Search This Blog

Monday, 26 August 2019

मेतकूट


साहित्य : दोन वाट्या (२५० ग्रॅम) चणाडाळ (हरभरा) , एक वाटी तांदूळ , पाव वाटी पोहे, पाव वाटी गहू , अर्धी वाटी उडदाची डाळ , अर्धी वाटी मुगाची डाळ ,८ – १० लाल सुक्या मिरच्या (ब्याडगी) ,एक चमचा मोहरी , एक टेबलस्पून जिरे , दोन चमचे मेथ्या,दोन टेबलस्पून धणे, एक चमचा हळद , एक मोठा खडा हिंग ,एक मोठा तुकडा सुंठ,२-३ लवंगा, एक तुकडा दालचीनी ,एक चमचा मीठ.
कृती : प्रथम गॅसवर एका काढईत चणा डाळ, उडीद डाळ, मुगाची डाळ ,गहू , तांदूळ,पोहे, मोहरी,धणे, जिरे,मेथ्या, दालचीनी,लवंगा हे सर्व पदार्थ वेगवेगळे पण खरपूस भाजून घ्यावेत . सर्वात शेवटी गॅस बंद करून गरम असलेल्या कढईत लाल मिरच्या व मीठ घालावे.सुंठेचा तुकडा कुटून बारीक तुकडे करून हळद व हिंग हे सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक दळावेत.दळल्यावर पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे व कोरड्या बाटलीत अगर स्टीलच्या घट्ट झाकणाच्या डब्यात भरावेत .
आजारपणात आजारी माणसाच्या तोंडाची जेंव्हा चव जाते तेंव्हा किंवा डॉक्टर जेंव्हा रोग्याला पचायला हलके असे पथ्याचे खायला द्या असे सांगतात तेंव्हा मेतकुटाचा फार उपयोग होतो.आशावेळी मेतकूट-तूप-भात खावासा वाटतो. तसेच लहान मुलांना पौष्टिक म्हणून जास्त पाणी घालून शिजवलेला गरम गुरगुट्या भात व त्यावर साजूक तूप व मेतकूट घालून खाऊ घालतात आणि त्यांनाही तो चविष्ट मऊ भात फारच आवडतो.
चटपटीत दह्यातील मेतकूट– एक तोंडी लावणे
साहित्य : चार चमचे मेतकूट पावडर,एक बारीक चिरलेला कांदा,ताक,चवीनुसार लाल तिखट,साखर व मीठ, फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग.
कृती: एका चीनी मातीच्या सटात (काचेचा बाउल किंवा स्टीलचे छोटे पातेलेही चालेल)चार चमचे मेटकूटाची पावडर घ्या,त्यात बारीक चिरलेला कांदा व ताक घाला(हवे तसे पातळ करून घेऊन) व कालवून थोडावेळ मुरत ठेवा. थोड्या वेळाने त्यात चवीनुसार साखर,मीठ,लाल तिखट घाला व त्याचेवर तेलाची फोडणी घालून ढवळून घ्या.
जेवाणांत आयत्यावेळी डावीकडचे तोंडीलावणे म्हणून चटणीच्या ऐवजी सर्व्ह करा.

Saturday, 24 August 2019

नाचणीच्या पिठाची तिखट उकड

#नाचणीच्या पिठाची तिखट #उकड

साहित्य : दोन वाट्या नाचणीचं पीठ, हळद, दोन वाट्या आंबट ताक, पाणी, ५-६ लसूण पाकळ्या , दोन हिरव्या मिरचयांचे तुकडे, ६-७ कढी पत्याची पाने, चिमूटभर हिंग, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा मोहरी, दोन टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती : आंबट ताकात नाचणीचे पीठ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून त्याचं दाटसर मिश्रण करून घ्यावं. नंतर गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या व त्या गरम तेलात हिंग,हळद , मोहरी, लसणीच्या पाकळ्या, कढी पत्ता आणि मिरचीचे तुकडे टाकून २-३ मिनिटे परतून घेऊन मग त्यात नाचणीचे पिठाचं ताकात कालवलेले मिश्रण ओतावं. ते शिजत असताना एकसारखं ढवळून त्याच्या गुठळ्या फोडाव्या. नंतर झाकण ठेवून ते शिजवून घ्यावं. ही उकड गरमच खावी. आवडीप्रमाणे ही उकड घट्ट किंवा पातळ करता येते.

