गेल्या वर्षी
तुमच्या घरचे " निर्माल्य आणून द्या व तीन महिन्यांनी काळे सोने म्हणजेच
सुगंधी कंपोस्ट घेऊन
जा" असे आवाहन करणार्या आम्हा उभयतांच्या पोस्टस् GMVB
फेसबुक
समुहा व्यतिरिक्त
इतर अनेक व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्याने, अल्पावधीतच आमच्या
आवाहनाला भाविकांचा व पर्यावरणप्रेमींचा इतका प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळला की २-३ दिवसातच आमच्याकडे कंपोस्ट साठी उपलब्ध असलेले सगळे
लोखंडी बॅरेल्स,थर्मोकोल
बॉक्सेस,व्हर्मी-कंपोस्ट
बीन्स हे निर्माल्याने तुडुंब भरून गेले . त्यामुळे आम्ही पोट-माळ्याच्या
एका कोपर्यात अगदी उघड्यावर कंपोस्ट करायला सुरुवात केली.
गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यावर एका दिवसात सोळा
लोकांनी आपआपल्या घरचे निर्माल्य आणून दिले.
असा उदंड प्रतिसाद देणार्या
सगळ्या पर्यावरांप्रेमी भाविकांचे आम्ही शतश: आभार.
फक्त .....
आत्तापर्यंत आम्हाला आलेल्या
क्लेशकारक व मनाला व्यथित व उद्विग्न करणार्या अनुभवातून व जे सष्टपणे जाणवले
त्यातून मला येथे ,निर्माल्य-दान
करणार्या भाविक भक्तांना नम्रपणे एवढेच सुचवावेसे वाटते की,भाविकांनी आपली श्रद्धा
व पर्यावरण या दोन्हीची सुयोग्य पद्धतीने सांगड घालायला हवी.
विचार करा आपण इतकं केलं, अजुन थोडा विचार करून
आपले सण समारंभ पर्यावरणपूरक साजरे केले तर त्या इतकं दुसरं समाधान नाही, आनंद नाही.
वापरा आणि अविरत वापरत रहा ही
आपली श्रेष्ठ भारतीय हिंदू संस्कृती सोडून आपण वापरा व फेकून द्या (use
and throw) या
पाश्चात्य चंगळ व भोगवादी संस्कृतीचे अंधानुकरण करतोय जे पर्यावरणाला गंभीररित्या
बाधक ठरतेय.
तेंव्हा श्रद्धाळू भविकांनो, तेंव्हा आता तरी डोळे
उघडा यासाठी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो को, किमान यापुढे तरी
निर्माल्य गोळा करताना कृपया खालील काळजी घ्या...
१.श्रावणांतील सत्यनारायणाच्या
पूजेत किंवा श्रींच्या मूर्ती समोर ठेवलेली डाळिंब, सीताफळ, सफरचंद, संत्री, मोसंबी, चिक्कू,अंजीर,केळी यांच्या सारखी
महागडी फळे उत्तरपूजा होताच निर्माल्यात बिनदिक्कत कचरा म्हणून टाकून न देता
खिरापत किंवा प्रसाद म्हणून भक्तांना वाटून टाकावीत किंवा अनाथ मुलांना खाऊ म्हणून
द्यावीत.
२. महा शिवरात्र,हरतालिका,बैलपोळा किंवा नागपंचमी
या सणांच्या वेळी ज्यांचे आपण मोठ्या श्रद्धेने पूजन केले त्याच देवतांच्या मूर्ती
किंवा श्रावणमासांत घरोघरी पारंपारिक श्रद्धेने आवर्जून पुजिले जाणारे जिवती चे
चित्र उत्तर पूजा होताच निर्माल्यासह कचर्यात टाकून नास्तिकही करणार नाहीत अशी
अवहेलना किंवा घोर विटंबना करू नका.
(बर्याच ठिकाणी विसर्जनानंतर श्री
गणेश मूर्तींचीही अशीच घोर विटंबना होत असल्याचे आपण वर्तमानपत्रातील बातम्यात
वाचले असेलचव भग्न व छिन्न-विच्छिन्न झालेल्या गणेश मुर्तींचे फोटोही पाहीलेच
असतील)
३.श्रींचा मखराच्या व अन्य
सजावटीचे काचेचे ,नकली
मोत्यांचे दाग-दागिने ,कलाबूतीचे,थर्मोकोलचे,प्लास्टिकचे
सजावट-साहित्य वेगळे करावे,ते
निर्माल्यात मिसळू नये.
