आजच्या नाशत्यासाठी केला होता हा जरा हटके असा मेतकूट मसाला पराठा.
त्याचीच ही सचित्र रेसिपी ..
मेतकूट मसाला पराठे
साहित्य : पराठ्यांसाठी चार वाट्या कणीक, चमचाभर तेल,अर्धा चमचा मीठ,भांडभर पाणी, मसाल्यासाठी अर्धी वाटी मेतकूट, चार चमचे पातळ केलेले साजूक तूप, चार चमचे पातळ केलेले अमुलचे बटर,किसलेले अमुलचे चीज,पाव वाटी बारीक चिरून वाफवलेली मेथी,चवीनुसार आले,लसूण, हिरव्या मिरच्या व मीठ घालून बनवलेला खर्डा,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीरआणि एक कांदा बारीक चिरून ठेवा.पराठया सोबत तोंडीलावणे म्हणून देण्यासाठी हळदीचे लोणचे.
कृती : एका परातीमध्ये पराठ्यासाठी कणीक घ्या आणि त्यात तेल,मीठ व जरुरीप्रमाणे पाणी घालून पराठ्याचे पीठ भिजवून व मळून घेऊन ओल्या सूती कपड्याने झाकून ठेवा.
दुसरीकडे एका बाउलमध्ये मसाल्यासाठी अर्धी वाटी मेतकूटघ्या. त्यात चार चमचे पातळ केलेले साजूक तूप आणि चार चमचे पातळ केलेले अमुलचे बटर घाला. पाव वाटी बारीक चिरून वाफवलेली मेथी,चवीनुसार आले,लसूण,हिरव्या मिरच्या व मीठ घालून बनवलेला खर्डा घालून मिक्स करा.
आता भिजवून मुरत ठेवलेल्या कणकीतून एक लाडवा एव्हढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटा त्या पोळीवर हाताने मेतकूट मसालापेस्ट चोळून लावा . आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले चीज सगळीकडे भुरभुरा . आता त्या पोळीची एक आडवी व एक उभी घडी घाला किंवा गुंडाळी करून पुन्हा एकडा गोल आकाराचा पराठा लाटा.
गॅसवर एक निर्लेप तवा तापवून घेऊन त्यावर अमूल बटर वर दोन्ही बाजूंनी पराठा चांगला खरपूस भाजून घ्या.
एका सर्व्हिंग डिशमध्ये खरपूस भाजलेला गरम पराठा काढून घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर पसरून हळदीच्या लोणच्यासह सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment