Sunday, 27 June 2021

इन्स्टंट रेडी मिक्स पोहे

 रविवार स्पेशल नाश्ता :

इन्स्टंट रेडी मिक्स पोहे




साहित्य : दोन वाट्या जाड पोहे ,एक कांदा,मटार दाणे, शेंगदाणे अर्धी मूठ, फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद व हिंग, कढीपत्त्याची आठ-दहा पाने ,चविनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,साखर,मीठ व लिंबाचा रस व सजावटीसाठी वरून घालण्यासाठी बारीक चिरलेली कोथिंबीर,ओल्या नारळाचा खवलेला चव व बारीक शेव.
कृती : आगोदर एका वाटीत पाणी घेऊन मटार भिजत टाका. मग गॅसवर मंद आंचेवर एका कढईत जाड पोहे सोनेरी रंगावर भाजून घ्या व एका परातीत काढून ठेवा. कांदा चिरून घ्या. आता गॅसवर काढईत फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यांत मोहरी,जिरे,हिंग , हळद व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घाला व फोडणी झाल्यावर त्यांत कढीपत्त्याची आठ-दहा पाने टाकून परतवून घ्या मग मटार दाणे व शेंगदाणे टाकून चांगले परतून घ्या, सर्वात शेवटी भाजून ठेवलेले पोहे टाकून परता,परतत असतांनाच अखेरीस चवीनुसार साखर,मीठ व लिंबाचा रस घालून मिसळून घ्या. मिश्रण कोरडे होईतोपर्यंत परतत रहा. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून वर झाकण ठेवा व गॅस बंद करा. गार झाल्यावर ही रेडी पोहे मिक्स एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
टीप : प्रवासाला ,सहलीला जातांना सोबत नेता येतील किंवा अचानक पाहुणे आल्यावर ५ मिनिटात गरमागरम पोहे सर्व्ह करू शकाल.

रेडी पोहे मिक्स वापरुन असे करा झटपट पोहे.
कृती : गॅसवर पॅन तापत ठेवा
त्यामध्ये कपभर पाणी टाका
थोडं बटर, एक मिरची बारीक चिरून, थोडं मीठ टाका
पाण्याला उकळी येऊ द्या,
त्यात इन्स्टंट पोह्याच्या डब्यातील जरुरीपुरते मिश्रण काढून ते हलक्या हाताने उकळत्या पाण्यात सोडा.
गॅस मंद आचेवर ठेवा.
हलक्या हाताने सर्व मिश्रण हळूहळू खालीवर करा !
नंतर मंद आंचेवर पॅन वर झाकणांत पाणी घालून ते झाकण ठेवून पाच मिनिट थांबा !
झाले मस्त गरम गरम 'तोंपासु' चविष्ट पोहे !
वाटल्यास वरून स्वादासाठी थोडी ताजी कोथिंबीर चिरून टाका, ओलं खोबर असेल तर बेस्ट ! त्याचा थोडा चव टाका !
अन एन्जॉय करा !!
ना तेलाची गरज ना फोडणीची धावपळ !
पाच मिनिटात पोहे तयार !

Friday, 25 June 2021

बटाटयांचं भुजणं

 बटाटयांचं भुजणं



हे भुजणं बनवण्यासाठी किती लोकांसाठी हे भुजणं बनवायचे आहे तीचा अंदाज घेऊन त्यानुसार बटाटे घ्या. लांबट आकाराचे बटाटे निवडून त्यांची सालं काढून गोल चकत्या कापून पाण्यात ठेवून द्या.
एका बाऊलमध्ये उभा चिरलेला कांदा, बारीक ठेचलेलं आलं लसूण, तिखट, हळद, भरपूर चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घाला. सर्वात शेवटी भरपूर तेल. हे सगळे मिक्स करायचे. यात मग बटाट्याच्या चकत्या घालायच्या. हलक्या हाताने हे परत मिक्स करायचे. सगळा ओला मसाला चकत्यांना लागायला हवा.
मग दहा मिनिटे हे मुरण्यासाठी झाकून ठेवा.
नंत गॕसवर कढई ठेवा. कढई गरम झाली की हे मिश्रण घाला. ( मिश्रणात तेल असतेच. त्यामुळे फोडणीची गरज नसते.) दोन तीन मिनिटे मध्यम आचेवर परता. मग साधारण बटाट्याच्या चकत्या बुडतील इतके दूध घाला व झाकण ठेवा. दहा ते बारा मिनिटे शिजू द्या. बहुतेक सगळे दूध आटून जाईल.
भुजणं झालं तयार!
वर नारळाचा चव व कोथिंबीर वरून घाला.
चपाती वा भाता सोबत याचा आस्वाद घ्या!

