Saturday 14 September 2013

शिळोप्याचे थालीपीठ

शिळोप्याचे थालीपीठ


आज सकाळी नाश्त्याला काय करावे असा आमचा विचार चालला असतांना माझे लक्ष फ्रिजमध्ये असलेल्या कालच्या शिल्लक असलेल्या अतिशय थोड्याश्या कोबीच्या भाजीकडे व भाताकडे गेले,तसेच काल रात्री डाळ फ्राय करतेवेळी शिल्लक राहिलेल्या कांद्याकडे गेले. मग थोडासा विचार करून हयातूनच एखादा अभिनव असा नवा चविष्ट पदार्थ बनवावा असे वाटले. त्याप्रमाणे हे सर्व वापरुन जो नवा पदार्थ आम्ही बनवला व तो झालाही खूपच खुयाखुशीत आणि चविष्ट ! त्याचीच कृती व त्यासाठी वापरलेले साहित्य आज मी येथे देत आहे .

साहित्य : काल केलेली व थोडीशी शिल्लक राहिलेली कोबीची भाजी,काल रात्री थोडा शिल्लक उरलेला भात ,काल कापून उरलेला अर्धा कांदा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे २-३ हिरव्या मिरच्या, मीठ,आल्याचा छोटा तुकडा, १०-१२ पुदिना पाने,धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, थालीपीठाच्या भाजणीचे पीठ ,तेल.

कृती : प्रथम लसणाच्या सोललेल्या पाकळ्या,आल्याचा तुकडा,चवीपुरत्या हिरव्या मिरच्या व मीठ,पुदिन्याची पाने , थोडा बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर हे सर्व मिक्सरमधून वाटून घेतले,मग एका तसराळयात कोबीची भाजी,,मोकळा केलेला भात, बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर ,जरुरीप्रमाणे ५ मोठ्ठे चमचे भाजणीचे पिठ घेतले,त्यात मिक्सरमधून काढलेले वाटण व आवश्यक तेव्हढे पाणी व दोन चमचे कडकडीत तेल घालून भिजवले  व मळून घेतले.नंतर तव्यावर थोडे तेल घालून थालीपीठ लावले,त्यावर मध्यभागी बोटाने एक भोक व भोवताली चार भोके पाडून त्यातही वरुण चमच्याने थोडे थोडे तेल घालून गॅसवर दोन्ही बाजूंनी भाजून घेतले व हे गरम गरम थालीपीठ दही,लोणी किंवा लोणच्याबरोबर खायला दिले. सर्वांनाच फारच आवडले.एकदम खुसखुशीत व चविष्ट झाले होते.


No comments:

Post a Comment