Monday 16 November 2020

शून्यकचरा (Zero Garbage)

शून्यकचरा (Zero Garbage) ही संकल्पना म्हणजे काय याबाबत

" शून्य कचरा " ही संकल्पना म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपल्या रहात असलेल्या सभोवतीच्या परिसरात कचरा पडून राहू नये यासाठी आपणच आपल्या कचर्‍याची उगमस्थानीच योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची. गेल्या काही वर्षांमध्ये याबाबतची नागरिकांमधली सकारात्मक जाणीव व सजगता वाढत असल्याचे दिसून येत आहे. मोठय़ा मोठय़ा गृह संकुलांमधून कचर्‍याचं व्यवस्थापन ही मोठी गरज समोर येत आहे. ही गरज भागवायची असेल तर आधी प्रत्येक घर, कुटुंब आणि व्यक्ती कामाला लागायला हवी.

प्रत्येक पर्यावरणप्रेमी नागरिकाने आपणच निर्माण करत असलेल्या कचर्यााची जबाबदारी घेऊन आपले रहाते घर,घरासभोवतालचा संपूर्ण परिसर व आपले शहर कचरामुक्त करण्यात आपला खारीचा वाटा उचलावा.

दररोज घरात बनणार्‍या  कचर्‍याचं व्यवस्थापन करण्याआधी कचर्‍याचं  ऑडिट करा. म्हणजे तुमच्या घरांमधून कोणत्या प्रकारचा किती कचरा बाहेर जातो त्यातला किती ओला कचरा आहे? सुक्या कचर्‍याचा नेमका काय उपयोग करता येईल? या सर्वांचा अभ्यास करून जर योजना आखली तर शून्य कचरा अभियान यशस्वी करणं सहज शक्य होईल.

आपला परिसर स्वच्छ निरोगी करण्याकरता किमान आपल्या घरातून तरी शून्यकचरा बाहेर पडेल यासाठी स्वच्छेने निर्धारपूर्वक प्रयत्न करा.

घनकचरा स्वत:हून वाहून जात नसतो तर तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच र्मयादित राहत असले तरी आपल्या शहरातल्या, गावातल्या, आपण राहतो त्या आजूबाजूच्या परिसरातील न वापरातील सर्व जागा हळूहळू कचर्‍यानं व्यापल्या जात आहे. या फोफावत जाणार्‍या  कचर्‍यासाठी फक्त कायदे व नियम करून त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे. आपल्या शहरातला कचरा ही फक्त एकट्या नगरपालिकेची किंवा सरकारची जबाबदारी नसून माझ्या घरच्या कचर्‍या ला  मीच जबाबदार आहे हे ओळखून व स्वीकारून प्रत्येकानं कामाला लागणं हीच खरी काळाची गरज आहे. त्यासाठी ‘शून्य कचरा’ ही संकल्पना घरा-घरातून राबवली गेली पाहिजे.

आपण जर घराघरातला कचरा जागेवरच वेगवेगळा केला तर घरच्याघरी त्यातील ओल्या कचर्‍याचा सुयोग्य वापर करून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्ट किंवा गांडूळ खत,विविध प्रकारचे एंजाईम्स निर्मितीचे पर्याय हाती येतात.परंतु हे करण्यासाठी लागते ती मानसिक सकारात्मकता , सजगता आणि पुढाकार. यासाठी लागेल ते मार्गदर्शन विनामोबदला द्यायला मी सदैव अगदी एका पायावर तयार आहे.

या मोहिमेत छोटयांचा सक्रिय सहभाग जास्त उत्साहवर्धक ठरू शकतो. या शून्य कचरा संकल्पनेमुळे त्यांना सायन्स प्रोजेक्टसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. लहान मुले व तरुणांची पथनाट्ये सादर करून समाजात जनजागृती निर्माण करता येईल. सेंद्रिय खतामुळे घराच्या कुंडय़ांमधील, परसातील फुलझाडे- फळझाडे बहरू लागल्यामुळे ज्येष्ठदेखील खूश होतील.

घरा-घरातून ,सहकारी सोसायट्यांमधून डम्प यार्डला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणणे हा या अभियानाचा अंतिम हेतू आहे.