Thursday, 24 June 2021

कारल्याचे भरीत

 कारल्याचे भरीत



कारलं धुवून उकडवून घ्यायचं (आपण आमटीसाठी तूर डाळ शिजायला लावतो त्यातच कारलं घालून उकडवावे किंवा गॅस वर वांग्यासारखे भाजून घ्यावे. म्हणजे कडूपणा येत नाही आणि अर्क सगळा डाळीत उतरतो फुकट जात नाही.
त्यातल्या बिया काढून गर कुस्करून घ्यायचा त्यात ओलं खोबरं (जरा जास्त) , कोथिंबीर बारीक चिरून, मिरची वाटून मीठ ,साखर आणि दही हे घालून व्यवस्थित एकत्र करायचं आणि झालं झक्कास असं कारल्याचं भरीत.
टीप:
अख्ख कारलं डाळीत उकडवायचं उकडलेली डाळ आमटीसाठी वापरायची आणि फक्त कारल्याचं भरीत करायचं डाळ कारलं एकत्र करून भरीत करायचं नाही.

Saturday, 12 June 2021

गूळ-पापडीच्या वड्या

 बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही विकतच्या महागड्या ब्रॅन्डेड पौष्टिक पदार्थांपेक्षा अत्यंत स्वस्त व घरीच बनवता येणार्या वड्या


गूळ-पापडीच्या वड्या
साहित्य : दोन वाट्या कणीक (गव्हाचे पीठ) ,एक वाटी जाड पोहे. एक वाटीभर साजूक तूप , एक वाटीभर किसलेला गूळ,प्रत्येकी एक छोटा चमचा विलायची व जायफळ यांची पूड, काजू व बदाम यांचे काप
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून घेऊन त्या गरम तुपात जाडे पोहे तळून घ्यावेत आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून पावडर करून घ्यावी. मग त्याच कढईत थोडेसे साजूक तूप घालू ते गरम झाले की त्यात कणिक घालावी व कणकीचा रंग तांबूस होई पर्यन्त व भाजल्याचा खमग सुवास घरभर दरवळेपर्यन्त भाजून घ्यावी. नंतर त्याच कढईत साजूक तुपात तळून मिक्सरवर वाटून घेतलेले जाड पोहे व भाजून घेतलेली कणीक एकत्र मिक्स करून घ्यावी. मग त्यात किसलेला गुळ घाला वा तो पातळ होइ पर्यत हलवत रहावे . मग त्यात विलायची व जायफळ यांची पूड टाकून चांगले हलवून मिक्स करून घ्या. एका पसरत ताटाला तूप लावावे व त्यात ते पातळ झालेले मिश्रण ओतावे.वाटीच्या बूडाला तूप लावून ते मिश्रण वाटीच्या साह्याने ताट भर पसरवावे नंतर दोन मिनिटांनी गरम असतानाच वड्या पाडून घ्याव्यात त्यावर काजू बदामाचे काप पेरावेत् थंड झाल्यावर गूळ पापडीच्या वड्या काढून घेऊन डब्यात भरून ठेवा.

Thursday, 10 June 2021

पौष्टिक आंबोशी घाऱ्या

 

पौष्टिक आंबोशी  घाऱ्या

 


 

हा प्रकार तसा जुनाच आहे.

 

रात्रीचा  भात पण उपयोगी येतो, वाया जात नाही आणि  एक नवीन डिश केल्याचा आनंद पण वाटतो.

साहित्य : एक वाटी रात्रीचा भात,अर्धी वाटी कणिक , अर्धी वाटी बेसन पीठ,अर्धी वाटी ज्वारीच पीठ, एक उकडलेला बटाटा.  पालक,मेथी,रताळी,केणा,पपई,मोहरी,शेवगा,हादगा यांच्या पानांची प्युरी ,चवीनुसार तिखट व मीठ, हळद,कोथिबींर धने पुड,एक चमचा तीळ,ओवा,पाव वाटी दही/ताक

कृती : दही/ताक,कोथिंबीर सोडून वरील सर्व साहित्य मिक्सर मधून काढून घ्या. मिक्सर थोडंच फिरवायच व एका भांड्यात काढून दही आंबट असेल तर एक चमचा टाकून मिश्रण रात्रभर राहु द्या.दुसऱ्या  दिवशी विविध पानांची प्युरी व उकडलेल्या बटाट्याचा मॅश केलेला लगदा आणि कोथिंबीर घालून पुरी प्रमाणे तळुन घ्या.