Thursday, 15 August 2019

पोह्यांची उकड

पोहे म्हणजे माझे जीव की प्राण! पोह्यांचा कोणताही प्रकार असो मला खुपच आवडतो.अशीच पोह्यांची उकडही अप्रतिम लागते.
साहित्य : दोन वाट्या जाडे पोहे (कांदा पोहयासाठी आपण जे वापरतो ते), दोन वाट्या आंबटसर ताक, चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या, कढिपत्त्याची ८-१० पाने, दोन चमचे तूप, एक चमचा जीरे, दहा बारा लसूण पाकळ्या, थोडं आलं किसून, मीठ, चिमुटभर हळद,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर व सजावटीसाठी बारीक शेव.
कृती : अर्धा तास आगोदर जाड पोहे पाण्याने धुवूनचाळणीत ठेवावे. अर्ध्या तासाने धुतलेले पोहे आणि यात जरूरीनुसार आंबट ताक घालून मिक्सरवर फिरवून घ्या.जास्त फिरवून अगदी लगदा/पेस्ट करू नका. दुसरीकडे कढईत तूप घालून तापत ठेवा.तूप चांगले तापल्यावर त्यात जीरे, मिरचीचे तुकडे, सोललेल्या लसूण पाकळ्या घाला. लसूण चांगली तांबूस होऊद्या. तोपर्यंत तयार मिश्रणात मीठ, हळद मिसळून घ्या.लसूण तळली की कढीपत्त्याची पाने घाला. आता तयार मिश्रण फोडणीत ओता. उरलेले ताक घाला. किसलेले आले घाला. गरजेनुसार पाणी घाला. ढवळून एक वाफ काढा. गरमागरम उकडीवर साजूक तूप व बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव घालून सर्व्ह करा.

कढी गोळे


कढी गोळे


 



साहित्य   :  मलईच्या (सायीच्या) दह्याचे  ५-६ वाट्या ताक , दीड वाटी चणा डाळ (हरभरा डाळ) , एक टेबलस्पून आले-लसणाची पेस्ट , चमचाभर हिरव्या मिरच्यांची पेस्ट *चवीनुसार कमी-जास्त) , एक छोटा चमचा हिंग ,एक चमचा जिरे पावडर , ८-१० कढीपत्त्याची पाने , दोन टेबलस्पून तेल , फोडणीचे साहित्य , एक चमचा बेसन पीठ, चवीनुसार मीठ व साखर
कृती : साधारणपणे  ४ तास आगोदर चणा डाळ धुवून भिजत घालावी. नंतर रोळीत / चाळणीवर  उपसून ठेवावी. पाणी निथळल्यानंतर शक्यतो पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये भरड्सर वाटावी. पण फार बारीक करू नये.एका परातीत भरड्सर  वाटून ठेवलेल्या डाळीत चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा आवडत असल्यास लाल तिखट, हिंग, आले-लसणाची पेस्ट, हळद, चवीनुसार मीठ घालून एकत्र करून ठेवावे. १५-२० मिनिटांनी त्या भरड डाळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे वडे करून घ्यावेत व गॅसवर एका पॅन मध्ये पानी उकळायला ठेऊन त्या पॅन वर एक चाळणी ठेवा आणि त्यात हे गोळे/वडे ठेऊन वाफवून/उकडून काढावेत.
आता कढी साठी एका टोपात / गंजात मलईचे ताक घेऊन त्या ताकाला एक चमचा डाळीचे पीठ लावून घेऊन त्यात कढीपत्त्याची पाने , चवीनुसार मीठ, चवीपुरती चिमूटभर साखर, आले-लसणाची  पेस्ट घालून कढीचा  टोप / गंज गॅसवर ठेवा. टोप / गंज  अर्धा रिकामा असावा. कढी चांगली उकळू लागल्यावर वाटलेल्या डाळीचे छोटे वाफवून घेतलेले गोळे कढीत सोडावेत.( कढी उकळण्यापूर्वी गोळे टाकल्यास गोळे फुटतात) एक एक करून सर्व गोळे कढीत सोडावेत.नंतर १० मिनिटे बारीक गॅसवर कढी उकळू द्यावी. गॅसवरून कढीचा टोप / गंज  उतरल्यावर , एका काढल्यात तेल, मेथी, मोहरी, हिंग अशी तडका फोडणी करावी व ती कढीवर घालावी. फोडणीत हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावे. हे गोळे भातात कुस्करून त्यावर फोडणी घालून खाण्याची पद्धत आहे. पोळीबरोबर खाण्यासही चांगले लागतात.

