Search This Blog

Friday, 28 March 2014

कोबीचे मुटके (मुठिया)

कोबीचे मुटके (मुठिया)

साहित्य :  एक वाटी कोबीचा कीस , एक वाटी ज्वारीचे पीठ ,अर्धी वाटी दही ,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , एक चमचा लिंबाचा रस , एक चमचा मिरची-आले – लसूण पेस्ट , एक छोटा चमचा जिरे पूड,एक टेबल स्पून पांढरे तीळ ( भाजून), चिमूटभर खायचा सोडा , चवीनुसार  मीठ व साखर , अर्धी वाटी तेल , फोडणीसाठी हळद , हिंग , जीरे , ८ – १० कढीपत्त्याची पाने ,
कृती : किसलेला कोबी व मुटक्याचे इतर साहित्य एकत्र करुन कडकडीत तेलाचे मोहन घालून मळून घेऊन नंतर मुटके  करुन घ्यावेत व ते वाफवावे. वाफावलेले मुटके तेलात जीरे, हिंग, कढीपत्ता घालून परतावेत व कोथिंबीर पेरुन गरम गरम खायला द्यावेत.

Thursday, 27 March 2014

उच्च प्रथिनयुक्त सार (डाळींचा प्रकार)

उच्च प्रथिनयुक्त सार (डाळींचा प्रकार)


साहित्य : एक वाटी तांदूळ,अर्धी वाटी मुगाची डाळ,प्रत्येकी पाव वाटी मसूर डाळ,चणा डाळ,उडीद डाळ,प्रत्येकी दोन चमचे धने व जिरे,एक चमचा मेथी,३-४ काळेमिरे,दोन लहान चमचे  सुके खोबरे (किसलेले),१०-१२ सुकलेली कढीपत्याची  पाने,चवीनुसार लाल सुक्या मिरच्या,एक छोटा खडा हिंग
कृती : हिंग सोडून बाकीचे सर्व साहित्य गॅसवर एका कढईत मंद आचेवर वेगवेगळे भाजून घ्यावे व नंतर ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे व शेवटी न भजता हिंगाची पावडर करावी व त्यात घालून सर्व एकत्र मिसळून घेऊन थंड झाल्यावर एका घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून ठेवावे.
सार कराण्यासाठी साहित्य व कृती :  दोन लाल पिकलेले टोमॅटो व एक कांदा घेऊन घेऊन त्याची प्यूरी करून घ्या,नंतर गॅसवर एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी,जिरे,हळद,हिंग ,ताजी कढीपत्याची पाने, २-३ ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी व त्यात ही प्यूरी व एक वाटी पाणी घालून उकळी आल्यावर त्यात चवीसाठी चिंच,गूळ,मीठ, कोथिंबीर व दोन तीन चमचे पूर्वीच  करून ठेवलेली  सार पावडर व आवश्यक तेव्हढे पाणी घालून १० मिनिटे छान उकळू द्या. जरूर वाटल्यास थोडा गोडा मसाला घातला तरी चालेल. 

Tuesday, 25 March 2014

कडधान्याचे पराठे

कडधान्याचे पराठे

साहित्य : हिरवे / पिवळे मूग,मटकी,चवळी,मसूर,पांढरा वाटाणा,राजमा अशी सर्व प्रकारची कडधान्ये प्रत्येकी दोन चमचे , आले,लसूण,धने-जिरे पूड प्रत्येकी एक छोटा चमचा,चवीनुसार मीठ,कणीक एक वाटी,ज्वारीचे पीठ अर्धी वाटी,बेसन पीठ पाव वाटी आवश्यकतेनुसार तेल व साजूक तूप.
कृती : पराठे करायच्या आगोदर वरील सर्व कडधान्ये प्रत्येकी दोन चमचे प्रमाणात घेऊन मोड येण्यासाठी दोन दिवस एकत्र पाण्यात भिजत घालावीत, दोन दिवसांनंतर भिजत घातलेली व मोड आलेली सर्व धान्ये एका रोळीत किंवा चाळणीत उपसून निथळत ठेवून एक तासाने एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालून त्यात आले,लसूण,धने-जिरे पूड प्रत्येकी एक छोटा चमचा,चवीनुसार मीठ घालून फिरवून घ्या,एका परातीत एक वाटी कणीक , अर्धी वाटी ज्वारीचे पीठ ,  पाव वाटी बेसन पीठ ,थोडसे मीठ ,तेल व आवश्यकतेनुसार पाणी घालून कणीक मळतो तसे मळून घ्यावे व ताट पालथे घालून झाकून ठेवावे.
अर्ध्या तासाने गॅसवर पराठ्यासाठी तवा तापत ठेवावा व पोळपाटावर पुरणासाठी पोळी लाटतो तसे पराठ्यासाठी लाटून त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेले सारण भरून (पुराण भरतो तसे) पराठा लाटून घ्यावा व तव्यावर थोडे तेल टाकून तेलावर दोन्ही भाजून घ्या .
 हा मिश्र धान्याचा गरम पराठा त्यावर साजूक तूप घालून लोणचे अगर सॉस बरोबर सर्व्ह करा. 

