Search This Blog

Thursday, 15 March 2018

मठ्ठा

मठ्ठा



साहित्य : आंबट ताक,आले,हिरवी मिरची,साखर ,मीठ व भाजके जिरे पावडर,कोथिंबीर 
कृती : ताज्या घुसाळलेल्या आंबट ताकात थोडे आले हिरवी मिरची वाटून लावली ,चवीपुरते मीठ टाकले ,थोडीशी साखर टाकली ,कोथिंबीर चुरून टाकली कि झालाच टेस्टी  मठ्ठा  तयार !   त्यात स्वादासाठी भाजक्या जिर्‍याची पूड टाकावी व फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावे.  
 पूर्वी लग्नाच्या पंक्ती मध्ये जिलेबी किंवा बुंदी आगर मोतीचूर लाडवाचे पक्वान्नाबरोबर ह्याची उपस्थिती अनिवार्य असे लग्नाच्या पंक्ती मधील जिळेबीचे किंवा बुंदी / मोतीचूर लाडवाचे जड जेवण पचविण्यास मदत करणार्‍या  या चविष्ट पेयाला मठ्ठा  हे अत्यंत मठ्ठ नांव कुणी  का बरे दिले असेल ?

ज्वारीच्या पिठाचे डोसे




साहित्य : दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ , एक वाटी उडदाची डाळ , अर्धी वाटी बारीक रवा, दोन टेबलस्पून दही , चवीपुरते मीठ व हिरवी मिरची
कृती : दोन तास आगोदर उडदाची डाळ धुवून भिजत घालून ठेवावी. दोन तासांनी पाण्यासकट डाळ मिक्सरमधून वाटून घ्यावी व दुसर्‍या एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊन त्यात बारीक रवा व ज्वारीचे पीठ आणि दही घाला व चवीनुसार मीठ व हिरवी मिरची घालून मिश्रण ढवळून घ्या व उबदार जागी ८-१० तास झाकून ठेवा. (हवेतील आर्द्रतेनुसार पीठ आंबून / फुगून वर येण्यास कमी-जास्त वेळ लागतो)
डोश्यांसाठी गॅसवर डोश्यांचा तवा तापत ठेवून त्यावर मिठाच्या पाण्याचा बोळा/ नारळाची शेंडी किंवा अर्धा कापलेला कांदा  फिरवून घ्या व मग तव्यावर चमचाभर तेल सोडून  मध्यभागी डावभर पीठ घालून डावाने सगळीकडे गोलाकार पसरून घ्या व दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन डोसा तयार झाला की नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
महत्वाची सूचना -प्रत्येकवेळी पातेल्यातून डोश्यांचे पीठ काढताना आजूबाजूचे  पीठ ढवळले जाऊन आतील गॅस बाहेर निघून जाणार नाही याची काळजी घेऊन हलक्या हाताने पीठ घ्या , कारण गॅस / हवा बाहेर निघून गेल्यास डोसे जाळीदार व हलके होणार नाहीत)


Tuesday, 13 March 2018

ज्वारीच्या पिठाचे वडे

ज्वारीच्या पिठाचे वडे




साहित्य  : एक वाटी ज्वारीचे पीठ ,दोन चमचे दही,चविनुसार मीठ , लाल तिखट, हळद , हिंग,चिमूट भर ओवा,चविसाठी चिमूट भर साखर ,मूठभर तीळ,तळणीसाठी आवशकतेनुसार तेल.
कृती  : प्रथम एका परातीत  ज्वारीचे पीठ घ्यावे त्यात दोन चमचे दही,चविनुसार मीठ , लाल तिखट, हळद , हिंग,चिमूट भर ओवा,चविसाठी चिमूट भर साखर  घालावी,थोडी मेथी बारीक चिरून धालावी,थोड आलं पण किसून घालावं  आणि सर्व मिश्रण चांगले मळून घ्यावे व  लिंबा एवढे गोळे करा.
आता केळीच्या पानावर हाताला थोडे पाणी लावून वडे  थापून वरच्या बाजूला तीळ पसरावे हे ज्वारीचे वडे तापलेल्या तेलात तळून काढा . छान फुगतात . हे प्रवासात पण नेतां येतात कारण तेखूप दिवस टिकतात .

