काल गुढी पाडव्याचा सण असल्यामुळे जेवणात उकडलेल्या बटाट्याची मसाला डोसा पद्धतीची भाजी केळी होती.
दोन्ही वेळेस ती खाऊन सुद्धा बरीच शिल्लक उरली होती.
मग आज त्याच आलू (बटाटा) भाजीचा वापर करून नाश्त्यासाठी चमचमीत टेस्टी आलू पराठे केले होते.
साहित्य : सारणासाठी : दोन मोठे उकडलेले बटाटे,एक चमचा आले-हिरवी मिरचीची पेस्ट,चवीनुसार मीठ,अर्धी वाटी तेल.
आवरणासाठी : दोन वाट्या कणीक,तेल , मीठ व गरजेनुसार पाणी.
कृती : उकडलेले बटाटे किसून ठेवा.
एका परातीत पारीसाठी (आवरणासाठी) कणीक घ्या,त्यात मीठ , तेल व जरूर तेव्हढेच पाणी घालून नेहमी पराठ्यासाठी भिजवतो त्याप्रमाणे कणकेचे आरवरणाचे पीठ भिजवून ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्या गरम तेलात आले-हिरवी मिरचीची पेस्ट घालून दोन मिनिटे परतून नंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या व ३-४ मिनिटे परतून घेऊन गॅस बंद करा. थंड झाल्यावर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्या. पराठ्याचे सारण तयार आहे.
भिजवून तयार ठेवलेल्या पिठाचा एक लाडवा एव्हढा गोळा पोळपाटावर लाटून त्यात तयार करून ठेवलेले सारण भरा व पराठा लाटून घेऊन तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून काढा. पराठा भाजतांना बाजूंनी थोडे तेल सोडा.
गरम पराठे दही व हिरव्या कोथिंबीरीच्या चटणीसोबत आणि चटणी नसेल तर सॉस सोबत सर्व्ह करा.
हे आलू पराठे खूपच स्वादिष्ट लागतात.
No comments:
Post a Comment