथी असेल तर जास्त चांगले,किंवा कासुरी मेथी घातली तरी चालेल), हिंग ,असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर,कढीपत्त्याची १०-१२ पाने,ओल्या नारळाचा चव,खिचडीबरोबर तोंडीलावणे म्हणून  कडबोळी,लिज्जत पापड(भाजून किंवा तेलाचे बोट लावून मायक्रो ओव्हन मधून काढलेला) ,तळणीच्या सांडगी मिरच्या (दहयातले कांदा घालून केलेले डांगर सुद्धा खिचडी बरोबर तोंडीलावणे म्हणून उत्तम लागते)व साजूक तूप.

कृती :  प्रथम मुगाची डाळ व तांदूळ धुवून घेऊन अर्धा तास आधी भिजत ठेवा. सुके खोबरे व जिरे भाजून घेऊन मिक्सर मधून कच्चा मसाला वाटून घ्या,जाड बुडाच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात प्रथम मोहोरी व जिरे टाकून ते तडतडल्यावर फोडणीत मेथ्या दाणे,हळद व हिंग घालून परता,मग कढीपत्त्याची पाने व थोडी कोथिंबीर टाकून पुन्हा परता,शेवटी भिजत ठेवलेली मुगाची डाळ व तांदूळ घालून चांगले परतून घ्या,आता त्यात कच्चा मसाला,गोडा मसाला ,चवीनुसार लाल तिखट,मीठ,गूळ घालून पुन्हा एकदा परतून घ्या व ते  मिश्रण प्रेशर कुकरमध्ये  काढून घेऊन त्यात सहा वाट्या पाणी घालून कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या देवून शिजवून घ्या.
सर्व्ह करतेवेळी डिश मध्ये खिचडी काढून त्यावर दोन चमचे साजूक तूप व बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा चव भुरभुरून  सोबत तोंडीलावणे म्हणून ३-४ कडबोळी ,दोन तळणीच्या सांडगी मिरच्या एखादा पापड द्यावा.


No comments:

Post a Comment