चार दिवसांपूर्वी इंटरनेटच्या अॅमेझॉन साईट वरून निर्लोनचे नॉनस्टिक तवा आणि फ्राय पॅन COD ने मागवले होते. ते काल मिळाले.
मग विचार केला की तव्याचे उद्घाटन आपण पुरणपोळीने करू या.
या वेळी पुरणपोळया नेहमीच्या पारंपारिक पद्धतीच्या न करता उपासाला चालतील अशा बनवू या.
मग उकडलेले बटाटे व राजगिरा पीठ यांचा वापर करून बनवलेल्या या पोळ्यांची सचित्र रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर आरत आहे.
साहित्य :
१. २-३ मध्यम आकाराचे बटाटे,
२. एक वाटीभर साजूक तूप,
३. दीड वाटी राजगिरा पीठ,
४. १/२ वाटी साखर,
५. बदाम व काजूचे काप किंवा आवडीनुसार,
६. १ छोटा चमचा वेलची पूड’
७. २ छोटे चमचे तेल
कृती:
बटाटे चांगले उकडून सोलुन व किसणीवर किसून घ्यावे.एका कढईत थोडसं साजूक तूप गरम करावे.त्यात बटाट्याचा कीस घालून साधारण १० मिनिटे चांगला परतून घ्यावा.परतत असताना खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.साखर, बदाम व काजूचे काप, वेलची पूड घालून पुरण बनवून घ्यावे व थोडे थंड होवू द्यावे.राजगिरा पिठात २ छोटे चमचे तेल व आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालून छान नरम पीठ मळुन घ्यावे.या पीठाचे एकाच आकाराचे गोळे करून घ्यावे.या गोळ्यांची पुरीच्या अकाराची पारी लाटून घ्यावी.
या पुरीची बोटांच्या साह्याने वाटी तयार करून घ्यावी.या वाटीत थोडे पुरण ठेवावे व पारीच्या सर्व बाजू बंद कराव्या व हा गोळा पीठात घोळून घ्यावा.पोळी गोल लाटून घ्यावी.
तवा गरम करून अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेली पोळी त्यावर घालावी.दोन्ही बाजुनी खरपुस भाजून घ्यावी.तव्यावर पोळीच्या आजूबाजूने साजूक तुपाची धार सोडावी.
गरमा गरम पुरणपोळी सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment