Thursday 29 December 2016

कारल्याची ओली चटणी



कारल्याची ओली चटणी



साहित्य - २-३ पिकलेली कारली दोन चमचे मोहरी, अर्धी वाटी नारळाचा चव, चवीपुरती साखर/गूळ, मीठ, लाल सुक्या मिरच्या, दोन टे. स्पू. तेल.
कृती  :  आगोदर कारली बिया काढून चिरून घ्यावीत. नंतर मिठाच्या पाण्यात ती वाफवून घ्यावीत. वाफवलेली कारली तेलात तळून घ्यावीत. थोड्या तेलात लाल सुक्या मिरच्या भाजून घ्याव्यात. मोहरी कोरडीच भाजावी.
नंतर चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून पाट्यावर किंवा मिक्सरमधून जाडसर भरडून घ्यावं. जिभेला चव नसल्यास ही चटणी नक्कीच खाऊन बघावी.

ओली शेव



ओली शेव

साहित्य : दोन वाट्या बेसनाचे (चणा डाळीचे) पीठ,अर्धा चमचा हळद,चवीनुसार मीठ,एक चमचा प्रत्येकी धने-जिरे पावडर,एक टेबलस्पून मोहन साठी तेल ,दोन टेबलस्पून दही,एक टेबलस्पून साखर,एक वाटी पाणी,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,अर्धी मूठ ओल्या नारळाचा खोवलेला चव,३-४ हिरव्या मिरच्या,५-६ बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा हळद,एक छोटा चमचा हिंग,एक टेबलस्पून तेल.
कृती : एका बाउलमध्ये बेसन (चणा डाळ) पीठ घेऊन त्यात धने-जिरे पावडर,हळद,चवीनुसार मीठ व साखर आणि दही घालून हाताने कालवून छान मिक्स करा. जरूरी असेल त्याप्रमाणे पाणी घालून भिजवलेल्या पिठाची स्मूथ पेस्ट बनवा.
 गॅसवर एका पॅनमध्ये थोडेसे तेल  घालून गरम करून घेऊन त्यात ही भिजवलेल्या बेसन पिठाची पेस्ट घालून त्याच शिजवून घेऊन उकड काढून घ्या.
एकीकडे उकड काढलेल्या बेसन पिठाचा एक मोठा गोळा हातात घ्या आणि चकली-शेवेच्या साच्याला (लाकडी/स्टील/पितळी  कोणताही चालेल) आंतून तेलाचा हात लावून घ्या व त्या सोर्‍यात उकडीचा गोळा हाताने दाबून भरा आणि सोर्‍यावर दाब देऊन गोलकार फिरवत लांब शेवयाचे गोल एका मोठ्या प्लॅस्टिक पेपरवर किंवा मोठ्या स्टीलच्या ताटात घाला.
आता दुसरीकडे कढईत फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की त्यात हिंग घाला व एक मिनिट परतून घ्या.नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून २-३ मिनिटे आणखीन परता. मग त्यात हळद,बारीक चिरलेली हिरवी मिरची व जिरे घालून आणखी दोन मिनिटे परता. शेवटी त्या फोडणीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून चमच्याने फोडणी खाली-वर हलवून घ्या आणि मग ती फोडणी प्लास्टीक पेपरवर/स्टीलच्या मोठ्या ताटात काढलेल्या ओल्या शेवेवर पासून ओता. सर्व्ह  करतेवेळी वर आणखीन बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया)



शिरवाळे (नारळाच्या दुधातील शेवया)

हा कोकणातील एक खास पारंपारिक असा गोडाचा पदार्थ आहे. मध्यंतरी आम्ही नरेंद्र बरोबर मढाळच्या शेतावर गेलो होतो तेंव्हा गुढ्याच्या वसंत तांबे यांच्याकडे प्रथमच हा पदार्थ खाला व त्याचवेळी रेसीपी  समजून घेतली.
साहित्य : दोन  मोठ्या वाट्या उकडीच्या मोदकासाठी  वापरतो ती तांदूळाची पिठी,एका मोठ्या नारळाचा खोवून काढलेला चव,दोन वाट्या गूळ,एक छोटा चमचा वेलची पूड. सजावटीसाठी ड्राय फ्रूटसचे  काप.
कृती :  सुरवातीला तांदूळाची पिठी दोन वाट्या गरम पाण्यात छोटा चमचा मीठ घालून मोदकासाठी आपण नेहमी  काढतो त्याप्रमाणे उकड काढून घ्यावी. . थोडयावेळाने उकडीचे पीठ चांगले मळून घेऊन त्या पिठाचे ७-८ गोळे करुन घ्यावे . मोठया भांड्यात गोळे बुडतील इतपत पाणी उकळत ठेवावे . पाण्याला उकळी आल्यावर त्यात हे उकडीच्या पिठाचे गोळे सोडावे. नंतर ७-८ मिनीटे मोठया गॅसवर शिजवावे. शिजून गोळे पाण्यावर तरंगू लागल्यावर लगेच बाहेर काढून चकलीच्या साच्यात घालून शेवया काढाव्या.
ओल्या नारळाचा चव, कोमट पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावा. घट्ट पिळून त्याचे दूध काढून गाळून घ्यावे. फार पातळ करू नये. जरा दाटसरच असावे. या दुधात बारीक चिरलेला गूळ कुसकरून घालावा. दूध चांगले गोड व्हायला हवे. वेलची पावडर घालावी, मग त्या शेवया घालून वरून ड्राय फ्रूटसचे काप घालून सर्व्ह कराव्या