" कारळ्याची चटणी "
Search This Blog
Monday, 30 September 2013
Sunday, 29 September 2013
बटाट्यांच्या काचर्याक
" बटाट्यांच्या काचर्या "
आयत्यावेळी कामे
वेळात कोणती भाजी करावी असा जर प्रश्न पडला तर त्याचे एकमेव उत्तर म्हणजे
बटाट्यांच्या काचर्यांची भाजी हे होय. त्याचीच रेसिपी आज मी येथे देणार आहे.
साहित्य : माणशी
दोन बटाटे,माणशी एक
कांदा,चवीनुसार लाल तिखटव मीठ,फोडणीसाठी
तेल,मोहोरी,हिंग,जिरे,हळद व ५-६ कढीपत्त्याची पाने.
कृती : प्रथम बटाटे स्वच्छ धुवून
त्याची साले काढून पातळ काप करून घ्यावेत व ते मिठाच्या पाण्यात ठेवावेत. कांद्याची
साले काढून उभे काप करून घ्यावेत.मग गॅसवर कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तापल्यावर त्यान मोहोरी व जिरे
टाकावे.मोहोरी तडतडल्यावर हळद व हिंग आणि कढीपत्याची पाने टाकून परतून घ्यावे,मग त्यात बटाट्याचे काप व कांद्याचे काप टाकून चवीनुसार तिखट व
मीठ घालून परतत राहावे. मग कढईवर झाकण ठेऊन भाजी शिजवू द्यावी. बटाटे व कांदा
शिजल्यावर झाकण काढून पुन्हा एकदा परतावे व बटाटा खरपुस झाल्यावर गॅस बंद करावा.
केवळ १०-१५ मिनिटात ही बटाट्यांच्या काचर्यांची खमंग व चविष्ट भाजी तयार होते व
पोळीबरोबर खायला फारच छान लागते.
Saturday, 28 September 2013
कणकेची (गव्हाच्या पिठाची)धिरडी
" कणकेची (गव्हाच्या पिठाची)धिरडी "
साहित्य
: दोन वाट्या कणिक (गव्हाचे पीठ), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण,
जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
: एका मोठ्या बाउलमध्ये कणिक (गव्हाचे पीठ) घेऊन त्यात थोडी हळद,
तिखट, मीठ, बारीक
चिरलेली कोथिंबीर, बारीक किसलेला लसूण घाला व मग त्यात पाणी
घालून डोश्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
तेल लावलेल्या निर्लेपच्या तव्यावर डावाने तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी घालून वर झाकण ठेवा. दोन्ही बाजूनी धिरडी चांगली भाजून घ्या आणि वर साजूक तूप घालून आवडेल त्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
तेल लावलेल्या निर्लेपच्या तव्यावर डावाने तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी घालून वर झाकण ठेवा. दोन्ही बाजूनी धिरडी चांगली भाजून घ्या आणि वर साजूक तूप घालून आवडेल त्या चटणी बरोबर सर्व्ह करा.
Friday, 27 September 2013
कुळथाचे पिठले
" कुळथाचे पिठले "
साहित्य : दोन मोठ्ठे चमचे कुळथाचे पीठ,चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,लसूण तीन पाकळ्या ,आमसुलाची दोन पाकळ्या, चवीपुरता गुळाचा खडा फोडणीसाठी कोण चमचे तेल,जिरे,हिंग हलद,मोहोरी,बारीक चिरलेली
कोथिंबीर व कढीपत्त्याची पाने.
कृती : सर्वात प्रथम गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तेल तापल्यावर
त्यात मोहोरी टाका,मोहोरी
तदतडल्यावर त्यात जिरे, हळद,हिंग,कढीपत्त्याची पाने व मिरच्याङ्के तुकडे टाकून परतून घ्या,मग हवे तसे पाणी टाकून त्यात चवीनुसार चिंच अगर अमसुल व मीठ घालून उकळी
येऊ द्या.पाणी उकळू लागल्यावर त्यावर कुलथाचे पीठ भुरभुरून लावावे व डावाने हलवत
राहा म्हणजे गुठळया होणार नाहीत .पीठ लावून पुरेसा घट्टपणा आल्यावर गॅस बंद करा.वर
बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या खोबर्याचा चव गाळून ५ मिनिटे तात झाकून ठेवा.
पोळी किंवा
भाताबरोबर पिठले छान लागते.
