Saturday 6 March 2021

कचर्‍यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)



 
कचर्‍यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)











घरातील निघणारा कचरा ही समस्या न मानता संधी समजून कंपोस्ट बनवा. कंपोस्ट म्हणजे कचर्‍यावर प्रक्रिया करून बनवलेले काळे सोनेच असते.कंपोस्ट म्हणजे Waste to Best बनवणे माना आणि त्यावर सुंदर अशी सेंद्रिय बाग फुलवा. 

ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या    “ वसुंधरा बचाव “ चळवळीत सहभागी होऊन इ.सन  २००६ पासून पर्यावरणास पूरक असे अनेक उपक्रम आम्ही उभयतांनी घरी चालू केले. त्यातील  आम्ही चालू केलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या स्वयंपाकघरातील रोजचा निर्माण होणारा सर्व प्रकारचा ओला कचरा ( म्हणजेच शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपाल्याचा अथवा फळांचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचरा कुंडीत  न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा या उद्देशाने आम्ही नोव्हेंबर २००९ पासून आमच्या जुन्या घराच्या १४' x १०' आकाराच्या गच्चीत,  बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच जैविक बगीचा फुलवला असून ओल्या कचर्‍यापासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचा चोथा, कोथिंबीर, पालक,शेपू, मेथी, चाकवत, अंबाडी,माठ,चुका, मुळा,करडई इत्यादि पालेभाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व पोरकिडे झालेले धान्य, कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली, बिरड्यांचीसाले, कलिंगड, फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी, लिंबू इत्यादि फळांच्या साली,अंडी,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ, नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) यांचा वापर करून या बगीच्यात आत्तापर्यंत आम्ही  आंबा,पेरु,चिक्कू,चिंच सिताफळ,डाळिंब,करवंद,आवळा, कलिंगड,अंजीर,स्ट्रॉबेरी,मलबेरी,जांभूळ,पपई,केळी,लिंबू इत्यादी) विविध प्रकारची फळझाडे लावली असून (वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.तसेच आम्ही बागेत भाजीपाला (वांगी,टोमॅटो,पालक, मेथी, रताळी,हळद,आले,लसूण,कांदा पात,वालपापडी, पावटा, कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा,कोबी,मोहरी, मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा,रताळी,दोडके,कोहळा,घोसाळी,)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. याखेरीज या जैविक मातीविरहित बागेत आम्ही अनेक जातींची फुलझाडे लावली आहेत (अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद, झेंडू, निशिगंध,पारीजातक, रातराणी, सोनटक्का, अनंत, अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा, सदाफुली, तगर, चित्रक,,चिमिन ,अ‍ॅडेनियम,सक्यु लंट, इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पादनही  घेत आहोत .सोबत आमच्या जैविक बागेचे काही फोटो नमुन्यादाखल खाली दिलेले आहेत.
या जैविक बगीच्या पद्धतीत मानवाने भौतिक सुखाच्या लालसेने निर्माण केलेला पण निसर्गाला मान्य नसलेला  कोरडा कचरा उदा. कागद,कांच,धातूचा पत्रा ,प्लास्टीक ,थर्मोकोल किंवा तार वगळता ज्याचे  जैविक विघटन होऊ शकते असा घरातील कोणताही नैसर्गिक ओला कचरा अगदी केसांचे गुंतवळ किंवा नखे  अगर मेलेली झुरळे किंवा उंदीर-घुशी सुद्धा टाकू शकता.
बाजारात मिळणारी बायो-कल्चर पावडर म्हणजे एक प्रकारचे ओल्या कचर्‍याचे जलद गतीने विघटन होण्यासाठी आवश्यक असे एक प्रकारचे विरजण आहे. (जसे आपण घरी दुधापासून दही करतांना दुधाला जसे विरजण लावतो तसे)  
विघटन होऊ शकेल असा ओला कचरा,रसवंतीगृहातून  उसाचा रस काढून झाल्यावर उरणारी चिपाडे,नारळाच्या शेंड्या व करवंट्यांचे बारीक तुकडे,वाळलेला पाला-पाचोळा,विटांचे  बारीक आकारातील तुकडे, कोकोपीट,बायोमास, बायो-कल्चर पावडर (विरजण) यांचा वापर करून कुंडीत (मातीविरहित) आपण रोपे किंवा झाडे लाऊ शकता. माती वापरलीच तर फक्त एकदाच तीही कुंडीच्या तळाच्या थरातच वापरावी. एकदा कचरा व कल्चर वापरण्यास सुरुवात केली की मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा मातीचा वापर करू नये.   

