तांदुळाच्या कण्यांच्या ओल्या फेण्या (पापड्या)
आज
सकाळी नाष्टा म्हणून लहानपणी खूप खाल्लेल्या वाफावलेल्या तांदळाच्या ओल्या पापड्या
(यांनाच फेण्या असेही म्हणतात) केल्या होत्या. पांच-सहा वर्षांपूर्वी नोटा बंदी
असतांना या आवडत्या पापड्यासाठी मुद्दाम तुळशिबागेत जाऊन एक स्टेनलेसस्टीलचा १२
प्लेट्सचा पापड्यांचा स्टँड खरेदी केला होता. (पूर्वी आमच्या बालपणी आमची आई रॉकेल
तेल, गोडे-तेलाच्या लोखंडी डब्याची व हिंगाच्या
पत्र्याच्या डब्यांची झाकणे वापरत असे)
त्याचीच
ही रेसिपी
साहित्य : दोन
वाट्या तांदुळाच्या कण्या,एक टेबलस्पून खसखस,चवीनुसार मीठ,भरडलले जिरे,वाटीभर दही.
कृती : सुरवातीला तांदुळाच्या
कण्या धुवून घ्याव्यात. एका पातेल्यात तांदुळाच्या कण्यांच्या
दुप्पट पाणी घेऊन त्यात तांदूळ भिजत घालून
तीन दिवस या तांदुळाच्या कण्या तशाच झाकून ठेवाव्यात.(पाणीसुद्धा बदलू नये)
तिसर्या दिवशी कण्यांना
आंबूस वास येयू लागतो.
तांदूळाच्या कण्या
आंबण्यास सुरवात झाली की चौथ्या दिवशी या तांदुळाच्या कण्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात.
धुतलेल्या तांदुळाच्या कण्या चाळणीवर गाळून त्यातील पाणी काढून टाकावे व मिक्सर
ग्राइंडर वर वाटून घ्याव्यात. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. त्या घट्टच वाटाव्यात.हे वाटलेले तांदुळाच्या
कण्यांचे पीठ नेहमीच्या इडलीच्या पिठाइतके
घट्ट असावे.
नंतर त्यात चमचाभर खसखस,चमचाभर भरलेले जिरे
आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून छान करावे.
हे झाले फेण्यांचे पीठ (batter) तयार.
आता या पिठाच्या
ओल्या फेण्या करायच्या वेळी प्रथम स्टँड मधील ताटल्यांना दह्याचाकिंवा तेलाचा हात लावून घ्यावा. नंतर ताटल्यांवर डावाने ओले
पीठ (batter) पसरून घालावे एका स्टँड मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर पसरून घातलेले
पीठ (batter) खूप जाड अथवा पांतळ असू नये.
ढोकळ्याच्या /इडल्यांच्या
कुकर मध्ये ,आणि कुकर नसेल तर एका मोठ्या पातेल्यात मध्ये तळाशी पाणी घ्यावे व ते पातेले गॅसवर त्यात
पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
पातेल्यातील
पाण्याला उकळी आली की फेण्यांच्या ताटल्यांचा स्टँड पातेल्यात ठेवावा व झाकण
लावावे.
१० - १५ मिनिटांनी
झाकण काढावे व गरम गरम फेण्या ताटल्यावरून सोडवून काढाव्यात आणि दह्याबरोबर सर्व्ह
कराव्यात.
काही महत्वाच्या
सूचना :
१) फेण्या
करण्यासाठी तांदूळ / कण्या आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या
पिठाला तुम्ही मिरची-कोथिंबीचे वाटण (पेस्ट) लावू शकता.
No comments:
Post a Comment