Sunday, 23 March 2014

ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी

ओले खोबारे,शेंगदाणे व कोथिंबीर यांची परतून सुकी चटणी


नारळ फोडून त्यातील चव खवून काढून झाल्यावर करवंटीच्या आतील भागास न खवलेले जे खोबरे चिकटून शिल्लक राहेलेले असते ते दुसर्‍यादिवशी सुरीने अगर चमच्याने काढून घ्यावे व त्याचाच  उपयोग करुन  छान खमंग अशी चटणी  कशी होते ते मी आज तुम्हाला येथे सांगणार आहे.

साहित्य : एक वाटी नारळाच्या करवंटीस आतील बाजूस शिल्लक (न खवलेले) राहिलेले ओले खोबरे (बारीक करून घ्यावे), ५-६ लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे , चवीपुरते चिंचेचे बुटुक ,चमचाभर भाजलेले तीळ , चवीनुसार ४-५ हिरव्या मिराचांचे तुकडे व मीठ आणि साखर , कढीपत्त्याची ४-५ पाने (बारीक चिरून) , फोडणीसाठी तेल , जिरे, मोहोरी , हिंग व हळद .
कृती : गॅसवर एका कढईत फोडणीसाठी दोन चमचे तेल तापत ठेवून तेल तापल्यावर त्यात चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे,लसणाच्या पाकल्याचे तुकडे,जिरे,मोहोरी,हिंग,हळद,कढीपत्त्याची पाने ,तीळ घालून परतवून घ्यावे व मग त्यातच ओले खोबरे घालून पुन्हा एकदा परतावे,मग चवीनुसार साखर व मीठ घालून साखर विरघळेपर्यंत पुन्हा परतत राहावे पाच मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून , गार झाल्यावर ही चटणी एका काचेच्या बाउल मध्ये काढून ठेवावी.
ही चटणी दोन तीन दिवस छान टिकते. नंतर मात्र सुक्या खोबर्यास व त्यामुळे ह्या चटणीस खवट वास येण्याची शक्यता आहे. 

Saturday, 22 March 2014

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

परवाचे दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्‍या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्‍या विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा (आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे.
साहित्य : एक मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद.  
कृती : विळीवर कैरीची जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत ठेवावे. गॅसवर एका काढल्यात तेल तापवून घेऊन मोहरी,जिरे,मेथया दाणे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी व ती  मुरलेल्या मिश्रणावर घालून पुन्हा एकदा चांगले हलवून घ्यावे.
जेवणात तोंडी लावणे म्हणून हा झटपट होणारा चुंदा कशाबरोबरही फारच चटकदार व चविष्ट लागतो. आठ-दहा दिवस टिकतोसुद्धा ! 

Friday, 21 March 2014

पावाचा चिवडा (शिळ्या)

पावाचा चिवडा (शिळ्या)
परवाचे दिवशी आमच्याकडे मटकीची उसळ केली होती. आमच्या नातीच्या आग्रहास्तव काल आम्ही मिसळीचा बेत केला होता.मिसळ करायची म्हणून काल आही मिसळीची तर्री (रस्सा) केली होती. म्हणूनच परवाचे  दिवशी मी तुम्हाला मटकीच्या उसळीची रेसिपी दिली होती, तर काल तर्री (मिसळीचा रस्सा) कशी करायची ह्याची रेसिपी दिली होती. काल मिसळीसाठी पाव आणले होते,त्यातील काही उरले म्हणून आज त्या शिळ्या पावाचा चिवडा करायचे ठरले. त्याचीच रेसिपी मी आज येथे तुमच्यासाठी देत आहे. 