Thursday, 26 September 2013
तिखमिखले (एक झटपट तोंडी लावणे)
" तिखमिखले (एक झटपट तोंडी लावणे) "
साहित्य : तीन चार जाड कमी तिखट
असलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी
वाटी दही (फार आंबट नको),चवीपुरते मीठ,मिरच्यांना
चोळायला तेल,दोन चमचे शेंगदाण्याचे बारीक कूट
कृती : प्रथम हिरव्या
मिराचांना तेलाचे बोट लावून त्या गॅसवर सर्व बाजूंनी खरपूस अश्या भाजून घ्या. एका
छोट्या स्टीलच्या बाउलमध्ये त्या चांगल्या कुस्करून घेऊन त्यावर दही व चवीपुरते मीठ
घालून मिक्स करून घ्या.झाले आपले हे झटपट तिखामिखले तय्यार ! (फार घट्ट वाटल्यास
थोडे दूध किंवा ताक घालून हवे तेव्हढे पातळ करावे)
आयत्यावेळी गरम पोळीबरोबर एक
झटपट तोंडी लावणे म्हणून हे मस्त चविष्ट असे तिखामिखले !
Wednesday, 25 September 2013
टोमॅटोचे सार
" टोमॅटोचे सार "
साहित्य : चार मोठ्ठे लालबुंद टोमॅटो,अर्ध्या नारळाचे खोवलेल्या खोबर्याचा चव,एक वाटी गोड दही,चवीनुसार तिखट (हिरव्या मिरच्या किंवा लाल तिखट),मीठ,साखर आणी फोडणीसाठी अर्धा डाव साजूक तूप, जिरे, हळद, हिंग, कढीपत्त्याची ८-१० पाने व अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : सर्वात प्रथम टोमॅटो उकडून घ्यावेत.मिक्सरच्या भांड्यात उकडलेल्या टोमटोची साले काढून आतला गर ,दही,खोबर्याचा चव,चवीनुसार साखर,मीठ व असतील तर हिरव्या मिरचयांचे तुकडे आणि थोडेसे पाणी घालून फिरवून घ्यावे व ते मिश्रण स्टीलच्या एका उभट गंजात काढून घ्यावे. व गॅसच्या एका शेगडीवर ठेवावे व दुसर्या शेगडीवर एका लोखाडी काढल्यात तुपाची फोडणी करावी त्यात जिरे,हिंग,हळद व कढीपत्त्याची पाने घालावीत.जर हिरव्या मिरच्या नसतील तर गंजातील सारावर प्रथम चवीनुसार लाल तिखट घालून त्यावर तुपाची गरम फोडणी घालून डावाने चांगले हलवून मग उकळी येऊ द्यावी.पाच मिनिटे उकळल्यावर गॅस बंद करावा व सारावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू झाकण ठेवाए म्हणजे साराला कोथिंबीरीचा वास व स्वाद दोन्ही येतील.
गरम पोळी किंवा भाताबरोबर हे टोमॅटोचे सार फारच मस्त लागते.
Tuesday, 24 September 2013
भेंडीचा रस्सा
" भेंडीचा
रस्सा "
साहित्य : हिरवीगार कोवळी भेंडी पाव किलो (चार माणसे
आरामात खाऊ शकतात), अर्धी
वाटी आंबट दही, आल्याचे बारीक तुकडे , चवीनुसार
दोन-तीन हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाण्याचे कुट दोन चमचे,
एक चमचा मगज बी , फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ.
कृती : सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. देठ काढून भरली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचे बारीक तुकडे , हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचे कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, शेंगदाण्याचे कुट आणि मगज बी ह्यांचे वाटण भेंडीवर घालावे. अर्धा चमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवून ऊकळी आल्यानंतर भेंडीरस्सा एका बाउलमध्ये काढावा. सर्व्ह करतेवेळी वरुन सजावटी साठी नारळ चव व बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालावी.
कृती : सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुवून घ्यावी. देठ काढून भरली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचे बारीक तुकडे , हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचे कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, शेंगदाण्याचे कुट आणि मगज बी ह्यांचे वाटण भेंडीवर घालावे. अर्धा चमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवून ऊकळी आल्यानंतर भेंडीरस्सा एका बाउलमध्ये काढावा. सर्व्ह करतेवेळी वरुन सजावटी साठी नारळ चव व बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालावी.
