Search This Blog

Saturday, 13 August 2016

उपवासाच्या पुरणपोळ्या



उपवासाच्या पुरणपोळ्या

साहित्य : २-३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,एक वाटीभर साजूक तूप,दोन वाट्या राजगिरा पीठ ,एक वाटी साखर , प्रत्येकी १०-१२ बदाम व काजूचे काप , एक छोटा चमचा वेलची पूड, दोन छोटे चमचे तेल.
कृती : उकडलेले बटाटे सोलून व चांगले कुस्करून (मॅश) घ्यावेत.एका कढईत थोडेसे साजूक तूप गरम करावे.त्यात कुस्करलेला बटाटा घालून साधारण १० मिनिटे चांगला खरपूस परतून घ्यावा.परतत असताना खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.बटाटा परतल्याने त्याला ब्राऊन रंग आला की त्यात साखर, बादाम व काजूचे काप, वेलची पूड घालून पुरण बनवून घ्यावे व थोडे थंड होऊ द्यावे.राजगिरा पिठात २ छोटे चमचे तेल व आवश्यकतेनुसार थोडेसे पाणी घालून छान नरम पीठ मळुन घ्यावे.या पीठाचे एकाच आकाराचे गोळे करून घ्यावे.या गोळ्याची पुरीच्या अकाराची पारी लाटून घ्यावी.
या पुरीची बोटांच्या साह्याने द्रोण/वाटी तयार करून घ्यावी.या द्रोणावर थोडे पुरण ठेवावे व पारीच्या सर्व बाजू बंद कराव्या व हा गोळा राजगिर्‍याच्या पीठात घोळून घ्यावा.पोळपाटावर गोल पोळी लाटून घ्यावी.
तवा गरम करून अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेली पोळी त्यावर घालावी.दोन्ही बाजुनी थडे तूप सोडून खरपुस भाजून घ्यावी. तव्यावर पोळीच्या आजूबाजूने साजूक तुपाची धार सोडावी.
गरमा गरम सर्व्ह करावी.

पालक चाट



पालक चाट





साहित्य : पालकाची मोठी पाने १५-२० नग, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, मैदा अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, काळे मीठ, दही १ वाटी, चिंचेची चटणी २ चमचे, पुदिन्याची चटणी २ चमचे (आलं-लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना याची चटणी), जिरे पावडर १ चमचा, तिखट चवीनुसार, उकडलेला बटाटा २ नग
कृती : पालकाची पाने स्वच्छ धुऊन ठेवावी. काही पाने निवडून त्याची गोल गुंडाळी करून लांब कापावे. त्यानंतर कॉर्नस्टार्च, मैदा, थोडेसे मीठ, बेकिंग पावडर एकत्र करून त्यामधे पाने बुडवून डीप फ्राय करा. बारीक लांब चिरलेल्या पालकामधे थोडा ओला पाण्याचा हात लावून यांनासुद्धा तळून घ्यावे. तळलेल्या पालकाच्या पानावर उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, दही, चिंचेची चटणी घालावी. वरून बारीक चिरलेल्या पालकाची भोव घालावी व लगेच सव्‍‌र्ह करावे.

Thursday, 11 August 2016

अंकुरीत मुगाचं सूप




अंकुरीत मुगाचं सूप


साहित्य एक वाटी अंकुरीत (मोड आलेले) अख्खे हिरवे मूग, एक मोठा  कांदा, २-३  लसणाच्या  पाकळ्या, चार वाट्या पाणी, चवीनुसार मीठ, सुपावर वरून घालायला थोडंसं लोणी.
कृती :  हिरवे अख्खे मूग भिजत घालून त्यांना अंकुरीत (मोड) करून घ्या. अंकुरीत मूगात  कांदालसूण घालून प्रेशर कुकर मधून शिजवून घ्या आणि मिक्सरला वाटून पेस्ट बनवून घ्या. त्यात पाणी व चवीनुसार मीठ घालून उकळा. वरून लोणी घालून प्यायला द्या. पाण्याचं प्रमाण आवडीनुसार वाढवा.
याच पद्धतीनं अंकुरीत अख्ख्या मसूराचेही सूप करता येईल.