Search This Blog

Monday, 11 May 2020

शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा

साहित्य : एक वाटी शेवया (शक्यतो हात-शेवया व जाड असाव्यात) , एक कांदा बारीक चिरून, एक टोमॅटो बारीक चिरून, भोपळी मिरची, श्रावणघेवडा आणि गाजर (सर्व भाज्या बारीक चिरून),अर्धी मूठ हिरवा मटार /वाटाणा ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे मोठाले तुकडे,अर्धा चमचा आल्याचा कीस,१०.१२ कढीपत्त्याची पाने (चिरून),एक चमचाभर लिंबाचा रस, चवीपुरती साखर,फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल, ) मोहरी , हिंग , जिरे,चवीनुसार मीठ,काजूचे तुकडे, शेंगदाणे, सजावटीसाठी ओलं खोबरं , चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव,चार वाट्या पाणी
कृती : प्रथम गॅसवर एका पातेल्यात चिमुटभर मीठ घालून चार वाट्या पाणी उकळायला ठेवावं, पाणी खळखळून उकळलं की त्यात भाजून घेतलेल्या शेवया टाकव्या. शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात.
चिरलेल्या भाज्या म्हणजेच भोपळी मिरची, श्रावणघेवडा आणि गाजर प्रथमच थोडया वाफवून घ्याव्यात.
आता गॅसवर एका कढाईत फोडणीसाठी तेल तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी , जिरं , कढीपत्ता , आलं-मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात चिरलेल्या कांद्याच्या फोडी घालावयात,व परतून कांदा पारदर्शी झाल्यावर त्यात श्रावण घेवडा , गाजर आणि मटार घाला, नंतर भोपळी मिरची घालावी व परतून घ्यावे,मग शेंगदाणे घालून परतून घ्यावेत.टाटा टोमॅटोच्या फोडी घालून परतून घ्या. सगळ्यात शेवटी शिजवून निथळत ठेवलेल्या शेवया घालाव्यात व पुन्हा एकदा परतावे. मग मीठ , साखर , लिंबूरस व काजुचे तुकडे घालून परतून घेऊन कढईवर झाकण ठेऊन व गॅस मंद करून एक वाफ काढून घ्यावी व गॅस लगेच बंद करावा.
सर्व्ह करतेवेळी वरून खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व बारीक शेव पेरून हा शेवयांचा उपमा खायला द्या.

Thursday, 23 April 2020

तांदुळाच्या कण्यांच्या ओल्या फेण्या (पापड्या)




तांदुळाच्या कण्यांच्या ओल्या फेण्या (पापड्या)



आज सकाळी नाष्टा म्हणून लहानपणी खूप खाल्लेल्या वाफावलेल्या तांदळाच्या ओल्या पापड्या (यांनाच फेण्या असेही म्हणतात) केल्या होत्या. पांच-सहा वर्षांपूर्वी नोटा बंदी असतांना या आवडत्या पापड्यासाठी मुद्दाम तुळशिबागेत जाऊन एक स्टेनलेसस्टीलचा १२ प्लेट्सचा पापड्यांचा स्टँड खरेदी केला होता. (पूर्वी आमच्या बालपणी आमची आई रॉकेल तेल, गोडे-तेलाच्या लोखंडी डब्याची व हिंगाच्या पत्र्याच्या डब्यांची झाकणे वापरत असे)
त्याचीच  ही रेसिपी
साहित्य : दोन वाट्या तांदुळाच्या कण्या,एक टेबलस्पून खसखस,चवीनुसार मीठ,भरडलले जिरे,वाटीभर दही.
कृती : सुरवातीला तांदुळाच्या कण्या धुवून घ्याव्यात. एका पातेल्यात तांदुळाच्या कण्यांच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात तांदूळ भिजत घालून  तीन दिवस या तांदुळाच्या कण्या तशाच झाकून ठेवाव्यात.(पाणीसुद्धा बदलू नये)
तिसर्‍या दिवशी कण्यांना आंबूस वास येयू लागतो.
तांदूळाच्या कण्या आंबण्यास सुरवात झाली की चौथ्या दिवशी या तांदुळाच्या कण्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. धुतलेल्या तांदुळाच्या कण्या चाळणीवर गाळून त्यातील पाणी काढून टाकावे व मिक्सर ग्राइंडर वर वाटून घ्याव्यात. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. त्या  घट्टच वाटाव्यात.हे वाटलेले तांदुळाच्या कण्यांचे  पीठ नेहमीच्या इडलीच्या पिठाइतके घट्ट असावे.
नंतर त्यात चमचाभर खसखस,चमचाभर भरलेले जिरे  आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून छान करावे. हे झाले फेण्यांचे  पीठ (batter) तयार.
आता या पिठाच्या ओल्या फेण्या करायच्या वेळी प्रथम स्टँड मधील ताटल्यांना दह्याचाकिंवा तेलाचा  हात लावून घ्यावा. नंतर ताटल्यांवर डावाने ओले पीठ (batter) पसरून घालावे एका स्टँड मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर पसरून घातलेले पीठ (batter) खूप जाड अथवा पांतळ असू नये.
ढोकळ्याच्या /इडल्यांच्या कुकर मध्ये ,आणि कुकर नसेल तर एका मोठ्या पातेल्यात  मध्ये तळाशी पाणी घ्यावे व ते पातेले गॅसवर त्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
पातेल्यातील पाण्याला उकळी आली की फेण्यांच्या ताटल्यांचा स्टँड पातेल्यात ठेवावा व झाकण लावावे.
१० - १५ मिनिटांनी झाकण काढावे व गरम गरम फेण्या ताटल्यावरून सोडवून काढाव्यात आणि दह्याबरोबर सर्व्ह कराव्यात.

