Search This Blog

Tuesday, 25 May 2021

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '

 

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '

 





माणसाला काही तरी छंद हा हवाच. तोच कठीण काळी आपल्याला उपयोगी पडतो.तसे मला फुलांच वेड अगदी लहाणपणा पासूनच आहे , पण तरीही आयुष्याची ४५ वर्षे बागेसाठी जागा नाही आणि १९८५ मध्ये स्वत:चे घर गेऊनही नोकरी व्यवसायात आकंठ बुडालेला असल्यामुळे वेळच मिळत नाही असे म्हणत हयातीची  ६६  वर्ष गेली ......पण  मग २००८ मध्ये  ठरवल की आता आपली आवड,आपला छंद जोपासायचा

आजकाल सर्वत्र फ्लॅट संस्कृती स्वीकारलेली आढळून येत असली तरी प्रत्येकास आपली स्वत:ची छोटीशीच का होईना पण बाग असावी अशी आंतरिक इच्छा तर असतेच ना. हौस म्हणून फळ झाडे नाही तरी किमान काही छोटी छोटी फुलझाडे तरी आपल्या या बागेत असावीत असे प्रात्येकालाच वाटत असते . ही हौस फ्लॅटमधील गॅलरीमध्ये कुंडय़ांत फुलझाडे लावून पूर्ण करायचा आपला नेहमी प्रयत्न असतो.. आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीतील कुंडय़ांमध्ये आपण हौसेने फुललेली जास्वंद देवाला वाहताना, फुललेला गुलाब किंवा सोनचाफा/अबोली/मोगरा/मदनबाण केसांत माळताना, आमटीला किंवा कढीला फोडणीसाठी आपल्याच कुंडीतील कढीपत्ता घालताना, चटणी-भाजीसाठी आपल्या बागेतील मिरचा,आले,पुदिना अथवा कोथंबिर वापरताना गृहिणीला होणारा अवर्णनिय आनंद हा प्रत्यक्षांत अनुभवयाचा असतो, तो शब्दांत सांगता येत नाही.

आपले घर कितीही छोटे असो किंवा मोठ्ठा बंगला असो , त्यामध्ये किमान एखादा छोटा का होईना,पण बागेचा हरित कोपरा  तरी असावा, हे आपल्यापाकी बहुतेक प्रत्येकाचेस्वप्न असते. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात बंगला किंवा मोठी घरे ही गोष्ट दुर्मीळच झाली आहे.त्यामुळे छोट्या जागेतच कल्पकतेनं सजावट करता येणे महत्त्वाचे आहे.
तुमची जागा कितीही लहान किंवा मोठी असो, तिथे एक सुंदर बगीचा कसा फुलवता येईल याचाच प्रत्येकजण विचार करत असतो. ह्याला आम्हीही अपवाद नाही.

आमचे आनंद-निधान म्हणजेच आमच्या ८५ वर्षांच्या जुन्या वाड्याच्या गच्चीवरील अवघ्या  १०' x १५' आकाराच्या छोट्याशा गच्चीत आम्ही उभयतांनी उतारवयांत मोठ्या कष्टाने स्वयंपाक घरातल्या ओल्या कचर्याचा वापर करून फुलवलेली आम्हाला नंदनवनाची अनुभूती देणारी पर्यावरणपूरक संपूर्ण सेंद्रिय व जैविक बाग. ज्या बागेत १०० हून जास्त विविध प्रकारची  फुलझाडे,फळझाडे ,भाजीपाल्याची आणि औषडी वनस्पतींची  झाडे जोपासली आहेत.

कोणतीही बाग ही जरी एक बागच असली तरी आपल्या घरची अगदी छोटीशी असलेली बागही आपल्या साठी नंदनवन असते. आपण स्वत: जिवापाड मेहनत घेऊन मोठ्या कष्टाने लावलेल्या व जिवापेक्षा जास्त जपून जोपासलेल्या आणि वाढवलेल्या घराच्या छोट्याशा गच्चीतील मातीविरहित बागेतून मनाला मिळणारा स्वर्गीय आनंद आणि समाधान याची काहीच तोड नसते. ती एक अवर्णनिय अशी अनुभूती असते. काही औरच... अगदी आईला आपल्या नवजात पहिल्या अपत्याकडे  पाहिल्यावर जसं वाटतं ना अगदी तसचं आम्हाला आमच्या बागेकडे, बागेतल्या झाडा-फुलांकडे पाहिल्यावर वाटतं.... सकाळी उठलं अन झाडांपाशी एक तरी फेरी झाली नाही तर दिवसभर आगदी हुरहूर लागुण रहाते, अन एकदा का झाडांपाशी जाऊन,त्यांच्याशी मनीचं हितगुज करून आलं की दिवसभर कसं प्रसन्न वाटतं. बागेतील झाडांशी बोलायला शब्दांची गरज नसते.हौसेला मोल नाही आणि मेहनतीला तोड नाही याची नित्य नवी प्रचिती येते. प्रत्येकाने  घरातल्या कुंडीमध्ये एखादे तरी टोमॅटो, वांगे किंवा मिरची अथवा एखादे पालेभाजीचे रोप लावायलाच हवे........ त्यामुले निसर्गाचे दातृत्व कळेल, शेतकऱ्याचे कष्ट समजतील, अन्नाचे महत्त्व पटेल, आणि सृजनाचा आनंदही मिळेल.

कधी कधी फुललेली छोटी छोटी फुलेही मनाला अपार समाधान देऊन जातात , त्याचे मोलही नाही ठरवता येत. खरी श्रीमंती पैशांत कधीच नसते तर आमची बाग हीच आमची खर्‍या अर्थाने श्रीमंती आहे असे आम्हाला वाटते. आम्ही अशा संपत्तीचे स्वामी आहोत याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो.

 प्रत्येकाच्या व्यक्तीगत आवडी-निवडीचे प्रतिबिंब त्यांच्या बागेत उमटते हे खरे... दैनंदिन रामरगाडयातुन आम्हाला जो काही मोकळा वेळ मिळतो त्यावेळी  मन शांत ठेवण्याचे ठिकाण म्हणजे `आमची बाग आहे.

माझ्या आनंदाचे गोत्र , ओल्या मातीलाही कधी, येई सुगंध.

आमची बाग म्हणजे आमचे ' आनंदनिधान '  आहे.

आमच्या या छोट्याशा नंदनवनांत भलेही गुलाबांचे किंवा अन्य फुलांचे भरगच्च ताटवे नसतील पण जे काही फुलते त्यांत आम्ही खूपच आनंदी आहोत.

यावेळी मला शांता शेळक्यांच्या कवितेतल्या खालील ओळी आठवतात.

सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास l
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास ll
पराग, देठ, सुवास, पाकळ्या फूल इतकीच देते ग्वाहीl
अलग अलग करू जाता हाती काही उरत नाही ll

आम्ही तर खात्रीने सांगू की ह्या झाडा फुलांनी आम्हांला समृद्ध केल.. #जगायची #इच्छा#फुलण्याचा #ध्यास आणि देता येईल तेवढे #देण्याची #दानत ह्या गोष्टींनी आज आम्ही समृद्ध जीवन व्यतीत करत आहोत.

बागकाम हाच आमचा ऑक्सीजन

वृक्ष सानिध्य हीच आमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा

 

सौ. अनीता व प्रमोद तांबे व प्रमोद लक्ष्मण तांबे, पुणे  दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ कर्णपिशाच्च (मो) ९७३०९ ८८७११ ,८४४६३ ५३८०५



No comments:

Post a Comment