Search This Blog

Wednesday, 3 September 2025

#काकडीचे_खुसखुशीत_मुटके

 #काकडीचे_खुसखुशीत_मुटके



साहित्य : एक मध्यम आकाराची खिरा काकडी,भाजणीचे पीठ,बेसन पीठ,कॉर्न
फ्लोअर,एक बारीक चिरलेला कांदा, गोडा मसाला,शेंगदाण्याचे कूट,पांढरे तीळ,जिरे पूड, हिरव्या मिरच्या,लसूण, आले, कोथिंबीर यांचे वाटण,लिंबाचा रस, मीठ,साखर,हळद,हिंग,कडकडीत तेलाचे मोहन
कृती : प्रथम काकडीची साले काढून घ्या. दोन्ही बाजूचे शेंडे कापून टाका. आता सालं काढलेली काकडी किसून घ्या आणि कीस दोन्ही हातांनी पिळून त्यातील पाणी काढून टाका. (हे पाणी सुपमध्ये वापरा)
आता एका थाळीत तो कोरडा केलेला काकडीचा कीस घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, गोडा मसाला,शेंगदाण्याचे कूट,पांढरे तीळ,जिरे पूड , हिरव्या मिरच्या,लसूण, आले, कोथिंबीर यांचे वाटण,लिंबाचा रस, मीठ,साखर,हळद,हिंग,कडकडीत तेलाचे मोहन व जरूरी प्रमाणे भाजणीचे पीठ,बेसन पीठ व कॉर्न फ्लोअर घालून मळून घ्या.
आता त्यांचे छोटे छोटे गोळे करून त्यांचे मुटके वळा.
गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात हे मुटके टाकून मुटके सोनेरी रंगावर तळून काढा.
लोणी किंवा पातळ हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.
टिप : जेवणात साइड डिश म्हणून हे खुसखुशीत काकडीचे सर्व्ह करू शकता.

Saturday, 23 August 2025

#मिक्स_व्हेजिटेबल_सुप

आजच्या जेवणापूर्वी भूक प्रज्वलित व्हावी यासाठी घ्यायचे अॅपेटायजर #मिक्स_व्हेजिटेबल_सुप



अतिशय पौष्टिक आणि जेवणाअगोदर प्यायल्यामूळे भूक वाढवणारे (Appetizer) असे हे स्वीट कॉर्न मिक्स व्हेजिटेबल सूप (Sweet Corn Mix Vegetable Soup) घरच्या घरीच बनवायला अतिशय सोप्पे आहे.
साहित्य : एक वाटी अमिरिकन कोवळे मक्याच्या कणसाचे दाणे (स्वीट कॉर्न) , गाजराचा कीस किंवा बारीक चिरलेले तुकडे ,फ्लॉवरचे बारीक चिरलेले तुकडे ,कोबीचा कीस,मटारचे दाणे,कांदापात व लसूणपात दोन्ही बारीक चिरून , दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर , दोन टेबल स्पून अमूल बटर , दोन चीज क्यूब (किसून)
कृती : गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये अमेरिकन कोवळे मक्याच्या कणसाचे दाणे अमूलच्या बटर मध्ये परतून व नुसत्या वाफेवर उकडून घ्या नंतर आणखीन अमूल बटर घालून गाजराचा कीस किंवा बारीक चिरलेले तुकडे ,फ्लॉवरचे बारीक चिरलेले तुकडे ,कोबीचा कीस,मटारचे दाणे,कांदापात व लसूणपात सुद्धा परतून व वाफवून घ्या.
दुसरीकडे गॅसवर कॉर्नफ्लावर व पांच कप पाणी घालून उकळायला ठेवा. पांच मिनिटे उकळून दाटपणा आल्यावर त्यात फ्रायपॅन मध्ये वाफवून ठेवलेले मका दाणे व इतर भाज्या घाला आणि ५ मिनिटे शिजू द्या.
५ मिनीटे शिजवल्यावर गॅस बंद करून वर किसलेले चीज टाका.

