Tuesday, 6 December 2016

चिंचेचे सारचिंचेचे सार

साहित्य : लाडवाएवढा चिंचेचा गोळा,अर्धाडाव तेल,एक चमचा मोहरी,एक चमचा जिरे,एक छोटा चमचा हिंगपूड,एक   चमचा  लाल मिरचीचे तिखट,चवीनुसार मीठ,चार चमचे गूळ,दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा खोवलेला चव,५-६ कढीपत्त्याची पाने,३-४ लाल सुक्या मिरच्या,अर्धी मूठ  बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : सुरवातीला एक तास आधी एका पातेल्यात चिंचेचा गोळा एक वाटीभर गरम पाण्यात भिजत घालून ठेवावा. एक तासानंतर त्यात आणखी वाटीभर गरम पाणी घालून चिंच कुस्करून कोळ काढून घ्यावा व सूती  फडक्यावर किंवा चाळणीवर गाळून घ्यावा. त्यात आणखी दोन वाट्या गरम पाणी घालून पातेले गॅसवर ठेवावे.
दुसरीकडे गॅसवर एका कढल्यात तेलाची फोडणी करून त्यात मोहरी व जिरे घालून ते दोन्ही चांगले तडतडल्यावर  कढीपत्त्याची पाने व लाल सुक्या मिरच्या घालून दोन मिनिटे परतून घेऊन शेवटी हिंग व हळद घालून काही सेकंड परतावे आणि मग ती तडका फोडणी गॅसवर पातेल्यात  असलेल्या चिंचच्या कोळावर ओतावी. मग त्या चवीनुसार तिखट व मीठ घालून पाच-सात मिनिटे सार चांगले उकळू द्यावे. चिंचेचा उग्र असा कच्चट वास गेला की गूळ घालावा. मंद आंचेवर सार पांच मिनिटे उकळले की त्यात ओल्या नारळाच्या खोवलेला चव  व बारीक चिलेली कोथिंबीर घालून आणखी एखादे मिनिट उकळून घेऊन गॅस बंद करावा व सार गॅसवरून खाली उतरावावे.
हे सार, मुगाची खिचडी किंवा डाळ व भात यांच्या बरोबर खूपच स्वादिष्ट लागते.