काही महत्वाच्या सूचना :
१) फेण्या करण्यासाठी तांदूळ / कण्या आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या पिठाला तुम्ही मिरची-कोथिंबीचे वाटण  (पेस्ट) लावू शकता.
३)  या फेण्यांचा स्टँड  भांड्यांच्या दुकानात मिळू शकेल. पुण्यात तुळशीबागेत तर नक्कीच मिळायला हावाच.

Tuesday, 3 March 2020

ब्रेड अनियन उत्तप्पा


ब्रेड अनियन उत्तप्पा 


साहित्य : ब्रेडचे पाच-सहा स्लाइस, पअर्धी वाटी जाड रवा , चार टेबलस्पून तांदूळाची पीठी , अर्धा ते पाऊण  वाटी दही,एक चमचा मीठ , एक छोटा चमचा जिरे , एक छोटा चमचा काळी मिरी पूड (ऐच्छिक) , एक वाटी बिया काढून अगदी बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी, एक गाजर (किसून) , दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या , दोन चमचे किसलेले आले , गरजेनुसार  तेल
कृती  : सुरुवातीला ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून टाका आणि  त्यांचे छोटे तुकडे करून घ्या. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात ब्रेडचे तुकडे, रवातांदूळाची पीठी, मीठ, दही व पाणी घालून वाटून पेस्ट बनवून घ्या.
एका मोठ्या बाउलमध्ये ही पेस्ट काढून घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून उत्तप्याचे पीठ बनवा.(पीठ फार पातळ अथवा फार घट्ट नसावे)
मग त्यात जिरे, बारीक चिरून ठेवलेल्या  टोमॅटोच्या फोडी , किसलेले गाजर, किसलेले आले, बारीक चिरून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या घालून मिक्स करून घ्या.
गॅसवर मध्यम आचेवर तवा गरम करून घेऊन त्यावर चमच्याने थोडेसे तेल सोडून त्यावर अर्धा कांदा किंवा कच्चा बटाटा तवाभर फिरवून मग हाताने तव्यावर थोडेसे पाणी शिंपडा आणि सुती कपड्याने तवा पुसून घ्या व तव्याला सगळीकडे तेल लावून घ्या.
दोन डाव पीठ तव्यावर घालून सगळीकडे गोल फिरवत पसरून घ्या. आता त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर सगळीकडे पसरून घाला.
चमच्याने उत्तप्याच्या सगळ्या कडेने तेल सोडा व दोन मिनिटे भाजून घेऊन पलटी करा व दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्या. (आंच मध्यमच ठेवा, मोठी आंच ठेवल्यास उत्तप्पा आतपर्यंत शिजणार नाही व आतून काच्चाच राहील). याच पद्धतीने उर्वरीत उत्ताप्पा बनवा.
कोणत्याही आवडत्या चटणी सोबत (खोबर्‍याची चटणी किंवा कोथिंबीरीची हिरवी चटणी) किंवा टोमॅटो सॉस बरोबर गरम उत्तप्पा सर्व्ह करा.