गरम-गरम पौष्टिक स्वीट कॉर्न मिक्स व्हेजिटेबल सूप बाऊलमधून सर्व्ह करा. 

पोह्याचे जाळीदार डोसे

 पोह्याचे जाळीदार डोसे



पोहे – १ मूठ भरून

दही – अर्धी वाटी

बेकिंग सोडा – अर्धा चमचा किंवा इनो पावडर

रवा – पाव वाटी

पाणी- जरुरीनुसार

मीठ – चवीनुसार

आले,लसूण,मिरची व कोथिंबीर यांचे वाटण 

 

कृती : एका पॅनमध्ये पोहे घेऊन त्यात रवा , दही आणि आले,लसूण,मिरची व कोथिंबीरीचे वाटण एकत्र करून  

त्यात  चवीनुसार मीठ घालून बनवून १५-२० मिनिटे मुरत ठेवा.

मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.

यानंतर बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

तव्यावर डावाने जाळीदार डोसे घाला.

  पोह्याचे जाळीदार डोसे तय्यार !

विशेष सूचना : तव्यावर डोशाचे मिश्रण टाकण्याआधी तेल तव्याला लावायला विसरू नये, जेणेकरून तव्याला डोसे चिकटणार नाहीत.


Wednesday, 13 August 2025

मेतकूट पोहे

 #मेतकूट_पोहे



मेतकूट पोहे करायला अगदी सोप्पे असतात.
साहित्य :आपले नेहमीचे कांदा पोह्याचे जाड पोहे,मेतकूट,दही किंवा लिंबाचा रस,मिरच्या,साखर,मीठ,कोथिंबीर,फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद
कृती : प्रथम एका चाळणीत पोहे घालून स्वच्छ धुवून घ्या आणि ५ मिनिटे पाणी निथळत ठेवा.
पाणी निघून गेले की त्यात मेतकूट,चवीनुसार बारीक चिरून हिरव्या मिरच्या,साखर,मीठ,दही किंवा लिंबाचा रस घालून हाताने कालवा व छान मिक्स करून ५ मिनिटे मुरत ठेवा.
दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या आणि तेल चांगले तापले की त्यात मोहरी,जिरे व शेवटी हळद घालून तडका फोडणी बनवा. आता त्यात मसाला लावून मुरत ठेवलेले पोहे घालून कलथ्याने हालवत रहा व फोडणीत छान परतून घ्या.
आता त्या पोह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा. पोहे वाफेवर छान शिजू द्या.
५ मिनिटांनी पॅन वरचे झाकण काढून डिशमध्ये पोहे काढा आणि सर्व्ह करा.
मेटकूटामुळे पोह्याला एक वेगळीच चव येते.

Sunday, 10 August 2025

भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी


भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी



 

 


आज सकाळी नाश्त्यासाठी आम्ही केली होती भिजवलेला साबुदाणा,काकडीचे काप ,कच्च्या बटाट्याचा कीस यांची खिचडी. एकदम अफलातून झाली होती.

त्याचीच ही सचित्र रेसीपी येथे शेअर करत आहे.   

साहित्य : साबुदाणा (५-६ तास भिजवून) ,काकडी (चिरून बारीक तुकडे),कच्चा बाटा (किसून) ,शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर (बारीक चिरून) ,लिंबाचा रस,साखर,तिखट व मीठ,फोडणीसाठी संजून तूप ,जिरे व फोडणीचे इतर साहित्य

कृती : ५-६ तास छान भिजवलेला साबुदाणा,एका कच्च्या बटाट्याचा कीस, एक काकडी बारीक शिरून,कोथिंबीर बारीक चिरून ,शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट,साजूक तूप ,जिरे

एका मोठ्या स्टीलच्या तसराळ्यात भिजवलेला साबुदाणा,कचहया बटाट्याचा कीस आणि बारीक चिरलेली काकडी व कोथिंबीर,शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट सगळे एकत्र करून हाताने चांगले मिक्स करून मुरण्यासाठी झाकून ठेवावे.

