Search This Blog

Saturday, 31 July 2021

काकडीचं लोणचं (नाकारडं) : प्रकार २

 काकडीचं लोणचं (नाकारडं) : प्रकार २





सोपे सोपे पण चविष्ट
करायला ही नाही क्लिष्ट
रेसिपी
जराशी मोठी काकडी घ्यायची. त्याचे साल काढून चौकोनी तुकडे करायचे.
लाल मोहरी, मिरची पाण्यात वाटायची. फेसून घ्यायची.
तेल हिंग मोहरी जिरं याची फोडणी गार करून घालायची. चवीनुसार मीठ.
खायला घेताना हवं असलं तर दही घालून घ्यायचं अप्रतिम टेस्ट

Friday, 30 July 2021

खास मधुमेहीं साठी पौष्टिक साबुदाणा खिचडी

 

खास मधुमेहीं साठी पौष्टिक साबुदाणा खिचडी

 


अशी खिचडी एकदा तरी करून बघाच.

फारच चविष्ट लागते.

साहित्य. पाऊण वाटी साबुदाणा,  तांबडा भोपळा,( काशीफळ /डांगर) एक खिरा काकडी,दोन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,शेंगदाण्याचेकूट, चवीप्रमाणे मीठ ,साखर चविपुरती थोडीशीच,

कृती : सर्वात प्रथम एका परातीत साबूदाणा ,शेंगदाण्याचे कूट,मीठ,साखर  एकत्र करून चांगल  मिक्स (मॅरीनेट) करून  मुरत ठेवा.

आता  एक उकडलेला बटाटा, तांबडा भोपळा आणि काकडी  यांच्या फोडी करून ठेवा. मिरच्या पोट फाडून बारीक चिरून तुकडे करा. (साबुदाण्याच्या दिडपट बटाटा,काकडी आणि भोपळ्यांचा  कीस हवा)

कृति : गॅसवर एका पॅन मध्ये  साजूक तूप तापवा, तूप  चांगले तापल्यावर मग त्यात भरपूर जिर फोडणीस टाका. जीरं चांगल खमंग तळा,खिचडीला जिऱ्याचा छान अरोमा लागला पाहीजे. मग त्यात बटाटा, काकडी, भोपळ्याचा फोडी  , हिरव्या मिरच्यांचे तुकडे   कोथींबीर टाकून  मस्त परतून घेऊन झाकण ठेवा. सगळे छान शिजू दे.

आता झाकण काढा साबूदाणा ,शेंगदाण्याचे कूट,मीठ,साखर मिक्स केलेलं सगळं त्यात टाका. सगळ छान एकत्रित परतवा.झाकण ठेवा. छान सगळ एकजीव आणि मिळून आले की झाकण काढा.आता झाकण न ठेवता परत एक वाफ आणा.

आता मस्त डायबेटीस खिचडी तय्यार.

तळटीप :  ती शिजलेली काकडी आणि भोपळ्याच्या फोडी अशा काही मस्त लागतात. तो एकत्रित अरोमा आपल्या टिपीकल खिचडीपेक्षा मस्त लागतो!!

करुन बघा , खाऊ घाला खा ,  आणि स्वस्थ राहा  मस्त रहा , चुस्त रहा !

Tuesday, 27 July 2021

खमण ढोकळा हलका व जाळीदार होण्यासाठी हे करून पहा

 



खमण ढोकळा हलका व जाळीदार होण्यासाठी हे करून पहा :

खमण ढोकळा करतेवेळी एक वाटी बेसन पिठात एक वाटी आंबट ताक घालून चांगले भिजवावे गुठळ्या मोडून टाकाव्यात व रात्रभर भिजत ठेवावे सकाळी छान आंबून येते . तसेच त्यात मिठा ऐवजी  थोडी साखर घालून पीठ रात्रभर ठेवलं तर जास्त चांगलं ferment होतं असे  एका food  technology शिकवणाऱ्या मित्रा  कडून मी शिकलो. सकाळी Ferment झालेल्या पिठात चविसाठी थोडेसे  मिठ व थोडं तेल टाकून ,नेहमीप्रमाणे ढोकळा करावा,२० मिनीटांत  उत्तम हलका व जाळीदार ढोकळा होईल.

