आजच्या जेवणात डावीकडचे तोंडीलावणे म्हणून आम्ही केला आहे एक आगळा वेगळा कोशिंबीरीचा प्रकार ज्याचे नांव आहे कारल्याचे किसमूर (कोशिंबीर)
त्याचीच ही सचित्र रेसिपी मी आता येथे खास तुमच्याशी शेअर करत आहे.
कारल्याचं किसमूर (कोशिंबीर)
कारल्याचं किसमूर म्हणजेच गोव्याकडे केलीजाणारी कारल्याची कोशिंबीर (डावीकडचे तोंडीलावणं) आहे.
कारल्याचा एक अत्यंत वेगळाच आणि अगदी सोपा, झटपट होणारा पदार्थ आहे. एकदा जरूर करून बघाच.
साहित्य :
दोन मोठ्या कारल्यांचे मासाल्यात घोळवून व मुरवूत ठेऊन नंतर तळलेले (शॅलो फ्राय) काप
एक मध्यम कांदा बारीक चिरून
एक चमचाभर चिरलेला गूळ व साखर
अर्धा चमचा लाल तिखट
सुकी चिंच दोन बुटुके (पाणी न घालता) किंवा चार मोठे चमचे दही
दोन मोठे चमचे खवलेला नारळाचा चव
दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती :
१. कारल्याचे काप चिरून मसालात घोळवून व मुरवून घेऊन नंतर तेलात तळून घ्या . (तळलेले मसाला कारल्याचे काप दुकानात मिळतात ते वापरले तरी चालतील)
२. कारल्याचे मसाल्यात घोळवून व मुरवून घेऊन नंतर तळलेले काप मिक्सरवर पल्स मोड मध्ये फिरवून जाडसर भरड कूट करून घ्या.
३. एका बाऊलमध्ये मसाला कारल्याचे जाडसर कूट आणि बाकी वर सांगितलेले कोशिंबीरीस लागणारे सर्व साहित्य घालून चांगलं मिक्स करा.
४. चविष्ट किसमूर तयार आहे. ही कारल्याची कोशिंबीर / तोंडीलावणं, पोळी / भाकरी बरोबर म्हणून सर्व्ह करा.
असंच नुसतं खायलाही छान लागतं.
टीप : कारलं म्हटलं की लगेच बरेच जण नाक मुरडतात. पण माझ्यासारखे कारलं आवडीनं खाणारेही काही आहेत .
ज्यांना कारलं आवडत नाही त्यांना सुद्धा ही कोशिंबीर नक्की आवडेल.
एकदा कराच आणि अनुभवाने खात्री करून घ्याच.
No comments:
Post a Comment