चटणी किंवा टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा.

 

Wednesday, 9 June 2021

पोहयाचे डांगर

 पोहयाचे डांगर



 

फक्त खायला करायच आसेल तर वाटीभर पोहे मंद आंचेवर भाजा आणि मिक्सर मधे दळून त्याचे पीठ करा,. बारीक झाल की  त्यांत चवीनुसार तिखट , मिठ ,ताक, ठेचलेले जिरेव हिरवी मिरची घाला जरुरीनुसार पाणी घालून कणके सारखा गोळा बनवा . तेलाच्या हाताने मळा . डांगर तयार. (ताकामधले जास्ती छान लागते आणि त्यात जिर , मिरची ठेचून घालायची)  

Tuesday, 8 June 2021

भरताच्या वांग्याचे पोहे

 

भरताच्या वांग्याचे पोहे


  

साहित्य : दोन वाट्या जाड पोहे  , पाऊण  वाटी उकडवून /भाजून  सोललेल्या वांग्याचा गर , दोन मध्यम कांदे बारीक चिरून
फोडणीसाठी साहित्य : एक चमचा  तेल, एक छोटा चमचा मोहोरी, चिमूटभर हिंग, एक छोटा हमचा हळद , एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, दोन चमचे लिंबाचा रस,एक चमचा साखर,चवीनुसार मीठ,अर्धी मूठ कोथिंबीर ,अर्धी मूठ ओल्या नारळाचा चव,मूठभर बारीक शेव         

कृती : आगोदर गॅसवर एका कढईत जाड पोहे चांगले भाजून घ्यावेत,एकदम कुरकुरीत झाले पाहिजेत. भाजलेले पोहे परातीत काढून घ्या , नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस, मिरचीचा ठेचा , बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ , साखर आणि वांग्याचा गर घालावा व मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे. शेवटी  एका  लहान कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात क्रमाने मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करून घेऊन ती तयार फोडणी या कालवलेल्या वांगी-पोहयांच्या मिश्रणावर  वर घालून हाताने कालवून पोहे झकास मिक्स करावेत.सर्व्हिंग डिशमध्ये पोहे काढल्यावर त्यावर सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर ,ओल्या नारळाचा चव घालून आणि बारीक शेव भुरभुरून हे वांगी पोहे लगेच खायला द्यावेत.


Monday, 7 June 2021

७ जून : पोह्यांचा जागतिक हैप्पी बर्थडे.

 

 जून :  आज आहे पोह्यांचा जागतिक हैप्पी बर्थडे.





आज या पोह्यांचा हक्काचा दिवस आहे. 

सहा वर्षांपूर्वी, ७ जून २०१५ रोजी पहिलं जागतिक पोहे दिवस साजरा करण्यात आला.

 कुणाच्याही तोंडाला पाणी सोडणारे पोहे हा तर मराठी लोकांचा आवडता नाष्टा.

महाराष्ट्रातच नाही तर सगळ्या भारतात वेगवेगळ्या प्रकारे पोहे खाल्ले जातात.

असे म्हणतात की ,उपवर मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि जर त्यात कंदा पोहे नसतील तर तो कार्यक्रम ग्राह्य धरला जात नाही.

पोह्याचे अनेक प्रकार आहेत जसे की जाड पोहे,पातळ पोहे, भाजके पोहे,नायलॉन पोहे,दुधाचे पोहे,हातसडीचे पोहे ,दगडे पोहे, पटणीचे पोहे इ.

पोह्याच्या अनेक रेसिपीही प्रचलित आहेत.