Monday, 23 September 2013
शेपू - पालक ह्यांची गोळा भाजी.
" शेपू - पालक ह्यांची गोळा भाजी "
साहित्य : एक जुडी शेपूची भाजी,एक जुडी पालकची भाजी,एक मूठ वाफावलेले मक्याचे दाणे (मताराचे सुद्धा चालतील),गोळाभाजीला लावण्यासाठी अर्धी वाटी चणा डाळीचे पीठ,८-१०
लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे,चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे
किंवा लाल तिखट,मीठ व गूळ अथवा साखर,फोडणीसाठी
तेल,मोहोरी,हळद,हिंग
व लसणाच्या पाकळ्या.
कृती : सर्वात
प्रथम शेपू व पालक व मग निवडून , चिरून व स्वच्छ
धुवून घ्या व पाणी निथळण्यासाठी एका चाळणीत ठेवा. मक्याचे मूठभर दाणे
वाफवून घ्या. गॅसवर एका कढईत किंवा फ्राय पॅनमध्ये फोडणीसाठी तेल तापवून त्यात
मोहोरी टाका,मोहोरी तदतडल्यावर हळद,हिंग
व चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या व चवीनुसार मिरचयांचे तुकडे टाकून परतून घ्या मग
मक्याचे वाफावलेले दाणे,चिरून व धुवून ठेवलेला शेपू आणि पालक
घालून परता,मग थोडे पाणी घालून शिजवून घ्या.मग त्यात
चवीनुसार मीठ व गूळ घाला व एका वाटीत पाणी घालून चणा डाळीचे पातळ पीठ कालवा व
भाजीत घाला व दावाने हलवत रहा भाजीचा गोळा बनेस्तवतर घोटात रहा,भाजीचा गोळा पुरेसा घट्ट बनताच गॅस बंद करा.
गोळा
भाजी सर्व्ह करतेवेळी वरुण चरचरीत लसणाची फोडणी घाला व कांदा - भाकरी बरोबर खायला
द्या.
Sunday, 22 September 2013
दही वडे
आजचा संडे स्पेशल मेन्यू आहे " दही वडे "
साहित्य : दोन वाट्या उडदाची डाळ (ह्यात साधारणपणे
३० वडे होतील) (मुगाची आणि उडदाची डाळ निम्मी निम्मी घेतली तरी चालेल. मुगाच्या डाळीमुळे
वड्यांना छान रंगही येतो), एक लिटर दूध , वडे तळणीसाठी तेल, चवीनुसार मीठ व साखर
आणि दहीवड्यावर वरून घेण्यासाठी आवडीप्रमाणे मीरपूड, लाल
तिखट, चाट मसाला,जिरे पूड,चिरलेली कोथिंबीर इत्यादी.
कृती : सर्वात प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुवून साधारण सात ते आठ तास भरपूर पाण्यात
भिजत घालावी,
दूध तापवून कोमट झाल्यावर विरजण
लावून दोन तासांनी फ्रिजमध्ये ठेवावे.सात - आठ तासांनंतर उडदाची डाळ चांगली भिजली
की ती चाळणीत घालून पाणी उपसून टाकावे. मिक्सरमध्ये डाळ बारीक वाटून घ्यावी. डाळ
वाटताना पाणी आवश्यक तेवढेच ठेवावे. आवडत असल्यास वाटत असतांनाच डाळीमध्ये जिरे/
हिरवी मिरची घातले तरी चालेल. वाटलेले पीठ मेदूवड्यांपेक्षा किंचीतच सैल हवे. पीठ
चमच्यात घेऊन वरून सोडले असता एकसंध गोळा पडायला हवा. पीठाचा दाटपणा भज्यांप्रमाणे,
केकप्रमाणे, इडलीप्रमाणे असायला नको.
डोश्याप्रमाणे तर नकोच नको. दहीवडे/ मेदूवडे करण्यामधे पीठ वाटणे एवढे एकच
कौशल्याचे काम आहे , वाटलेल्या पीठात चवीप्रमाणे मीठ घालून
साधारण अर्ध्या-पाऊण तासासाठी ताटाने झाकून ठेवून द्या.
