Search This Blog

Monday, 16 November 2020

शून्यकचरा (Zero Garbage)

शून्यकचरा (Zero Garbage) ही संकल्पना म्हणजे काय याबाबत

" शून्य कचरा " ही संकल्पना म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपल्या रहात असलेल्या सभोवतीच्या परिसरात कचरा पडून राहू नये यासाठी आपणच आपल्या कचर्‍याची उगमस्थानीच योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची. गेल्या काही वर्षांमध्ये याबाबतची नागरिकांमधली सकारात्मक जाणीव व सजगता वाढत असल्याचे दिसून येत आहे. मोठय़ा मोठय़ा गृह संकुलांमधून कचर्‍याचं व्यवस्थापन ही मोठी गरज समोर येत आहे. ही गरज भागवायची असेल तर आधी प्रत्येक घर, कुटुंब आणि व्यक्ती कामाला लागायला हवी.

प्रत्येक पर्यावरणप्रेमी नागरिकाने आपणच निर्माण करत असलेल्या कचर्यााची जबाबदारी घेऊन आपले रहाते घर,घरासभोवतालचा संपूर्ण परिसर व आपले शहर कचरामुक्त करण्यात आपला खारीचा वाटा उचलावा.

दररोज घरात बनणार्‍या  कचर्‍याचं व्यवस्थापन करण्याआधी कचर्‍याचं  ऑडिट करा. म्हणजे तुमच्या घरांमधून कोणत्या प्रकारचा किती कचरा बाहेर जातो त्यातला किती ओला कचरा आहे? सुक्या कचर्‍याचा नेमका काय उपयोग करता येईल? या सर्वांचा अभ्यास करून जर योजना आखली तर शून्य कचरा अभियान यशस्वी करणं सहज शक्य होईल.

आपला परिसर स्वच्छ निरोगी करण्याकरता किमान आपल्या घरातून तरी शून्यकचरा बाहेर पडेल यासाठी स्वच्छेने निर्धारपूर्वक प्रयत्न करा.

घनकचरा स्वत:हून वाहून जात नसतो तर तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच र्मयादित राहत असले तरी आपल्या शहरातल्या, गावातल्या, आपण राहतो त्या आजूबाजूच्या परिसरातील न वापरातील सर्व जागा हळूहळू कचर्‍यानं व्यापल्या जात आहे. या फोफावत जाणार्‍या  कचर्‍यासाठी फक्त कायदे व नियम करून त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यासाठी प्रत्येकानं आपापल्या व्यक्तीगत पातळीवर प्रयत्न करणं जास्त गरजेचं आहे. आपल्या शहरातला कचरा ही फक्त एकट्या नगरपालिकेची किंवा सरकारची जबाबदारी नसून माझ्या घरच्या कचर्‍या ला  मीच जबाबदार आहे हे ओळखून व स्वीकारून प्रत्येकानं कामाला लागणं हीच खरी काळाची गरज आहे. त्यासाठी ‘शून्य कचरा’ ही संकल्पना घरा-घरातून राबवली गेली पाहिजे.

आपण जर घराघरातला कचरा जागेवरच वेगवेगळा केला तर घरच्याघरी त्यातील ओल्या कचर्‍याचा सुयोग्य वापर करून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्ट किंवा गांडूळ खत,विविध प्रकारचे एंजाईम्स निर्मितीचे पर्याय हाती येतात.परंतु हे करण्यासाठी लागते ती मानसिक सकारात्मकता , सजगता आणि पुढाकार. यासाठी लागेल ते मार्गदर्शन विनामोबदला द्यायला मी सदैव अगदी एका पायावर तयार आहे.

या मोहिमेत छोटयांचा सक्रिय सहभाग जास्त उत्साहवर्धक ठरू शकतो. या शून्य कचरा संकल्पनेमुळे त्यांना सायन्स प्रोजेक्टसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. लहान मुले व तरुणांची पथनाट्ये सादर करून समाजात जनजागृती निर्माण करता येईल. सेंद्रिय खतामुळे घराच्या कुंडय़ांमधील, परसातील फुलझाडे- फळझाडे बहरू लागल्यामुळे ज्येष्ठदेखील खूश होतील.

घरा-घरातून ,सहकारी सोसायट्यांमधून डम्प यार्डला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे प्रमाण शून्यावर आणणे हा या अभियानाचा अंतिम हेतू आहे.

