Search This Blog

Thursday, 7 October 2021

मुगडाळ-शेवयांची खिचडी

 

मुगडाळ-शेवयांची खिचडी

 


 

या खिचडीत मुगाची डाळ भरपूर प्रमाणात घालतात. त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीनेही नाष्टा म्हणून किंवा रात्रीच्या वेळी पचायला हलकी असल्याने जेवणांत  ही खिचडी करावी.

साहित्य  : एक वाटी गणेश शेवया (इतर कुठल्याही शेवया वापरल्या तरी चालतील) , एक वाटी मूगाची डाळ ,एक बारीक चिरलेला कांदा,दोन टेबलस्पून साजूक तूप,चवीनुसार मीठ व २-३ हिरव्या मिरच्या,एक चमचा गोडा काळा  मसाला, फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,एक छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग, सजावटीसाठी मूठभर बारीक  चिरलेली कोथिंबीर व पाव वाटी खवलेला ओल्या नारळाचा चव,चार वाट्या गरम पाणी

कृती : खिचडीला सुरवात करण्यापूर्वी अर्धा तास आगोदर मूगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात भिजत घालून ठेवा.

आता गॅसवर एका  कढईत साजूक तूप गरम करून त्यात शेवया घाला व  मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खमंग भाजून एका परातीत काढून ठेवा.

नंतर त्याच कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन घ्या. तेल चांगले तापल्यावर त्यात मोहरी आणि जिरं घालून दोन्ही चांगले  तडतडल्यावर  हिंग व हळद क्रमाने टाकून एखादे मिनिट परतून घ्यावे व मग  हिरव्या मिरचांचे तुकडे टाकावे.

मिरची खमंग तळली गेल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून  किंचित रंग बदलून पारदर्शक होई पर्यंत परतून घ्यावा. लक्षांत ठेवा परतून कांदा जास्त ब्राऊन  होऊ देऊ नका.

आता त्यात मगाशी भाजून ठेवलेल्या शेवया टाकाव्या व भिजत घातलेली  मुगाची डाळ घाला. चवीप्रमाणे मीठ घाला,काळा गोडा मसाला घाला व झार्‍याने चांगले हलवून घ्या.

दरम्यान दुसरीकडे गॅसवर एका उभ्या गंजात पाणी ऊकळायला ठेवावे.

आता हे ऊकळते पाणी फोडणीला टाकून परतलेल्या  मूग डाळ+शेवयांमध्ये टाकावे.साधारणपणे सर्व शेवया बुडून दोन बोटं पाणी वर शिल्लक राहील एवढे पाणी टाकावे.

आता गॅस बारीक करून दोन मिनीटे खिचडीचे हे मिश्रण शिजू द्यावे व शिजून थोडेसे आळल्यावर कडेने तूप सोडून झाकण ठेवावे आणि मंद आचेवर दणदणीत वाफ येऊ द्यावी. या वाफेवरच मुगाची डाळ पूर्ण शिजायला हवी.

ही मुगडाळ-शेवयाची गरमागरम खिचडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव यांनी सजावट करून लगेच सर्व्ह करावी.

या खिचडीला स्वतःचाच एव्हढा खमंगपणा असतो की त्यासोबत इतर कुठल्याच तोंडीलावण्याची गरज भासत नाही.

टीप : या खिचडीत आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या उदा. सिमला मिरची, श्रावण घेवडा (फरसबी), तोंडली,वांगी,मश्रूम्स्, स्वीट कॉर्न , मटार,बटाटा,फ्लॉवर इ. घालू शकता.

No comments:

Post a Comment