Search This Blog

Saturday, 23 August 2025

पोह्याचे जाळीदार डोसे

 पोह्याचे जाळीदार डोसे



पोहे – १ मूठ भरून

दही – अर्धी वाटी

बेकिंग सोडा – अर्धा चमचा किंवा इनो पावडर

रवा – पाव वाटी

पाणी- जरुरीनुसार

मीठ – चवीनुसार

आले,लसूण,मिरची व कोथिंबीर यांचे वाटण 

 

कृती : एका पॅनमध्ये पोहे घेऊन त्यात रवा , दही आणि आले,लसूण,मिरची व कोथिंबीरीचे वाटण एकत्र करून  

त्यात  चवीनुसार मीठ घालून बनवून १५-२० मिनिटे मुरत ठेवा.

मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.

यानंतर बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

तव्यावर डावाने जाळीदार डोसे घाला.

  पोह्याचे जाळीदार डोसे तय्यार !

विशेष सूचना : तव्यावर डोशाचे मिश्रण टाकण्याआधी तेल तव्याला लावायला विसरू नये, जेणेकरून तव्याला डोसे चिकटणार नाहीत.


Wednesday, 13 August 2025

मेतकूट पोहे

 #मेतकूट_पोहे



मेतकूट पोहे करायला अगदी सोप्पे असतात.
साहित्य :आपले नेहमीचे कांदा पोह्याचे जाड पोहे,मेतकूट,दही किंवा लिंबाचा रस,मिरच्या,साखर,मीठ,कोथिंबीर,फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद
कृती : प्रथम एका चाळणीत पोहे घालून स्वच्छ धुवून घ्या आणि ५ मिनिटे पाणी निथळत ठेवा.
पाणी निघून गेले की त्यात मेतकूट,चवीनुसार बारीक चिरून हिरव्या मिरच्या,साखर,मीठ,दही किंवा लिंबाचा रस घालून हाताने कालवा व छान मिक्स करून ५ मिनिटे मुरत ठेवा.
दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या आणि तेल चांगले तापले की त्यात मोहरी,जिरे व शेवटी हळद घालून तडका फोडणी बनवा. आता त्यात मसाला लावून मुरत ठेवलेले पोहे घालून कलथ्याने हालवत रहा व फोडणीत छान परतून घ्या.
आता त्या पोह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा. पोहे वाफेवर छान शिजू द्या.
५ मिनिटांनी पॅन वरचे झाकण काढून डिशमध्ये पोहे काढा आणि सर्व्ह करा.
मेटकूटामुळे पोह्याला एक वेगळीच चव येते.

Sunday, 10 August 2025

भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी


भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी



 

 


आज सकाळी नाश्त्यासाठी आम्ही केली होती भिजवलेला साबुदाणा,काकडीचे काप ,कच्च्या बटाट्याचा कीस यांची खिचडी. एकदम अफलातून झाली होती.

त्याचीच ही सचित्र रेसीपी येथे शेअर करत आहे.   

साहित्य : साबुदाणा (५-६ तास भिजवून) ,काकडी (चिरून बारीक तुकडे),कच्चा बाटा (किसून) ,शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर (बारीक चिरून) ,लिंबाचा रस,साखर,तिखट व मीठ,फोडणीसाठी संजून तूप ,जिरे व फोडणीचे इतर साहित्य

कृती : ५-६ तास छान भिजवलेला साबुदाणा,एका कच्च्या बटाट्याचा कीस, एक काकडी बारीक शिरून,कोथिंबीर बारीक चिरून ,शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट,साजूक तूप ,जिरे

एका मोठ्या स्टीलच्या तसराळ्यात भिजवलेला साबुदाणा,कचहया बटाट्याचा कीस आणि बारीक चिरलेली काकडी व कोथिंबीर,शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट सगळे एकत्र करून हाताने चांगले मिक्स करून मुरण्यासाठी झाकून ठेवावे.

गॅसवर एका पॅन  मध्ये फोडणीसाठी तूप घालून ते चांगले तापले की त्यात जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात मुरत ठेवलेले साबुदाणा आणि इतर वस्तू मिक्स करून ठेवलेले सारण घालून कलथ्याने छान  परतावे. पॅनवर झाकण ठेवून छान वाफ काढून साबुदाणा शिजवून घ्यावा.

पुन्हा त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.

वाफ जिरली  की झाकण काढून कलथ्याने एकदा परतून घेऊन खिचडी सर्व करावी .

टिप : असेल तर वर ओल्या नारळाचा चव भुरभुरावा.

आम्ही आजची खिचडी बायो-गॅसवर केली

Sunday, 27 July 2025

कारल्याचे चटकदार पंचामृत

 

  आज सकाळी फ्रीज उघडल्यावर दोन कारली दृष्टीस पडली. आणि मनात आले की आज यांचाच वापर करावा आणि डावीकडे तोंडिलावणे म्हणून कारल्याचे पंचामृत बनवावे.

मग काय काढली फ्रीजमधून कारली बाहेर आणि अक्षरश: १५ मिनिटांत बनवून टाकले "कारल्याचे चटकदार पंचामृत"
त्याचीच ही सचित्र रेसीपी मी आज येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.

