ही मंगलोर ची खास स्पेशालिटी आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी आमचे परम स्नेही सोलापूरचे डॉक्टर बालिगा यांच्या कडे गेलो तेंव्हा त्यांच्या आईंनी एक दिवस नाष्ट्यासाठी केले होते तेंव्हा पहिल्यांदाच मी हे मंगलोरी बन्स खालयाचे आठवते आहे.
अति पिकलेली (खूप जास्त पिकलेली ) केळी, मोठे चार चमचे साखर , चिमूटभर मीठ,अर्धा चमचा जिरे पूड किंवा ओवा पूड ,चिमूटभर इनोज फ्रूट सॉल्ट,एक चमचा साजूक तूप आणि आंबट दही हे सगळे एकत्र करून कणकीत घालून पीठ मळतात आणि रात्रभर (किमान ८ तास) आंबवून घेतात. नंतर दुसे दिवशी त्याच्या पुऱ्या बनवतात. अतिशय स्वादिष्ट आणि लुसलुशीत बनतात ह्या पुऱ्या. एखाद्याला Delicious ह्या शब्दाचा अर्थ समजवायचा असेल तर हे बन्स खायला द्यावेत.
साहित्य : दोन वाट्या कणीक , २ मध्यम आकाराची जराशी जास्तच पिकलेली केळी, १-२ कोशिंबीरीचे मोठे चमचे भरून दही, मोठे चार चमचे साखर , छोटा चमचा इनोज फ्रूट सोल्ट,चिमूटभरमीठ, अर्धा चमचा जिरे पूड किंवा ओवा,एक चमचा साजूक तूप,आवशयकतेनुसार पुऱ्या तळायला तेल किंवा तूप.
कृती : मिक्सरच्या भांड्यांत जास्त पिकलेल्या केळ्याचे तुकडे, आंबट दही,साखर, ,भरड जिरे, मीठ, चिमूटभर इनोज फ्रूट सॉल्ट व एक चमचा साजूक तूप घ्याआणि मिक्सरवर ते मिश्रण फिरवून घ्या. मग त्यात मावेल तेव्हढी कणिक घालून सैलसर पीठ भिजवून घ्या. पीठ जास्त घट्ट असेल तर आणखी दही घाला पण पाणी अजिबात घालू नका.पीठ फार सैल आहे असे वाटत असेल तरच थोडी कणिक घाला.तेलाचा हात लावून पीठ जरा मळून घ्या आणि रात्रभर (किमान ८ तास) झाकून ठेवा.
दुसरे दिवशी सकाळी पीठ जरासे मळून लिंबाएवढे गोळे करा आणि थोड्या जाडसर पुऱ्या लाटून घ्या .
गॅसवर एका कढईत तेल / तुप गरम करून घेऊन मध्यम आचेवर पुऱ्या तळून घ्या. पुऱ्या छान फुगतात.
हे मंगलोरी बन्स गरम / थंड कसेही खाऊ शकता. चटणी / तुपाबरोबर नाश्ता म्हणून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment