Thursday 28 June 2018

#डाळीच्या पिठाचे #धिरडे


#डाळीच्या पिठाचे #धिरडे


साहित्य : एक वाटी बेसन/चणा डाळीचे पीठ,एक कांदा बारीक चिरून,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या किंवा ठेचाव मीठ,एक छोटा चमचा हळद
कृती : एका भांड्यात बेसन पीठ,बारीक चिरलेला कांदा व हिरवी मिरची/ठेचा घ्या, त्यात थोडे पाणी, मीठ आणि हळद टाका व चांगले मिक्स करून घ्या. गॅसवर एका फ्रायपॅन मध्ये थोडे (जास्त) तेल गरम करा आणि त्यात हे मिश्रण टाका. थोड्या वेळाने धिरडे उलटे करा व शिजवून घ्या. तेल थोडे जास्त असेल तर कडेचा भाग आगदी भज्यासारखा तळला जातो आणि कुरकुरीत लागतो. हे बेसन धिरडे  तसेच खाल्ले तरी मस्त लागते . मात्र हे धिरडे पोळी/स्लाइस ब्रेड बरोबर खायला जास्त चांगले.


#पाकातल्या पुऱ्या





साहित्य  :  एक वाटी रवा , एक वाटी मैदा , चवीपुरते एक चिमूटभर मीठ , पाकासाठी एक वाटी साखर  , मोहन व तळण्यासाठी तेल ,विलायची पूड ,जिलबीचा खाद्य रंग ,व्हॅनिला ईसेन्स

कृती : रवा, मैदा व चिमूटभर मीठ एका भांड्यात एकत्र करून घ्यावं. कडकडीत तेल तापवून ते मोहन  या मिश्रणात टाकून मिश्रण ओलसर करून घेऊ साध्या पाण्यात भिजवून ३ - ४ तास झाकून मुरण्यासाठी ठेऊन द्यावे.
आता एका वाटीत मैदा व तूप एकत्र करून पाणी घालून पातळ भिजवावे.
भिजवून ठेवलेले रवा- मैद्याचे पीठ चांगले  मुरले  की मिश्रण हाताला ओलसर लागतं. मुरल्यानंतर मिश्रणाचे पोळीसाथी  कणकेचे करतो तसे  गोळे करून घ्यावे व पोळी लाटावी. या पोळीच्या एका बाजूवर मैदा व तूपाचं मिश्रण पसरुण घेऊन ती पोळी बाजूला ठेवावी. दुसरी पोळी लाटून तिच्यावरही मैदा व तुपाचं मिश्रण एका बाजूला लावावं. दोन पोळ्या एकावर एक ठेवून त्याचा रोल करावा. या रोलचे छोटे तुकडे करावे. हे तुकडे पुन्हा एकदा लाटून घेऊन यांची पूरी करावी. या पुर्‍या मध्यम आचेवर तेलात गुलाबी रंग येईपर्यंत तळाव्यात. एकावर एक अशा पोळ्या ठेवल्यानं व त्यांच्या रोल्सचे तुकडे करून त्यांच्या पुर्‍या केल्याने या पुर्‍यांना छान पदर सुटतात. पुर्‍या थंड होण्यासाठी एका परातीत अथवा ताटात काढाव्यात.
एका जाड बुडाच्या पातेल्यात अथवा निर्लेपच्या पातेल्यात  एक वाटी साखर घेऊन तिच्यात थोडं पाणी टाकून ३ तारी पाक करून घ्यावा. त्यात थोडी विलायचीची पुड ,३-४ थेंब जिलबीचा खाद्य रंग  व ३-४ थेंब व्हॅनिला ईसेन्स टाकावा. पुर्‍या थंड झाल्यावर या पाकात अर्धा तास बुडवून बाहेर काढाव्या व डब्यात भरून ठेवाव्यात.
ह्या पुर्‍या १० १५ दिवस छान टिकतात.