#कारल्याचे_चटकदार_पंचामृत
साहित्य : दोन मध्यम आकाराची कारली , पाव वाटी गोटा (सुक्या) खोबर्याचे पातळ काप , अर्धी वाटी पांढरे तीळ , अर्धी वाटी शेंगदाण्याचे भरड कूट (अर्धेगोबडे) ,अर्धी वाटी चिंचेचा कोळ काढून , चवीनुसार ५ – ६ हिरव्या मिरच्या , ८-१० कढी पत्त्याची पाने , गुळाचा एक मोठ्ठा खडा , चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद व हिंग
कृती : प्रथम बिया काढून कारली बारीक चिरून व धुवून घट्ट पिळून घ्यावीत. नंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून घ्या व तेलाची हिंग, हळद,मोहरी, कढीलिंब घालून तडका फोडणी करा आणि त्यात बारीक चिरलेली कारली व पाणी घालून चांगले शिजवून घ्या. मग चिंचेचा कोळ,तिळाचे कूट, दाण्याचे कूट व खोबऱ्याचे काप शिजत आलेल्या कारल्यात घालावेत. नंतर त्यात चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे मीठ व गूळ घालावा. चांगले शिजल्यावर कारल्याचे पंचामृत तयार होते.

Monday, 19 May 2025

झटपट आंबा सरबत

 

झटपट आंबा सरबत

 


घरात जर साखरांबा असेल तर चार चमचे साखरांबा घ्या, त्यात अर्धा चमचा मीठ आणि एक ग्लास पाणी व थोडा बर्फ घालून ढवळा, छान सरबत होते,त्यातच अननसाच्या बारीक फोडी टाकल्यास फारच उत्तम चव येते.

 नुकतीच आमच्या कोकणातील 'अनीता फार्म' वरुन जावयांनी हापुसच्या आंब्याची पेटी पाठवली होती.

तेंव्हापासून आम्ही त्या पेटीतल्या हापुसच्या आंब्यांचा वापर करून रोज एक नवा पदार्थ बनावट आहोत.
परवा संकष्टी चतुर्थीला उपास सोडतांना काहीतरी गोड करण्या साठी आमच्या नातीने हापुसच्या आंब्याचा गोडाचा 'शिरा' केला होता.
त्याचीच ही सचित्र रेसीपी मी येथे तुमच्या सोबत शेअर करत आहे.
साहित्य : चार वाट्या बारीक रवा,दीड वाटी साजुक तूप, तीन वाट्या साखर, तीन वाट्या पाणी, दोन वाट्या हापूस आंब्याचा रस,अर्धा छोटा चमचा वेलची पूड,सजावटीसाठी वाटीभर हापूस आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी , ५-६ काजू पाकळ्यांचे काप, ५-६ बदामांचे काप,१०-१२ बेदाणे.
कृती : गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून त्यात बारीक रवा मंद आचेवर गुलाबी रंगावर खमंग आणि खरपूस भाजल्याचा सुवास सुटे पर्यंत भाजून घ्या.दुसऱ्या भांड्यात पाणी उकळून घेऊ ते भाजलेल्या रव्यात घाला.रवा शिजून घट्ट होऊ लागला की त्यात साजूक तूप, साखर आणि हापुसच्या आंब्याचा रस घालून झार्याने ढवळून व मिक्स करून घ्या व अजून थोडा वेळ शिजवा. वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करून दोन मिनिटापर्यंत वाफवून घ्या.
सर्व्हिस प्लेटमध्ये वाटीने गरमागरम शिरा मुदीसारखा काढून घ्या व वर हापूस आंब्याचे छोटे तुकडे आणि काजू,बदामांचे काप आणि बेदाणे यांनी सजावट करून नंतर गरमागरम सर्व्ह करा.

Saturday, 17 May 2025

ज्वारीचे आप्पे

 

ज्वारीचे आप्पे



नाश्त्यात  ज्वारीचा समावेश केल्याने शरीरातील लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. तर ज्वारीचे सेवन केल्याने शरीरास प्रोटिन्स देखील उपलब्ध होतात. ज्वारीच्या भाकरी सोबतचं ‘ज्वारीचे आप्पे' तुम्ही कधी खाल्ले आहेत का?

नाही ना, मग ही रेसिपी तुमच्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चमचमीत 'ज्वारीचे आप्पे' कसे बनवायचे याची रेसिपी.

ज्वारीचे आप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

एक वाटी ज्वारीचे पीठ

एक  गाजर (किसून)

एक कांदा (बारीक चिरून)

चवीनुसार हिरवी मिरची (बारीक चिरून)

इनोज फ्रूट सॉल्ट (अर्धे पाउच)

मूठभर पोहे (भिजवलेले)

खोबर्याचे तुकडे किंवा ओल्या खोबऱ्याचा चव

अर्धी वाटी दही

एक चमचा आले आणि लसूण पेस्ट

मूठभर कोथिंबीर (बारीक चिरलेली)

एक चमचा तिखट मसाले

ज्वारीचे आप्पे बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एक मोठा कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरुन घ्या. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेले गाजर, आले लसूण हे एकत्र करून घ्या. त्यात ज्वारीचे पीठ घालून ते एकत्र मिसळून घ्या. गरजेनूसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या. यानंतर त्यात दही घालून पीठ १५-२० मिनीटे मुरण्यासाठी बाजूला ठेवा. नंतर त्यात पोहे घालून मिश्रण एकत्रीत करा. त्यात इनो टाका.

आता आप्पे पात्राला तेल लावून तयार केलेल मिश्रण आप्पे पात्रात थोडे थोडे टाका. आप्पे पूर्ण शिजल्या नंतर गरम गरम आप्पे पूड  चटणीसह एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही गरम गरम ज्वारीचे आप्पे खाऊन  त्यांचा आनंद घेऊ  शकता.