Sunday, 1 March 2020

दलियाची पौष्टिक खिचडी


दलियाची पौष्टिक खिचडी



दलिया खिचडी हा लोकप्रिय गुजराती प्रकार आहे. ह्यात गव्हाचा रवा (दलिया), मूग डाळ आणि भाज्या घालतात. या खिचडीत तांदूळ अजिबात घालायचा नसतो. ज्यांना तांदूळ वर्ज्य आहे त्यांच्यासाठी, मधुमेही लोकांसाठी हा उत्तम पर्याय आहे. बाकी सर्वांनाच हा चविष्ट खिचडीचा प्रकार आवडेल. ही खिचडी करण्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. 
ह्यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. हिवाळ्यात मिळणार्या शेंगभाज्यांचे  ताजे दाणे घालू शकता. फक्त सगळ्या भाज्यांचे एकत्रित प्रमाण दलिया आणि मूग डाळीपेक्षा जास्त असावं. तुम्ही पाहिजे असल्यास कांदा उभा चिरून बाकी भाज्यांबरोबर किंवा तेलावर परतून घालू शकता. गरमागरम खिचडी साजूक तूप आणि कढीसोबत अप्रतिम लागते.
टीप : 
ही खिचडी गार झाल्यावर घट्ट होते. त्यामुळे गरम असतानाच खावी. नाहीतर परत गरम करताना थोडं पाणी शिंपडून गरम करावी.


भाजक्या डाळीची चटणी

भाजक्या डाळीची चटणी 

साहित्य  ; भाजकी डाळ +लसूण +आले +कढीपत्त्याची पाने  +हिरव्या मिरच्या+मीठ +साखर +आमचूर /लिंबाचा रस /सायट्रिक असिड 
कृती  : वर दिलेले सगळे साहित्य  मिक्सर मध्ये घेऊन बारीक करा . 
मिक्सरमधून बाहेर काढून त्यावर हिंग मोहोरी हळद याची तेलाची फोडणी ओतून मिक्स करा थंड झाल्यावर बाटलीत /डब्यात भरून ठेवा. 
टणी करायची असेल तेव्हा त्या मध्ये पाणी किवा ताक किवा दही पाणी घालून ढवळून घ्या चव पाहून मीठ /साखर घालून चव अ‍ॅडजस्ट करा. 


Saturday, 18 January 2020

सोलाणा हरभर्‍याची आमटी


सोलाणा हरभर्‍याची आमटी 


सोलाणा हरभरे छानपैकी तेलावर परतून व वाफेवर शिजवून घ्यायचे आणि नंतर त्यात आवडीनुसार कांदा,लसूण, हिरवी मिरची,जिरे,सुके खोबरे तेलावर परतून घेऊन एकत्र  मिक्सरवर वाटून  फोडणीला टाकायचे आणि उकळी आली की चवीनुसार मीठ घालायचे. वाटण शिजलेसे वाटले की गॅस बंद  करून बारीक चिरलेली कोथिंबिर घालून वर झाकण म्हणून ताट ठेवून द्या.
आमटी झाली.आता आमटीबरोबर भाकरीच हवीच , शिवाय  खर्डा तर हवाच हवा.असा हरभर्‍याची आमटी,खर्डा, फोडलेला कांदा,घरचं दही,पंचपक्वानाला मागे सारेल असा चटपटीत आणि फर्डा बेत .

Thursday, 16 January 2020

पावाच्या खुसखुशीत वड्या

  1. #पावाच्या खुसखुशीत #वड्या


साहित्य : शिळ्या (पांढर्‍या) पावाच्या १०-१२ स्लाइस , एक वाटी साखर , चिमुटभर बेकिंग पावडर , २-३ वेलदोड्यांची पूड, अर्धा कप दुध, एक टेबलस्पून दुधाची पावडर , एक टेबलस्पून साजूक तूप, ८-१० काजूचे तुकडे व बेदाणे
कृती : शिळ्या ब्रेडच्या स्लाईसेसचा बारीक चुरा करुन त्यात साखर, बेकिंग पावडर , वेलदोड्यांची पूड, दुधाची पावडर मावेल एव्हढं दुध घालून मिक्स करा व दोन तास मुरत ठेवा,म्हणजे साखर विरघळेल.
स्टीलच्या थाळ्याला हाताने साजूक तूप लावून त्यावर हे मिश्रण थापा. वरून काजूचे तुकडे किंवा बेदाणे लावा.
थाळा गॅसवर ठेवा. वर झाकण ठेवून गॅसच्या मंद आंचेवर १०-१५ मिनिटं खरपूस भाजा.
थंड झालं की वड्या पाडा आणि घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.