यासाठी सर्वात प्रथम घरातील रोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करा

१) स्वयंपाकघरातील ओला कचरा

यामध्ये भाज्या व फळांची देठे ,साली,टरफले , चहाचा चोथा, शिळे अथवा खराब झालेले अन्न, अंड्याची टरफले , निर्माल्य इत्यादी त्यापासून घरी बागेकरता स्वत: घरच्या घरीच कंपोस्ट खत तयार करा

२) रिसायकल होऊ शकणारा कचरा

प्लास्टिक, थर्मोकॉल, धातू , कांच, पेपर ,जुने कपडे ,बॅग ,चप्पल बूट ,तुत ब्रश,कंगवे,कमरेचे बेल्ट्स,लेडीज पर्स

रिसायकल होणारा कचरा म्हणजे प्लास्टिक डबे, बाटल्या तसेच पेपर रद्दी पुट्ठे इत्यादी रिसायकल करण्याकरता जवळच्या रद्दी भांगार वाल्यास द्या

इतर रिसायकल होणारा कचरा रिसायकल करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्त करा

पातळ प्लास्टिक पिशव्या , थर्मोकॉल, जुने कपडे बॅग चप्पल या गोष्टी काही सामाजिक कार्य करणार्याा सेवाभावी संस्थांमार्फत गोळा करून त्यातील प्लास्टिक जेजुरी येथे पॉली फ्युएल तयार करण्यास, थर्मोकॉल रिसायकल करण्यास तसेच जुने कपडे बॅग चप्पल 'गुंज' नावाच्या संस्थेस दिले जातात

३) सॅनिटरी आणि मेडिकल वेस्ट

सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे व वृद्धांचे डायपर, इंजेक्शन , बँडेज, रेझर्स अशा गोष्टी लाल ठिपका लावून महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचार्यांकडे सुपूर्त करा

४) इलेक्ट्रॉनिक वेस्ट

जुने खराब झालेले बॅटरी , सेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सीडी ,काम्प्युटरचे सुटे भाग इत्यादी तुम्ही collection ड्राईव्ह मध्ये रिसायकल करण्या करता देऊ शकता

3R चा मंत्र स्वीकारा व अंगिकारा

Refuse

Reuse

Recycle

वरील मंत्र अंगिकारले तर मुळात घरात कचरा होणारच नाही

१) बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन बाहेर पडा प्लास्टिक पिशवी कॅरी बॅग ला नकार द्या

२) प्लास्टिक पूर्णपणे टाळणे जरी कठीण असले तरी काही गोष्टी एकदा वापरून टाकून न देता परत परत वापरा शेवटी झाडे लावण्याकरता किंवा सुशोभीकरणा करता वापर करा अन्यथा रिसायकल करा

३) थर्मोकॉल ला वेगळे ऑप्शन्स शोधा गणपती करता इको फ्रेंडली सजावट, कार्यक्रमांना थर्मोकॉल च्या ऐवजी पत्रावळी, सुपारी किंवा उसाच्या चिपाड पासून बनलेले किंवा स्टील चे ताट वाट्या वापरा

४) प्लॅस्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडूच्या मातीचा किंवा गोमय गणेश मूर्ती चा पर्याय स्वीकारा

५) आजकाल गलेलठ्ठ पगार आणि उच्च रहाणीमानामुळे पाश्च्यात्यांप्रमाणे 'use and throw' ही मनोवृत्ती व प्रवृत्ती/संस्कृती वाढीस लागल्याने कपडे बॅग चप्पल मोबाइल फोन अशा वस्तू थोडे दिवस वापरून फेकून द्यायची सवय लागली आहे त्या शक्य तितक्या वापरा नंतर कचरा म्हणून फेकून न देता गरजू संस्थाना दान करा.

कचराव्यवस्थापान क्षेत्रात काम करणार्‍या अभ्यासगटाला मिळालेल्या आकडेवारीवरुन असे निदर्शनास आले आहे की रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास ,घरात निर्माण होणार्‍या कचर्‍यातील ७०% कचरा हा स्वयंपाक घरातील ओला कचराच असतो तर २९% प्लास्टिक च्या पिशव्या बाटल्या असतात आणि फक्त १% कचरा हा इतर कचरा असतो म्हणजे जर ओल्या कचऱ्या पासून कंपोस्टखत केले आणि प्लास्टिकचा वापर निर्धारपूर्वक कमी केला किंवा रिसायकल करता गोळा करून दिला तर आपण शून्य कचरा हे उद्दीष्ट आपण सहजपणे साधू शकतो.