विरजणाच्या दह्यात चवीप्रमाणे आणि आवडीप्रमाणे मीठ,
साखर आणि भाजलेल्या जिर्याची पूड घालून दही व्यवस्थित गुळगुळीत
होईपर्यंत घुसळून व फेटून घ्या. किंचीत आल्याचा रस घातल्याने दह्याला मस्त चव व
स्वादही येतो. विरजणाचे अंगचे पाणी आणि मीठ साखरेमुळे सुटलेल्या पाण्यामुळे दही जेव्हढे
सैल होईल तेवढेच पुरेसे होते. पण तयार झालेले दही फारच घट्ट वाटले तरच पाणी मिसळून
दही फ्रिजमधे थंडगार व्हायला ठेवून द्या.
अर्ध्या-पाऊण तासानंतर
उडदाच्या डाळीचे वाटलेले पीठ चमच्याने व्यवस्थित आणि भरपूर फेटून घ्या. तळणीसाठी
तेल तापवून आपल्याला आवडतील तेवढ्या आकाराचे वडे किंचीत सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून टिश्यू पेपरवर काढून घ्या.
तळलेले सगळे वडे एका पसरट तसराळयात
घ्या. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात किंचीत मीठ आणि हिंग मिसळून घ्या. आणि
हे पाणी वड्यांवर घाला. साधारण दहा मिनिटे वड्यांमधे पाणी राहू द्या.
मग एकेक वडा हातात घेऊन हलक्या हलक्या हाताने पाणी पिळून घ्या. वडा
मोडता कामा नये. हे वडे घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात घालून फ्रिजमधे ठेवले तर
दोन दिवस चांगले राहतात.
दहीवडे देताना एका खोलगट डिशमधे वडे घेऊन त्यावर तयार केलेले थंडगार
दही घालून त्यावर आवडीप्रमाणे चाट मसाला,जिरेपूड, मिरपूड, लाल तिखट, कोथिंबीर
भुरभुरवून मग द्यावे.
Saturday, 21 September 2013
पडवळाची रस्सा भाजी
" पडवळाची रस्सा भाजी "
साहित्य : २५० ग्राम पडवळ , अर्धी
वाटी हरभरा (चणा) डाळ , मूठभर मका दाणे , ग्रेव्हीसाठी दोन चमचे मगज बी , दोन चमचे
शेंगदाण्याचे कूट , अर्धा कांदा,एक
बटाटा , चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,
गूळ ,मीठ,गोडा मसाला, फोडणीसाठी तेल,मोहोरी,जिरे, हळद, हिंग,कढीपट्ट्याची पाने,वरुन सजावटीसाठी स्वादासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
प्रथम पडवळ धुवून घेऊन त्याच्या
विळीवर चिरून आतील बिया व धागे
काढून टाकून बारीक फोडी/तुकडे करावेत,बटाट्याची
साले काढून बारीक फोडी कराव्यात,कांदा चिरून त्याच्या बारीक
फोडी करून त्यात मगज बी शेंगदाण्याचे कूट,मिरच्या व मीठ
घालून मिक्सर मधु वाटण (पेस्ट) करून घ्यावे. ही सगळी तयारी झाल्यावर गॅसवर
एका पातेल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवावे,तेल
गरम झाल्यावर त्यात मोहोरी,जिरे,हळद , हिंग व कढीपट्ट्याची पाने घालून
उलथानयाने परतावे,मग त्यात वाटण घालून पुन्हा परतावे,मग गोडामसाला घालून परतावे ,शेवटी पडवळाच्या फोडी व
बटाट्याचा फोडी व भिजलेली चणा डाळ व मक्याचे दाणे घालून परतावे व वर एका ताटात
पाणी घालून झाकण म्हणून ठेवावे व एक दरदरून वाट येऊ द्यावी. बटाटा व पडवळ शिजले की
त्यात ग्रेव्हीसाठी आवश्यक तेव्हाडेच पाणी
घालावे, मग त्यात गूळ व मीठ घालून डावाने चांगले मिसळून घ्यावे व एक उकळी आली की
गॅस बंद करावा.
बाउलमधून सर्व्ह करतेवेळी गरमा गरम रस्सा भाजीवर
सजावट म्हणून बारीक चिरलेली कोथिंबीर
घालून मग सर्व्ह करावी.
