Tuesday 1 December 2020

येसुरची आमटी

झटपट होणारी आणि पौष्टिकतेने भरपूर अशी येसूरची आमटी हल्ली खुप कमी बघायला मिळते. या येसूरच्या आमटीत प्रोटीन कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात असते. ही बनवायला अतिशय सोप्पी. थंडीच्या दिवसात किंवा सर्दी झालेली असेल किंवा तापाची किणकिण असली तरी गरमागरम येसूरची आमटी प्यायल्याने लगेच तरतरी येते अंगात. कमीतकमी तेल आणि मसाले वापरून अत्यंत पौष्टिक, पचायला हलकी अशी आमटी तयार होते. येसूरचे पीठ बनवीण्यासाठी प्रत्येकी एक छोटी वाटी हरभरा डाळ, गहू,बाजरी आणि ज्वारी मंद आंचेवर खमंग भाजून घ्यावी आणि मिक्सरवर बारीक पीठ दळून घ्यावे. हे पीठ डब्यात भरून ठेवावे. चारसहा महीने आरामात टिकते . येसूरच्या आमटीसाठी येसूरचे पीठ तीन चमचे.धनेजीरे पुड , लाल तिखट , गरम मसाला, मीठ, मोहरी, कोथींबीर, आणि थोड़ आले-लसूण ठेचून घ्या. तापलेल्या कढ़ईत दोन चमचे तेल घालून मोहरी आणि ठेचलेलं आले-लसूण परतून घ्या. माह त्यातच सुके मसाले टाकुन परता आणि नंतर एक ग्लास गरम पाणी टाकून छान उकळी येऊ द्या.मीठ आणि चिरलेली कोथंबीर घाला. उकळी आली की येसूरचे पीठ लावा आणि पिठल्याप्रमाणे.चार पाच मिनिटे उकळी येऊ द्या. गरमागरम आमटी तयार आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर व भाताबरोबर छान लागते.

No comments:

Post a Comment