साहित्य :  ४-५ शिळ्या पावाचे स्लाइस,एक माध्यम कांदा,चवीपुरते लाल तिखट किंवा हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ ,साखर व लिंबाचा रस, ८-१० कढीपत्याची पाने फोडणीचे साहित्य म्हणजेच तेल,मोहरी,जिरे,हिंग व हळद ,हवे असल्यास व आवडत असल्यास अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे,स्वादासाठी व सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :  आगोदर शिळ्या पावाच्या स्लाइसचा चरा करून घ्या व कांदा सोलून व चिरून घ्या, गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करून घ्या ,तेल चांगले तापल्यावर त्यात मोहरी टाका,मोहरी तडतडल्यावर जिरे,हिंग,हळद टाकून परता,मग कांदा व कढीपत्याची पाने टाकून पुन्हा एयकडा चांगले परतून घ्या ,आता आवडत असल्यास भाजलेले शेंगदाणे घालून व शेवटी पावाचा चुरा,मीठ व साखर घाला वर लिंबाचा रस टाकून आणखी एकदा सर्व चांगले परतून मिसळून घ्या ,वर एक ताट झाकण ठेऊन एक वाफ काढा, मग स्वादासाठी बारीक चिरलेली कोठीमिर घालून झाकण ठेऊन गॅस बंद कारा.
पांच मिनिटानंतर झाकण खाधून एकदा झार्‍याने हलवून घेऊन मग डिशमधून हा गरम पावाचा चिवडा सर्व्ह करा. 

Thursday, 20 March 2014

मिसळीसाठी कटाचा रस्सा – तर्री


मिसळीसाठी  कटाचा रस्सा – तर्री



तुम्हाला माहितीच असेल की मिसळ ही पूर्णपणे कटावर अवलंबून असते. कट म्हणजेच मिसळीचा रस्सा ! यालाच       " तर्री " असेही म्हणतात. 

मिसळीच्या कटासाठी (रश्यासाठी)लागणारा मसाला : प्रथम एका कढईत सुकया खोबर्याचा कीस आणि तीळ वेगवेगळे कोरडेच (तेल न घालता) भाजून घेऊन ते वेगळ्या ताटात काढून ठेवावे. त्याच कढईत अगदी थोडे तेल घालून त्यात एक वाटी उभा चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होई पर्यंत परतून घेऊन ते भाजलेल्या तीळ व खोबर्‍याच्या ताटातच बाजूला काढून ठेवावे.त्यानंतर कढईत पुन्हा थोडं तेल घालून त्यात अख्खे धणे, आणि सगळा अख्खा गरम मसाला परतावा आणि त्यातच लाल मिरच्या आणि नंतर ओला नारळ घालून आणखी थोडा वेळ परतून घ्यावे.गरम मसाला आणि मिरच्यासाठी तेल कमी लागते.. त्यामुळे त्यातच ओला नारळ परतावा म्हणजे खूप तेलकट नाही होणार. आता भाजलेला हा सगळा मसाला आणि एका टोमॅटोचे मोठे तुकडे करून मिक्सर मधून एकदम बारिक वाटून घ्यावे. हा झाला मसाला.

कट किंवा रस्सा : ह्या कटासाठी जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साधारण अर्धा डाव तेल घालावे. तेल चांगले तापले म्हणजे त्यात प्रथम थोडा बारीक चिरलेला कांदा, कढीपत्याची पाने, हळ्द, हिंग व जिरे  घालावे. कांदा गुलाबी झाला की, त्यात २-४ चमचे कांदा लसूण मसाला घालावा व लगेचच त्यावर २ चमचे साखर घालावी. कांदा लसूण मसाल्याचे प्रमाण चवीनुसार बदलावे. साखर मात्र विसरू नये. तेलातच साखर घातल्याने कमी तेलात तर्री नवाचा प्रकार मिळतो. यात आता वाटलेला सगळा मसाला घालावा आणि थोडा वेळ परतावा. आधीच शिजवून घेतल्याने केवळ टोमॅटो शिजेल इतपतच तो परतावा. मग त्यात गरम पाणी घालावे. अंदाजे ४ कप पाणी घालावे. खूप दाट वाटल्यास आणखी थोडे घालावे. पण खूप पातळ करू नये. आता यात मिठ घालावे आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला हवा असेल तर घालावा पुन्हा. उकळी आली की गॅस बंद करावा.(फोडणीत साखर घातल्याने तर्री सुंदर येते. आणी निम्मेच तेल लागते. साखरेचा पाक होऊन तो लाल रंग जबरद्स्त दिसतो..