Search This Blog

Sunday, 27 July 2014

मका कणसांच्या दाण्यांची भजी

मका कणसांच्या दाण्यांची भजी 



आज श्रावणमास प्रारंभ ! आजच अमेरिकन स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याची कोवळी कणसे आणली होती त्याचे दाणे काढून त्याची भजी केली होती म्हणून त्याचा फोटो व रेसिपी येथे देत आहे. 
मका कणसाच्या दाण्यांची भजी 
साहित्य : दोन वाट्या कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे  दाणे , अर्धी वाटी बारूक रवा, तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे बेसनपीठ , तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे  भाजणी ,चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट , एक चमचा जिरेपूड ,एक छोटा बारीक चिरलेला कांदा  मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ व भजी तळण्यासाठी तेल. 
कृती : मिक्सरवर  मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे) , भरडलेल्या दाण्यांत बारीक रवा,भाजणी, चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपूड, बेसनपीठ,बारीक चिरलेला कांदा व  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसारमीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
विशेष सूचना :
१) जर मक्याचे दाणे जून आहेत असे वाटले तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२बेसन पीठा बरोबर आपण इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) जर भजी तेलात फुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

No comments:

Post a Comment