१. साधे पोहे

२. कांदा पोहे

३. बटाटा पोहे,

४. मटार पोहे,

५. फ्लॉवर पोहे,

६. भरताच्या वांग्याचे पोहे,

७. दडपे पोहे,

८. कोळाचे पोहे,

९. आचारी पोहे,

१०. लावलेले पोहे,

११. दूध पोहे ,

१२. दही पोहे,

१३. ताकातले पोहे,

१४. पोपट पोहे,

१५. टोमॅटो पोहे,

१६. कांदा-बटाटा पोहे

१७. झटपट पोहे

१८. ओला हरबरा (सोलाणा) पोहे

१९. वांगी पोहे

२०. वाटाणा उसळीचे मसाला पोहे

पोहे आरोग्यालाही चांगले असतात. पोह्यामध्ये लोह असते. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी पोहे खाल्याने  त्यांना लोहाची कमतरता रहात नाही. पोह्यामध्ये फायबर असल्याने बद्धकोष्ट असणार्‍यांनी अवश्य नाश्ता म्हणून पोहे खाल्याने ती सदस्या दूर होते. पोहे साखरेचे नियंत्रणात मदत करतात, पोह्यात प्रोटिन्स व ग्ल्युटेन भरपूर असते.

काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी पोहे खाण्याच्या पद्धतीवरून बांग्लादेशी मजूरांना ओळखल्याचा दावाही केला होता. 

आज रात्री आम्ही भारताच्या वांग्याचे पोहे करणार आहोत व त्याची रेसिपी मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेन.

Friday, 4 June 2021

सकाळचा नाश्ता : गवार,बटाटा,मेथी,पालक,शेवग्याची पाने,केणाची पाने ,रताळ्याची पाने व शेपू या मिश्र भाज्यांचे पौष्टिक पराठे

 सकाळचा नाश्ता : गवार,बटाटा,मेथी,पालक,शेवग्याची पाने,केणाची पाने ,रताळ्याची पाने व शेपू या मिश्र भाज्यांचे पौष्टिक पराठे

साहित्य : गवार,बटाटा,मेथी,पालक,शेवग्याची पाने,केणाची पाने ,रताळ्याची पाने व शेपू या भाज्या,कणिक,बेसन पीठ,तेल ,मिरच्या,मीठ,साखर,हळद,हिंग,आलं-लसूण पेस्ट,धने-जिरे पावडर,तीळ
कृती : आपला नेहमीचा मिक्सर ताकाचा जार घ्या , त्याला आतिल बाजूने तेल लावा आणि जार मध्ये थोडेसे तेल घाला म्हणजे कणिक जारला आतून चिकटत नाही.
मग त्या जार मध्ये अर्धा जार भरेल एवढी कणिक (गव्हाचं पीठ) घाला.दोन चमचे बेसन पीठ घाला. गवार-बटाटा भाजी घाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, धना जीरा पावडर, मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारिक चिरलेली केणा ,पालक,मेथी, शेपू या पालेभाज्यांची पाने (इतर पालेभाज्या उदा. मायाळू,हादगा,मुळे ,मोहरी यांचीही बारीक चिरलेली पाने घातली तरी चालतील) , रताळ्यांची पाने , शेवग्याची पाने व सोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर यांचीही पाने बारीक चिरून टाका, वरून थोडे तीळ टाका.
आता अगदी थोडे थोडे पाणी घालत whipping mode वर मिक्सर फिरवत पांच-सहा मिनिटे पीठ मिक्स करायचे, सुरेख मऊ असे पीठ मळून तयार होते.
आता मिक्सरमधून पिठाचा गोळा बाहेर परतीत किवा तसरळ्यांत काढून घ्या व तेलाचा हात लावून परत मळून घ्या. पण पाणी अगदी थोडे थोडे घालायचे.
पीठ दहा मिनिटे मुरल्यावर लिंबा एव्हढे उंडे करून पोळपाटावर पराठे लाटून घ्या.
दुसरीकडे गॅसवर तवा तापत ठेवा. तवा चांगला तापला की त्यावर पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून काढा.
नाश्ता म्हणून खाराची मिरची,लोणचे ,लोणी किंवा दह्या सोबत खुसखुशीत , आरोग्यदायी आणि पौष्टिक पराठे सर्व्ह करा.
टीप : शेवटी मिक्सर च्या भांड्यात पाणी आणि भांडी धुण्याचा द्रवरूप साबण घालून एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे मिक्सर परत चकाचक...
May be an image of food
Like
Comment
Share

Thursday, 3 June 2021

उडीद डाळीचा हलवा (गोड शिरा)

 

उडीद डाळीचा हलवा (गोड शिरा)


 



साहित्य : एक वाटी उडीद डाळ,पाव वाटी मुगाची डाळ,दीड वाट्या  साजूक तूप, अडीच  वाट्या साखर (आवडीनुसार कमी-जास्त),एक छोटा चमचा प्रत्येकी जायफळ-वेलची पूड , १०-१५ बेदाणे,प्रत्येकी ५-६ काजू पाकळी,बदाम व पिस्ते यांचे काप, २-३ थेंब जिलबीचा खाद्य रंग.