Friday, 20 September 2013
बेसनाचे लाडू
" बेसनाचे लाडू "
साहित्य : तीन वाट्या चणा (हरभरा) डाळ,
दोन वाट्या पिठी साखर, एक वाटी साजूक तूप,चमचाभर वेलची पूड,अर्धी वाटी दूध
कृती : बेसनाचे लाडू करण्यासाठी चार तास आगोदर चणा
(हरभरा) डाळ स्वच्छ पाण्यात भिजत घालावी,
चार तासांनी एका चाळणीत उपसून घेऊन मिक्सरमधून वाटून घ्यावी,गॅसवर
एका कढईत मिक्सरमडून वाटून काढलेली डाळ तुपावर चांगली खमंग अशी लालसर सोनेरी
रंगावर व भाजल्याचा खमंग दरवळ सुटेपर्यंत भाजून घ्यावी,नंतर
त्यात थडा दुधाचा हबका मारून पुन्हा भाजावी म्हणजे चांगली फुलूल येईल मग त्यातच
तूप व पिढीसाखर आणि वेलची प्पुड घालून मिश्रण हलवून एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा
व थोडे निवल्यावर तूप हाताला लावून लाडू वळावेत व थंड झाल्यावर एका घट्ट झाकणाच्या
स्टीलच्या डब्यात भरून ठेवावेत. हे बेसनाचे लाडू श्री गणरायाला फार प्रिय असल्याने
अनंत चतुर्दशीला श्रींचे विसर्जनाचे वेळी
नैवेद्य-प्रसाद म्हणून करतात.
Thursday, 19 September 2013
वाटली डाळ
"वाटली डाळ"
मित्रहो नमस्कार,आज आहे गुरुवार दिनांक १९ सप्टेंबर,२०१३ काल होती "अनंत चतुर्दशी" म्हणजेच श्रींच्या विसर्जनाचा दिवस,बाप्पांना आवडते म्हणून विसर्जनाचे वेळी खिरापतीचा प्रसाद म्हणून हरभर्याच्या डाळीची 'वाटली डाळ' करायची आपल्याकडे पूर्वापार परंपरेने चालत आलेली एक प्रथा आहे.आम्हीही काल आमच्या घरच्या गणेशाचे विधिपूर्वक विसर्जन केले त्यावेळी नैवेद्य म्हणून बेसनाचे लाडू व खिरापतीसाठी ही "वाटली डाळ" केली होती.त्याच वाटल्या दलीची रेसिपी मी आज तुमच्यासाठी येथे देत आहे. उद्या बेसनाच्या लाडवाची रेसिपी देईन .
साहित्य : चार वाट्या चणा डाळ (हरभरा डाळ) , फोडणीसाठी तेल,मोहोरी,जिरे,हिंग ,लाल तिखट,हळद,कढीपत्त्याची पाने,मीठ , साखर,सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा खवलेला चव.
कृती : चार तास आगोदर चणा डाळ भिजत घालावी. मग मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावी. नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत फोडणीसाठी तेल घेऊन ते तापल्यावर त्यात मोहोरी,जिरे,हिंग,हळद,चवीनुसार लाल तिखट
घालून परतावे,मग त्यात वाटलेली डाळ घालून उलथन्याने चांगले हलवून मिसळून घ्यावे त्याचवेळी चवीपुरते साखर व मीठ घालून पुन्हा हलवावे.मधूनच पाण्याचा हबका मारून हलवावे.शेवटी वर एका स्टीलच्या ताटात पाणी घेऊन झाकून एक दरदरून वाफ येऊ द्यावी.मग तात काढून त्यातील गरम पाणी डाळीत घालून ती पुन्हा एकदा हलवावी. व झाकून ठेवावी.
पाच मिनिटांनी झाकण काढून दिशमधून सर्व्ह करतेवेळी वरुन सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या नारळाचा चव घालून द्यावी.
