Thursday 9 September 2021

सिमला ढोबळी (ढब्बू) मिरचीचे खाराचे लोणचे

 सिमला ढोबळी (ढब्बू) मिरचीचे खाराचे लोणचे



साहित्य : अर्धा किलो सिमला ढोबळी (ढब्बू) मिरच्या ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १००ग्राम मोहरीची डाळ, एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा खाराची मिरची मसाला एक पाकीट (१०० ग्राम) , अर्धा डझन लिंबे , ५० ग्राम आले , एक वाटी तेल आणि फोडणीसाठी मोहोरी, हळद,हिंग व मेथीची पूड

कृती : प्रथम सिमला ढोबळी ढब्बू) मिरच्या धुवून व स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करून घ्याव्यात व त्यांची देठे (देखे) खुडुन घ्यावीत,आतील बिया काढून टाकाव्यात. कात्रीने किंवा विळीवर चिरून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चार लिंबांच्या फोडी करून घ्या.आल्याचे विळीवर किंवा सुरीने अतिशय बारीक तुकडे करून घ्या. मोहोरीची डाळ तेलात चांगली फेटून घ्या.
एका परातीत किंवा स्टीलच्या थाळ्यात सिमला मिरच्यांचे तुकडे,आल्याचे तुकडे,हिरव्या मिर्च्यांचे तुकडे,लिंबाच्या फोडी , फेटलेली मोहोरीची डाळ , मिरची मसाला व मीठ घालून ते मिश्रण मोठ्या चमच्याने हलवून चांगले एकजीव करून घ्या व एका स्वच्छा व कोरड्या काचेच्या किंवा चीनी मातीच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरा. गॅसवर कढईत वाटीभर तेल घेऊन चांगले कडकडीत तापल्यावर त्यात मोहोरी,हळद,हिंग व मेथीची पूड घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर बरणीत भरलेल्या मिरच्यांवर ओता व चमच्याने हलवून वरती एक चमचा मिठ पसरा (थर द्या) आणि बरणी झाकण लावून त्यावर दादरा म्हणून एका स्वच्छ फडक्याने बांधून कपाटात अंधार्‍या जागी ठेवा.

दोन तीन दिवसांनंतर बरणी उघडून पुन्हा एकदा चमच्याने हलवून तोंडी लावणे म्हणून खायला द्या.

No comments:

Post a Comment