कुंडी : कुंडी म्हणून बाजारात मिळणार्‍या मातीच्या अगर प्लास्टिकचा विविध आकाराच्या कुंड्या,पत्र्याचे गोल.चौकोनी आकारातील डबे,ड्रम्स,प्लास्टिकचे डबे,ड्रम्स,थर्मोकोलचे चौकोनी आठवा आयताकृती खोके काहीही चालू शकते.माझ्या मते थर्मोकोलचे आयताकृती आकाराचे खोके सर्वात उत्तम ! आजकाल मेडीकलच्या डिस्ट्रिब्युटरकडून / दुकानातून असे रिकामे खोके मिळू शकतात. यात मातीचा वापर नसल्याने व  थर्मोकोल वजनाने हलके असल्याने ज्येष्ठ व्यक्तींना या कुंड्या बागेत हाताळणे सोपे जाते हे एक महत्वाचे कारण व दुसरे असे की थर्मोकोल हे पाण्याने सडत आगर कुजत नाही,किंवा याचेवर कसलाही रासायनिक अगदी अ‍ॅसिडचाही परिणाम होत नाही.

कुंडीत रोप लावण्याची पद्धत : ज्या कुंडीत झाड / रोप लावायचे असेल त्यांच्या  तळात  व सर्व बाजूंनी तळा पासून दोन इंच उंचीवर १० मी.मी. आकाराची मध्ये  ४" अंतर ठेऊन भोके पाडावीत त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊन रोपांच्या मुळांना प्राणवायू मिळू शकतो. नारळाच्या शेंड्या, कोकोपीट ,विटांचे तुकडे व ऊसाची चिपाडे यांचेमुळे ओलावा टिकून रहाण्यास मदत होते. प्रथम कुंडीच्या तळाच्या थरात  ४" उंचीचा विटांचे छोटे छोटे तुकडे,करवंट्यांचे तुकडे व पाला-पाचोळा किंवा या एकाच थरात वापरायची असेल तर माती यांचा थर देऊन त्यावर एक मूठ बायो-कल्चर पावडर ( विरजण)  पसरून पुन्हा ४" उसाही चिपाडे ,नारळाच्या शेंड्या,भाज्यांची देठे असा थर हाताने दाबून द्यावा व त्यावर पुन्हा एक मूठ बायो-कल्चर (विरजण) पावडर घालावी. याप्रमाणे थरावर थर द्यावे व कुंडी वरुन  मोकळी ठेऊन भरून घ्यावी  व शेवटचा थर भरून झाल्यावर ३ मुठी बायो-कल्चर पावडर पसरावी. भरलेल्या कचर्‍यात मधोमध खड्डा करून बाजारातून आणलेले रोप बाहेरची प्लास्टिकची काळी पिशवी मुळांना धक्का न लावता फाडून टाकून ते रोप बुंध्यासह व मातीसकट त्या खड्ड्यात ठेऊन बाजूला केलेला कचरा पुन्हा वर ओढून घ्यावा. वर एक मूठ निंबोळ्यांची पेंड घालावी. रोज एक वेळ पाणी देत जावे. 

आठ दिवसांनंतर भाजीपाल्याचा कचरा फळांच्या साली,टरफले ,भाज्यांची देठे व शिळे-पाके अन्न घालायला सुरुवात करावी. सुरूवातीस ४-६ महीने तरी कोबी व फ्लौवर याचा पाला टाकू नये.(कारण त्यामुळे अळ्या होतात)
कचर्‍यास दुर्गंधी , कचर्‍यातून घाण पाणी , अळया , किंवा कचर्‍यावर माशा असा त्रास / समस्या उद्भवल्यास वरुन आणखी बायो-कल्चर घालावे.

या पद्धतीचे फायदे :  कचर्‍यास कसलीच दुर्गंधी येत नसल्याने ओल्या कचर्‍यामुळे प्रदूषणात होणारी भर टाळता येते. कचरा पाणी झाडात शोषून ठेवत असल्यामुळे पाणी कमी लागते. अन्य कुठल्याच खताची जरुरी लागत नाही. जास्ती तंत्राची जरूरी नसते. एक-दोन दिवस गावाला गेलात तरी काही फरक पडत नाही. मुळांना वाढीस लागणारे अन्न-पाणी  जवळच मिळत असल्याने झाडाची वाढ लवकर होऊन फळे,फुले,भाज्या,शेंगा यांचे उत्पादन मातीच्या तुलनेत लवकर  व मुबलक सुरू होते. ( मला शेवग्याची बी  लावल्यापासून एका वर्षाचे आत शेवग्याच्या शेंगा खाता आल्या)

टीप  : बायो-कल्चर (विरजण)  हे सुरूवातीस फक्त एकदाच वापरायचे लागते ,पुन्हा-पुन्हा वापरावे लागत नाही.

