Friday 27 December 2019

मसाला पापड चे पराठे

मसाला पापड चे  पराठे





नाश्त्यासाठी एक अफलातून नवीन डिश

साहित्य : दोन लिज्जतचे भाजलेले पापड ,अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर,दोन चमचे सोलापुरी काळा मसाला,दोन चमचे गोडा मसाला, एक चमचा  प्रत्येकी धने-जिरे पूड, दोन चमचे पांढरे भाजलेले तीळ , दोन चमचे साखर,एक चमचा मीठ,एक चमचा लाल तिखट,दोन चमचे दही,दोन चमचे लिंबाचा रस,एक  चमचा हळद,अर्धा चमचा हिंग,दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन ,पराठ्यांसाठी भिजवून मळून ठेवलेली कणीक,एक वाटी अमुलचे बटर.
कृती : एका पसरट आकाराच्या लंगडीत किंवा तसराळ्यांत दोन लिज्जत भाजलेल्या पापडांचा हातानेच अगदी बारीक चुरा करून घ्या. मग त्यात अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन चमचे सोलापुरी काळा मसाला,दोन चमचे गोडा मसाला, एक चमचा  प्रत्येकी धने-जिरे पूड, दोन चमचे पांढरे भाजलेले तीळ , दोन चमचे साखर,एक चमचा मीठ,एक चमचा लाल तिखट,दोन चमचे दही,दोन चमचे लिंबाचा रस,एक  चमचा हळद,अर्धा चमचा हिंग घालून हातानेच कालवून चांगले मिक्स करून घ्या. त्यामिश्रणावर दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून पुन्हा एकदा चांगले मिक्स करा व मिश्रण झाकून १५ मिनिटे मुरत ठेवा.
मिश्रण १५ मिनिटे चांगले मुरले  की भिजवून व मळून  ठेवालेल्या कणकीचे लिंबा एव्हढ्या आकाराचे गोळे बनवून ठेवा. एकेक गोळा पोळपाटावर लाटून त्यात चमच्याने दोन चमचे पापड चुर्‍याचे मसाला सारण भरून पराठे लाटा आणि अमुल बटरचा वापर करून तापलेल्या तव्यावर मध्यम आंचेवर दोन्ही बाजूंनी पराठे भाजून घ्या.
ताज्या दहयासोबत नाश्ता म्हणून हे मसाला पापड पराठे सर्व्ह करा. खूपच  हेल्दि व टेस्टी लागतात हे पराठे .


No comments:

Post a Comment