Search This Blog

Monday, 16 November 2020

कंपोस्ट -बायोकल्चर-विरजण

 

 कंपोस्ट -बायोकल्चर-विरजण

सर्व प्रकारच्या निसर्गनिर्मित सेंद्रिय पदार्थांचे जैविक विघटन होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेलाच आपण कंपोस्ट करणे असे म्हणतो.

असे कंपोस्ट करतांना विरजण म्हणून गुळाचे पाणी,शेणाचा काला, जिवामृत,घरी बनवलेली विविध प्रकारची इंजाईम्स,गांडूळे, दही-ताक ,कुजवट कचरा , हिंग ,मोठ्या झाडाच्या बुंध्या सभोवतालची माती , वेस्ट-डिकंपोजर ,जिवामृत,,आपणच घरी बनवलेले कंपोस्ट,अगर बाजारात उपलब्ध असणारे अत्यंत महागडे कल्चर यापैकी काहीही वापरले तरी चालते .कारण याचा विराजाण म्हणून आपण करत असलेला वापर हा मुख्यत्वे अल्प कालावधीत सूक्ष्म जिवाणूंची (बक्टेरियाची) वाढ अनेक पटींनी (Multiple) व्हावी जेणेकरून कंपोस्ट प्रकियेला गती मिळून ते लवकरतयार होईल या उद्देशाने केलेला असतो.









Sunday, 15 November 2020

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '

 

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '


आजकाल सर्वत्र फ्लॅट संस्कृती स्वीकारलेली आढळून येत असली तरी प्रत्येकास आपली स्वत:ची छोटीशीच का होईना पण बाग असावी अशी आंतरिक इच्छा तर असतेच ना. हौस म्हणून फळ झाडे नाही तरी किमान काही छोटी छोटी फुलझाडे तरी आपल्या या बागेत असावीत असे प्रात्येकालाच वाटत असते . ही हौस फ्लॅटमधील गॅलरीमध्ये कुंडय़ांत फुलझाडे लावून पूर्ण करायचा आपला नेहमी प्रयत्न असतो.. आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीतील कुंडय़ांमध्ये आपण हौसेने फुललेली जास्वंद देवाला वाहताना, फुललेला गुलाब किंवा सोनचाफा/अबोली/मोगरा/मदनबाण केसांत माळताना, आमटीला किंवा कढीला फोडणीसाठी आपल्याच कुंडीतील कढीपत्ता घालताना, चटणी-भाजीसाठी आपल्या बागेतील मिरचा,आले,पुदिना अथवा कोथंबिर वापरताना गृहिणीला होणारा अवर्णनिय आनंद हा प्रत्यक्षांत अनुभवयाचा असतो, तो शब्दांत सांगता येत नाही.

आपले घर कितीही छोटे असो किंवा मोठ्ठा बंगला असो , त्यामध्ये किमान एखादा छोटा का होईना,पण बागेचा हरित कोपरा तरी असावा, हे आपल्यापाकी बहुतेक प्रत्येकाचेच स्वप्न असते. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात बंगला किंवा मोठी घरे ही गोष्ट दुर्मीळच झाली आहे.त्यामुळे छोट्या जागेतच कल्पकतेनं सजावट करता येणे महत्त्वाचे आहे.
तुमची जागा कितीही लहान किंवा मोठी असो, तिथे एक सुंदर बगीचा कसा फुलवता येईल याचाच प्रत्येकजण विचार करत असतो. ह्याला आम्हीही अपवाद नाही.

आमचे आनंद-निधान म्हणजेच आमच्या ८५ वर्षांच्या जुन्या वाड्याच्या गच्चीवरील अवघ्या १०' x १५' आकाराच्या छोट्याशा गच्चीत आम्ही उभयतांनी उतारवयांत मोठ्या कष्टाने स्वयंपाक घरातल्या ओल्या कचर्याचा वापर करून फुलवलेली आम्हाला नंदनवनाची अनुभूती देणारी पर्यावरणपूरक संपूर्ण सेंद्रिय व जैविक बाग. ज्या बागेत १०० हून जास्त विविध प्रकारची फुलझाडे,फळझाडे ,भाजीपाल्याची आणि औषडी वनस्पतींची झाडे जोपासली आहेत.