प्रमोद तांबे , पुणे - दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३

कर्णपिशाच्च (मो)८४४६३५३८०५ 

प्रेरणादायी अविस्मरणीय अनुभव

 मला आलेला एक विलक्षण प्रेरणादायी अविस्मरणीय अनुभव आज मी येथे तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितो :

पुण्यातील चतुशृंगीच्या पायथ्याजवळ असलेल्या लक्ष्मी सोसायटीमधील बंगला नंबर २२ मध्ये राहणार्‍या नलिनी केसकर नावाच्या ८५ वर्षांच्या तरुण (यांना वृद्ध कसे म्हणायचे ?) आजी मला बहिर्‍यालाही ऐकू येईल अशा सुस्पष्ट व खणखणीत आवाजात माझ्याशी सुसंवाद साधत मला म्हणाल्या की,तुमच्या गच्चीवरील मातीविरहित बाग (संस्था) बद्दल ११ एप्रिल २०१८ च्या दैनिक लोकसत्ताच्या पुरवणीत (पुणे आवृत्ती) आलेला लेख मी वाचला व त्यातून स्फूर्ती व प्रेरणा मिळाल्याने त्यांची घरीच बागेसंबंधी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यांना घरातील ओला कचरा घरातच जिरवायचा आहे व त्यापासून कंपोस्ट खत कसे बनवावे याची माहिती त्यांनी माझ्याकडून घेतली आणि त्यादिवसापासून त्यांनी ओलाकचरा घरातच जिरवायला सुरवातही केली हे विशेष.

या वयातील त्यांची ही दुर्दम्य ईच्छाशक्ती व पर्‍यावरणासाठी आपण काहीतरी योगदान द्यावे या तळमळीला माझा सलाम !

प्रमोद तांबे , १४१५ सदाशिव पेठ, पुणे,दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ कर्णपिशाच्च (मो) ८४४६३ ५३८०५

पर्यावरणासाठी आपलाही खारीचा वाटा आपण उचलू या.

 

पर्यावरणासाठी आपलाही खारीचा वाटा आपण उचलू या.





किमानपक्षी  आपल्या घरात आपणच दररोज निर्माण करत असलेल्या घन कचर्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करणे आणि  त्यातील ओल्या कचऱ्याचे घरगुती व्यवस्थापन ही आपलीच जबाबदारी आहे , असे मानून असा ओला कचरा घरातच जिरवण्याचे काम केले तरी महानगरपालिकेच्या संपूर्ण घन-कचरा व्यवास्थापन यंत्रणेवर असलेला ताण  आपण बऱ्याच अंशी कमी करू शकतो . जरूरी आहे ती फक्त हे ओळखून केलेल्या आपल्या सहकार्याची.

 

गवारीच्या शेंगांचा ठेचा


गवारीच्या शेंगांचा  ठेचा


साहित्य : दोन मुठी भरून थोडी मोठी गवार तोडून घेणे, चवीनुसार व आवडी नुसार ४ ते ५ हिरव्या मिरच्या किंवा १०-१२  लसणाच्या पाकळ्या , १ मूठभर भाजलेले शेंगदाणे (सालासकट), १ चमचा जीरे, चवीनुसार मीठ

कृती : मिरच्या कढईत तेल न घालता व्यवस्थित भाजून घेणे, त्याच कढईत तोडलेल्या गवारी व्यवस्थित भाजून घेणे. नंतर खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये आधी मिरच्या ,जाडसर कुटून घ्यावे नंतर गवार, अर्धा चमचा जीरे,मीठ, भाजलेले सालासकट शेंगदाणे जाडसर (अर्ध-बोबडे) कुटून घ्यावे. मिक्सरला फिरवून घ्यायचे असतील तर  थोडे थांबून फिरवून घ्यावे. कढईत अर्धा ते चमचा तेल घेऊन उरलेले जीरे, ४ ते ५ कढीपत्ता पाने तुकडे करून घालते, २ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणे व कुटून घेतलेला ठेचा घालून २ ते ३ मिनीटे व्यवस्थित परतून घेणे.

यम्मी व टेस्टी ठेचा तयार.. भाकरी बरोबर अप्रतिम लागत. 

कंपोस्ट -बायोकल्चर-विरजण

 

 कंपोस्ट -बायोकल्चर-विरजण

सर्व प्रकारच्या निसर्गनिर्मित सेंद्रिय पदार्थांचे जैविक विघटन होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेलाच आपण कंपोस्ट करणे असे म्हणतो.

