Monday 16 November 2020

 

आमचे पर्यावरण रक्षक व आर्थिक बचतीचे मनाला आनंद देणारे विविध छंद

 

घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प :

सन २००६ पासून कौटुंबिक (व्यक्तीगत)पातळीवर आमच्या १४१५ सदाशिव पेठेत असलेल्या स्वत:च्या मालकीच्या ८० वर्षाच्या जुन्या वाड्यात स्वयंपाकघरामध्ये रोज निर्माण होणार्‍या विघटनशील घन कचर्‍याचे व्यवस्थापन करणारे खालील तीन उपक्रम आम्ही उभयतांनी चालू केले आहेत.

 

१. कचर्‍यातून नंदनवन :

 

आम्ही चालू केलेला पहिला उपक्रम म्हणजे आमच्या घरात रोजच्यारोज निर्माण होणार्‍या सर्व प्रकारच्या कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरणकरून त्यातील ओला कचरा जागेवरच जिरवून आम्ही नोव्हेंबर २००९ पासून आमच्या जुन्या घराच्या १४ फूट x १०फूट आकाराच्या छोट्याशा गच्चीत, माती विरहित जैविक बगीच्याचे नंदनवन फुलवले असून ओल्या कचर्‍यापासून या बगीच्यात आत्तापर्यंत आम्ही विविध प्रकारची १२५ हून जास्त -फळझाडे ,भाजीपाला , अनेक जातींची फुलझाडे आणि औषधी वनस्पती लावली आहेत व त्याचे नियमित उत्पादनही घेत आहोत .

 






२ . कचर्‍यातून बायो-गॅस निर्मिती:





 

आम्ही चालू केलेला आणखी एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजच्यारोज निर्माण होणारा सर्व प्रकारच्या ओल्या कचर्‍याचा पुर्नवापर करून आम्ही अतिशय हौसेने सन २००६पासून आमच्या ८० वर्षांच्या जुन्या वाड्याच्या गच्चीवर बायो-गॅस निर्मिती संयंत्राची उभारणी केली असून त्यातून निर्माण होणार्‍या मिथेन गॅसचा वापर सुरू केल्यापासून पासून आमच्या L.P.G. (बरशेन)गॅस सिलिंडरच्या वापरात सरासरी २५ ते ३०  दिवसांची बचत व्हायला  लागली आहे, त्याचप्रमाणे गॅस निर्मिती सुरू झाल्यावर संयंत्रातून उत्सर्जीत होणारे अतिरिक्त सांडपाणीसुध्दा बायो-कल्चर बागेसाठी खत म्हणून वापरतो.

या प्रकल्पासाठी माझ्या गच्चीवरील एका कोपर्‍यातील ५’ x जागा लागली. या प्रकल्पामुळे सध्या दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ लागली आहे . सुरवातीला हा प्रकल्प उभारीसाठी रु. ७५००/- एतका खर्च आला.

  पहिल्या तीन वर्षातच संयंत्र उभारणीचा संपूर्ण खर्च भरून निघाला आणि त्यानंतर म्हणजे २००९ पासून गेली ११ वर्षे आम्ही दरमहा ५५०/- रुपयांची बचत करत आहोत. या संयंत्राचा  देखभाल खर्च शून्य आहे.

 

३. गांडूळ व कंपोस्ट खत प्रकल्प :

 















सन २०१० मध्ये आम्ही गांडूळ खत निर्मितीस प्रारंभ केला त्यासाठी २८०० रुपयांची गांडूळ खत निर्मिती करणारी पी.व्ही. सी ची पेटी (Vermi Composting Bin) खरेदी केली.





त्या पेटीत विघटन होऊ शकेल असा स्वयंपाक घरात निर्माण होणारा सर्व प्रकारचा ओला कचरा रिचवून त्यापासून गांडूळांच्या सहाय्याने कचर्‍याचे जैविक विघटन होऊन खताची निर्मिती होते.

सुरवातीस आलेला खर्च रु२८००/-

आजवर या प्रकल्पातून एक पै चाही खर्च न करता ५०० किलोपेक्षा जास्त खत निर्मिती झाली असून रु. २५ या सध्याच्या बाजारभावाने आम्हाला सुमारे रु. १२,५००/- एव्हढे उत्पन्न मिळू शकले असते.