गॅसवर एका पॅन  मध्ये फोडणीसाठी तूप घालून ते चांगले तापले की त्यात जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात मुरत ठेवलेले साबुदाणा आणि इतर वस्तू मिक्स करून ठेवलेले सारण घालून कलथ्याने छान  परतावे. पॅनवर झाकण ठेवून छान वाफ काढून साबुदाणा शिजवून घ्यावा.

पुन्हा त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.

वाफ जिरली  की झाकण काढून कलथ्याने एकदा परतून घेऊन खिचडी सर्व करावी .

टिप : असेल तर वर ओल्या नारळाचा चव भुरभुरावा.

आम्ही आजची खिचडी बायो-गॅसवर केली

Sunday, 27 July 2025

कारल्याचे चटकदार पंचामृत

 

  आज सकाळी फ्रीज उघडल्यावर दोन कारली दृष्टीस पडली. आणि मनात आले की आज यांचाच वापर करावा आणि डावीकडे तोंडिलावणे म्हणून कारल्याचे पंचामृत बनवावे.

मग काय काढली फ्रीजमधून कारली बाहेर आणि अक्षरश: १५ मिनिटांत बनवून टाकले "कारल्याचे चटकदार पंचामृत"
त्याचीच ही सचित्र रेसीपी मी आज येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.

#कारल्याचे_चटकदार_पंचामृत
साहित्य : दोन मध्यम आकाराची कारली , पाव वाटी गोटा (सुक्या) खोबर्याचे पातळ काप , अर्धी वाटी पांढरे तीळ , अर्धी वाटी शेंगदाण्याचे भरड कूट (अर्धेगोबडे) ,अर्धी वाटी चिंचेचा कोळ काढून , चवीनुसार ५ – ६ हिरव्या मिरच्या , ८-१० कढी पत्त्याची पाने , गुळाचा एक मोठ्ठा खडा , चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद व हिंग
कृती : प्रथम बिया काढून कारली बारीक चिरून व धुवून घट्ट पिळून घ्यावीत. नंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून घ्या व तेलाची हिंग, हळद,मोहरी, कढीलिंब घालून तडका फोडणी करा आणि त्यात बारीक चिरलेली कारली व पाणी घालून चांगले शिजवून घ्या. मग चिंचेचा कोळ,तिळाचे कूट, दाण्याचे कूट व खोबऱ्याचे काप शिजत आलेल्या कारल्यात घालावेत. नंतर त्यात चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे मीठ व गूळ घालावा. चांगले शिजल्यावर कारल्याचे पंचामृत तयार होते.

Monday, 19 May 2025

झटपट आंबा सरबत

 

झटपट आंबा सरबत

 


घरात जर साखरांबा असेल तर चार चमचे साखरांबा घ्या, त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक ग्लास पाणी व थोडा बर्फ घालून ढवळा, छान सरबत होते,त्यातच अननसाच्या बारीक फोडी टाकल्यास फारच उत्तम चव येते.

 नुकतीच आमच्या कोकणातील 'अनीता फार्म' वरुन जावयांनी हापुसच्या आंब्याची पेटी पाठवली होती.

तेंव्हापासून आम्ही त्या पेटीतल्या हापुसच्या आंब्यांचा वापर करून रोज एक नवा पदार्थ बनावट आहोत.
परवा संकष्टी चतुर्थीला उपास सोडतांना काहीतरी गोड करण्या साठी आमच्या नातीने हापुसच्या आंब्याचा गोडाचा 'शिरा' केला होता.
त्याचीच ही सचित्र रेसीपी मी येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.
साहित्य : चार वाट्या बारीक रवा,दीड वाटी साजुक तूप, तीन वाट्या साखर, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या हापूस आंब्याचा रस,अर्धा छोटा चमचा वेलची पूड,सजावटीसाठी वाटीभर हापूस आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी , ५-६ काजू पाकळ्यांचे काप, ५-६ बदामांचे काप,१०-१२ बेदाणे.
कृती : गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात बारीक रवा मंद आचेवर गुलाबी रंगावर खमंग आणि खरपूस भाजल्याचा सुवास सुटे पर्यंत भाजून घ्या.दुसऱ्या भांड्यात पाणी उकळून घेऊ ते भाजलेल्या रव्यात घाला.रवा शिजून घट्ट होऊ लागला की त्यात साजूक तूप, साखर आणि हापुसच्या आंब्याचा रस घालून झार्याने ढवळून व मिक्स करून घ्या व अजून थोडा वेळ शिजवा. वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करून दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्या.
सर्व्हिस प्लेटमध्ये वाटीने गरमागरम शिरा मुदीसारखा काढून घ्या व वर हापूस आंब्याचे छोटे तुकडे आणि काजू,बदामांचे काप आणि बेदाणे यांनी सजावट करून नंतर गरमागरम सर्व्ह करा.