कोणतीही बाग ही जरी एक बागच असली तरी आपल्या घरची अगदी छोटीशी असलेली बागही आपल्या साठी नंदनवनच असते. आपण स्वत: जिवापाड मेहनत घेऊन मोठ्या कष्टाने लावलेल्या व जिवापेक्षा जास्त जपून जोपासलेल्या आणि वाढवलेल्या घराच्या छोट्याशा गच्चीतील मातीविरहित बागेतून मनाला मिळणारा स्वर्गीय आनंद आणि समाधान याची काहीच तोड नसते. ती एक अवर्णनिय अशी अनुभूती असते. काही औरच... अगदी आईला आपल्या नवजात पहिल्या अपत्याकडे पाहिल्यावर जसं वाटतं ना अगदी तसचं आम्हाला आमच्या बागेकडे, बागेतल्या झाडा-फुलांकडे पाहिल्यावर वाटतं.... सकाळी उठलं अन झाडांपाशी एक तरी फेरी झाली नाही तर दिवसभर आगदी हुरहूर लागुण रहाते, अन एकदा का झाडांपाशी जाऊन,त्यांच्याशी मनीचं हितगुज करून आलं की दिवसभर कसं प्रसन्न वाटतं. हौसेला मोल नाही आणि मेहनतीला तोड नाही याची नित्य नवी प्रचिती येते.

कधी कधी फुललेली छोटी छोटी फुलेही मनाला अपार समाधान देऊन जातात , त्याचे मोलही नाही ठरवता येत. खरी श्रीमंती पैशांत कधीच नसते तर आमची बाग हीच आमची खर्या अर्थाने श्रीमंती आहे असे आम्हाला वाटते. आम्ही अशा संपत्तीचे स्वामी आहोत याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो.

प्रत्येकाच्या व्यक्तीगत आवडी-निवडीचे प्रतिबिंब त्यांच्या बागेत उमटते हे खरे... दैनंदिन रामरगाडयातुन आम्हाला जो काही मोकळा वेळ मिळतो त्यावेळी मन शांत ठेवण्याचे ठिकाण म्हणजे `आमची बाग आहे.

माझ्या आनंदाचे गोत्र , ओल्या मातीलाही कधी, येई सुगंध.

आमची बाग म्हणजे आमचे ' आनंदनिधान ' आहे.

आमच्या या छोट्याशा नंदनवनांत भलेही गुलाबांचे किंवा अन्य फुलांचे भरगच्च ताटवे नसतील पण जे काही फुलते त्यांत आम्ही खूपच आनंदी आहोत.

यावेळी मला शांता शेळक्यांच्या कवितेतल्या खालील ओळी आठवतात.

सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास l
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास ll
पराग, देठ, सुवास, पाकळ्या फूल इतकीच देते ग्वाहीl
अलग अलग करू जाता हाती काही उरत नाही ll

आम्ही तर खात्रीने सांगू की ह्या झाडा फुलांनी आम्हांला समृद्ध केल.. #जगायची #इच्छा, #फुलण्याचा #ध्यास आणि देता येईल तेवढे #देण्याची #दानत ह्या गोष्टींनी आज आम्ही समृद्ध जीवन व्यतीत करत आहोत.






































Wednesday, 11 November 2020

मोहरीच्या पानांची भाजी

 

मोहरीच्या पानांची भाजी

 

 


मोहरीची आणि पालकयांची पाने स्वच्छ धुवू्न बारीक चिरून घ्यावीत व कढईमध्ये मऊ होईपर्यंत चांगली घोटून घोटून शिजवावी नंतर दोन चमचे मक्याचे किंवा चणा डाळीचे (बेसन) पीठ घालून घोटावी दूसरीकडे कढईमध्ये मोहरीचा तेलात बारीक केलेली आलं लसून हिरवी मिरची व कांदा चांगला परतावा , त्यामध्ये शिजलेली भाजी टाकावी नंतर परत कढईत तूप घेऊन त्यामध्ये अख्या लाल , हिरव्या मिरच्या टाकून तडका द्यायचा गरम गरम वाढतांना त्यामध्ये बटर किंवा लोणी टाकायचं खूप छान होते ही भाजी करून नक्की बघा. पोळी, भाकरी किंवा मक्याच्या रोटी सोबत खा

 

टीप : मोहरीच्या पानांसोबत पालक पण टाकावा नाही तर उष्ण तापमान असलेल्या प्रातांत ही मोहरीच्या पानांची भाजी उष्ण पडते आणि पालक टाकल्याने मोहरीचा उग्र पणा पण कमी होतो. कोवळा पालक जुडी आणि राई जुडी असे प्रमाण घ्यावे
पालक पनीर ची भाजी बनवतो तशीही बनवता येते.

 अगदी साधी भाजी बनवता येते, मोहरीची पाने बारीक चिरून घ्यावी, कढई गॅस वर ठेऊन जिरे लसूण हिरवी मिरची बारीक तुकडे ची फोडणी करावी, पार कोरडी होईपरर्यंत शिजवावी, गरम गरम बाजरी किंवा ज्वारी च्या भाकरी सोबत खमंग लागते.

Monday, 14 September 2020

ज्वारीच्या भाकरीचा गोपाळकाला

 

ज्वारीच्या भाकरीचा  गोपाळकाला

 


 

या  गोपाळ काळ्यासाठी आदल्या रात्री चार भाकरी जास्त करून ठेवाव्यात.
सकाळी भाकरी मिक्सर मधून भरडसर फिरवून घ्यावी.

एका पसरट भांड्यात भाकरीची भरड काढून त्यात दोन वाट्या ताक किंवा एक वाटी दही एक वाटी पाणी घालून, थोडं घुसळून यात घालावं. एक वाटी दूध घालावं.

एक चमचा मीठ आणि तीन चार चमचे साखर घालावी.
हे प्रमाण ताक किंवा दही किती आंबट आहे त्यावर अवलंबून आहे. टेस्ट करून पहावं.

यात एक चमचा आंब्याचं लोणचं घालावं.

छोट्या फोडणीच्या भांड्यात चार मोठे चमचे तेल गरम करून त्यात भरपूर जिरं आणि एक दीड चमचा हिंग घालून फोडणी करावी. गॅस बंद करून फोडणीत तीन चमचे मिरचीचे लोणचे घालावे. मस्त घमघमाट सुटतो. मिरची तळली गेली की ही फोडणी भाकरीच्या काल्यावर पसरावी आणि परत सगळं एकजीव करून घ्यावे. कढीपत्ता आवडत असेल तर घालावा, आणखी सुंदर चव येते.

दहा मिनिटे झाकून ठेवावे.

तोपर्यंत काला फुगला तर गरजेनुसार परत थोडे ताक आणि दूध घालून सारखं करून घ्यावे.

शेवटी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून , हा काला खावा.

 

Monday, 11 May 2020

शेवयांचा उपमा

शेवयांचा उपमा

साहित्य : एक वाटी शेवया (शक्यतो हात-शेवया व जाड असाव्यात) , एक कांदा बारीक चिरून, एक टोमॅटो बारीक चिरून, भोपळी मिरची, श्रावणघेवडा आणि गाजर (सर्व भाज्या बारीक चिरून),अर्धी मूठ हिरवा मटार /वाटाणा ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे मोठाले तुकडे,अर्धा चमचा आल्याचा कीस,१०.१२ कढीपत्त्याची पाने (चिरून),एक चमचाभर लिंबाचा रस, चवीपुरती साखर,फोडणीसाठी दोन टेबलस्पून तेल, ) मोहरी , हिंग , जिरे,चवीनुसार मीठ,काजूचे तुकडे, शेंगदाणे, सजावटीसाठी ओलं खोबरं , चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव,चार वाट्या पाणी
कृती : प्रथम गॅसवर एका पातेल्यात चिमुटभर मीठ घालून चार वाट्या पाणी उकळायला ठेवावं, पाणी खळखळून उकळलं की त्यात भाजून घेतलेल्या शेवया टाकव्या. शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात.
चिरलेल्या भाज्या म्हणजेच भोपळी मिरची, श्रावणघेवडा आणि गाजर प्रथमच थोडया वाफवून घ्याव्यात.
आता गॅसवर एका कढाईत फोडणीसाठी तेल तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी , जिरं , कढीपत्ता , आलं-मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात चिरलेल्या कांद्याच्या फोडी घालावयात,व परतून कांदा पारदर्शी झाल्यावर त्यात श्रावण घेवडा , गाजर आणि मटार घाला, नंतर भोपळी मिरची घालावी व परतून घ्यावे,मग शेंगदाणे घालून परतून घ्यावेत.टाटा टोमॅटोच्या फोडी घालून परतून घ्या. सगळ्यात शेवटी शिजवून निथळत ठेवलेल्या शेवया घालाव्यात व पुन्हा एकदा परतावे. मग मीठ , साखर , लिंबूरस व काजुचे तुकडे घालून परतून घेऊन कढईवर झाकण ठेऊन व गॅस मंद करून एक वाफ काढून घ्यावी व गॅस लगेच बंद करावा.
सर्व्ह करतेवेळी वरून खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व बारीक शेव पेरून हा शेवयांचा उपमा खायला द्या.