कृती :  एका बाउलमध्ये उडीद डाळ+मुगाची डाळ रात्रभर  भिजत घालून ठेवा. सकाळी चाळणीवर ती डाळ उपसून घ्या व पाणी निथळून घेतल्यावर मिक्सरवर भरड (रवा) वाटून घ्या.

आता गॅसवर एका नॉन स्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यात हा   मिक्सरवर वाटलेला  भरड  डाळीचा रवा   घालून मध्यम आंचेवर एक सारखे परतत रहा म्हणजे डाळीच्या वाटलेल्या रव्याचा  लगदा तळाला चिकटणार नाही. परतत असतांना डाळीच्या रव्याचा  रंग पालटून तो गोल्डन ब्राऊन होऊन सगळीकडून तूप सुटायला  लागले की त्यात साखर घाला व परतणे चालूच ठेवा. साखर पुर्णपणे विरघळून डाळीशी एकजीव झाली की दोन-तीन थेंब जिलबीचा खाद्य रंग, वेलची व जायफळ पूड,बेदाणे व थोडेसे काजू,पिस्ते आणि बदामांचे काप घालून पांच मिनिटे परतून घ्या आणि पॅनवर झाकण ठेवून गॅस बंद करा.

सर्व्हिंग प्लेटमध्ये हलव्याच्या मुदी पाडून  घ्या आणि  त्या उडीद डाळीच्या हलव्या च्या मुदिंवर  वर थोडेसे काजू,पिस्ते आणि बदामांचे काप घालून गरमागरम हलवा  सर्व्ह करा.

 

Wednesday, 2 June 2021

कारल्याचे किसमूर (कोशिंबीर)

 आजच्या जेवणात डावीकडचे तोंडीलावणे म्हणून आम्ही केला आहे एक आगळा वेगळा कोशिंबीरीचा प्रकार ज्याचे नांव आहे कारल्याचे किसमूर (कोशिंबीर)

त्याचीच ही सचित्र रेसिपी मी आता येथे खास तुमच्याशी शेअर करत आहे.
कारल्याचं किसमूर (कोशिंबीर)
कारल्याचं किसमूर म्हणजेच गोव्याकडे केलीजाणारी कारल्याची कोशिंबीर (डावीकडचे तोंडीलावणं) आहे.
कारल्याचा एक अत्यंत वेगळाच आणि अगदी सोपा, झटपट होणारा पदार्थ आहे. एकदा जरूर करून बघाच.
साहित्य :
दोन मोठ्या कारल्यांचे मासाल्यात घोळवून व मुरवूत ठेऊन नंतर तळलेले (शॅलो फ्राय) काप
एक मध्यम कांदा बारीक चिरून
एक चमचाभर चिरलेला गूळ व साखर
अर्धा चमचा लाल तिखट
सुकी चिंच दोन बुटुके (पाणी न घालता) किंवा चार मोठे चमचे दही
दोन मोठे चमचे खवलेला नारळाचा चव
दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती :
१. कारल्याचे काप चिरून मसालात घोळवून व मुरवून घेऊन नंतर तेलात तळून घ्या . (तळलेले मसाला कारल्याचे काप दुकानात मिळतात ते वापरले तरी चालतील)
२. कारल्याचे मसाल्यात घोळवून व मुरवून घेऊन नंतर तळलेले काप मिक्सरवर पल्स मोड मध्ये फिरवून जाडसर भरड कूट करून घ्या.
३. एका बाऊलमध्ये मसाला कारल्याचे जाडसर कूट आणि बाकी वर सांगितलेले कोशिंबीरीस लागणारे सर्व साहित्य घालून चांगलं मिक्स करा.
४. चविष्ट किसमूर तयार आहे. ही कारल्याची कोशिंबीर / तोंडीलावणं, पोळी / भाकरी बरोबर म्हणून सर्व्ह करा.
असंच नुसतं खायलाही छान लागतं.
टीप : कारलं म्हटलं की लगेच बरेच जण नाक मुरडतात. पण माझ्यासारखे कारलं आवडीनं खाणारेही काही आहेत .
ज्यांना कारलं आवडत नाही त्यांना सुद्धा ही कोशिंबीर नक्की आवडेल.
एकदा कराच आणि अनुभवाने खात्री करून घ्याच.
Like
Comment
Share