 

 

Sunday, 25 July 2021

घडीच्या पोळ्या

 घडीच्या पोळ्या महिनाभर टिकण्यासाठी गृहिणींना खास टीप :

सगळ्या पोळ्या एकदम लाटून झाल्यावर नंतर अर्धाच भाजुन घ्याव्यात .थंड झाल्यावर प्रत्येक पोळी बटरपेपर मध्ये घालुन सगळ्या झिपलाँग पिशवीत भरून डिप फ्रीजमध्ये ठेवाव्यात .
पोळ्या व्यवस्थित डिप फ्रिज केल्यातर छानच टिकतात . लागतील तेवढ्याच फ्रीजमधून बाहेर काढाव्यात आणि १५ मिनिटांनी तव्यावर दोन्ही बाजूंनी छान भाजुन घ्याव्यात .मस्तच होतात.
या साठी फ्रिज मात्र उत्तम हवा.


Monday, 19 July 2021

उडदाचं घुटं


 उडदाचं घुटं

साहित्य : एक वाटी उडदाची सालासह डाळ (मी इडली साठी भिजत घातलेली पण शिल्लक उरलेली उडदाची डाळच वापरली आहे) ,एक टेबलस्पून हरभर्याची डाळ , पाव वाटी किसलेले सुक्के गोटाखोबरं, ४-५ लसूण पाकळ्या, एक पेराएव्हढा आल्याचा तुकडा , चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून चिंचेचा कोळ
फोडणीसाठी दोन चमचे तेल, मोहरी, जिरं, कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची,मूठभर कोथिंबीर
कृती : आगोदर भिजवलेली उडदाची डाळ व हरभर्याची डाळ प्रेशर कुकर मधून ४ शिट्ट्या करुन शिजवून घेतली. गॅसवर एका कढल्यात किंवा तव्यावर किसलेले सुके/ कोरडं खोबरं आणि जिरं खरपूस भाजून घेतले . भाजतांनाच त्यात धने,तमालपत्र , आल्याचा तुकडा ,लसणाच्या पाकळ्या घातल्या. नंतर तो कच्चा मसाला मिक्सरवर वाटून घेतला. शिजलेल्या डाळी डावाने घोटून एकजीव करुन घेतल्या . आता घोटलेल्या डाळींचे वरण एका पॅनमध्ये काढून घेऊन त्यात डाली भिवण्यासाठी घातलेले पाणी घालून उकळायला ठेवा. त्यात मिक्सरवर वाटून घेतलेले वाटण घाला. मग चिंचेचा कोळ व चवीप्रमाणे मीठ घाला.
आता गॅसवर एका कढल्यात तेलाची तडका फोडणी करावी. त्यात कढिपत्ता, हिरवी /लाल मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण घालावे. लसूण खमंग होईपर्यंत परतावे.
नंतर ती तडका फोडणी उकळी आलेल्या घुट्यात घालावी.
टीप : काळ्या उडदाच्या साल असलेल्या डाळीचे घुटं हे जास्त चांगले लागते.

Tuesday, 13 July 2021

सॅंडविच साठी हटके हिरवी चटणी

 नाश्त्या साठी सकाळीच बेकरीतून पाव आणले आणि चटणी सॅंडविच करू असा विचार केला. मग केली हिरवी सॅंडविच-चटणी . त्याचीच ही सचित्र रेसिपी खास तुमच्या साठी

सॅंडविच साठी हटके हिरवी चटणी




साहित्य : ५ ते ६हिरव्या मिरच्या , पेरभर आलं, एक टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे आणि पंढरपुरी डाळं , २ वाट्या (कमी जास्त चालेल) चिरलेली कोथिंबीर ,चवीनुसार मीठ ,एक चमचा जिरं,अर्धा चमचा सैंधव काळ मीठ ,अर्धा चमचा किंवा अर्ध्या लिंबाचा रस , (फ्रिज मधले) पाव वाटी गार पाणी किंवा दोन तीन बर्फाचे तुकडे , दोन टेबलस्पून बारीक शेव
ही चटणी फ्रीजर मध्ये ठेवल्यास अनेक दिवस / महिनेही टिकते. बर्फाच्या ट्रे मधे घालून फ्रिजर मधे ठेऊ शकता.
चटणी मिक्सर मधे फिरवताना मिक्सरचे भांडे उष्णतेने गरम होत त्यामुळे चटणीचा रंग काळसर होतो पण गार पाणी घातल्याने चटणी हिरवीगार रहाते.
बारीक शेव घातल्याने चटणी चव अफलातून लागते.
कोणत्याही चाट प्रकारातही तुम्ही या चटणीचा वापर करू शकता.
पराठ्या बरोबरही खूप छान लागते
एक वेळ जरूर जरूर ट्राय करून पहा.