Thursday, 23 April 2020

तांदुळाच्या कण्यांच्या ओल्या फेण्या (पापड्या)




तांदुळाच्या कण्यांच्या ओल्या फेण्या (पापड्या)



आज सकाळी नाष्टा म्हणून लहानपणी खूप खाल्लेल्या वाफावलेल्या तांदळाच्या ओल्या पापड्या (यांनाच फेण्या असेही म्हणतात) केल्या होत्या. पांच-सहा वर्षांपूर्वी नोटा बंदी असतांना या आवडत्या पापड्यासाठी मुद्दाम तुळशिबागेत जाऊन एक स्टेनलेसस्टीलचा १२ प्लेट्सचा पापड्यांचा स्टँड खरेदी केला होता. (पूर्वी आमच्या बालपणी आमची आई रॉकेल तेल, गोडे-तेलाच्या लोखंडी डब्याची व हिंगाच्या पत्र्याच्या डब्यांची झाकणे वापरत असे)
त्याचीच  ही रेसिपी
साहित्य : दोन वाट्या तांदुळाच्या कण्या,एक टेबलस्पून खसखस,चवीनुसार मीठ,भरडलले जिरे,वाटीभर दही.
कृती : सुरवातीला तांदुळाच्या कण्या धुवून घ्याव्यात. एका पातेल्यात तांदुळाच्या कण्यांच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात तांदूळ भिजत घालून  तीन दिवस या तांदुळाच्या कण्या तशाच झाकून ठेवाव्यात.(पाणीसुद्धा बदलू नये)
तिसर्‍या दिवशी कण्यांना आंबूस वास येयू लागतो.
तांदूळाच्या कण्या आंबण्यास सुरवात झाली की चौथ्या दिवशी या तांदुळाच्या कण्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. धुतलेल्या तांदुळाच्या कण्या चाळणीवर गाळून त्यातील पाणी काढून टाकावे व मिक्सर ग्राइंडर वर वाटून घ्याव्यात. वाटताना त्यात अजिबात पाणी घालू नये. त्या  घट्टच वाटाव्यात.हे वाटलेले तांदुळाच्या कण्यांचे  पीठ नेहमीच्या इडलीच्या पिठाइतके घट्ट असावे.
नंतर त्यात चमचाभर खसखस,चमचाभर भरलेले जिरे  आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून छान करावे. हे झाले फेण्यांचे  पीठ (batter) तयार.
आता या पिठाच्या ओल्या फेण्या करायच्या वेळी प्रथम स्टँड मधील ताटल्यांना दह्याचाकिंवा तेलाचा  हात लावून घ्यावा. नंतर ताटल्यांवर डावाने ओले पीठ (batter) पसरून घालावे एका स्टँड मध्ये ६ ताटल्या मावतात. ताट्ल्यांवर पसरून घातलेले पीठ (batter) खूप जाड अथवा पांतळ असू नये.
ढोकळ्याच्या /इडल्यांच्या कुकर मध्ये ,आणि कुकर नसेल तर एका मोठ्या पातेल्यात  मध्ये तळाशी पाणी घ्यावे व ते पातेले गॅसवर त्यात पाणी उकळण्यासाठी ठेवावे.
पातेल्यातील पाण्याला उकळी आली की फेण्यांच्या ताटल्यांचा स्टँड पातेल्यात ठेवावा व झाकण लावावे.
१० - १५ मिनिटांनी झाकण काढावे व गरम गरम फेण्या ताटल्यावरून सोडवून काढाव्यात आणि दह्याबरोबर सर्व्ह कराव्यात.

काही महत्वाच्या सूचना :
१) फेण्या करण्यासाठी तांदूळ / कण्या आंबणे खूप गरजेचे आहे.
२) आवडत असल्यास या पिठाला तुम्ही मिरची-कोथिंबीचे वाटण  (पेस्ट) लावू शकता.
३)  या फेण्यांचा स्टँड  भांड्यांच्या दुकानात मिळू शकेल. पुण्यात तुळशीबागेत तर नक्कीच मिळायला हावाच.