Saturday, 17 May 2025

ज्वारीचे आप्पे

 

ज्वारीचे आप्पे



नाश्त्यात  ज्वारीचा समावेश केल्याने शरीरातील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तर ज्वारीचे सेवन केल्याने शरीरास प्रोटिन्स देखील उपलब्ध होतात. ज्वारीच्या भाकरी सोबतचं ‘ज्वारीचे आप्पे' तुम्ही कधी खाल्ले आहेत का?

नाही ना, मग ही रेसिपी तुमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चमचमीत 'ज्वारीचे आप्पे' कसे बनवायचे याची रेसिपी.

ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

एक वाटी ज्वारीचे पीठ

एक  गाजर (किसून)

एक कांदा (बारीक चिरून)

चवीनुसार हिरवी मिरची (बारीक चिरून)

इनोज फ्रूट सॉल्ट (अर्धे पाउच)

मूठभर पोहे (भिजवलेले)

खोबर्याचे तुकडे किंवा ओल्या खोबऱ्याचा चव

अर्धी वाटी दही

एक चमचा आले आणि लसूण पेस्ट

मूठभर कोथिंबीर (बारीक चिरलेली)

एक चमचा तिखट मसाले

ज्वारीचे आप्पे बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एक मोठा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरुन घ्या. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेले गाजर, आले लसूण हे एकत्र करून घ्या. त्यात ज्वारीचे पीठ घालून ते एकत्र मिसळून घ्या. गरजेनूसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या. यानंतर त्यात दही घालून पीठ १५-२० मिनीटे मुरण्यासाठी बाजूला ठेवा. नंतर त्यात पोहे घालून मिश्रण एकत्रीत करा. त्यात इनो टाका.

आता आप्पे पात्राला तेल लावून तयार केलेल मिश्रण आप्पे पात्रात थोडे थोडे टाका. आप्पे पूर्ण शिजल्या नंतर गरम गरम आप्पे पूड  चटणीसह एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही गरम गरम ज्वारीचे आप्पे खाऊन  त्यांचा आनंद घेऊ  शकता.

Saturday, 5 April 2025

आंबट गोड तिखट चटकदार चवीचा नवीन पदार्थ ,'कांदा-काकडी-कैरीचा चटकदार तक्कू'

 #कांदा_काकडी_कैरीचा_चटकदार_तक्कू




गुढी पाडव्याच्या सुमारास मंडईत कच्च्या कैऱ्या येण्यास सुरवात झालेली असते. भाव जरा जास्तच असतात.
मी सोबतच्या फोटोत दाखवलेली कैरी घेतली त्याला रु.५०/-मोजावे लागले.तर फोटोत दाखवलेली तवस खिरा काकडी रु.३०/- ला मिळाली.
करी आणि काकडी दोन्हीही इतकी महाग असूनही मला ‘तक्कू’ ची जबरदस्त याद आलेली असल्याने महागाईकडे काना-डोळा करून मी कच्ची कैरी व काकडी. दोन्ही घेतल्या.
घरी आल्यावर विलंब न करता लगेचच कांदा-काकडी-कैरीचा चटकदार तक्कू बनवला आणि मनसोक्त आस्वाद घेत खाल्ला.
त्याचीच सचित्र रेसीपी येथे शेअर करत आहे.
आंबट गोड तिखट चटकदार चवीचा नवीन पदार्थ ,'कांदा-काकडी-कैरीचा चटकदार तक्कू'
साहित्य- एक कैरी, एक काकडी, एक कांदा , दोन चमचे लाल मिरचीचे तिखट, एक चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव वाटी तेल, चवीनुसार मीठ ,किसलेला गूळ व साखर.
कृती- कैरी व काकडी दोन्हींची साले काढून किसून घ्या. त्यात कांदा सोलून व किसून घाला. तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी घालून मंद आचेवर हळद, तिखट तळून घ्या व हे तळलेली फोडणी किसलेल्या कैरी, काकडी, कांदा यांच्या किसावर घाला. चवीनुसार लिंबाचा रस,गूळ,साखर व मीठ घालून मिक्स करा. झटपट चटकदायर तक्कू तयार!