नुकतीच आम्ही आधुनिक पद्धतीची षटकोनी आकाराची वर्मी बिन घेतली आहे.



 

४. पाणी व्यवस्थापन :

ऑटो लेव्हल कंट्रोलर :

 


आमच्या जुन्या पद्धतीच्या तीन मजली वाड्यातील रहिवाश्यासाठी पुणे महानगर पालिकेने पाण्याचे एकच १/२ " कनेक्शन दिले असून, पाण्याचे साठवण करण्यासाठी तळ मजल्यावर एक ४००० लिटर्स क्षमतेची पाण्याची टाकी (Ground Storage Reservoir) बांधलेली आहे. त्या टाकीवर ०.५ हॉर्स पॉवर क्षमतेचा विद्युत पंप बसवलेला आहे व तळ मजल्यावरील टाकीत साठवलेले पाणी या पंपाद्वारे तिसर्‍या मजल्याच्या वर गच्चीत बसवलेल्या दोन टाक्यांत साठवले जाते व त्यातून वाड्यातील सर्व रहिवाश्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्याचे नियंत्रण करण्यासाठी २० वर्षांपूर्वी आम्ही ऑटो लेव्हल कंट्रोलरचा वापर सुरू केला होता व आजही तो चालू आहे. त्याच्या वापरामुळे गेल्या २० वर्षात एकदाही टाक्या ओव्हरफ्लो न झाल्याने पाण्याची नासाडी थांबल्याने पाण्याची बचत होते. स्वयंपाकघरात अ‍ॅक्वा गार्ड फिल्टर्स बसवून घेतला असून पिण्यासाठी सुद्धा आम्ही हे टाकीतील पाणीच वापरतो.

 

रेन वॉटर हारवेस्टिंग :

 

संपूर्ण वाड्याच्या गच्ची व छपरावरील पावसाचे पाणी साठवून एका बोअर द्वारे त्याचे जमिनी पुनर्भरण कराण्याची आम्ही निश्चित केले असून त्यासाठी एका एजन्सीला काम दिले आहे व येत्या पावसाळ्यापूर्वी ते काम पूर्ण हाऊस २०२१ च्या पावसाळ्यात या उपक्रमाद्वारे पाण्याचे पुनर्भरण केले जाईल.

५. वीज व्यवस्थापन :

 

सौर वॉटर हिटर :

 



विजेची राष्ट्रीय बचत व्हावी व पर्यावरणास हातभार लागावा म्हणून आम्ही आमच्या घराचा गच्चीवर २४ जानेवारी २००१ ला सौर वॉटर हिटर बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून आजतागायत आम्हाला २४x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. सौर वॉटर हिटर बसवण्यासाठी प्लंबिंग कामासह एकूण खर्च रुपये २३,५०५/-(दरमहाची बॉयलर व गिझर वीज बचत किमान ५००/- पेक्षा जास्त होत आहे) (हे सयंत्र बसविण्यासाठी गच्चीवर लागणारी जागा १०' x ') गेल्या १३ वर्षात फक्त एकदा फ्लेक्सिबल होज पाइप बदलावा लागला त्यासाठी २५० रुपये खर्च आला. बाकी मेंटेनन्स शून्य. फक्त महिन्यातून एकदा काच स्वच्छ करावी लागते.

 

या व्यतिक्त आमच्याकडे

१.Racold कंपनीचा २५ लिटर्स चा ईलेक्ट्रिक वाँटर हिटर (१९९० पासून अद्यापपर्यंत ),  आणि

 


३. दीप कंपनीचा गँस गिझर (२००८ पासून अद्यापपर्यंत ) वापरत आहोत.





सोलर वाँटर हिटरचा खर्च पुर्णपणे वसूल झाला आहे,त्यामुळे पावसाळ्यातील काही काळ सोडला तर २४ तास केंव्हाही गरम पाणी फुकटात मिळते,मेंटेनस खर्च जवळजवळ शून्य आहे.तीनही उपकरणे आजही सुस्थितीत असून गरम पाण्याचा अजिबात त्रास नाही.

 

या तीनही यंत्रणा जोडणे अशक्य आहे असे जवळपास सर्वच प्लंबर नी सांगितल्यावर मी मुळात सिव्हिल इंजिनीअर असल्याने हे आव्हान म्हणून स्वीकारले व माझ्या देखरेखीखाली या यंत्रणा जोडून घेतल्या आहेत.