Wednesday, 18 September 2013
तिखट मिठाचा सांजा
" तिखट मिठाचा सांजा ' अर्थातच उप्पिट किंवा शिरा
साहित्य : दोन वाट्या बारीक रवा, अर्धा कांदा चिरून फोडी करुन,अर्धा बटाटा चिरून फोडीकरुन,अर्धा टोमॅटो चिरून फोडीकरुन ,हिरवा मटार दाणे,मक्याचे दाणे,शेंग दाणे,चवीनुसार हिरव्या मिरच्या,मीठ,साखर,कढी पत्त्याची पाने,थोडी भिजलेली मुगाची व उडदाची डाळ, फोडणीसाठी तेल, मोहोरी,जिरे,हिंग व हळद,वरुन स्वाद व सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओल्या नारळाचा चव (खोबरे)
कृती : प्रथम गॅसच्या एका शेगडीवर स्टीलच्या गंजात तीन वाट्या पाणी तापत ठेवावे व दुसर्या शेगडीवर एका कढईत चमचाभर तेलावर रवा सोनेरी रंगावर भाजून घ्यावा व एका ताटात काढून घेऊन त्याच कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेवावे,तेल तापल्यावर त्यात फोडणीचे साहित्य मोहोरी,जिरे,हिंग,हळद ह्या क्रमाने घालून मग कढिपत्याची पाने व मिरचीचे तुकडे घालावेत व परतून घ्यावे,नंतर त्यात कांदा,बटाटा,मटार, मक्याचे दाणे,शेंगदाणे व शेवटी टोमॅटो घालून परतून घ्यावे,मग त्यात गरम पाणी घालून एक उकळी आल्यावर भाजून ठेवलेला रवा घालावा,रवा घालतांना उलथन्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.सर्व रवा घालून झाल्यावर कढईवर एक ताटात पाणी घालून झाकून ठेवावे,व एक वाफ येऊ द्यावी. वरच्या ताटातील पाणी वाफेने उकळू लागल्यावर ताट काढून ते पाणी सांज्यात घालावे व एकदा उलथन्याने हलवून घेऊन पुन्हा ताट झाकून ठेवावे.
सर्व्ह करतेवेळी डिशमध्ये सांजा काढल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले ओले खोबरे घालून खायला द्यावे.
भावलेले विज्ञान: सुई शिवाय इंजेक्शन / Needleless drug delivery
भावलेले विज्ञान: सुई शिवाय इंजेक्शन / Needleless drug delivery: स्थळ सरकारी रुग्णालय. वेळ सकाळची. ठराविक वेळेत इथे बालकांना लस दिली जाते. त्यामुळे गर्दी. सगळ्या माता आपआपल्या बाळांना घेऊन आपला नंबर कधी...
Tuesday, 17 September 2013
शिळ्या भाताचे वडे
" शिळ्या भाताचे वडे "
-
साहित्य : तीन वाट्या आदल्या दिवशीचा (शिळा)
भात, चवीनुसार हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या,धुवून चिरलेली कोथिंबीर (आवडीप्रमाणे) , आल्याचा छोटा
तुकडा, एक छोटा चमचा जिरे पुड, ५-६
कढीपत्त्याची पाने, २ चमचे लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर
कृती : वाड्याच्या आवरणासाठी बेसनाचे पीठ भिजवून घ्या. भिजवतेवेळी त्यात दोन चमचे
तांदळाची पिठी,चविसाठी थोडे मीठ व कडकडीत तेलाचे मोहन व जिरे घालावे. भात हाताने मोकळा करून घेऊन,कुस्करून / मळून
एकजीव करा. त्यात आलं-मिरची-लसणीचा ठेचा, कोथिंबीर बारीक
चिरून, मीठ व लिंबाचा रस ,जिरे पूड घालून एकत्र करा. त्याचे
वडे थापून बेसनाच्या पीठात भिजवून गरम तेलात मध्यम आचेवर तळा.तळलेले वडे टिश्यू
पेपरवर काढावेत.
डिशमधून ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
Monday, 16 September 2013
मटार उसळ
" मटार उसळ "
साहित्य : तीन वाट्या ताजे हिरवे मटारचे दाणे, दोन माध्यम उकडलेले बटाटे,फोडणीचे सामान (पाच चमचे तेल,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा लाल तिखट(चवीप्रमाणे जास्त घातले तरी चालेल) , दोन चमचे गोडा मसाला, दोन चमचे गरम मसाला, हळद व हिंग), आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता,किसून भाजलेलं सुकं खोबरं, ४ चमचे दाण्याचं कूट,मीठ व गुळाचा खडा
कृती : एका मोठ्या
स्टीलच्या पातेल्यात ५-६ वाट्या पाणी तापत ठेवा, दुसर्या एका मोठ्या जाड बुडाच्या कल्हईच्या पितळेच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकून ती तडतडायला लागल्यावर त्यात
आले-लसूणाची पेस्ट, कढीपत्ता, लाल तिखट,
गोडा मसाला, गरम मसाला, हळद
व हिंग (याच क्रमाने) टाकुन नंतर त्यावर मटारचे दाणे व थोडे मीठ टाकून (अगदी
थोडेसेच) परतून घेऊ, मग
त्यात बटाट्याच्या फोडी, ४ चमचे दाण्याचं कूट,खोबरं, गूळ व उकळतं पाणी टाकून पाण्याला
उकळी फुटली की गॅस बारीक करून, झाकण ठेऊन ५ मिनिटं उकळत ठेऊ. ५ मिनिटांनंतर मटार शिजले का ते
व चव बघावी व आवश्यकतेप्रमाणे
त्यात थोडे मीठ व तिखट टाकावे॰ खाताना ज्याचे त्याने आवडीप्रमाणे लिंबू पिळावे.
