Search This Blog

Monday, 11 August 2014

कुटाच्या (तळणीच्या) मिरच्या

कुटाच्या (तळणीच्या) मिरच्या



साहित्य :  हरभरा डाळ , मूग डाळ व उडीद डाळ प्रत्येकी एक चमचा ,दही, दहा चमचे गावरान इंदुरी धणे, पांच चमचे मोहरी, एक चमचा भाऊज कुटलेली बडीशेप, एक चमचा भाऊंन कुटलले जिरे , अर्ध्याचमचा आले-लसूण पेस्ट , एक चमचा मेथीदाणे, दोन चमचे हळद, दोन चमचे आमचूर पावडर, एक चमचा पावडर हिंग, अर्धा चमचा सैंधव मीठ , अर्धा चमचा साखर , चवीनुसार मीठ
कृती : डाळी १/२ तास भिजवून त्यात हळद, सैंधव आणि चमचाभर तेल घालून वाफवून गार कराव्या, त्यात बडीशेप, जिरे, मीठ, साखर घालून एकजीव करावे, धणे, मोहरी, मेथीदाणे, बडिशेप,जिरे हे  सर्व साहित्य एकत्र करून मिनिटभर भाजून घा व मग त्यात हळद, पावडर हिंग व आमचूर पावडर मिसळून मिक्सरमधून दळून पूड करा. तीन भाग दळलेला मसाला आणि दोन भाग मीठ  असे प्रमाण घेऊन त्यात सैंधव मीठ +साखर+आले-लसूण पेस्ट +वाटल्यास दही घाला,नाही घातले नाही तर चालेल. हा सर्व एकत्र करून मसाला करा. मंडईत खास तळणीसाथी योग्य म्हणून मिळणार्‍या जाड सालीच्या हिरव्या मिरच्यांना चीर देऊन आतून पोकळ करून घेऊन त्यात हा मसाला दाबून दाबून भरा व एका पसरट भांड्यात तेल सोडून मिरच्या लावाव्यात, वेळोवेळी उलटत झाकून वाफवून घ्याव्यात, शेवटी थोडावेळ उघड्या भांड्यात परतत चुरचुरीत करून घ्याव्यात, सुमारे २-३ मिनिटे लागतील, मग २-३ उन्हे देऊन खडखडीत वाळवा. तळतेवेळी ह्या मिरच्या आगोदर तेल लावून मगच तळाव्यात.





Thursday, 7 August 2014

खाराच्या मिरच्या

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)


साहित्य  :  अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची मसाला एक पाकीट , एक डझन लिंबे , ५० ग्राम आले , एक वाटी तेल.फोडणीसाठी मोहोरी, हळद,हिंग व मेथीची पूड

कृती  : प्रथम मिरच्या धुवून व स्वच्छ कापडाने  पुसून कोरड्या करून घ्याव्यात व विळीवर चिरून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चार लिंबांच्या फोडी करून घ्या.आल्याचे विळीवर किंवा सुरीने अतिशय बारीक तुकडे करून घ्या. मोहोरीची डाळ तेलात चांगली फेटून घ्या.
एका परातीत किंवा स्टीलच्या थाळ्यात मिरचयांचे तुकडे,आल्याचे तुकडे,लिंबाच्या फोडी , फेटलेली मोहोरीची डाळ , मिरची मसाला व मीठ घालून ते मिश्रण मोठ्या चमच्याने हलवून चांगले एकजीव करून घ्या व एका स्वच्छा व कोरड्या काचेच्या किंवा चीनी मातीच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरा. गॅसवर कढईत वाटीभर  तेल घेऊन चांगले कडकडीत तापल्यावर  त्यात मोहोरी,हळद,हिंग व मेथीची पूड घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर बरणीत भरलेल्या मिरच्यांवर ओता व चमच्याने हलवून बरणी झाकण लावून त्यावर दादरा म्हणून एका स्वच्छ फडक्याने बांधून कपाटात ठेवा. 

दोन तीन दिवसांनंतर बरणी उघडून पुन्हा एकदा चमच्याने हलवून तोंडी लावणे म्हणून खायला द्या.



Monday, 4 August 2014

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)

कच्च्या कैरीचा चुंदा (चटणी)



परवाचे दिवशी आम्ही मंडईत गेलो तेंव्हा कैर्‍या बघून तोंडाला एकदम पाणीच सुटले. मग आम्ही कैर्‍या विकत घेतल्या. काल कैरीची चटणी केली व आज कच्च्या कैरीचा चुंदा (आंबट-गोड चटणी) केली आहे त्याचीच रेसिपी पुढे देत आहे.
साहित्य : एक मोठ्ठी कैरी (किसून) ,चवीनुसार गूळ ,साखर,मीठ व लाल तिखट व फोडणीचे साहित्य तेल,मोहरी.जिरे,हिंग,मेथया दाणे व हळद.  
कृती : विळीवर कैरीची जाड साले काढून टाकावीत व कैरी किसून घ्यावी, एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कैरीचा कीस घेऊन त्यात चवीनुसार गूळ,साखर मीठ व तिखट घालून चमच्याने चांगले हलवून मिक्स करून तीन-चार तास मुरत ठेवावे. गॅसवर एका काढल्यात तेल तापवून घेऊन मोहरी,जिरे,मेथया दाणे ,हिंग व हळद घालून फोडणी करावी व ती  मुरलेल्या मिश्रणावर घालून पुन्हा एकदा चांगले हलवून घ्यावे.
जेवणात चटपटीत तोंडी लावणे म्हणून हा झटपट होणारा चुंदा कशाबरोबरही खायला फारच चटकदार व चविष्ट लागतो. शिवाय हा आठ-दहा दिवस छान टिकतोसुद्धा ! 