त्यामुळे गरम पाण्यासाठी या वरील  तीन पैकी मला जो हवा असेल तो पर्याय मी वापरू शकतो.

 

सौर कुकर :



१९८० पासून आम्ही गेली ४० वर्षे सौर कुकरचा वापर करतो. यामुळेही गॅस खर्चात बचत होते शिवाय हा सौर कुकर पर्यावरणास पूरक असल्याने त्याचा वापर केल्याने आपण पर्‍यावरणास मदत करत आहोत याचे मानसिक समाधानही मिळते ते वेगळेच.

जुना सौर कुकर गंजून व आरसा फुटल्यामुळे खराब होऊन बाद झाल्यानंतरचा (मध्यंतरीचा) काही काळ सोडला तर आम्ही उभयता गेली ४०वर्षे सौर कुकरचा वापर करत आहोत. एल.पी.जी.गॅस सारख्या राष्ट्रीय साधन संपत्तीची बचत व्हावी व पर्यावरणास पूरक अशा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास हातभार लागावा हा विचार मनी धरून आम्ही उभयतांनी दिनांक ०७ नोव्हेंबर २००९ नवा सौर कुकर खरेदी केला व तेंव्हापासून पासून घरचे रोजचे अन्न (जेवण) शिजवण्यासाठी सौर कुकरचा पुन:श्च वापर सुरू केला आहे. त्यामुळे इंधनाची बचत होते व प्रदूषण कमी होण्यास हातभारही लागतो. ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातातच पण वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या, बटाटे , चिकन,मटण,पुरण सुद्धा उत्तम शिजतेच एतकेच नव्हे तर ह्या कुकरमध्ये दूधाची बासुंदी सुद्धा न करपता होते. (खर्च २,६००/-) (लागणारी जागा ५' x ') या कुकरसाठी बाहेरून काळा रंग दिलेले डबे मिळतात, पण ते न वापरता घरातील साधे नेहमीचे स्टीलचे डबे त्यांना बाहेरून काळा रंग देऊन वापरले तरी चालते. याच्या आरशावर पडलेला सूर्य प्रकाश परावर्तीत होऊन काचेतून आत ठेवलेल्या अन्नाच्या डब्यावर पडल्यावर आतील अन्न शिजते. त्यासाठी यातील आरसा दक्षिणेकडे करावा लागतो व त्याचा कोण बदलून असा ठेवावा की ऊन परावर्तित होऊन आत ठेवलेल्या डब्यावर पडेल.

 

सौर ऊर्जा निर्मिती (सोलर एनर्जी) :

 



ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या चळवळीत , पर्यावरणास पूरक अशा साधनसंपत्तीचा जास्तीत वापर करून आपण आपला खारीचा वाटा म्हणून हातभार लावावा व विजेची राष्ट्रीय बचत व्हावी केवळ या बहुउद्देशानेच मी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत म्हणून ओळख असलेल्या सौर ऊर्जा निर्मिती चा वापर करायचे ठरवले व त्यासाठी आम्ही आमच्या जुन्या घराच्या छतावर (वाड्याच्या गच्चीवर) दोन ८० वॅट्ची सौर निर्मिती पँनेल्स आणि माळ्यामध्ये एक १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सची बॅटरी व एक इन्व्हर्टर बसवून घेतला असून त्यापासून १ जानेवारी २०११ पासून घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर दिवाणखान्यातील १८ वॅटची एक एल.ई.डी ची ट्यूब (जिचा प्रकाश नेहमीच्या ४० वॅटच्या फ्लूरोसंट ट्यूब एव्हढा मिळतो) ,स्वयंपाकघरातील १८ वॅटची एक एल.ई.डी ची ट्यूब , जिन्यातील ९ वॅटचे एल.ई.डी. .चे चार दिवे (ज्यांचा प्रकाश नेहमीच्या ६० वॅटच्या ग्लोब एव्हढा पडतो), व गच्चीवरील एक ९ वॅटचा दिवा असे घरातील सर्व दिवे आता पुर्णपणे सौर उर्जेवरच चालतात. साधारणपणे सायंकाळी ६.३० ते रात्री १० पर्यन्त (३.५० तास) व पहाटे ५.०० ते ६.३० (१.५० तास) असे एकूण ५ तास ही सौर ऊर्जा पुरते. माझ्या एम.एस.ई.बी. वीज कंपनीच्या मासिक बिलात दरमहा सुमारे १०० रुपयांची बचत होऊ लागली आहे. हा संच (दोन ८० वॅट्ची सौर निर्मिती पँनेल्स + एक १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सची बॅटरी व एक इन्व्हर्टर + स्वतंत्र वायरिंगसह दोन ट्यूब फिटिंग व एल.ई.डी.चे ९ वॅटचे चार दिवे) उभारणीसाठी मला एकूण ६०,००० रुपये एव्हढा खर्च आला होता व सर्व काम १० दिवसात पूर्ण झाले. (विशेष टीप: वरील सर्व ठिकाणचे पूर्वी असलेले व एम.एस .ई. बी. च्या वीजे वर चालणारे ट्यूब किंवा दिवे हे तसेच असून जरूर असेल तेंव्हा मी ते वापरूही शकतो, त्याखेरीज टी.व्ही., पंखे, फ्रीज, मायक्रो, इस्त्री, मिक्सर, वॉशिंग मशीन व इतर विद्युत उपकरणे ही सर्व एम.एस.ई.बी. च्या विजेवर चालतात)