रासायनिक खतांचा वापर टाळावा. किडीसाठी हळदीचे पाणी,तिखटाचे पाणी,कडूलिंबाची पाने घालून उकळून घेतलेले पाणी,तंबाखूचे पाणी यांचा वापर फवारणीसाठी करावा. आपल्या काही शंका असल्यास एकदा प्रत्यक्ष येऊन बाग बघा व शंकाचे निरसन करून घ्या.

नव्याने घरातील ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट सुरू करू इच्छिणार्‍या गरजूंना आम्ही विनामूल्य बायो-कल्चर देत असतो. खाली दिलेल्या पत्त्यावर  आधी  लँडलाइन दूरध्वनीवर फोन करून घरी या व घेऊन जा. (मोबाइल करू नये,कारण  वयपरत्वे मी  तीव्र कर्णबधिर ( ठारबहिरा)  झालो आहे  त्यामुळे फोनवरचे बोलणे ऐकू येत नाही. 
Bio-culture powder is also available online on shopclue , amazon.snapdeal and other sites. Cash on Delivery  option is also available.
संपर्कासाठी :
सौ. अनिता प्रमोद तांबे व श्री.प्रमोद लक्ष्मण तांबे
दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ कर्णपिशाच्च (मोबाइल)  : ९७३०९ ८८७११ व ८४४६३ ५३८०५ 
"श्री स्नेह-सेवा",१४१५,सदाशिव पेठ , रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल शेजारी, एस.पी.कॉलेज समोर, खजिना महालच्या बोळात,पुणे - ४११ ०३०
ई. मेल : pltambe@yahoo.co.in
हे पहा गच्चीवरील मातीविरहित जैविक बागेचे आणखी काही निवडक फोटो









 

फुकट कंपोस्ट 

एक नवा पैसाही खर्च न करता घरच्या घरी उत्तम प्रकारचे कंपोस्ट करता येते, त्यासाठी बाजारातून अत्यंत महागडे असे रेडिमेड कंपोस्टर बिन विकत घेण्याची काहीच आवश्यकता नाही.
घरातलाच एखादा जुना मातीचा माठ/रांजण ,लोखंडी ड्रम,रंगाची प्लास्टीक बादली किंवा भाजीचे क्रेट  अथवा फुटकी लोखंडी अथवा प्लास्टिकची बादली वापरुनही कंपोस्ट करता येईल. त्यावर झाकण न लावता, जुन्या सुती सच्छिद्र कापडाचे किंवा ओढणीचे आच्छादन घालावे . माठाला/ बादलीला /कंटेंनरला थोड्या थोड्या अंतरावर भोके पाडून घ्यावीत, त्यामुळे हवा खेळती राहून ऑक्सीजनचा पुरवठा होतो एरीएशन चांगले होते व कंम्पोस्ट होतांना कचरा साडून त्याची दुर्गंधी येत नाही. भोके न करता पण आपण ते वापरु शकता. ओल्या कचऱ्याबरोबर पुरेसा सुका कचरा किंवा वाळलेला पाला-पाचोळा त्यात मिसळून ओलावा नियंत्रणात ठेवावा. अधूनमधून कचरा खालीवर करत जा,अगदी विनात्रास कंपोस्ट बनेल.
हे साधे ATM चे गणित आहे, ते जमले की झाले!
A म्हणजे Air
T म्हणजे Temperature
M म्हणजे Moisture
हां ,आता जर तुमच्याकडे पैसा जास्तच झाला असेल आणि तुम्हाला जर तो खर्चच करायचा असेल तर बाजारात अनेक ब्रॅँडेड कंपन्यांचीमहागडी पण आकर्षक दिसणारी कंपोस्ट बिन्स उपलब्ध आहेत खुशाल ती खरेदी करा व आपली घरातच कंपोस्ट करण्याची हौस भागवून घ्या .

