Tuesday 20 August 2013

“अळूच्या वड्या”





साहित्य : मोठ्ठी वड्यांच्या अळूची ४/५ पाने स्वच्छ धुवुन, १ वाट्या चणा डाळ (बेसन) पीठ, १ चमचा तांदुळाची पिठी, १/४ वाटी चिंचेचा घट्टसर कोळ, २ चमचे गुळ, १/४ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १ चमचा तीळ, १ चमचा ओवा, १ चमचा धने जि-याची पूड, चवीपुरते मीठ, तळणी साठी तेल

कृती : प्रथम ळूची पाने स्वच्छ पुसून त्याचे देठ कापून घ्यावेत. प्रत्येक स्वतंत्र पान मागील बाजूने त्यावर लाटणे फ़िरवुन सपाट करुन घ्यावे.
नंतर एका तसराळ्यामध्ये बेसन पीठ घेन त्यातच तांदुळपिठी घालावी.नंतर त्यात एकेक करत हळद, लाल तिखट, मीठ ,धने-जिरे पुड,चिंचेचा कोळ,१चमचा तेल, ओवा, तिळ हे सगळे जिन्नस घालून मिक्स करावे. घट्टसर भिजवावे. जरुरी असल्यास थोडे पाणी घालावे.मिश्रण फ़ार पातळ आणि फ़ार घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
आता हे मिश्रण अळूच्या उलट्या पानावर पातळ थर बसेल असे नीट पसरावे. आता अळूचे दुसरे पान त्यावर तसेच पालथे ठेवावे.आणि परत एकदा मिश्रणाचा पातळ थर पसरावा. असेच चारही पानांचे थर पूर्ण करावेत.
आता खालच्या बाजुने गुंडाळी करत जावी.गुंडाळताना प्रत्येक वेळी मिश्रण थोडे लावत जावे.
आता हे तयार झालेले रोल वाफ़ेवर उकडुन घ्यावेत.आणि गार झाल्यावर त्याच्या चकत्या कापून त्या तेला मध्ये तळून घ्याव्यात. ज्यांना तळलेले आवडत नाही शांसाठी ह्या वड्या शॅलो फ़्राय ही करुन खाता येतील.
तयार वड्यांवर कोथिंबीर, ओले खोबरे घालून मस्त सजवावी.
टीपअळूची पाने खुप मोठी असली तर ३ च घ्यावीत आणि सर्व प्रथम मोठे पान खाली घ्यावे त्या नंतर मध्यम व वर छोटे घ्यावे असा क्रम केल्याने नंतर वळकटीची घडी नीट बांधता येते, आणि तळताना ती सुटत ही नाही.



No comments:

Post a Comment