गच्चीवर उभारलेल्या दोन ८० वॅट्ची सौर निर्मिती पँनेल्ससाठी ५’ x जागा व माळ्यावर एक १८० वॅट्ची बॅटरी व एक इन्व्हर्टर बसविण्यासाठी ३’ x जागा लागली. १ जानेवारी २०११ ला प्रत्यक्ष सौर वीजेचा वापर सुरू केल्यापासून आजपावेतो मला फक्त १८० वॅट्ची सिरॅमिक सेल्सच्या बॅटरीमध्ये महिन्यातून एकदा डिस्टील वॉटर (५० मी.ली.) भरावे लागते. या खेरीज एक पैचाही खर्च केलेला नाही. 

  

LED दिव्यांचा वापर:

 


गेल्या ५ पूर्वीवर्षांपासून आमच्या घरातील सर्व खोल्यातील व स्वच्छतागृहातील तसेच आमच्या वाड्यातील सार्वजनिक जीने,चौक,स्वच्छतागृह,माळा व गच्ची ई) जागी आम्ही. L.E.D.) चे दिवे (ट्यूब्ज व बल्ब्ज) बसवले आहेत. त्यामुळे विजेची बचत होते.

रुफ टॉप सोलर सिस्टिम :











कार्बन उत्सर्जन न होऊ देता वीज निर्मिती करून पर्यावरणास आपला हातभार लागावा या हेतूने आम्ही जुलै २०१९ मध्ये आमच्या संपूर्ण तीन मजली वाड्यासाठी 5 Kw क्षमतेची रुफ टॉप सोलर सिस्टिम म्हणजेच ड्युएल मीटर ग्रिड सिस्टिम कार्यान्वित केली आहे. यासाठी आम्हाला एकूण रु. ३,७५,०००/- एव्हढा खर्च आला. ही सिस्टिम बसवण्यापूर्वी आम्हाला संपूर्ण तीन मजली वाड्याचे (प्रत्येक मजल्यासाठी स्वतंत्र वीज मीटर होते) एकत्रित वीज बिल दरमहा रु. ७,००० ते ८,००० /- येत असे. आणि आता ही सिस्टिम चालू झाल्यावर गेल्या तीन महिन्यापासून रु.‘o’ झीरो (शून्य) बिल येत आहे.

 

बचतीचा आणखी एक उपक्रम :

 

घर घंटी (पिठाची गिरणी):

 


याखेरीज आमच्या घरी गेल्या १९९८ पासून म्हणजेच गेल्या २२ वर्षापासून नटराजची घर-घंटी (पिठाची गिरणी)वापरत आहोत , त्यामुळे अतिशय अल्प खर्चात आम्हाला हवे तेंव्हा निर्भेळ ताजे पीठ मिळते. आणि खर्चात बचतही होते ते वेगळेच. या गिरणीला आम्हाला १९९८ मध्ये रु. १३,०००/- खर्च आला होता.

No comments:

Post a Comment