Wednesday 27 June 2018

#पेंडपाला ( स्पेशल सोलापुरी पदार्थ )

#पेंडपाला ( स्पेशल सोलापुरी पदार्थ )



  
साहित्य  : एक वाटी हरबरा/चण्याची डाळ,अर्धी वाटी तुरीची डाळ,चार चमचे शेंगदाण्याचे कुट१० - १२ लसणाच्या पाकळ्या,मूठभर कोथिंबीर,एक छोटा चमचा हळद, दोन चमचे काळा मसाला किंव्हा गोडा मसाला, लाल तिखट, चवी नुसार मीठ,फोडणीसाठी तेल , जिरे , मोहरी , लाल मिरच्या
कृती : प्रथम कुकर मध्ये चण्याची डाळ आणि तुरीची डाळ घालावी आणि ती बुडेल त्या पेक्षा थोडं जास्त पाणी घालावा आणि त्याचा साधारण २-३ शिट्या कराव्या. फक्त काळजी एवढी घ्यायची की डाळ जास्त शिजली नाही पाहिजे. म्हणजे साधारण बोटचेपी अशी शिजली पाहिजे. जर डाळ शिजून त्यात थोडं पाणी राहिले असेल तर ते काढून टाकावे.नंतर त्यात शेंगदाण्याचे कुट, काला किंवा गोडा मसाला,हळद,तिखट, मीठ आणि लसूण ठेचून टाकावा. नंतर त्यात भरपूर कोथिंबीर घालावी. 
नंतर एका कढईत फोडणी करावी त्यात २ -३ लाल मिरच्या घालाव्यात . आणि वरील सर्व एकत्र केलेलं साहित्य फोडणीत घाला आणि वाफ येइपर्यन्त परतून घ्या. 
एका सव्हिंग बाउल मध्ये काढून सर्व्ह करा. हा पदार्थ भाकरी सोबत खूप छान लागतो. त्याच्या जोडीला फोडणीचं ताक आणि कांदा तोंडी लावायला असेल तर उत्तमच.


#पोहे #कोथिंबीरीच्या #पापड्या

#पोहे #कोथिंबीरीच्या #पापड्या

साहित्य- दोन वाट्या पातळ पोहे, दोन वाट्या बारीकचिरलेली कोथिंबीर , पाऊण वाटी साबूदाणा, दोन चमचे पापडखार, एक टेबलस्पून पांढरे तीळ, एक टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ.

कृती - आदल्या दिवशी रात्री साबुदाणे भिजवून ठेवावे. दुसरे दिवशी सकाळी त्यात,पाण्यात घालून लगेच काढलेले पातळ पोहे मिसळून घ्यावे व मग त्यात पापडखार, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टेबलस्पून तेल व चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य घालून हाताने चांगले कालवून आणि मळून घ्या. या मिश्रणाचे छोटे गोळे करा. नंतर पोळपाटावर तेल लावलेला प्लास्टिक कागद ठेवून त्यावर छोटा गोळा ठेवून त्याला जरा दाबून वरूनही प्लास्टिक कागद ठेवून पुरीच्या आकाराप्रमाणे चांगले पातळ लाटून घेणे. अशा प्रकारे आपण नेहणी जसे पापड लाटतो तश्याच या पापडय़ा लाटूनघ्याव्यात.  या पापडय़ा प्रथम घरातच ५-६ तास सुकवाव्यात  नंतर त्या पापडय़ा ३-४ दिवस कडकडीत उन्हात वाळवाव्यात. या पापडय़ा वर्षभर छान टिकतात.

Monday 25 June 2018

#पंजाबी छोले मसाला

#पंजाबी छोले मसाला


साहीत्य : एक वाटी छोले/हरभरे/काबुली चणे ,एक चमचा प्रत्येकी धणे-जिरे पावडर,दोन चमचे गरम मसाला , एक छोटा चमचा हळद ,पाव चमचा आमचूर पावडर,चवीनुसार मिठ व मिरची पावडर , एक टोमॅटो चिरून, एक कांदा चिरून, एक चमचा आले-लसुण मिरची पेस्ट,कोथिंबिर बारीक चिरून,एक टेबलस्पून तेल,चिमूटभर खाचा सोडा, एक टीबॅग
कृती :-
आदल्या रात्री छोले धुवन,पुर्ण बुडतील एवढ्या पाण्यात मिजत घालावेतव दुसरे दिवशी सकाळी त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे व चिमूटभर खायचा सोडा घालून कुकरमधे शिजण्यास ठेवावे.शिजवताना त्यात टीबॅग सोडावी.नसेल तर लहान चमचा चहा पावडर पांढर्या कपड्यात बांधुन पुरचूंडी सोडा.कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बब्द करा. कुकरची वाफ जिरेपर्यत चिरलेल्या कांदा व टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्या.
नंतर गॅसवर फ्रायपॅन मधे तेल गरम करण्यास ठेवा व हिग जिरे,मोहरी घालून फोडणी करावी,आगोदर हळद,मिरची पूड घालून नंतर परतत परतत अनुक्रमे कांदा पेस्ट,टोमॅटो पेस्ट,आल,लसूण,मिरची पेस्ट घालून नीट परतावे .
नंतर त्यामधे धणे-जिरे पावडर,गरम मसाला,मिठ व आमचूर पावडर घालून परतावे व थोडे पाणी घालून शेवटी या ग्रेव्हीमधे शिजवलेले छोले/हरभरे/काबुली चणे घालावेत.पाच-सात मिनिटे उकळू द्यावे.(ग्रेव्ही जरा दाटच असलेली बरी)
आता तयार चना/छोले मसाला बाउल मधे काढावा व सजावटी साठी वरून कोथिंबीर ,टोमॅटो चकत्या ठेवावे.आवडत असल्यास सोबत कांदा व लिंबू द्यावे.
गरम फुलके अथवा चपाती सोबत खावे छान लागते.
टीप: तयार चना मसाला वापरायचा असेल तर गरम मसाला व धणे जिरे पावडर घालू नये.