Tuesday, 13 August 2019

डाळ भुर्जी कोरडे पिठलं


डाळ भुर्जी  कोरडे पिठलं







साहित्य  : दोन वाट्या चणाडाळ , चवीनुसार १० ते १२ हिरव्या मिरच्या,५-६ कांदे,चवीनुसार मीठ,१०-१२ कढीपत्त्याची पाने,एक चमचा  जिरे ,१२-१५ लसूण पाकळया,मूठभर कोथींबीर ,चिमुटभर हिंग,चिमुटभर हळद,फोडणीसाठी तेल.
कृती  : प्रथम चार तास चणाडाळ पाण्यात भिजत घाला . पाण्यातून उपसून काढून मिक्सरवर ती वाटताना हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लसूण पाकळ्या घालून पाणी न घालता भरडसर वाटा.
मग  ती भरडसर वाटलेली डाळ चाळणीला तेल लावून थापा.
नंतर  एका भांडयात दोन वाट्या पाणी ओता आणि वर वाटली डाळ थापलेली चाळणी  ठेवून झाकण ठेवा आणि ५-७  मिनिटे ती उकडा.
थंड झाल्यावर बाहेर काढून ती उकडलेली डाळ हाताने फोडा/कुस्करा.
गॅसवर एका कढईत फोडणीसाठी आवश्यक तेवढ तेल गरम करून त्यात जीरे , कढीपत्ता आणि थोड़ी हिरवी मिरची तुकडे करून  घाला. ते परतल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा परता. मग त्यात हिंग, हळद घाला.
शेवटी त्यात कुस्करलेली डाळ घालून परता आणि झाकण ठेउन एक वाफ काढा.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही डाळ भुर्जी-कोरडे पिठले भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

Monday, 12 August 2019

सातूच्या पिठाचे लाडू


सातूच्या पिठाचे लाडू

साहित्य : दोन वाट्या सातूचे पीठ,दोन वाट्या कणीक (गव्हाचे पीठ) , अडीच वाट्या पिठीसाखर , दोन वाट्या साजूक तूप , एक छोटा चमचा वेलची पूड,एक टेबलस्पून भिजवलेल्या बदामांचे काप.
कृती  :  दोन वाट्या साजूक तुयात कणीक व सातूचे पीठ मंद आंचेवर खरपूस व खमंग वास सुटून लालसाररांग येतोवर भाजून घ्यावे. ही दोन्ही पिठे भाजून घेतल्यावर थोडीशी गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पूड व  भिजवलेल्या बदामांचे काप मिक्स करावे  व मिश्रण गार झाल्यावर तुपाच्या हाताने या मिश्रणाचे नेहमीसारखे  लाडू वळावेत.


ज्वारीच्या पिठाच्या वड्या

#ज्वारीच्या #पिठाच्या #वड्या

साहित्य: दोन ग्लास ताजे ताक , अर्धा किलो ज्वारीचे पिठ,फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक चमचा आले लसूण पेस्ट , चवीनुसार मिठ , सुके गोटाखोबरे+लसूण+लालतिखट+जिरे यांची इक्र्वर्वातुंकीली कोरडी पूड चटणी.
कृती- प्रथम एका टोपात ताक घेऊन ताकाला जिरे व हिंग-मोहरीची फोडणी द्यावी ताक गरम होत असतांनाच त्यात ज्वारीचे पिठ थोडे थोडे कालवत जावे घट्ट होईपर्यन्त ढवळावे. नंतर त्यात वरून थोडे तेल टाकून टोपावर झाकण ठेऊन मिश्रणास एक वाफ येवू द्यावी.पूर्ण शिजल्यावर एका ताटाला तेल लाऊन त्यावर शिजलेले मिश्रण थापून त्यावर अल तिखट-सुके खोबरे-लसूण यांची पूड चटणी व बारीक चिरलेली कोथिंबिर पसरवून त्याच्या वड्या पाडून त्या सॉस किंवा हिरवी चटणी सोबत सर्व्ह कराव्या.
टीप : ज्वारीचे गुणधर्म- ज्वारीच्या पिठात प्रथिनांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिज द्रव्ये अधिकतम प्रमाणात आढळतात. ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ आणि खनिज पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. याव्यतिरिक्त ज्वारीपासून आपणास थायमिन, रायबोफलेव्हिन, नायसिन ही जीवनसत्वे मिळतात. लठ्ठपणा कमी करण्यास आणि नियंत्रणात ठेवण्यास ज्वारीचा आहारात उपयोग होतो. मधुमेहाचे नियंत्रण करण्यासाठी ज्वारीच्या आहाराचा सतत वापर करणे फायदेशीर ठरते.हृदयाचे विविध विकार कमी करण्यासाठी ज्वारीच्या खाद्यान्नाचा उपयोग होतो.