Monday, 31 March 2025

आलू पराठे

 


काल गुढी पाडव्याचा सण असल्यामुळे जेवणात उकडलेल्या बटाट्याची मसाला डोसा पद्धतीची भाजी केळी होती.

दोन्ही वेळेस ती खाऊन सुद्धा बरीच शिल्लक उरली होती.
मग आज त्याच आलू (बटाटा) भाजीचा वापर करून नाश्त्यासाठी चमचमीत टेस्टी आलू पराठे केले होते.
त्याच आलू पराठ्यांची सचित्र रेसीपी येथे शेअर करत आहे.
साहित्य : सारणासाठी : दोन मोठे उकडलेले बटाटे,एक चमचा आले-हिरवी मिरचीची पेस्ट,चवीनुसार मीठ,अर्धी वाटी तेल.
आवरणासाठी : दोन वाट्या कणीक,तेल , मीठ व गरजेनुसार पाणी.
कृती : उकडलेले बटाटे किसून ठेवा.
एका परातीत पारीसाठी (आवरणासाठी) कणीक घ्या,त्यात मीठ , तेल व जरूर तेव्हढेच पाणी घालून नेहमी पराठ्यासाठी भिजवतो त्याप्रमाणे कणकेचे आरवरणाचे पीठ भिजवून ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्या गरम तेलात आले-हिरवी मिरचीची पेस्ट घालून दोन मिनिटे परतून नंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या व ३-४ मिनिटे परतून घेऊन गॅस बंद करा. थंड झाल्यावर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्या. पराठ्याचे सारण तयार आहे.
भिजवून तयार ठेवलेल्या पिठाचा एक लाडवा एव्हढा गोळा पोळपाटावर लाटून त्यात तयार करून ठेवलेले सारण भरा व पराठा लाटून घेऊन तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून काढा. पराठा भाजतांना बाजूंनी थोडे तेल सोडा.
गरम पराठे दही व हिरव्या कोथिंबीरीच्या चटणीसोबत आणि चटणी नसेल तर सॉस सोबत सर्व्ह करा.
हे आलू पराठे खूपच स्वादिष्ट लागतात.

Sunday, 30 March 2025

#गुढीपाडवा_स्पेशल #आमरस_केळी_प्रसादाचा_गोड_शिरा

 आज नाव वर्षांचा पहिला दिवस-चैत्र-पाडवा म्हणजेच गुढी पाडव्याचा मुहुर्ताचा आद्य सण !