कंपोस्ट कधीही बिघडत नसते फक्त कचर्‍यात पाणी जास्त झाल्यास कचरा कुजण्या ऐवजी सडायला लागतो व दुर्गंधी येते,माशा,चिलटे,डास,किडे,अळ्या यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू होतो. पण घाबरून जाऊ नका. अशावेळी कचर्‍यावर कोरडी माती , कोरडा वाळलेला पाला-पाचोळा टाकावा,नारळाच्या शेंड्या व पावडर टाकावी. किंवा पुठ्ठ्याचे तुकडे करून टाका म्हणजे ओलावा जाईल आणि उपद्रव लगेच कमी होईल. खत होतांना कचरा कुजायला हवा,सडायला नको हे लक्षात घ्या.

माती विरहित बाग म्हणजे काय

आपल्या सर्वांची अशी ठाम धारणा / समजूत असते की बागेसाठी ‘ माती ‘ हवीच. मातीविना  बाग होऊच शकत नाही.

पण माझ्या स्वानुभवातून मी अशी बाग करता येते हे  लोकांना पटवून देत असतो. ते कसे शक्य होते त्याबद्दल  आता सविस्तर सांगतो.

गच्चीवरील माती विरहित बाग या संकल्पनेत आपल्या गच्चीवर,बाल्कनीत किंवा घर/बंगल्याच्या आवारात बाग-बगीच्या फुलवतांना आपल्या घरातच अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या (माती शिवाय) खाली दिलेल्या वस्तूंचा व नैसर्गिक स्त्रोतांचा सुयोग्य व प्रमाणशिर वापर करावा हे अभिप्रेत आहे.

 

आपणांस अगदी विनासायास सहजपणे उपलब्ध असणारे नैसर्गिक स्त्रोत, म्हणजेच झाडांची पाने, वाळलेला पालापाचोळा,फुलांचे निर्माल्य, स्वयंपाकघरातील दररोज वापरात येणारा हिरव्या व ओल्या भाजीपाल्याचा टाकाऊ (त्याज्य) भाग,फळांचा साली,नारळाच्या शेंड्या व करवंटयांचे तुकडे,रसवंतीगृहातून मिळणारी ऊसाची चिपाडे, भाताचे तुस,विटांचे बारीक बारीक तुकडे,खडी व जाड वाळू हा होय.

 

पूर्वापार चालत आलेल्या रूढ पद्धती नुसार सामान्यत: आपण कुंडी अथवा वाफा भरण्यासाठी  Mother Soil म्हणजेच १००% नदीकाठच्या गाळाच्या पोयटा माती  आणि काही प्रमाणात खताचा वापर करत असतो.गाळाची माती मिळत नसेल तर शेतातील माती किवा जमिनीतून उकरून काढलेली माती ज्याला Mother Soil म्हणतात तिचा १००%  वापर केलेला असतो.  

 

पण कुंड्यात भरण्यासाठी  अशी माती आणणे ही खूप कष्टाचे व खर्चीक असते. शिवाय अशा मातीचा वापर करून भरलेल्या  कुंडया  जड होतात.

 

त्याउलट माझ्या पद्धतीने म्हणजेच मातीचा अजिबात वापर न करता  वरील नैसर्गिक स्त्रोतांचा कुंडी वाफा भरण्यासाठी वापर केल्यास त्यातून घरातील टाकाऊ ओल्या कचऱ्याचे अगदी सहजपणे व्यवस्थापन होते. अशा पध्दतीने फुलवलेला बाग-बगीचा हा अधिक तजेलदार, हिरवागार, टवटवीत तर असतोच पण त्यातून उत्पन्न होणारी फळे, फुले, भाजीपाला हा पूर्णपणे विषमुक्त व रासायनिक शेतीतील उत्पन्नापेक्षा अधिक चवदार व सत्वयुक्त असतो. अशी गच्चीवरील माती विरहित बागेची संकल्पना असून सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक अभिसरण घडवून आणणारी ही संकल्पना सर्वदूर पसरावी यासाठी प्रयत्न वाढवणे नितांत गरजेचे असल्याने ते कार्य या GMVB समुहाच्या माध्यमातून वेगाने बाळसे घेत आहे याचा मला आनंद वाटतो.


कंपोस्ट कधीही बिघडत नसते

बिघडलेले कंपोस्ट कसे दुरुस्त करावे? या बद्दल घरातच कंपोस्ट बनवू इच्छिणार्या नवागत /शिकाऊ सदस्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळेल असा सविस्तर महत्वपूर्ण माहिती देणारी  तनुजा महाजन यांची पोस्ट ग्रुपवर पोस्ट म्हणून प्रकाशित करण्यात आली आहे.