यासाठी सर्वात प्रथम घरातील रोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करा

१) स्वयंपाकघरातील ओला कचरा

यामध्ये भाज्या व फळांची देठे ,साली,टरफले , चहाचा चोथा, शिळे अथवा खराब झालेले अन्न, अंड्याची टरफले , निर्माल्य इत्यादी त्यापासून घरी बागेकरता स्वत: घरच्या घरीच कंपोस्ट खत तयार करा

२) रिसायकल होऊ शकणारा कचरा

प्लास्टिक, थर्मोकॉल, धातू , कांच, पेपर ,जुने कपडे ,बॅग ,चप्पल बूट ,तुत ब्रश,कंगवे,कमरेचे बेल्ट्स,लेडीज पर्स

रिसायकल होणारा कचरा म्हणजे प्लास्टिक डबे, बाटल्या तसेच पेपर रद्दी पुट्ठे इत्यादी रिसायकल करण्याकरता जवळच्या रद्दी भांगार वाल्यास द्या

इतर रिसायकल होणारा कचरा रिसायकल करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्त करा

पातळ प्लास्टिक पिशव्या , थर्मोकॉल, जुने कपडे बॅग चप्पल या गोष्टी काही सामाजिक कार्य करणार्याा सेवाभावी संस्थांमार्फत गोळा करून त्यातील प्लास्टिक जेजुरी येथे पॉली फ्युएल तयार करण्यास, थर्मोकॉल रिसायकल करण्यास तसेच जुने कपडे बॅग चप्पल 'गुंज' नावाच्या संस्थेस दिले जातात

३) सॅनिटरी आणि मेडिकल वेस्ट

सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे व वृद्धांचे डायपर, इंजेक्शन , बँडेज, रेझर्स अशा गोष्टी लाल ठिपका लावून महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचार्यांकडे सुपूर्त करा

४) इलेक्ट्रॉनिक वेस्ट

जुने खराब झालेले बॅटरी , सेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीडी ,काम्प्युटरचे सुटे भाग इत्यादी तुम्ही collection ड्राईव्ह मध्ये रिसायकल करण्या करता देऊ शकता

3R चा मंत्र स्वीकारा व अंगिकारा

Refuse

Reuse

Recycle

वरील मंत्र अंगिकारले तर मुळात घरात कचरा होणारच नाही

१) बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन बाहेर पडा प्लास्टिक पिशवी कॅरी बॅग ला नकार द्या

२) प्लास्टिक पूर्णपणे टाळणे जरी कठीण असले तरी काही गोष्टी एकदा वापरून टाकून न देता परत परत वापरा शेवटी झाडे लावण्याकरता किंवा सुशोभीकरणा करता वापर करा अन्यथा रिसायकल करा

३) थर्मोकॉल ला वेगळे ऑप्शन्स शोधा गणपती करता इको फ्रेंडली सजावट, कार्यक्रमांना थर्मोकॉल च्या ऐवजी पत्रावळी, सुपारी किंवा उसाच्या चिपाड पासून बनलेले किंवा स्टील चे ताट वाट्या वापरा

४) प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडूच्या मातीचा किंवा गोमय गणेश मूर्ती चा पर्याय स्वीकारा

५) आजकाल गलेलठ्ठ पगार आणि उच्च रहाणीमानामुळे पाश्च्यात्यांप्रमाणे 'use and throw' ही मनोवृत्ती व प्रवृत्ती/संस्कृती वाढीस लागल्याने कपडे बॅग चप्पल मोबाइल फोन अशा वस्तू थोडे दिवस वापरून फेकून द्यायची सवय लागली आहे त्या शक्य तितक्या वापरा नंतर कचरा म्हणून फेकून न देता गरजू संस्थाना दान करा.

कचराव्यवस्थापान क्षेत्रात काम करणार्‍या अभ्यासगटाला मिळालेल्या आकडेवारीवरुन असे निदर्शनास आले आहे की रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास ,घरात निर्माण होणार्‍या कचर्‍यातील ७०% कचरा हा स्वयंपाक घरातील ओला कचराच असतो तर २९% प्लास्टिक च्या पिशव्या बाटल्या असतात आणि फक्त १% कचरा हा इतर कचरा असतो म्हणजे जर ओल्या कचऱ्या पासून कंपोस्टखत केले आणि प्लास्टिकचा वापर निर्धारपूर्वक कमी केला किंवा रिसायकल करता गोळा करून दिला तर आपण शून्य कचरा हे उद्दीष्ट आपण सहजपणे साधू शकतो.

प्रमोद तांबे , पुणे - दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३

कर्णपिशाच्च (मो)८४४६३५३८०५ 

No comments:

Post a Comment