Friday 22 June 2018

#शेपूच्या दशम्या/ #पराठे





साहित्य : एक जुड्डी शेपू , चवीनुसार १-२  हिररव्या मिरच्या , ५-६ लसूण पाकळ्या , दोन वाट्या कणिक, दोन टेबलस्पून ओट्स, चवीनुसार मीठ , एक चमचा ओवा,आवश्यकतेनुसार पाणी.
कृती :   शेपू निवडून , धुवून, बारीक चिरून घेणे त्यात लसुण , मिरचीचा ठेचा , मीठ आणि दोन टेबलस्पून ओट्स घाला.
मावेल तशी कणिक (गव्हाचे पीठ) घेऊन पोळ्यांसाठी मळतो तशी कणिक मळून ठेवा व  १५ मिनिटांनी पराठे लाटून तेल/ तूप लावून भाजा. 

#आंबेहळदीची चटणी

#आंबेहळदीची चटणी


साहित्य : अर्धा वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,एक २ “ लांब आंबेहळदीचा तुकडा , पेरभर आल्याचा तुकडा, ४ ५ लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार दोन हिरव्या मिरच्या , चवीनुसार मीठ , एक चमचा साखर , एक टेबलस्पून लिंबाचा रस वरुन फोडणी देण्या साठी दोन चमचे तेल, व ८-१० कढीपत्त्याची पाने, एक चमचा मोहरी.


कृती : प्रथम ओल्या नारळाचा खोवलेला चव, आंबेहळदीचा तुकडा , आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या , मीठ , साखर व लिंबाचा रस हे सर्व साहीत्य मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यात घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्या व वरून कढीपत्ता आणि मोहरीची तेलाची तडका फोडणी द्यावी , फोडणी ओतल्यावर २ मिनीट चटणी वर झाकण ठेवावे

Thursday 21 June 2018

#पंचामृत



साहित्य : अर्धी वाटी चिंचेचा कोळ काढून , अर्धी वाटी गोटा (सुक्या) खोबर्याेचे पातळ काप करून , अर्धी वाटी भाजलेल्या पांढर्याअ तीळाचे कूट , अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड कूट , चवीनुसार ७-८ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे , पाव वाटी मनुका, बेदाणे, काजू , चवीनुसार अर्धी वाटी किसलेला गूळ , २-३ चमचे ब्राह्मणी गोडा (काळा) मसाला , फोडणीसाठी मोहोरी , हळद , हिंग व ८-१० कढीपत्त्याची पाने
कृती: गॅसवर एका पातेल्यात फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात मोहोरी,हिंग, हळद, मिरच्या व कढीपत्त्याची पाने घालून फोडणी करुण घेऊन त्यात सुक्या खोबर्यावचे काप परतून घ्यावेत व नंतर चिंचेचा कोळ घालून एक उकळी काढून घेऊन मग त्यात गोडा मसाला, शेंगदाण्याचे कूट , बेदाणे, मनुका, काजू घालून आणखी थोडे पाणी घालून , तिळाचे कूट व गूळ घालून हवे तेव्हढे घट्ट होईपर्यंत आटवावे.