४. कापराच्या वड्या/हळदी, कुंकू /हळकुंड/अख्खे
बदाम/उदबत्तीचे रिकामे पुडे किंवा अर्धवट जाळलेल्या उदबत्त्या व तुपाच्या
वाती/कापसाची वस्त्रे/ जानवी जोड/ रिकाम्या आगपेटया,मिठाईचे कागदी किंवा
पुठ्ठ्याचे बॉक्स, हरतालिकेला
वाहिलेल्या काचेच्या बांगड्या ,गुलबासारख्ता काटेरी वनस्पति/प्रसादाचे अविघटनशील
द्रोण/प्लेट्स अशा वस्तु निर्माल्यातून वेगळ्या करवाव्यात.(कारण त्यांचे कामोपोस्ट
होऊ शकत नाही,उलट
काचेच्या फुटक्या बांगडीमुळे माझ्यासारख्या कंपोस्ट हाताळणार्याला जखम होण्याची
शक्यताच जास्त)
५. देवाला पंचपक्वांनांचा नैवेद्य
दाखवावलेले पात्र निर्माल्यात टाकून अन्न देवतेचा अपमान करू नये.
६. शक्यतो फक्त फुले व हार यांचे
निर्माल्य सुकवून एकच कागदी पिशवीत जमा करा.
७. रोज गोळा होणारे निर्माल्य
अत्यंत पातळ प्लास्टिक कॅरी बॅग्जमध्ये भरून गाठ मारून साठवू नका. (पातळ कॅरी
बॅग्जमध्ये भरून गाठ मारून ठेवलयास निर्माल्य सडल्याने काळे पडून त्याला दुर्गंधी
येऊ लागते व त्यात अपायकारक असे विषारी वायु तयार होतात)
८. कोणत्याही प्रकारचा प्रसाद मग
ती डाळिंब,सीताफळ,सफरचंद,संत्री,मोसंबी यांच्या सारखी
महागडी फळे असोत अथवा खारका, बदाम,काजू यासारखा सुकामेवा
असो किंवा पेढे,बर्फी,सुके गुलाबजाम,म्हैसूरपाक यासारखे
मिठाईचे पदार्थ असोत वा खडीसाखर गूळ,खोबरे इ.असो द्या ,या वस्तु कोणालातरी
प्रसाद म्हणून देऊन टाका , कचऱ्यात
जाण्यापेक्षा कुणाच्या तरी मुखी लागेल, शेवटी ते अन्न आहे त्याची अशी
विल्हेवाट लावणे तुम्हालातरी पटते का ?
९. पूजेमध्ये तांब्याच्या कलशावर
/ घटावर जे श्रीफळ ठेवतात तेही शेवटच्या दिवशी उत्तरपूजा झाली की फोडून प्रसाद
म्हणून वाटून टाकावा.
१०. देवापुढे केळीच्या पानावर
महाप्रसाद म्हणून जो नैवेद्य ठेवतात ते पान एखाद्या गरजवंतास द्यावे किंवा
प्रसाद म्हणून यजमानांनी ग्रहण करावे. ते केळीचे पान अन्नासह निर्माल्यामध्ये
टाकून अन्नदेवतेचा असा अवमान किंवा माजुरडेपणा करु नये.
११. निर्माल्यातली शक्य तेव्हढी
फुले ही आपल्या घरी बाग असेल तर प्रत्येक कुंडीत थोडी थोडी टाकलीत तरी काही
काळाने त्याचे खत बनेल.
१२. थोडा विचार करून जमा होणाऱ्या
निर्माल्यापैकी काही गोष्टींचा घरच्या घरी विनियोग केला तर कमीत कमी निर्माल्य, सुस्थितीत कंपोस्ट साठी
देता येऊ शकेल .
भारतीय उत्सव, सण हे आपल्या हिंदू
संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत, फक्त असे उत्सव-सण-समारंभ साजरे
करताना आपण त्यांचं स्वरूप काळानुसार थोडंफार कसे बदलता येईल जेणे करून आपण आपली
परंपराही जपू व पर्यावरणाचीही हानी होणार नाही हे पहायला हवं.
यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा
किंवा अव्हेरण्याचा हेतू नाही तरीही यदा-कदाचित नकळत म्या पामराकडुन असा प्रमाद
घडला असेलच तर श्रीगजाननाने तो आपल्या विशाल उदरात घ्यावा आणि समस्त भक्त-गणांना
आता तरी सद्बुद्धी देऊन बदलत्या वास्तवाचे भान राखत सण साजरे करण्याची सुबुद्धी द्यावी
हीच त्या गणनायकाच्या चरणी विनम्र प्रार्थना.
याबाबत आपण आपले विचार
आमच्यापर्यंत पोहचवू शकता.
प्रमोद
तांबे , पुणे
- दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ कर्णपिशाच्च (मो) ८४४६३ ५३८०५
No comments:
Post a Comment