ती  वाचल्यावर या अनुषंगाने माझ्या मनांत आलेले काही विचार येथे शेअर करत आहे जे शिकाऊ सदास्यांना मार्गदर्शक होतील अशी खात्री वाटते .

कंपोस्ट बनवणे ही कोणतीही अशक्यप्राय अशी अवघड ,कोणालाही कधीच न जमणारी गोष्ट नाही. ती एक अत्यंत साधी,सुलभ,सोपी व नैसर्गिक अशी जैविक प्रक्रिया आहे. फक्त ती प्रक्रिया कसे कार्य करते ते आपण प्रत्येकाने समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

या कंपोस्ट प्रक्रियेत आपल्यासारख्या एखाद्या अनभिज्ञ नवख्या व्यक्तीकडून आजाणतेपणाने अथवा अपुर्या माहितीमुळे व अज्ञानाने काही गफलत झाली की मगच अडचणींना सुरवात होते. मग दुर्गंधी वाढीस लागतो, त्यात अळ्या होतात. तेथे चिलटे,माशा घोंगाऊ लागतात. आणि असा त्रास उद्भवला की नवखी व्यक्ती नाउमेद होते. अशा व्यकीचा सुरवात करतेवेळी असलेला उत्साह कमी होत जातो. यातील बरेच जण या टप्प्यावर आपल्याला हे जमणारच नाही असा नकारात्मक विचार करून ते बनवणेचं सोडून देतात.

असे म्हणतात की,सायकल शिकतांना किमान एकदा तरी गुढगा फुटलाच पाहिजे, किंवा पोहणे शिकतांना एकदा तरी गटांगळ्या खाऊ नाका-तोंडात पाणी जाऊन जीव घाबरा-घुबरा व्हायलाच हवा, म्हणजेच अशा स्वानुभवातून चुकत-माकत ,धडपडत ,तावून-सुलाखून घेतलेले शिक्षण आयुष्यभर ध्यानांत रहाते. तद्वतच स्वानुभवातून घरच्या घरी कंपोस्ट प्रक्रिया शिकू पहाणार्या प्रत्येकास एकदा हा अनुभव यावाच.

सर्वात प्रथम सर्व नवशिक्या लोकांनी कंपोस्ट बनवणे हाती घेण्यापूर्वी कंपोस्ट प्रक्रियेविषयीच्या काही मूलभूत गोष्टी अवगत करून ,जाणून घेणे खूप गरजेचे आहे असे मला सांगावेसे वाटते.

कंपोस्ट ची सुलभ व्याख्या : ओल्या कचर्याचे सूक्ष्म जिवाणूंद्वारे (बक्टेरिया) जैविक विघटन करून त्याचे उत्तम प्रकारच्या खता मध्ये रूपांतर करण्याची पूर्णपणे नैसर्गिक अशी जैविक विघटनाची प्रक्रिया म्हणजेच 'कंपोस्ट'

धडा पहिला : पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे " कंपोस्ट हे कधीही खराब होत नाही आणि वायाही जात नाही. तर कुठल्याही बिघडलेल्या टप्प्यावर आपण ते सुधारून पुन्हा योग्य मार्गावर आणू शकतो" त्यामुळे नवागतांनी नाउमेद किवा निराश होऊन कंपोस्ट बनवणे सोडू नाही. तर ते कसे सुधारता येते हे आत्मसात करून घ्यावे.

धडा दूसरा : या कंपोस्ट म्हणजेच सूक्ष्म जिवाणूंच्या सहाय्याने होणार्या विघटन प्रक्रियेसाठी चार मुलभूत घटकांची आवश्यकता असते आणि ते घटक आहेत १. नायट्रोजन २. कार्बन ३. ऑक्सिजन आणि ४. आर्द्रता (दमटपणा किंवा ओलावा). तसेचं ही प्रक्रिया चालू असतांना अखेरचा टप्पा पार पडेपर्यंत या चार घटकांचे सुयोग्य मात्रेत संतुलन राखणे हेही खूप गरजेचे असते.

धडा तिसरा : १. नायट्रोजन म्हणजेच नत्र हा घटक ओल्या हिरव्या कचर्यातून मिळतो. हिरवी पाने,भाजीपाला व त्याची देठें या सगळ्यात नत्राचे प्रमाण मुबलक मात्रेत असते.

२. कार्बन म्हणजेच कर्ब. झाडांच्या [आणातून व  वाळलेल्या पाला-पाचोळयातून (ड्राय ब्राऊन वेस्ट) मुबलक प्रमाणांत प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असणारा कार्बन हा घटक मिळतो.

