Thursday 15 August 2019

कढी गोळे


कढी गोळे


 



साहित्य   :  मलईच्या (सायीच्या) दह्याचे  ५-६ वाट्या ताक , दीड वाटी चणा डाळ (हरभरा डाळ) , एक टेबलस्पून आले-लसणाची पेस्ट , चमचाभर हिरव्या मिरच्यांची पेस्ट *चवीनुसार कमी-जास्त) , एक छोटा चमचा हिंग ,एक चमचा जिरे पावडर , ८-१० कढीपत्त्याची पाने , दोन टेबलस्पून तेल , फोडणीचे साहित्य , एक चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ व साखर
कृती : साधारणपणे  ४ तास आगोदर चणा डाळ धुवून भिजत घालावी. नंतर रोळीत / चाळणीवर  उपसून ठेवावी. पाणी निथळल्यानंतर शक्यतो पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये भरड्सर वाटावी. पण फार बारीक करू नये.एका परातीत भरड्सर  वाटून ठेवलेल्या डाळीत चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा आवडत असल्यास लाल तिखट, हिंग, आले-लसणाची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ घालून एकत्र करून ठेवावे. १५-२० मिनिटांनी त्या भरड डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे वडे करून घ्यावेत व गॅसवर एका पॅन मध्ये पानी उकळायला ठेऊन त्या पॅन वर एक चाळणी ठेवा आणि त्यात हे गोळे/वडे ठेऊन वाफवून/उकडून काढावेत.
आता कढी साठी एका टोपात / गंजात मलईचे ताक घेऊन त्या ताकाला एक चमचा डाळीचे पीठ लावून घेऊन त्यात कढीपत्त्याची पाने , चवीनुसार मीठ, चवीपुरती चिमूटभर साखर, आले-लसणाची  पेस्ट घालून कढीचा  टोप / गंज गॅसवर ठेवा. टोप / गंज  अर्धा रिकामा असावा. कढी चांगली उकळू लागल्यावर वाटलेल्या डाळीचे छोटे वाफवून घेतलेले गोळे कढीत सोडावेत.( कढी उकळण्यापूर्वी गोळे टाकल्यास गोळे फुटतात) एक एक करून सर्व गोळे कढीत सोडावेत.नंतर १० मिनिटे बारीक गॅसवर कढी उकळू द्यावी. गॅसवरून कढीचा टोप / गंज  उतरल्यावर , एका काढल्यात तेल, मेथी, मोहरी, हिंग अशी तडका फोडणी करावी व ती कढीवर घालावी. फोडणीत हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावे. हे गोळे भातात कुस्करून त्यावर फोडणी घालून खाण्याची पद्धत आहे. पोळीबरोबर खाण्यासही चांगले लागतात.

No comments:

Post a Comment