Search This Blog

Thursday, 26 December 2019

पोह्यांची उकड

#पोह्यांची #उकड

पोहे म्हणजे माझे जीव की प्राण! पोह्यांचा कोणताही प्रकार असो मला खुपच आवडतो.अशीच पोह्यांची उकडही अप्रतिम लागते.
साहित्य : दोन वाट्या जाडे पोहे (कांदा पोहयासाठी आपण जे वापरतो ते), दोन वाट्या आंबटसर ताक, चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या, कढिपत्त्याची ८-१० पाने, दोन चमचे तूप, एक चमचा जीरे, दहा बारा लसूण पाकळ्या, थोडं आलं किसून, मीठ, चिमुटभर हळद,अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर व सजावटीसाठी बारीक शेव.
कृती : अर्धा तास आगोदर जाड पोहे पाण्याने धुवूनचाळणीत ठेवावे. अर्ध्या तासाने धुतलेले पोहे आणि यात जरूरीनुसार आंबट ताक घालून मिक्सरवर फिरवून घ्या.जास्त फिरवून अगदी लगदा/पेस्ट करू नका. दुसरीकडे कढईत तूप घालून तापत ठेवा.तूप चांगले तापल्यावर त्यात जीरे, मिरचीचे तुकडे, सोललेल्या लसूण पाकळ्या घाला. लसूण चांगली तांबूस होऊद्या. तोपर्यंत तयार मिश्रणात मीठ, हळद मिसळून घ्या.लसूण तळली की कढीपत्त्याची पाने घाला. आता तयार मिश्रण फोडणीत ओता. उरलेले ताक घाला. किसलेले आले घाला. गरजेनुसार पाणी घाला. ढवळून एक वाफ काढा. गरमागरम उकडीवर साजूक तूप व बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक शेव घालून सर्व्ह करा.

Sunday, 22 December 2019

बेलफळाचे सरबत

बेलफळाचे सरबत


बेलफळ हे अमृत फळ आहेच.मधुमेहात बिघडलेल्या चयापचय क्रियेत मोलाची साथ देतो.पोटाचे तसेच पूर्ण शरीराची स्वच्छता होते..
उन्हाळ्यात अमृतफळ बेलाचे सरबत पिण्याचे खूप  फायदे होतात.
साहित्य : चार पूर्ण पिकलेली बेलफळे,दोन वाट्या साखर,एका लिबाचा रस,एक छोटा चमचा वेलची पूड,-५ केशराच्या काड्या, चिमूटभर मीठ.
कृती : बेलफळे फोडून चमच्याने बेलफळांच्या आंतला गर काढून घ्या. एका बाऊलमध्ये बेलफळाचा गर घेऊन त्यात याच्या दुप्पट साखर,एका लिंबाचा रस,चिमूटभर मीठ,वेलची पूड ,केशराच्या काड्या व जरुरीप्रमाणे पाणी आणि बर्फाचे तुकडे घालून मिक्सरच्या ब्लेंडरमध्ये फिरवून सरबत बनवा.
सव्हिंग ग्लासेसमध्ये काढून पुदिन्याच्या पांनानी सजावट करून सर्व्ह करा.


Friday, 20 December 2019

कलिंगडाचे पोळे - तवस (डोसा/ #धिरडे)




साहित्य : कलिंगडाचा लाल भाग खाल्यानंतर उरलेला पांढरा भाग किसून घ्यावा, हा कीस दोन वाट्या, तांदूळ दोन वाट्या, एक वाटी किसलेले ओले खोबरे, चवीपुते मीठ व तेल.
कृती : प्रथम तांदूळ धुऊन घ्यावे,मग त्यात कलिंगडाचा कीस व ओल्या नारळाचा चव घालून मिक्‍स करून दहा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर मिक्सरवर वाटून घ्यावे व चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे.
गॅसवर तवा तापत ठेवावा. तव्यावर तेल सोडून डावाने पीठ पसरून पोळे काढावे. उलटून भाजून घ्यावेत. कोणत्याही चटणीबरोबर गरम पोळे सर्व्ह करावे.

Tuesday, 17 December 2019

इडलीचा उपमा



इडलीचा उपमा


साहित्य : मऊ स्पोंजी इडलीचा भरड असा चुरा,भाजलेले शेंगदाणे,मटार दाणे किंवा मका दाणे ,चवीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे,मीठ,साखर,बारीक चिरलेली कोथिंबीर, कढी पत्ता,लिंबाचा रस व फोडणीसाठी तेल,हळद,जिरे,मोहरी,हिंग.
कृती : कढईत फोडणीसाठी तेल टाकून तापल्यावर त्यात मोहरी,जिरे,हळद,हिंग,कढीपत्याची पाने,हिरव्या मिरच्यांचे तुकडे,भाजलेले शेंगदाणे टाका व परतवून झाल्यावर त्यात इडलीचा भरड केलेला चुरा,चवीनुसार मीठ ,साखर व लिंबाचा रस टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल असे हलवून घ्या,कढईवर एक ताट झाकून ताटात थोडे पाणी घाला व एक वाफ येऊ द्या.ताट काढल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा ५ मिनिटे झाकून ठेवा व नंतर डिशमधून सर्व्ह करा.

Sunday, 6 October 2019

साबुदाणा-रवा उत्तप्पा

साबुदाणा-रवा उत्तप्पा

साहित्य : एक वाटी बारीक रवा,एक वाटी साबुदाणा, एक मोठा कांदा,एक मोठा टोमॅटो,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,चवीप्रमाणे मीठचिमूटभर साखर,५-६ कढीपत्त्याची पाने,अर्धी मूठ कोथिंबीर,आवश्यकतेनुसार तेल.
कृती : डोसे करण्यापूर्वी दोन तास साबुदाणा भिजत घालून ठेवा. १०=१५ मिनिटे अगोदर रवा भिजत घातला. दोन तासानंतर भिजलेला साबुदाणा मिक्सर फिरवून घेतला आणि तो भिजत घातलेल्या रावयात मिक्स केला. मग ह्या पिठात चिरलेला कांदा ,टोमॅटो,हिरवी मिरची, कोथिंबीर ,चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर,कढीपत्ता सगळं घालून पीठ पुन्हा मिक्स करून घेतलं. पीठ थोडेसे जाडसर ठेवले आणि आणि डोस्यासारखं तव्यावर घातलं . ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.