जेवणात द वर्षी प्रमाणे श्रीखंड न करता काहीतरी हटके करावे असा विचार मनात आला.
म्हणून मग आजच्या सणाला , कोकणारतील रत्नागिरीच्या परांजपे आंबेवाल्यांकडून घेतलेला हापसच्या आंब्याचा रस व काल सौ.ना राम मंदिरात भजनाचे वेळी मिळालेली केळी यांचा वापर करून साजूक तुपातला प्रसादाचा शिरा केलाय.
त्याचीच ही सचित्र रेसीपी येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.
साहित्य : सव्वा वाटी बारीक रवा, सव्वा वाटी रत्नागिरी हापूस आंब्याचा रस,सव्वा केळे, सव्वा वाटी साजूक तूप,सव्वा वाटी साखर,सव्वा वाटी दूध,केशराच्या ४-५ काड्या, ५-६ काजू पाकळ्या,५-६ बेदाणे,वेलची पूड,बारीक चमचा श्रीखंड किंवा जिलबीचा खाद्य रंग.
कृती : आगोदर मिक्सरच्या ताकाच्या भांड्यात दूध,केळ्याचे काप,आंब्याचा रस,साखर,वेलची पूड व खाद्य रंग घालून मिक्सरवर फिरवून साखर विरघळण्यासाठी बाजूला ठेवा.
आता गॅसवर एका फ्रायपॅन मध्ये साजूक तूप घालून त्यात काजू पाकळ्या व बेदाणे तळून काढा.
नंतर त्याच पॅन मध्ये आणखीन थोडेसे साजूक तूप घालून त्यात बारीक रवा घालून मंद आंचेवर झकास सोनेरी रंगावर सुवास येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. भाजताननाच हळू-हळू साजूक तूप घालत रहा.
रवा छान भाजून सुवास आला की आता त्यात मिक्सरवर फिरवून घेतलेले आमरस,केळी,साखर,दूध,वेलची यांचे द्रावण टाकून झाऱ्याने हालवत रहा. आवश्यकता वाटल्यास दूध घाला.
पॅन वर एक ताट झाकून झकास वाफ काढा. रवा शिजला की गॅस बंद करा.
एका वाटीत शिरा घालून डिशमध्ये मूद काढा.
मुदीवर वर केशराच्या काड्या आणि काजूच्या पाकळ्यांनी सजावट करा.

Saturday, 29 March 2025

मसाला भरली कारली

 

मसाला भरली कारली 

   











साहित्य : ताजी कारली २५० ग्राम,दोन कांदे (बारीक चिरून) ,३-४ लसूण पाकळ्या (बारीक चिरून) , ४-५ चमचे शेंगदाण्याचे भरड कूट,३-४ चमचे पांढरे तीळ (खरपूस भाजून)  ,२-३ चमचे चिंचेचा कोळ किंवा चटणी,३-४ चमचे गोडा मसाला,२ चमचे लाल तिखट,थोडीशी हळद,हिंग,चवीनुसार  साखर आणि किसलेला  गूळ व मीठ,५-६ चमचे कडकडीत तेलाचे मोहन आणि फोडणीसाठी तेल व इतर फोडणीचे साहित्य मोहरी,हिंग व हळद.

कृती : कारल्याचे दोन्ही बाजूचे शेवटचे  देठ कापून टाका व कारल्याचे अर्धा इंच रुंदीचे काप  करा व  चमच्याच्या मागील बाजूने कारल्याच्या प्रत्येक कापातील आतल्या  बिया व गर  काढून टाका आणि  कारल्याच्या कापांना  आतून-बाहेरून  चांगले चोळून मीठ लावून एका ताटात झाकून ठेवा.दुसर्‍या ताटात बारीक चिरलेरला कांदा, बारीक चिरलेरल्या लसूण पाकळ्या, पांढरे तीळ, धने-जिरे पावडर,गोडा मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद व हिंग,नुसार साखर आणि किसलेला गूळ व चवीनुसार मीठ,२-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून हाताने चांगले मिसळून घ्या व मसाला तयार करून ठेवा.

आता हा मसाला प्रत्येक कारल्याच्या कापात चांगला दाबून भरा. कारल्यात भरून उरलेला मसाला तसाच ठेवा.

 गॅसवर  एका उथळ फ्रायपॅन मध्ये  फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात क्रमाने मोहरी,हिंग व हळद घाला व एक मिनिट परतून घेऊन मग त्यात हलक्या हाताने ही मसाला भरलेली कारली ठेऊन द्या ,  उरलेला मसालाही घाला व उलथन्याने हलकेच हलवून घ्या व कढईवर झाकण ठेवून वाफेवर  कारली शिजवून घ्या. जशी ग्रेवही हवी असेल त्यानुसार पाणी घाला.

घडीच्या पोळी बरोबर ही मसाला भरलेली कारल्याची भाजी सर्व्ह करा.

जराही कडू लागत नाही.