#भेंडीचे #पंचामृत

भेंडीचे  पंचामृत

साहित्य : वाटीभर भेंडीचे गोल पातळ चिरलेले काप,लिंबाएव्हढा चिंचेचा गोळा,चवीनुसार मीठ व गूळ,अर्धा चमचा लाल मिरचीचे तिखट,एक टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,एक टेबलस्पून भालेल्या तीलाचे कूट,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण,५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती : प्रथम गरम पाण्यात चिंच १५ मिनिटे भिजत घालून ठेवा. १५ मिनिटांनी भिजलेल्या चिंचेचा कोळ काढून ठेवा.
आता गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे व  मोहरी टाका व दोन्ही चांगली तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला लसूण व कढीपत्त्याची पाने टाकून परता व नंतर त्यात भेंडीचे गोल पातळ चिरलेले काप टाकून परतून घ्या. वाफेवर भेंडी थोडी शिजली की,चिंचेचा कोळ, गुळ,तिखट, मीठ टाकून उकळी आली की मग दाण्याचे कुट व तीळाचे कुट टाकुन छान शिजू द्या.(कच्या चिंचेचा उग्र वास जाईपर्यंत शिजवा)सगळे घटक चांगले शिजले की गॅस बंद करा. आपले भेंडीचे पंचामृत तय्यार. जेवणात डावीकडचे तोंडीलावणे म्हणून सर्व्ह करा. छान लागते.

#निनाव #वड्या


निनाव वड्या




साहित्य : एक वाटी बेसन पीठ , एक टेबलस्पून कणीक, एक वाटी (किंवा आवडीनुसार कमी-जास्त) गूळ , एक छोटा चमचा विलायची पावडर , एक चिमुटभर जायफळाची पावडर , एक वाटीभर नारळाचे दूध, बदाम, पिस्ता व काजू काप , बेदाणे व चारोळया,आवडत असल्यास एखाद्या आवडत्या ईसेन्सचे दोन-तीन थेंब .
कृती : सर्वप्रथम गॅसवर एक फ्राय पॅनमध्ये एक टेबलस्पून साजूक तूप गरम करून त्यात बेसनपीठ व कणिक खरपूस भाजून घ्यावे. नंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ओल्या नारळाच्या काढलेल्या दुधात भाजलेले बेसन पीठ,कणीक आणि बाकीचे सर्व पदार्थ घालून नीट मिक्स करून घ्यावेत , त्यात गुठळी बनणा / ररहाणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर गॅसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये हे सर्व मिश्रण ओतावे व आवडत असल्यास एखाद्या आवडत्या ईसेन्सचे दोन-तीन थेंब घालून साधारणपणे पिठल्याएव्हढे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते मिश्रण शिजवत ठेवावे. साधारण करपल्यासारखा वास आला की समजावे की निनाव झाले असे समजावे.

एका ट्रेमध्ये किंवा स्टीलच्या पसरत ताटात तूप लावून त्यात हे मिश्रण काढून घ्यावे व लाकडी उलथण्याने किंवा वाटीच्या बुडाला तूप लावून दाबून एका समान जाडीच्या पातळ वड्या थापाव्यात. सर्वात शेवटी बदाम, पिस्ता , काजू यांचे काप बेदाणे व चारोळया वगैरे पेरून या वड्या सजवाव्यात.थंड झाल्यावर हव्या त्या आकारात वड्या कापाव्यात व ट्रे किंवा ताटातून काढून डब्यात भरून ठेवाव्यात.

Tuesday 19 June 2018

#मेथी - #केळी वडे"

"मेथी - केळी वडे"

साहित्य : बारीक चिरलेली मेथी,एक पिकलेले केळं,बेसन/चणा डाळीचे पीठ,चवीनुसार हिरव्या  मिरचीचा ठेचा,लाल मिरचीचे तिखट,मीठ,ओवा,धने पूड,चिमूटभर साखर,चिमूटभर खायचा सोडा.
कृती : प्रथम मेथी बारीक चिरून व केळं कुस्करून घ्या. मग दोन्ही एकत्र करून त्यात वरील सर्व साहित्य तुमच्या अंदाजाने घालावे. थोडे कच्च्या तेलाचे मोहन घालून घट्टसर मळून घ्या. अर्धा एक तास तसेच मुरत ठेवावे. ह्या पिठाचे हातावर चपटे वडे थापून घेऊन गोल्डन रंगावर तळावेत.
चटणी सॉस किंवा गरम गरम चहा सोबत खायला द्या