Sunday, 11 July 2021

पापडाचे वडे

 पापडाचे वडे




पापडाचे वडे ही केरळची खासियत आहे व एक पारंपारिक लोकप्रिय पदार्थ आहे
साहित्य : एक वाटी भर बेसन (चणा डाळीचे पीठ) , एक मोठा (कोशिंबीरीचा) चमचा तांदूळाची पिठी , हळद , हिंग , चवीनुसार तिखट व मठ, जिरे-ओवा-काळी मिरी प्रत्येकी अर्धा चमचा भरड पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कढी पत्त्याची पाने व दोन चमचे तेलाचे मोहन , लिज्जतचे कच्चे ओले पापड ४ नग आणि तळणीसाठी तेल
कृती : एक मोठ्या बाऊलमध्ये बेसन (चणा डाळीचे पीठ) , तांदूळाची पिठी,हळद,हिंग, चवीनुसार तिखट व मठ, जिरे-ओवा-काळी मिरी प्रत्येकी अर्धा चमचा भरड पूड ही सगळे एकत्र घेऊन कोरडेच हाताने मिक्स करून घ्यावे व नंतर थोडे थोडे पाणी घालत मिक्स करत जावे. भज्यांसाठी ठेवतो त्यापेक्षा जास्त घट्ट ठेवावे. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर,चिरलेली कढी पत्त्याची पाने व दोन चमचे तेलाचे मोहन घालून पुन्हा एकदा फेटून घेतात तसे ढवळून मिक्स करून ठेवावे.
आता गॅस वर एका पॅन (कढई) मध्ये तेल गरम करायला ठेवावे.
तेल चांगले गरम होऊन उकळी आली की एकेका लिज्जतचे कच्चे ओल्या पापडाचे चार तुकडे करून प्रत्येक तुकडा पिठात बुडवून सगळीकडे पीठ व्यवस्थित लागेल यांची खात्री करून तापलेल्या तेलात सोडावे. उलटून पालटून दोन्ही कडून वडे सोनेरी रंगावर फ्राय करून काढावे.
Vandana Pur

Saturday, 10 July 2021

आरोग्यदायी गुळाचा चहा (मधुमेहींना वरदान)

 


आरोग्यदायी गुळाचा चहा (मधुमेहींना वरदान)


साहित्य – २ कप पाणी, ४ कप दूध, पेरभर ठेचलेले / किसलेले आलं, एक छोटा चमचा वेलची पावडर, ६/७ गवती चहाच्या काड्या, चमचे चहापत्ती आणि ४ चमचे किसलेला गुळ.

कृती - प्रथम पाण्यात चहापत्ती, आलं, गवती चहा, वेलची पावडर ३ मिनिटे मोठ्या आचेवर उकळून घ्या. त्यानंतर यात दूध घालून किमान ५ मिनिटे चांगले उकळून घ्या. त्यानंतर पूर्ण गॅस मंद करून यात किसलेला  गुळ घालावा आणि गुळ विरघळे पर्यंत चहा उकळून घ्यावा. ( गुळ घातल्यावर चहा सारखा ढवळू नये आणि दूध मोठ्या आचेवर असताना यात गुळ घालू नये. अन्यथा दुध फाटू शकते ) तयार चहा कपमध्ये गरमागरम ओतून घ्यावा.

Sunday, 4 July 2021

तांदुळ डाळीचे वडे

 

तांदुळ डाळीचे वडे 

 


 

सर्वप्रथम एक वाटी तांदुळ (शक्यतो पुलावाचे), अर्धी वाटी उडदाची डाळ, मुठभर हरभरा डाळ. हे तिनही घटक एकत्र करुन दोन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्या. तीसर्यावेळी यात पुन्हा दोन इंच पाणी जास्त घालुन झाकुन ठेवा. किमान दोन तास हे मिश्रण चांगले भिजु द्यावे. दोन तासानंतर तांदुऴ व डाळी छान फुगलेल्या दिसतील. यातील कोणतेही पाणी न काढता सर्व मिश्रण मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ओतुन घ्या. यात अर्धा इंच आले तुकडा, दोन लाल मिरच्या, तीन ते चार हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालुन मिक्सरवर पाच मिनिटे फिरवुन घ्या. भांडे खाली काढुन पहा खुप सुंदर घट्टसर बॅटर तयार होईल. एका पातेल्यात हे बॅटर ओतुन घ्या. तोपर्यंत कढईत प्रमाणात तेल घालुन मंद आचेवर तापायला ठेवा. ओतलेले बॅटर झाकुन दहा मिनिटे ठेवा. तोपर्यंत तेलही चांगले कडक होते. तापलेल्या तेलात चमच्याने एक-एक करुन वडे लालसर तळुन घ्या. कोथिंबिर, मिरची, पुदिना, आले यांची पातळ चटणी बरोबर सर्व्ह करा आणि मनसोक्तपणे एका अनोख्या पदार्थाचा अनुभव घ्या