Sunday, 15 September 2013
पिकल्या केळ्याचे (गोड) आप्पे
काल आमच्या घरच्या गणेशाच्या आरतीचेवेळी प्रसादासाठी आम्ही केले होते "पिकल्या केळ्याचे (गोड) आप्पे"त्याचीच रेसिपी येथे देत आहे.
साहित्य : एक वाटी जाड पोहे (कांदा पोहयाचे), बारीक रवा दोन वाट्या बारीक रवा , एक वाटी दूध , अर्धी वाटी खवलेला ओल्या नारळाचा चव , तीन पिकलेली केळी , एक वाटी किसलेला गूळ , अर्धा चमचा वेलची पूड,अर्धा चमचा कायचा सोडा (किंवा
इनोजही चालेल) , अर्धे लिंबू व आप्पे घालण्यासाठी थोडे साजूक
तूप.
कृती : पोहे,दूध , रवा , ओल्या नारळाचा चव,गूळ ,केळी,वेलची पूड हे सर्व
मिक्सरमध्ये घेऊन त्यात सोडा घालून व लिंबू पिळून मग दोन मिनिटे मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे व एका
बाउलमध्ये काढून पांच मिनिटे झाकून ठेवावे. नंतर निर्लेपचे आप्पे पात्र गॅसवर ठेऊन साजूक तूप घालून हे मिश्रण घालून ५ मिनिटे
झाकून लगेच काढावे.
डिशमधून गोड घट्ट दहयाबरोबर हे गोड आप्पे सर्व्ह
करावेत.
Saturday, 14 September 2013
शिळोप्याचे थालीपीठ
शिळोप्याचे
थालीपीठ
आज सकाळी
नाश्त्याला काय करावे असा आमचा विचार चालला असतांना माझे लक्ष फ्रिजमध्ये असलेल्या
कालच्या शिल्लक असलेल्या अतिशय थोड्याश्या कोबीच्या भाजीकडे व भाताकडे गेले,तसेच काल रात्री डाळ फ्राय करतेवेळी शिल्लक राहिलेल्या
कांद्याकडे गेले. मग थोडासा विचार करून हयातूनच एखादा अभिनव असा नवा चविष्ट पदार्थ
बनवावा असे वाटले. त्याप्रमाणे हे सर्व वापरुन जो नवा पदार्थ आम्ही बनवला व तो
झालाही खूपच खुयाखुशीत आणि चविष्ट ! त्याचीच कृती व त्यासाठी वापरलेले साहित्य आज मी
येथे देत आहे .
साहित्य : काल
केलेली व थोडीशी शिल्लक राहिलेली कोबीची भाजी,काल
रात्री थोडा शिल्लक उरलेला भात ,काल कापून उरलेला अर्धा
कांदा,लसणाच्या ४-५ पाकळ्या,चवीप्रमाणे
२-३ हिरव्या मिरच्या, मीठ,आल्याचा छोटा
तुकडा, १०-१२ पुदिना पाने,धुवून बारीक चिरलेली
कोथिंबीर, थालीपीठाच्या भाजणीचे पीठ ,तेल.
कृती : प्रथम लसणाच्या
सोललेल्या पाकळ्या,आल्याचा तुकडा,चवीपुरत्या हिरव्या मिरच्या व मीठ,पुदिन्याची पाने , थोडा बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर हे सर्व मिक्सरमधून वाटून घेतले,मग एका तसराळयात कोबीची भाजी,,मोकळा केलेला भात, बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर ,जरुरीप्रमाणे ५ मोठ्ठे
चमचे भाजणीचे पिठ घेतले,त्यात मिक्सरमधून काढलेले वाटण व आवश्यक
तेव्हढे पाणी व दोन चमचे कडकडीत तेल घालून भिजवले व मळून घेतले.नंतर तव्यावर थोडे तेल घालून थालीपीठ
लावले,त्यावर मध्यभागी बोटाने एक भोक व भोवताली चार भोके पाडून
त्यातही वरुण चमच्याने थोडे थोडे तेल घालून गॅसवर दोन्ही बाजूंनी भाजून घेतले व हे
गरम गरम थालीपीठ दही,लोणी किंवा लोणच्याबरोबर खायला दिले. सर्वांनाच
फारच आवडले.एकदम खुसखुशीत व चविष्ट झाले होते.
