Search This Blog

Saturday, 23 August 2025

#मिक्स_व्हेजिटेबल_सुप

आजच्या जेवणापूर्वी भूक प्रज्वलित व्हावी यासाठी घ्यायचे अॅपेटायजर #मिक्स_व्हेजिटेबल_सुप



अतिशय पौष्टिक आणि जेवणाअगोदर प्यायल्यामूळे भूक वाढवणारे (Appetizer) असे हे स्वीट कॉर्न मिक्स व्हेजिटेबल सूप (Sweet Corn Mix Vegetable Soup) घरच्या घरीच बनवायला अतिशय सोप्पे आहे.
साहित्य : एक वाटी अमिरिकन कोवळे मक्याच्या कणसाचे दाणे (स्वीट कॉर्न) , गाजराचा कीस किंवा बारीक चिरलेले तुकडे ,फ्लॉवरचे बारीक चिरलेले तुकडे ,कोबीचा कीस,मटारचे दाणे,कांदापात व लसूणपात दोन्ही बारीक चिरून , दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर , दोन टेबल स्पून अमूल बटर , दोन चीज क्यूब (किसून)
कृती : गॅसवर एका फ्राय पॅनमध्ये अमेरिकन कोवळे मक्याच्या कणसाचे दाणे अमूलच्या बटर मध्ये परतून व नुसत्या वाफेवर उकडून घ्या नंतर आणखीन अमूल बटर घालून गाजराचा कीस किंवा बारीक चिरलेले तुकडे ,फ्लॉवरचे बारीक चिरलेले तुकडे ,कोबीचा कीस,मटारचे दाणे,कांदापात व लसूणपात सुद्धा परतून व वाफवून घ्या.
दुसरीकडे गॅसवर कॉर्नफ्लावर व पांच कप पाणी घालून उकळायला ठेवा. पांच मिनिटे उकळून दाटपणा आल्यावर त्यात फ्रायपॅन मध्ये वाफवून ठेवलेले मका दाणे व इतर भाज्या घाला आणि ५ मिनिटे शिजू द्या.
५ मिनीटे शिजवल्यावर गॅस बंद करून वर किसलेले चीज टाका.

गरम-गरम पौष्टिक स्वीट कॉर्न मिक्स व्हेजिटेबल सूप बाऊलमधून सर्व्ह करा. 

पोह्याचे जाळीदार डोसे

 पोह्याचे जाळीदार डोसे



पोहे – १ मूठ भरून

दही – अर्धी वाटी

बेकिंग सोडा – अर्धा चमचा किंवा इनो पावडर

रवा – पाव वाटी

पाणी- जरुरीनुसार

मीठ – चवीनुसार

आले,लसूण,मिरची व कोथिंबीर यांचे वाटण 

 

कृती : एका पॅनमध्ये पोहे घेऊन त्यात रवा , दही आणि आले,लसूण,मिरची व कोथिंबीरीचे वाटण एकत्र करून  

त्यात  चवीनुसार मीठ घालून बनवून १५-२० मिनिटे मुरत ठेवा.

मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.

यानंतर बेकिंग सोडा घालून मिक्स करा.

तव्यावर डावाने जाळीदार डोसे घाला.

  पोह्याचे जाळीदार डोसे तय्यार !

विशेष सूचना : तव्यावर डोशाचे मिश्रण टाकण्याआधी तेल तव्याला लावायला विसरू नये, जेणेकरून तव्याला डोसे चिकटणार नाहीत.


Wednesday, 13 August 2025

मेतकूट पोहे

 #मेतकूट_पोहे



मेतकूट पोहे करायला अगदी सोप्पे असतात.
साहित्य :आपले नेहमीचे कांदा पोह्याचे जाड पोहे,मेतकूट,दही किंवा लिंबाचा रस,मिरच्या,साखर,मीठ,कोथिंबीर,फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद
कृती : प्रथम एका चाळणीत पोहे घालून स्वच्छ धुवून घ्या आणि ५ मिनिटे पाणी निथळत ठेवा.
पाणी निघून गेले की त्यात मेतकूट,चवीनुसार बारीक चिरून हिरव्या मिरच्या,साखर,मीठ,दही किंवा लिंबाचा रस घालून हाताने कालवा व छान मिक्स करून ५ मिनिटे मुरत ठेवा.
दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या आणि तेल चांगले तापले की त्यात मोहरी,जिरे व शेवटी हळद घालून तडका फोडणी बनवा. आता त्यात मसाला लावून मुरत ठेवलेले पोहे घालून कलथ्याने हालवत रहा व फोडणीत छान परतून घ्या.
आता त्या पोह्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा. पोहे वाफेवर छान शिजू द्या.
५ मिनिटांनी पॅन वरचे झाकण काढून डिशमध्ये पोहे काढा आणि सर्व्ह करा.
मेटकूटामुळे पोह्याला एक वेगळीच चव येते.

Sunday, 10 August 2025

भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी


भिजवलेला साबुदाणा,काकडी,कच्च्या बटाट्याचा कीस याची खिचडी



 

 


आज सकाळी नाश्त्यासाठी आम्ही केली होती भिजवलेला साबुदाणा,काकडीचे काप ,कच्च्या बटाट्याचा कीस यांची खिचडी. एकदम अफलातून झाली होती.

त्याचीच ही सचित्र रेसीपी येथे शेअर करत आहे.   

साहित्य : साबुदाणा (५-६ तास भिजवून) ,काकडी (चिरून बारीक तुकडे),कच्चा बाटा (किसून) ,शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर (बारीक चिरून) ,लिंबाचा रस,साखर,तिखट व मीठ,फोडणीसाठी संजून तूप ,जिरे व फोडणीचे इतर साहित्य

कृती : ५-६ तास छान भिजवलेला साबुदाणा,एका कच्च्या बटाट्याचा कीस, एक काकडी बारीक शिरून,कोथिंबीर बारीक चिरून ,शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट,साजूक तूप ,जिरे

एका मोठ्या स्टीलच्या तसराळ्यात भिजवलेला साबुदाणा,कचहया बटाट्याचा कीस आणि बारीक चिरलेली काकडी व कोथिंबीर,शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार लिंबाचा रस,साखर,मीठ व तिखट सगळे एकत्र करून हाताने चांगले मिक्स करून मुरण्यासाठी झाकून ठेवावे.

गॅसवर एका पॅन  मध्ये फोडणीसाठी तूप घालून ते चांगले तापले की त्यात जीरे घालून ते तडतडल्यावर त्यात मुरत ठेवलेले साबुदाणा आणि इतर वस्तू मिक्स करून ठेवलेले सारण घालून कलथ्याने छान  परतावे. पॅनवर झाकण ठेवून छान वाफ काढून साबुदाणा शिजवून घ्यावा.

पुन्हा त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पॅनवर झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.

वाफ जिरली  की झाकण काढून कलथ्याने एकदा परतून घेऊन खिचडी सर्व करावी .

टिप : असेल तर वर ओल्या नारळाचा चव भुरभुरावा.

आम्ही आजची खिचडी बायो-गॅसवर केली