असे कंपोस्ट करतांना विरजण म्हणून गुळाचे पाणी,शेणाचा काला, जिवामृत,घरी बनवलेली विविध प्रकारची इंजाईम्स,गांडूळे, दही-ताक ,कुजवट कचरा , हिंग ,मोठ्या झाडाच्या बुंध्या सभोवतालची माती , वेस्ट-डिकंपोजर ,जिवामृत,,आपणच घरी बनवलेले कंपोस्ट,अगर बाजारात उपलब्ध असणारे अत्यंत महागडे कल्चर यापैकी काहीही वापरले तरी चालते .कारण याचा विराजाण म्हणून आपण करत असलेला वापर हा मुख्यत्वे अल्प कालावधीत सूक्ष्म जिवाणूंची (बक्टेरियाची) वाढ अनेक पटींनी (Multiple) व्हावी जेणेकरून कंपोस्ट प्रकियेला गती मिळून ते लवकरतयार होईल या उद्देशाने केलेला असतो.









Sunday, 15 November 2020

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '

 

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '


आजकाल सर्वत्र फ्लॅट संस्कृती स्वीकारलेली आढळून येत असली तरी प्रत्येकास आपली स्वत:ची छोटीशीच का होईना पण बाग असावी अशी आंतरिक इच्छा तर असतेच ना. हौस म्हणून फळ झाडे नाही तरी किमान काही छोटी छोटी फुलझाडे तरी आपल्या या बागेत असावीत असे प्रात्येकालाच वाटत असते . ही हौस फ्लॅटमधील गॅलरीमध्ये कुंडय़ांत फुलझाडे लावून पूर्ण करायचा आपला नेहमी प्रयत्न असतो.. आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीतील कुंडय़ांमध्ये आपण हौसेने फुललेली जास्वंद देवाला वाहताना, फुललेला गुलाब किंवा सोनचाफा/अबोली/मोगरा/मदनबाण केसांत माळताना, आमटीला किंवा कढीला फोडणीसाठी आपल्याच कुंडीतील कढीपत्ता घालताना, चटणी-भाजीसाठी आपल्या बागेतील मिरचा,आले,पुदिना अथवा कोथंबिर वापरताना गृहिणीला होणारा अवर्णनिय आनंद हा प्रत्यक्षांत अनुभवयाचा असतो, तो शब्दांत सांगता येत नाही.

आपले घर कितीही छोटे असो किंवा मोठ्ठा बंगला असो , त्यामध्ये किमान एखादा छोटा का होईना,पण बागेचा हरित कोपरा तरी असावा, हे आपल्यापाकी बहुतेक प्रत्येकाचेच स्वप्न असते. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात बंगला किंवा मोठी घरे ही गोष्ट दुर्मीळच झाली आहे.त्यामुळे छोट्या जागेतच कल्पकतेनं सजावट करता येणे महत्त्वाचे आहे.
तुमची जागा कितीही लहान किंवा मोठी असो, तिथे एक सुंदर बगीचा कसा फुलवता येईल याचाच प्रत्येकजण विचार करत असतो. ह्याला आम्हीही अपवाद नाही.

आमचे आनंद-निधान म्हणजेच आमच्या ८५ वर्षांच्या जुन्या वाड्याच्या गच्चीवरील अवघ्या १०' x १५' आकाराच्या छोट्याशा गच्चीत आम्ही उभयतांनी उतारवयांत मोठ्या कष्टाने स्वयंपाक घरातल्या ओल्या कचर्याचा वापर करून फुलवलेली आम्हाला नंदनवनाची अनुभूती देणारी पर्यावरणपूरक संपूर्ण सेंद्रिय व जैविक बाग. ज्या बागेत १०० हून जास्त विविध प्रकारची फुलझाडे,फळझाडे ,भाजीपाल्याची आणि औषडी वनस्पतींची झाडे जोपासली आहेत.

