Friday 9 August 2019

शेव पिठले

हे शेव पिठले एकदमच वेगळे आहे. ह्यात बाजारात मिळणारी तयार शेव वापरायची नाही. आणि घरी बनवून तळून सुद्धा घ्यायची नाही.
साहित्य : एक वाटी बेसन पीठ, आलं-लसूण-मिरची,मूठभर चिरलेली कोथिंबीर, दोन मोठे कांदे, सुकं गोटा खोबरं, फोडणी साठी डावभर तेल, हिंग,हळद,जिरं, मोहरी
कृती : प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये बेसन पीठ घ्या आणि त्या पिठात तिखट मीठ घालून भज्याच्या पिठापेक्षा जरासे जास्त घट्ट भिजवून ठेवा.मग सुकं गोटा खोबरं भाजून घ्या. आलं-लसूण-खोबरं-हिरवी मिरची ,चिरलेल्या कांद्याच्या फोडी एकत्र करून मिक्सरवर वाटण करून घ्या.एका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात वाटण घालून परतून घ्या. मग त्यात चार वाट्या उकळतं पाणी घाला. उकळी आली की किसणी उलटी धरून त्यात बेसन पीठ घालून शेव पाडा. सर्व शेव पाडून झाली की पुन्हा उकळी येऊन ती शिजू द्या. आता बेसन पिठाचे भांडे आणि किसणी वर थोडे पाणी घाला. ते पाणी ह्या पिठल्या मध्ये घाला आणि पुन्हा उकळी येऊ द्या. त्या मुळे पिठल्याला दाटपणा येईल. मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून ढवळा आणि गरम पोळी-भाताबरोबर सर्व्ह करा.
साधं पिठलं करण्यापेक्षा एकदा हे शेव पिठले करून पहाच.
खात्रीने हे आगळे वेगळे शेव पिठले तुम्हाला नक्कीच आवडेल.

No comments:

Post a Comment