Thursday, 31 July 2014

खमंग दडपे पोहे

खमंग दडपे पोहे 

साहित्य : दोन वाट्या पातळ पोहे,. चार चमचे रिफाइंड तेल,फोडणीसाठी जिरे.मोहोरी,हळद,हिंग,चवीनुसार मीठ,पिठी साखर व हिरव्या मिरचयांचे तुकडे,बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन तळणीच्या मसाला भरलेल्या मिरचयांचे तुकडे,१०-१२ कढीपत्त्याची पाने,एक मोठा कांदा चिरून,अर्धी वाटी शेंगदाणे, दोन चमचे दही किंवा लिंबाचा रस,नारळाचा खवलेला चव व एक काकडी व एक टोमॅटो बारीक चिरून.
कृती :  गॅसवर एका कढईमधे तेल तापवून घेऊन त्यात शेंगादाणे तळून घ्यावेत, नंतर त्यातच जिरे ,मोहरी ,हिंग टाकून फोडणी करावी,नंतर कोथिंबीर, कडीपत्ता, कांदा, हिरवी आणि लाल तळणीची मिरची फोडणीत टाकून परतून घ्यावी,
परतल्यानंतर शेवटी त्यात हळद टाकावी.
मग एका स्टीलच्या मोठ्या पातेल्यात पातळ पोहे घेउन त्यावर बारीक चिरलेली काकडी,टोमॅटो,खवलेला ओल्या नारळाचा चव घालून एकदा कालवून घेऊन मग त्यावर ही कढईतील शेंगदाणे व इतर साहित्य घालून परतलेली फोडणी टाकावी,वरून दोन चमचे दही किंवा लिंबाचा रस घालून कालवून घ्यावे व पातेल्यावर एक घट्ट झाकण ठेवावे म्हणजेच ते ५ ते १० मिनिटे दडपून ठेवावे.डिश भरतेवेळी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे खमंग दडपे पोहे सर्व्ह करावेत. 

Wednesday, 30 July 2014

पुरण पुरी !!

पुरण पुरी !!!

साहित्य : अर्धा किलो चणा डाळ , अर्धा किलो गुळ , गव्हाचे पिठ , मिठ अर्धा चमचा, सुंठ इलायची जायफळ बडिशेप पावडर एक चमचा
तळण्यासाठी तेल
कृती : चणा डाळ पाणी मिठ घालून कूकरला शिजवून घ्या. त्यात थोडसे अर्धा कप गरम पाणी आणी गुळ घालून मिसळून घ्या. त्यात सुंठ इलायची जायफळ पावडर घालून मिसळून घ्या. त्यात मावेल एवढ गव्हाच पिठ घालून मळून घ्या. पांच मिनिटांनी या पिठाच्या पुर्‍या लाटून तळून घ्या.
या पुर्‍या बासुंदी किंवा आमरस सोबत छान लागतात तसेच त्या चार पाच दिवस छान टिकतातही. पिकनिक किंवा गावी जाताना न्यायला उत्तम !!

Sunday, 27 July 2014

मका कणसांच्या दाण्यांची भजी

मका कणसांच्या दाण्यांची भजी 



आज श्रावणमास प्रारंभ ! आजच अमेरिकन स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याची कोवळी कणसे आणली होती त्याचे दाणे काढून त्याची भजी केली होती म्हणून त्याचा फोटो व रेसिपी येथे देत आहे. 
मका कणसाच्या दाण्यांची भजी 
साहित्य : दोन वाट्या कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे  दाणे , अर्धी वाटी बारूक रवा, तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे बेसनपीठ , तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे  भाजणी ,चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट , एक चमचा जिरेपूड ,एक छोटा बारीक चिरलेला कांदा  मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ व भजी तळण्यासाठी तेल. 
कृती : मिक्सरवर  मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे) , भरडलेल्या दाण्यांत बारीक रवा,भाजणी, चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपूड, बेसनपीठ,बारीक चिरलेला कांदा व  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसारमीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
विशेष सूचना :
१) जर मक्याचे दाणे जून आहेत असे वाटले तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२बेसन पीठा बरोबर आपण इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) जर भजी तेलात फुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

Friday, 11 July 2014

रताळ्याची खीर

रताळ्याची खीर

काल गुरुवार १० जुलैला होती आषाढी द्वादशी,म्हणजेच एकादशीचे पारणे ! त्यासाठी आमच्या घराच्या गच्चीवरील मातीविरहीत बागेतून काढलेल्या रताळ्याची गोड खीर उपास सोडण्यासाठी३ केली होती. त्याचाच फोटो व साहित्य आणि कृती आज खाली देत आहे. 

साहित्य : एक मोठे रताळे,वाटीभर साखर,दोन मोठे चमचे साजूक तूप,दोन कप दूध,एक बारीक चमचा वेलची पूड,चार काजू,चार बदाम,चार बेदाणे
कृती : प्रथम रताळे चांगले धुवून घ्या,मग ते किसणीवर किसून घ्या,गॅसवर एका कढईत दोन चमचे साजूक तूप गरम करून घेऊन त्यात रताळयाचा कीस सोनेरी रंगावर परतून घ्या,मग त्यात दोन कप दूध खालून एक उकळी येऊ द्या,मग त्यात एक वाटी साखर घाला, आता त्यात एक बारीक चमचा वेलची पूड व चार काजू आणि चार बदाम तुकडे करून घाला,चार बेदाणेही घाला. रताळयाचा  कीस शिजल्यावर गॅस बंद करा.