Friday, 13 September 2013
खमंग काकडी अर्थातच काकडीची कोशिंबीर
"खमंग काकडी"
साहित्य : दोन मोठ्या कोवळ्या काकड्या, घट्ट दही,दोन बारीक
चिरलेल्या हिरव्या मिरच्या,
दोन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड (जाडसर)कुट,किसलेला
ओल्या नारळाचा चव,
अर्धा चमचा जिरे,चिमूटभर
हिंग,चवीनुसार
साखर व मीठ,
एक चमचा तूप (फोडणीसाठी),बारीक
चिरलेली कोथिंबीर
कृती : प्रथम काकड्या धुवून घ्या व दोन्ही बाजूंनी
शेवटची टोके कापून टाका,काकडी
कडू नाही ना ह्याची खात्री करून,
झाल्यावर काकडीची साले काढून व चोचवून किंवा किसणीवर किसून घ्या, किसलेल्या
काकडीला थोडे मीठ लावून थोड्या वेळाने कीस पिळून काकडीतील जास्तचे पाणी काढून
टाका.
एका मोठ्या स्टीलच्या तसराळयात किंवा बाउलमध्ये
किसलेली काकडी घेऊन त्यात ओल्या नारळाचा खोवलेला चव,घट्ट दही,शेंगदाण्याचे जाडसर कुट,बारीक चिरलेले
मिरचयांचे तुकडे,चवीनुसार
साखर व मीठ घाला नंतर त्यावर गॅसवर एका कढल्यात तूप तापवून त्यात जिरे टाकून,जिरे चांगले
तडतडायला लागल्यावर चिमूटभर हिंग घालून ही तयार केलेली फोडणी घाला व चमच्याने
चांगले मिसळून घ्या.
सर्व्ह करते वेळी वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून
पुन्हा एकदा चांगले मिसळून मग ही खमंग काकडी सर्व्ह करा.
Thursday, 12 September 2013
ताकातील उकड
"ताकातील उकड "
साहित्य : २ वाट्या ताजे आंबट ताक , तांदळाचे पीठ (ज्वारीचेही चालते), ३-४ लसणाच्या पाकळ्या , आल्याचा छोटा तुकडा , ३-४ हिरव्या मिरच्या (चवीनुसार) , फोडणीसाठी दोन चमचे तेल व मिसळणीच्या डब्यातील छोटा चमचा मोहोरी , जिरे,हिंग, हळद,मेथ्या,५-६ कढीपत्त्याची ताजी पाने,बारीक चिरलेली कोथिंबीर,चविसाठी चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ.
कृती : प्रथम गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करावे. तेलात
मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरच्यांचे
तुकडे घालून फोडणी द्यावी. त्यातच लसणाच्या
पाकळ्या व आले ठेचून घालावे. सर्व व्यवस्थित परतले की त्यात ताक घालावे. ताकाला
उकळी येईस्तोवर ढवळत राहावे म्हणजे ताक फुटणार नाही. ताकाला उकळी आली की त्यात
चवीपुरते साखर व मीठ घालावे. तांदळाचे पीठ वरुन भुरभुरावे. गुठळ्या होणार नाहीत
याची काळजी घ्यावी कारण भराभर पिठ घातले तर हमखास गुठळ्या होतात. उकडीला जेवढा
घट्टपणा हवा असेल तेवढे तांदळाचे पीठ हळूहळू घालत ढवळत राहावे. कढईवर एका ताटात पाणी
घालून झाकावे व दोन चांगल्या वाफा काढाव्यात.
वरच्या ताटातील पाण्यास उकळी आल्यावर समजावे झाली आपली ताकातली उकड तय्यार !
सर्व्ह करतेवेळी गरमागरम उकडीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोड्यावेळ
झाकून ठेऊन मगच सर्व्ह करावी.
|
Subscribe to:
Posts (Atom)