कोणतीही बाग ही जरी एक बागच असली तरी आपल्या घरची अगदी छोटीशी असलेली बागही आपल्या साठी नंदनवनच असते. आपण स्वत: जिवापाड मेहनत घेऊन मोठ्या कष्टाने लावलेल्या व जिवापेक्षा जास्त जपून जोपासलेल्या आणि वाढवलेल्या घराच्या छोट्याशा गच्चीतील मातीविरहित बागेतून मनाला मिळणारा स्वर्गीय आनंद आणि समाधान याची काहीच तोड नसते. ती एक अवर्णनिय अशी अनुभूती असते. काही औरच... अगदी आईला आपल्या नवजात पहिल्या अपत्याकडे पाहिल्यावर जसं वाटतं ना अगदी तसचं आम्हाला आमच्या बागेकडे, बागेतल्या झाडा-फुलांकडे पाहिल्यावर वाटतं.... सकाळी उठलं अन झाडांपाशी एक तरी फेरी झाली नाही तर दिवसभर आगदी हुरहूर लागुण रहाते, अन एकदा का झाडांपाशी जाऊन,त्यांच्याशी मनीचं हितगुज करून आलं की दिवसभर कसं प्रसन्न वाटतं. हौसेला मोल नाही आणि मेहनतीला तोड नाही याची नित्य नवी प्रचिती येते.

कधी कधी फुललेली छोटी छोटी फुलेही मनाला अपार समाधान देऊन जातात , त्याचे मोलही नाही ठरवता येत. खरी श्रीमंती पैशांत कधीच नसते तर आमची बाग हीच आमची खर्या अर्थाने श्रीमंती आहे असे आम्हाला वाटते. आम्ही अशा संपत्तीचे स्वामी आहोत याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो.

प्रत्येकाच्या व्यक्तीगत आवडी-निवडीचे प्रतिबिंब त्यांच्या बागेत उमटते हे खरे... दैनंदिन रामरगाडयातुन आम्हाला जो काही मोकळा वेळ मिळतो त्यावेळी मन शांत ठेवण्याचे ठिकाण म्हणजे `आमची बाग आहे.

माझ्या आनंदाचे गोत्र , ओल्या मातीलाही कधी, येई सुगंध.

आमची बाग म्हणजे आमचे ' आनंदनिधान ' आहे.

आमच्या या छोट्याशा नंदनवनांत भलेही गुलाबांचे किंवा अन्य फुलांचे भरगच्च ताटवे नसतील पण जे काही फुलते त्यांत आम्ही खूपच आनंदी आहोत.

यावेळी मला शांता शेळक्यांच्या कवितेतल्या खालील ओळी आठवतात.

सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास l
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास ll
पराग, देठ, सुवास, पाकळ्या फूल इतकीच देते ग्वाहीl
अलग अलग करू जाता हाती काही उरत नाही ll

आम्ही तर खात्रीने सांगू की ह्या झाडा फुलांनी आम्हांला समृद्ध केल.. #जगायची #इच्छा, #फुलण्याचा #ध्यास आणि देता येईल तेवढे #देण्याची #दानत ह्या गोष्टींनी आज आम्ही समृद्ध जीवन व्यतीत करत आहोत.






































Wednesday, 11 November 2020

मोहरीच्या पानांची भाजी

 

मोहरीच्या पानांची भाजी

 

 


मोहरीची आणि पालकयांची पाने स्वच्छ धुवू्न बारीक चिरून घ्यावीत व कढईमध्ये मऊ होईपर्यंत चांगली घोटून घोटून शिजवावी नंतर दोन चमचे मक्याचे किंवा चणा डाळीचे (बेसन) पीठ घालून घोटावी दूसरीकडे कढईमध्ये मोहरीचा तेलात बारीक केलेली आलं लसून हिरवी मिरची व कांदा चांगला परतावा , त्यामध्ये शिजलेली भाजी टाकावी नंतर परत कढईत तूप घेऊन त्यामध्ये अख्या लाल , हिरव्या मिरच्या टाकून तडका द्यायचा गरम गरम वाढतांना त्यामध्ये बटर किंवा लोणी टाकायचं खूप छान होते ही भाजी करून नक्की बघा. पोळी, भाकरी किंवा मक्याच्या रोटी सोबत खा

 

टीप : मोहरीच्या पानांसोबत पालक पण टाकावा नाही तर उष्ण तापमान असलेल्या प्रातांत ही मोहरीच्या पानांची भाजी उष्ण पडते आणि पालक टाकल्याने मोहरीचा उग्र पणा पण कमी होतो. कोवळा पालक जुडी आणि राई जुडी असे प्रमाण घ्यावे
पालक पनीर ची भाजी बनवतो तशीही बनवता येते.

 अगदी साधी भाजी बनवता येते, मोहरीची पाने बारीक चिरून घ्यावी, कढई गॅस वर ठेऊन जिरे लसूण हिरवी मिरची बारीक तुकडे ची फोडणी करावी, पार कोरडी होईपरर्यंत शिजवावी, गरम गरम बाजरी किंवा ज्वारी च्या भाकरी सोबत खमंग लागते.