३. ऑक्सीजन म्हणजेच प्राणवायू : प्राणवायूचे महत्व मी निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. या सृष्टीतील एकही प्राणिमात्र प्राणवायूशिवाय जगूच शक्त नाही हे आपण सगळेच जाणतो. मग त्याला ओल्या कचार्याचे विघटनाचे अविरतपणे कार्य करणारे सूक्ष्म जिवाणू म्हणजेच 'बक्टेरिया' हेही अपवाद कसे असतील? त्यांनाही प्राणवायूची म्हणजेच ऑक्सीजनची नितांत गरज असते हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि हा अत्यावश्यक असा ऑक्सीजन मुबलक प्रमाणांत मिळण्यासाठी ओल्या कचर्यात हवा खेळती रहाणे खूप गरजेचे असते. म्हणूनच आपण कंपोस्टसाथी जे कंटेनर (माठ,बादली,खोके इ) वापरणार असतो त्याला तळांत आणि सर्व बाजूंनी भोके ठेवावीत. त्याचप्रमाणे दर दोन दिवसाआड कचरा खालीवर करत जावा,जेणेकरून हवा खेळती राहील. तसेच आणखी एक महत्वाची सुचना करावीशी वाटते ती म्हणजे नवा कचरा घालतांना त्यात काड्या, काटक्या, आणि वाळलेली मोठाली पाने (याला ड्राय ब्राऊन वेस्ट म्हणतात) ह्यांचा आवर्जून वापर करा,जेणेकरून हवेचे  छोटे  छोटे  कप्पे तयार होऊन हवा खेळती राहिल.

४. ओलावा/ आर्द्रता/ दमटपणा : विघटनाचे महत्वपूर्ण कार्य करणार्या सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीसाठी आणि त्यांचे विघटनाचे कार्य जोमाने होण्यासाठी ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रतेची जरूर असते. त्यामुळेच जर कचरा जास्त कोरडा (सुका) असेल तर त्यावर थोडासा पाण्याचा शिडकावा जेणेकरून कचर्यात ओलावा निर्माण होऊन विघटनाचे कार्य सुयोग्य पद्धतीने होईल.

धडा चौथा : कंपोस्ट प्रक्रियेत बिघाड होण्याची प्रमुख कारणे व त्यावरील उपाय : कधी कधी ओल्या कचर्यात टोमॅटो,काकड्या या भाज्यांचा टाकाऊ भाग किंवा कलिंगड,खरबूज,द्राक्षे अशा पाण्याचा अंश जास्त असणार्या भाज्यांचा/फळांचा टाकाऊ भाग जास्त असतो. त्यामुळे कचर्यातील ओलावा किंवा पाण्याचे प्रमाण वाढून संतुलन बिघडते. सामान्यपणे चार घटकांचे संतुलन असलेल्या कचर्याचे विघटन होतांना सूक्ष्म जिवाणूंच्या कार्य पद्धतीने कचरा कुजायला सुरवात होते. या प्रक्रियेत कचरा असा कुजणे अभिप्रेत/अपेक्षित असते. पण जेंव्हा वर सांगितलेल्या भाज्यांच्या किंवा फळांच्या माध्यमातून कचर्यातील पाण्याचे प्रमाण वाढते तेंव्हा कुजण्याची प्रक्रिया थांबते आणि कचरा सडायला सुरवात होते,आणि मगच कचर्याला दुर्गंधी यायला सुवात होऊन पुढचे दु:ष्परिणाम जाणवायला लागतात.

एकदा रोगाचे निदान झाले की त्यावर उपाय करणेही फार सोपे आणि सुलभपणे करणे शक्य होते. काहीही उपाय करून आपल्याला कचर्यातला ओलावा म्हणजेच पाण्याचे प्रमाण कमी करून नियंत्रणांत आणायचे असते.

त्यासाठी असे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ओल्या कचर्यावर वाळलेला पाला-पाचोळा पसरावा, किंवा कोरडी माती भुभुरावी अथवा नारळाच्या शेंड्यांचा चुरा/कोकोपिट ,भाताचे तुस, किंवा पुठ्याचे अगर कागदाचे तुकडे टाकावे म्हणजे कचर्यातले अतिरिक्त पाणी त्या कोरड्या पदार्थांनी शोषले जाऊन ओलावा नियंत्रणात आणला जाईल व लगेच त्याचा परिणाम होऊन दुर्गंधी कमी होऊन कंपोस्टची प्रक्रिया सुरळीत चालू होईल.