कैरीचा भात

कैरीचा भात


साहित्य : एक वाटी कैरीचा कीस,दोन वाट्या भात,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,७-८ कढीपत्त्याची पाने,एक टेबलस्पून तीळ,एक चमचा मोहरी,एक चमचा उडीद डाळ,चिमूटभर हिंग,चवीनुसार मीठ,चिमूटभर हळद.
कृती : साला सकट कैरी किसून ठेवा. हिरव्या मिरच्या बारीक चिरून ठेवा. शिजलेला भात एका परातीत काढून हाताने मोकळा करून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यातच उडीद डाळ टाकून ती गोल्डन ब्राऊन रंगावर परता. मग त्यात तीळ, हिंग, कढीपत्त्याची पाने,बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,आणि कैरीचा कीस घालून परता. नंतर त्यात चिमूटभर हळद घाला.(हळद खूपच थोडी घाला,फक्त कैरीच्या किसाला छान सोनेरी रंग यावा एव्हढीच) दोन-तीन मिनिटे परता.कैरी शिजून थोडी मऊ झाली की गॅस बंद करा.
आता त्यात चवीनुसार मीठ  व शिजलेला व मोकळा करून ठेवलेला भात घालून झार्‍याने हलवून मिक्स करा.
आपल्याला आवडत्या कोणत्याही लोणच्या सोबत सर्व्ह करा.
   

Saturday, 10 March 2018

भोकराच्या पानांची भाजी

भोकराच्या पानांची भाजी

साहित्य  : भोकराची कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ इत्यादी. कृती - भोकराची कोवळी पाने निवडून, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत व पाने बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्यावे. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. नंतर हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून घ्यावी.


पातीच्या लसूण-कांद्याची भाजी


पातीच्या लसूण-कांद्याची भाजी


साहित्य  : एक पातीच्या कांद्याची जुडी, एक जुडी पातीच्या लसणाची, अर्धी वाटी डाळीचे पीठ, एक चमचा लाल मिरचीच्या तिखटाची पूड, पाव चमचा मेथीदाणे, पाव वाटी तेल, एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा हिंग, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, दोन चमचे ओल्या  खोबर्‍याचा  खोवलेला चव.
कृती  : कांदा व लसूण पाती बारीक चिरून घ्याव्यात. गॅसवर एका पॅनमध्ये तेलावर हिंग, हळदीची फोडणी करून घ्यावी,मेथीदाणे लालसर परतून घेऊन त्यावर लसूण परतावा. त्यानंतर चिरलेली कांदेपात लालसर होईपर्यंत परतावी, मग लसणाची पात परतून व शिजवून घ्यावी. शिजल्यावर मीठ, साखर व ओल्या खोबर्‍याचा चव घालावा. भाजीला डाळीचे पीठ घालून एकजीव करावे. पाण्याचा हबका देऊन परतून भाजी मोकळी करावी.

Tuesday, 6 March 2018

सावधान ! पैशाने आरोग्य नाही विकत घेता येत !



माझा एक जवळचा मित्र सिव्हिल इंजिनीअर आहे व एका जागतिक दर्जाच्या परदेशी बांधकाम कंपनीत मोठ्या हुद्यावर नोकरी करत आहे.एकदा वैतागून त्याने मला सांगितले की या नोकरीमुळे तो कामात एव्हढा व्यस्त असतो की त्यामुळे त्याला खाण्यापिण्याच्या वेळाही पाळता येणे शक्यच होत नाही. पंचतारांकित हॉटेल मध्ये वरचेवर रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या व्यावसायिक बैठकांमुळे (Business Parties) होणारी सततची जागरणं ,धूम्रपान,मद्यपान हे टाळता येणे शक्य नव्हते. वेळच्या वेळेला जेवण नाही. कंपांनीकडून कामाच्या वेळेबाबत सारख्या deadlines दिल्या जात असतात , त्या पाळल्या गेल्या नाहीत तर नोकरीची शास्वती नाही आणि बरंच काही.
तरुण असताना वाट्टेल तसे वागातांना काही वाटत नाही कारण तेंव्हा तुमची तब्येत ठणठणीत असते,काही होत नाही. मात्र एकदा का चाळीशी आली की एकेक आजार होऊ लागतात.आता बायको आहे , लहान मुलगा आहे तर शरीरच साथ देत नाही सारखे कुरकुरते आहे.
तरुण असताना शरीराची हेळसांड (body abuse) केली जाते , जितकं जास्त अनिर्बंध वागू तेव्हडे आपण व्यवसायांत यशस्वी असं समजलं जाते.
आजकाल थोड्याफार फरकाने अशीच जीवनशैली (lifestyle) बऱ्याच उद्योग-व्यवसायांत आढळून येत असते.
पैसा हल्ली खोर्‍याने मिळत असतो ,आरोग्याचा विमाही असतो पण म्हणून आपण कसंही वागलं तर चालेल असं बऱ्याच जणांना वाटतं ,पण तसं नसतं.  पुन्हा वेड्या वाकड्या सवयी लावून घेऊ नयेत ,पुढे झेपत नाहीत .
Medical treatment आता आहे पण महाग पण खूप आहे.
Take care my young friends.